धीरज वाटेकर

कोकणातील लोककलांचे वैविध्य चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरिवद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्या वतीने आजपासून चार दिवस (५ ते ८ फेब्रुवारी २०२३) चिपळुणातील श्रीजुना कालभैरव मंदिर ट्रस्ट अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानात ‘पर्यटन लोककला सांस्कृतिक आणि कोकणी खाद्य’ महोत्सवात सादर होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि पालकमंत्री ना. उदय सामंत, महोत्सवाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष ‘कृषिभूषण’ डॉ. तानाजी चोरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. कोकण प्रदेश हा सांस्कृतिक परंपरेने आणि लोककलेने समृद्ध आहे. नागरीकरण न झालेल्या आदिवासींसह ग्रामीण जीवनातील कलांना आपण ‘लोककला’ (फोकआर्ट) ही संज्ञा योजिली आहे. निसर्गरम्य कोकणासह जगात जेथे लोककलाविष्कार आहेत तेथे आजही निसर्गसंवाद साधणाऱ्या लोकसमूहांचे अस्तित्व आहे. कोकणातील होळी आणि गणेशोत्सव महत्त्वाच्या उत्सवांशी पारंपरिक लोककला निगडित आहेत. कोकणभूमीत लोककलांचे वैविध्य लपलेले आहे. बदलत्या काळात ‘पर्यटन’ अंगाने विचार करता या साऱ्याची ‘मूल्यवृद्धी’ होऊन लोककलांना ‘राजाश्रय’ मिळायला हवा आहे. त्यादृष्टीने भव्य उत्सवी वातावरणात लोककलांचे वैविध्य समूहमनावर बिंबवायला वाचनालयाचा प्रयास अभिमानास्पद आहे.
रानात जाऊन गवळदेवाचा (पिंपळ तत्सम वृक्षाखाली पूजा करून रानात जेवण बनवणे) नैवेद्य करण्याची प्रथा आजही कोकणात टिकून आहे. आपल्या पाळीव जनावरांची काळजी घेणाऱ्या या निसर्ग देवतेप्रति प्रामाणिक श्रद्धेची भावना त्यामागे आहे. यातून निसर्गाची जपणूकही होत असते. देवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावातल्या सगळय़ांनी एकत्र जमून केलेलं सहभोजन ही सामाजिक एकोप्यासाठी उपयुक्त आहे. कोकणात भातलावणी संपल्यावर घरोघरी गणपती येत असतात. तेव्हा इथला सर्वसामान्य शेतकरी मनुष्य मोकळा असतो. पुढे याच भाताची कापणी आणि मळणी संपल्यावर कोकणाला शिमग्याचे वेध लागतात. या काळातील कोकणी ‘लोककला’ इथल्या मातीला नवीन नाहीत. या लोककला लोकांच्या दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. जात्यावरची ओवीगीते, बाळाला जोजवण्याची गीते, सण-उत्सवातील नृत्यनाटय़े, देवतोपासना म्हणून काढली जाणारी चित्रे, शिल्पे, रांगोळी हेही सारे पारंपरिक लोकजीवनाचा घटक आहेत. याद्वारे होणाऱ्या सौंदर्यनिर्मितीचा इथल्या निर्मात्याला कायम आनंद मिळत आला आहे. लोककलांचा महोत्सव म्हणून आयोजकांची त्यात डोकावणारी सखोलता, कार्यपद्धतीचे वैविध्य आणि दस्तऐवजीकरण करण्याचा आग्रह याबाबी अधिक महत्त्वाच्या ठराव्यात. काळानुरूप कोकणातील जवळपास साऱ्या लोककलांच्या वेशभूषा, प्रकाशयोजना आणि वाद्यवृंदात झपाटय़ाने ‘रंगीतसंगीत’ बदल होताहेत. यामुळे मूळ कलाप्रकार हरवण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन वाचनालयाने महोत्सवात शत-प्रतिशत पारंपरिकतेला न्याय देण्याचा प्रयत्न करते आहे. अस्सल परंपरा ‘वर्धिष्णू’ करण्यासाठी असे प्रयत्न आवश्यक ठरावेत. दशावतारी नाटके, अनेक सोंगे घेऊन येणारे ‘नमन’ लोकनृत्य, शक्तीतुरा, शिमगा पालखीतील ग्रामदेवतेचे मुखवटे, प्रतिमा आणि त्याला जोडलेली विशिष्ट तालावर पालखी नाचवणारी लोकनृत्य, संकासुर-गोमू, मनाला नवी ऊर्जा देणारी, उजव्या पायात चाळ बांधून भरजरी कपडय़ांनी सजलेली, पारंपरिक सामूहिक नृत्याचा आविष्कार असलेली जाखडी आदी सारे इथल्या लोककलेचे आविष्कार आहेत. पालखी नाचवणे हा नृत्याचा अभिनव प्रकार आपल्याला फक्त कोकणातच पहायला मिळतो. पालघरमधील आदिवासी पावसाला विनवणी करणारा ‘कांबड’ नाच (कांबडय़ा) करतात. कोकणात मासेमारी करणाऱ्या गाबीत समाजात घुमटाचा फाग हा लोककलेचा नाटय़प्रकार प्रसिद्ध आहे. कोकणातील चित्रकथी-कळसूत्री बाहुल्यांनी ‘पद्म’ सन्मान मिळवला आहे. पण असं असलं तरी याही पलीकडे कोकणात गोंधळी, गज्जानृत्य, सापाड, चित्रकथी, तारफा, घोरनृत्य, काटखेळ, नकटा, डेरा, घोरीप आदी असंख्य ‘लोककला’ आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्या कलांना, कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम हा महोत्सव करतो आहे. अनेक प्रकारच्या बहुविध लोककलांनी आपली भूमी संपन्न आहे. कालानुरूप या लोककला लोप पावत चालल्या आहेत. अंधश्रद्धा बाजूला सारून सकस प्रयोगात्मक लोककला जिवंत राहाण्यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. कोकणातील गणेशोत्सवात ‘जाकडी’नृत्य म्हणजे शक्तीतुरा हे इथल्या संस्कृतीचे ठसकेबाज वैशिष्टय़ ठरावे. इथल्या श्रमजीवी शेतकरी वर्गाचा हा हक्काचा नृत्यप्रकार आहे. शक्ती-तुरा हे दोन्ही फड आळीपाळीने पौराणिक ग्रंथ पुराणांच्या आधारे खास गाण्यांच्या चालीवर एकमेकांना प्रश्न टाकून त्याची उत्तरे पटवून देत असतात. नृत्य पथकातील तरुण पायात चाळ बांधून कमरेला ठुमका देत हातापायांची वेगाने हालचाल करत आणि ढोलकीच्या तालावर नृत्य साथ देत असतात. नमन, दशावतार लोककला कलात देवतांचे मुखवटे धारण करून त्यांची पूजा केली जाते. परमेश्वराची महती गाऊन कृपा संपादन करणे हा या मागचा हेतू असतो. प्रत्येक गावात लोककलावंतांचे देवाचे खेळे असतात. आपल्या चित्रपटसृष्टीने असंख्य अभिनेते पाहिलेत. पण कोकणात विशेष कोणतेही शिक्षण न घेता अनुभव आणि अवलोकनातून प्रामाणिकपणे लोककला सादर केली जाते. कोकणभूमीने शतकानुशतके जोपासलेला लोककलेचा हा गाभा आपल्याला या महोत्सवात अनुभवता येणार आहे.

gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
Arjun Erigaisi
व्यक्तिवेध : अर्जुन एरिगेसी
Nagpur dance bar, dance bar customers ,
नागपूर : डान्सबारमध्ये आंबटशौकीन ग्राहकांसमोर अश्लील नृत्य; मुंबई-दिल्लीच्या वारांगना…
Khesari Lal Yadav
कोट्यवधींचा मालक असूनही ‘हा’ भोजपुरी अभिनेता जगतो साधं आयुष्य; मिरची अन् भाकरी खातानाचा फोटो व्हायरल
Loksatta natyrang  Personality Suryacha Pille Three act play Directed
नाट्यरंग: सूर्याची पिल्ले; वटवृक्षावरील बांडगुळांची अर्कचित्रात्मक शोकांतिका
pune pustak Mahotsav marathi news
‘पुणे पुस्तक महोत्सव’ का गाजला?

‘पर्यटन लोककला सांस्कृतिक आणि कोकणी खाद्य’ महोत्सवात कोकणातील खाद्यसंस्कृती, जाखडी : काल, आज आणि उद्या, रत्नभूमीतील लोककला, लोककला आणि स्त्री अभिव्यक्ती, नमनाचा अनुबंध आणि शाश्वत पर्यटन या विषयावरील परिसंवाद तसेच देवाला जागर-गोंधळ, संकासुर व गोमू, लौकवाद्य मैफल, गज्जानृत्य, उखाणे, सापाड, नमन, जाखडी, चित्रकथी, कुंभारकला, भेदीक शाहिरी, तारफा नृत्य, घोरनृत्य, दशावतार, काटखेळ, गौरी टिपरी व गोफ नृत्य, पोवाडा, नकटा, कोळी नृत्य, डेरा, पालखी नृत्य, मंगळागौर, कातकरी, मुस्लीम गीते, खालू बाजा, जलसा, वैदिक लग्नगीते, घोरीप, महिला दशावतार आदी चाळीसहून अधिक लोककला सादर होणार आहेत. महोत्सवांतर्गत स्थानिकांच्या लोककला कट्टय़ात ईशस्तवन, नमन, ओवी, गाऱ्हाणे, स्मरणगीत, ऐतिहासिक पोवाडा, कोकणी गीत, मुस्लीम लग्न, बारसे गीते, पारंपरिक गाणी, पारंपरिक नृत्य, आंबेडकरी गायनपार्टी, सांस्कृतिक गीत, बोलीभाषा संवादात्मक चर्चा, डांगी नृत्य, दिवली नृत्य, आंबेडकरी जलसा, वेसवा नृत्य, कोकणी संस्कृती, भारूड यांसह आष्टा येथील धनगरी नृत्याचे विशेषत्वाने सादरीकरण होणार आहे. चिपळुणातील या भव्य महोत्सवाची आयोजक संस्था, शतकोत्तर हीरकमहोत्सवी वर्षांचा वारसा लाभलेले संस्कारकेंद्र ‘लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर’ ही आहे. चिपळूण शहराला कोकणच्या सांस्कृतिक राजधानीचा दर्जा प्राप्त करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी, नि:स्पृह कार्यकर्त्यांचे बळ लाभलेली, संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील जिज्ञासूंमध्ये चिपळूणची ओळख सांगणारी, इथल्या श्रोत्यांना सजग आणि बहुश्रुत बनवून शहराचे सामाजिक भान उत्तम विकसित करणारी संस्था अशी तिची ओळख आहे. हे वाचनालय साहित्यिक, सांस्कृतिक अभिसरणाचे मुख्य केंद्र असावं असा व्यापक दृष्टिकोन ठेवून कार्य करते आहे. वाचनीय आणि श्रवणीय असलेले हे वाचनमंदिर आपल्या ‘वस्तुसंग्रहालय आणि कलादालन’ प्रकल्पांमुळे प्रेक्षणीय झाले