मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर त्याच्या मुलाच्या “जहांगीर” या नावावरून ट्रोल झाला. या ट्रोलिंगने एवढे टोक गाठले की, चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका या पुढे न साकारण्याचा निर्णय घेतला. खरेतर मांडलेकर यांचा मुलगा जहांगीर हा आता ११ वर्षांचा आहे. आतापर्यंत मांडलेकर यांनी फर्जंद (२०१८), ‘फत्तेशिकस्त’ (२०१९), ‘पावनखिंड’ (२०२२), ‘शेर शिवराज’(२०२२), ‘सुभेदार’ (२०२३) आणि ‘शिवरायांचा छावा’ (२०२४) या सहा चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महराज यांची भूमिका साकारली आहे.
मांडलेकर हे २०१८ पासून म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून चित्रपटांमध्ये शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहेत. २२ एप्रिल २०२२ ला ‘शेर शिवराज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधी ‘हिंदुस्थान पोस्ट ‘ या यु ट्यूब वाहिनीवर चिन्मय मांडलेकर यांनी आपल्या मुलाचे नाव “जहांगीर” हे जे. आर. डी. टाटा यांच्या नवावरून ठेवण्यात आल्याचे सांगितले होते. त्यावेळी मात्र कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही आणि आता “जहांगीर” या नावावरून का बरे ट्रोल करावेसे वाटले असावे?
याला निमित्त ठरले चिन्मय मांडलेकर यांची पत्नी नेहा मांडलेकर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ. त्यात त्या सांगताना दिसतात कि, “काही दिवसांपूर्वी चिन्मय यांनी एक मुलाखत दिली होती आणि त्यानंतर त्यांना ट्रोल केले जाऊ लागले.” तर मांडलेकर यांनी ‘अजब गजब’ या यु ट्यूब वाहिनीवर एक मुलाखत दिली होती. “धर्म निरपेक्षता म्हणजे तुमच्या मते काय?” असा प्रश्न मांडलेकर यांना मुलाखत घेणाऱ्याने केला असता ते म्हणाले “राजकीय यंत्रणा आणि धार्मिक विश्वास हे वेगवेगळे असावे.” ते पुढे म्हणाले घराच्या चार भिंतींच्या आत आपला धर्म पाळला पाहिजे. घराच्या बाहेर समाजात वावरताना आपण सगळे भारतीय नागरिक आहोत. त्याच प्रमाणे मतदानाविषयी म्हणाले कि, “मी नेहमी न चुकता मतदान करतो. नेहमी वेगवेगळ्या पक्षांना मतदान केले आहे. जो काम करतो त्यालाच मतदान करतो. खूप विचारपूर्वक मतदान करतो आणि ‘नोटा’चे बटण कधी दाबत नाही.” समाजातील प्रश्नांबाबत मुलांसोबत चर्चा कशा प्रकारे करता, या प्रश्नावर मांडलेकर म्हणाले “मुलांना रोज वर्तमानपत्र वाचायला सांगतो, त्यांना नेहमी सांगतो प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करून निष्कर्षाप्रत या, फक्त अंधभक्त होऊ नका”.
कदाचित मांडलेकर यांंची ही मते धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना पटली नसावीत त्यातही लोकसभा निवडणूक तोंडावर असताना तर मुळीच पचली नसावीत. “शिवरायांची भूमिका करतोस आणि मुलाचे नाव जहांगीर कसे ठेवतोस?” “पाकिस्तानात जा”, “नाव जहांगीर ठेवलं आता खान पण लाव”, “सुंता नाही केली का?” इत्यादी प्रश्न त्याला कमेंटद्वारे विचारले जाऊ लागले. कोणी कोणते कपडे घालायचे, काय खायचे, कुणाशी लग्न करायचे, पाल्यांची नावे काय ठेवायची हे व्यक्तीचे वैयक्तिक निर्णय असतात. पण समाजातील अनेकांना इतरांचै वैयक्तिक निर्णय पटत नाहीत. यात कोणताही धर्म मागे नाही. प्रत्क्क धर्मातील काही लोक इतर धर्मांचा द्वेष करतात. त्यांना स्वत:चाच धर्म श्रेष्ठ वाटतो. किंबहुना कोणतीही धर्मातल्या कट्टर/सांप्रदायिक व्यक्तीला असेच वाटते.
हेही वाचा : खासदार बिनविरोध कसे काय निवडले जातात? इतिहास काय सांगतो?
ट्रोल करणाऱ्यांचे म्हणणे शिवरायांची भूमिका करणाऱ्याने आपल्या मुलाचे नाव “जहांगीर” ठेवू नये. का? तर ते मुस्लीम नाव आहे. खरे तर जहांगीर हे नाव मुस्लीम नाही ते पर्शियन आहे. तसेच मांडलेकर यांनी सांगितल्या प्रमाणे जे. आर. डी. टाटा यांचे नाव देखील जहांगीर होते. आता टाटाची उत्पादने घेणे हे ट्रोल बंद करणार आहोत का? अलीकडे “शिवाजीमहाराज मुस्लीमविरोधी होते असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतो. हेच जणू सत्य आहे असे लोकांच्या मनावर बिंबविले जाते.
साताऱ्यात पुसेसावळी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे धार्मिक दंगल झाली होती, ज्यात एकाला जीव गमवावा लागला. शिवाजी महाराज महाराष्ट्रातील लोकांसाठी खूप संवेदनशील विषय आहे. या भावनेचा वापर काहीजण राजकीय हेतू सध्या करण्यासाठी करताना दिसतात. रंग से पेहेचान लेंगे म्हणणरे आता चक्क शिवरायांच्या नावे जणू “नाम से पेहेचान लेंगे” म्हणत धार्मिक ओळख महत्वाची आहे हे लोकांच्या मनावर बिंबवत असल्याचे दिसते. हे चित्र पाहिल्यावर मनात प्रश्न येतो की, या ट्रोलर्सनी छत्रपती शिवरायांबद्दलचे एक पुस्तक तरी वाचले असेल का? त्यांना खरच शिवराय समजले आहेत का?
हेही वाचा : विदर्भ: अनुशेष हा शब्द गायब पण वास्तव तेच..
शिवरायांनी धर्म, जात, भाषा किंवा पंथ, लिंग यावरून भेदभाव न केल्याचा घटना इतिहासात नमूद आहेत. राजे शिवाजी यांचा लढा हा औरंगजेब मुघल होता मुस्लीम होता म्हणून नव्हता तर तो जुलमी होता, आपल्या शेतकऱ्यांवर अन्याय करत होता, गोरगरिबांवर अन्याय करत होता म्हणून होता. शिवरायांचा लढा एका अन्यायकारी ताकदीशी होता इस्लामशी नव्हे. म्हणूनच तर त्यांच्या सैन्यात अनेक मुसलमान मावळे होते. इब्राहीम खान हे शिवरायांच्या तोफखान्याचे प्रमुख होते तर दौलत खान यांच्याकडे कोकण किनारपट्टीच्या रक्षणाची जबाबदारी दिली होती. तर मदारी मेहतर हा त्यांचा अत्यंत विश्वासातील माणूस होता. त्यानेच राजांची आग्र्याहून सुटका करण्यासाठी प्राण पणाला लावले.
शिवरायांचे स्वराज्य गरीब, रंजलेले, गांजलेले, शेतकरी, स्त्रिया अशा सगळ्यांनाच सन्मानाची वागणूक देणारे आहे. प्रत्येक मावळ्याला त्यांच्या आस्थांचे पालन करण्याचे स्वातंत्र्य देणारे आहे. उदाहरणादाखल रायगड किल्ल्याच्या बाजूला भगवान जगदीश्वर मंदिराच्या बाजूलाच त्यांनी एक मशीदही बांधली होती जेणेकरून मुस्लीम मावळे त्यांच्या आस्थेची जोपासना करतील. कुराण असो, मशीद असो वा स्त्रिया, त्यांना इजा न करण्याची सक्त ताकीद शिवरायांनी मावळ्यांना दिली होती. आणि त्याचे पालन होईल याची ते कठोरपणे दक्षता घेत असत.
हेही वाचा : पश्चिम महाराष्ट्र: सहकार चळवळ दशा आणि दिशा
औरंगजेबाच्या पदरी सुरुवातीला हिंदू मनसबदारांचे प्रमाण हे २१.६ टक्के होते ते पुढे ३१.६ टक्के इतके वाढले. शहाजहानच्या राज्यात हे हिंदू मनसबदारांचे प्रमाण २२.४ टक्के होते तर अकबराच्या पदरी पाचशेहून अधिक मनसब असणारे जेवढे सरदार होते त्यात हिंदू सरदारांचे २२.५ टक्के होते. शिवराय हिंदू धर्माचे पालन करीत पण ते धर्मांध नव्हते. बाबाजी निंबाळकर व नेताजी पालकर हे मुस्लीम होऊन काही वर्षे लोटल्यानंतर शिवरायांकडे आले, तेव्हा त्यांनी दोघांनाही हिंदू करवून घेतले. निंबाळकरासोबत कोणीच सोयरिक जुळवण्यास तयार नव्हते, तेव्हा शिवरायांनी स्वत:ची मुलगी देऊन सोयरिक जुळवली. खरेतर शिवराय हे कोणत्याच व्यक्तीचा जाती- धर्माच्या नावावर द्वेष करत नव्हते. आपल्याला संविधानाने दिलेल्या धर्म व विश्वास स्वातंत्र्याची संकल्पना, छत्रपती शिवाजी राजेंनी तर १७ व्या शतकातच अमलात आणली असल्याचे दिसते.
मग जे शिवरायांचे नाव घेऊन हिंदुत्व, भगवा, औरंगजेब इत्यादींच्या नावे राजकारण करतात ते खरेच शिवरायांच्या वाटेवर चालत आहेत का? ते इतर धर्मांतील लोकांचा त्यांच्या धार्मिक ग्रंथांचा, धार्मिक स्थळांचा शिवरायांप्रमाणे आदर करतात का? शिवरायांबद्दल त्यांच्या मनात आदर आहे का? खरेतर शिवरायांकडून खूप शिकण्यासारखे आहे. अशा वेळी “शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत” असे जेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी म्हटले तेव्हा या हिंदुत्ववादी शिवराय प्रेमींना का चीड आली नाही?
हेही वाचा : मराठवाडा: होय, आम्ही पैसे पाण्यात घालतो!
अभिनेता चिन्मय मांडलेकर यांना होणारे ट्रोलिंग म्हणा किंवा समाज माध्यमांवर पसरवले जाणारे संदेश म्हणा हे खरेच शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी आहेत का, त्यांच्या नावावर राजकीय स्वार्थ साधण्याची ही धडपड आहे?
mithilaraut1@gmail.com