आहे. संपूर्ण कोकणभूमी ही जशी स्वर्गीय निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तशी ती कलावंतांची भूमी म्हणूनही प्रसिद्ध आहे. इथल्या कलाकारांची साहित्य, कला, रंगभूमीशी घट्ट नाळ जुळलेली आहे. चित्रपट अंगाने याचा मेळ साधला जायला हवा आहे. कोकणात रंगभूमी, लोककला आणि साहित्याशी निगडित धडपड अलीकडे गांभीर्याने घेतली जाऊ लागली आहे. कोकणी माणसाचा मूळ पिंड कलेचा आहे. त्यातही हा माणूस नाटकवेडा आहे. कोकणात चित्रपटनिर्मितीला पोषक वातावरण आहे. कोकणात कलाकारांची मोठय़ा प्रमाणात उपलब्धता आहे. त्यांना चित्रपट अंगाने किमान जुजबी प्रशिक्षण मिळायला हवे आहे. ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटात कर्नाटकातील एका ग्रामदैवताची सेवा करणारा सेवेकरी गावकरी आणि जमीनदार यांच्यातील संघर्ष दाखवला आहे. विशेष म्हणजे यातून कर्नाटक राज्याच्या दक्षिण जिल्ह्यातील किनारपट्टीवरील ‘कोला’ उत्सवासह ‘भुता कोला’ प्रथा-परंपरा याचं अचूक चित्रण घडलं आहे. या प्रथेत भुताची म्हणजे ग्रामदेवाची पूजा केली जाते. हे दैवत गावाचं रक्षण करतं आणि त्यांच्या क्रोधामुळे काहीही अनर्थ होऊ शकतो अशी इथल्या गावकऱ्यांची मान्यता आहे. याबरोबरच ही कला सादर करणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून ती देवता ही गावकऱ्यांशी संवाद साधते असा तिथल्या लोकांचा विश्वास आहे. अशा लोककला कोकणातही खूप आहेत. उत्सवी वातावरणात, जनमानसाच्या पाठबळावर त्या तग धरून राहिल्या तर त्यांवरही भविष्यात प्रकाश पडू शकेल. पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणानंतर कोकणाचे सौंदर्य आणि चित्रपटसृष्टी हातात हात घालून चालू लागली तर इथल्या लोककलावंतांना चांगले दिवस येतील. तोवर या मंडळींनी तग धरावा यासाठी असे लोककला महोत्सव हे लोककलावंतांच्या जीवनातील जणू ‘पथदीप’ ठरावेत.

कोकणात ‘पर्यटन’ विकासाचे वारे स्थिरावत असताना लोककला, संस्कृती आणि खाद्यपदार्थाच्या वैविध्याला पर्यटनाशी जोडून नवा विचार देण्याचा प्रयत्न होतो आहे. जगभर आणि देशभर पर्यटन करताना आपण तिथल्या लोकसंस्कृतीचा पोशाख आवडीने परिधान करून आपलीच छायाचित्रे पैसे देऊन मुद्दामहून काढून घेत असतो. भविष्यात कोकणातील विविध लोककलांच्या ड्रेसचे पर्यटन अंगाने असे व्यावसायिकीकरण होण्याची आवश्यकता आहे. ‘पर्यटन’ अंगाने लोककलांची ‘मूल्यवृद्धी’ होऊन त्यांना ‘राजाश्रय’ मिळावा यासाठीही आगामी दस्तऐवजीकरणासह भव्य उत्सवी वातावरणात सर्वासमोर येत असलेले लोककलांचे वैविध्य समूहमनावर बिंबवण्याचा होत असलेला ‘महोत्सवी’ प्रयत्न स्वागतार्ह म्हणायला हवा.

लेखक, कोकण विकास, पर्यावरण-पर्यटन चळवळीतील कार्यकर्ते

Story img Loader