अंगभूत अभिनयकला अभ्यासपूर्वक प्रयत्नांनी, चौफेर निरीक्षणशक्तीची जोड देत जोपासणाऱ्या, वाढवणाऱ्या आणि शून्यातून स्वत:चे विश्व उभारणाऱ्या दिग्गज प्रतिभावंतांपैकी एक म्हणजे विक्रम गोखले. घरात अभिनयाचा वारसा आहे म्हणून कोणतीही गोष्ट सहजतेने मिळावी इतकी अनुकूल परिस्थिती त्यांच्या आजूबाजूला नव्हती, किंबहुना तशी ती असती तरी घराणेशाहीचा फायदा घेण्याची त्यांची वृत्ती नव्हती. त्यामुळे चंद्रकांत गोखले या कसलेल्या अभिनेत्याचा मुलगा ही ओळख असतानाही मुंबईत येऊन अभिनय क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना अमाप संघर्ष करावा लागला. कोणाच्या तरी घरी झोपण्यापुरती जागा मिळवत दिवसभर टॅक्सी चालवण्यापासून, विवाह सोहळय़ांमध्ये आईस्क्रीमची भांडी विसळण्यापर्यंत मिळेल ती कामे त्यांनी केली. मात्र या अथक संघर्षांतून सोनेरी यश मिळवल्यानंतरही आपल्या गरिबीचे, संघर्षांचे उदात्तीकरण त्यांनी कधीही, कोणासमोर केले नाही. त्यांच्या संघर्षांऐवजी कायमच त्यांचा अभिनय, त्यांच्या नाटक-चित्रपटातील भूमिका, त्यांनी वेळोवेळी मांडलेल्या वैचारिक भूमिका याचसाठी ते कायम चर्चेत राहिले.
विक्रम चंद्रकांत गोखले यांचा जन्म पुण्यातला. पुण्यातील भावे हायस्कूल आणि वि. र. वेलणकर हायस्कूल येथून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. तर, आताच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. अभिनय क्षेत्रातील त्यांचा प्रवेश हा बालकलाकार म्हणूनच झाला होता. ‘आग्य्राहून सुटका’, ‘राजसंन्यास’, ‘बेबंदशाही’ या नाटकांमधून त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ हे त्यांनी भूमिका केलेले पहिले व्यावसायिक नाटक होते. मात्र, खऱ्या अर्थाने ‘बॅरिस्टर’ या नाटकाने त्यांना चांगला नट म्हणून ओळख मिळवून दिली. ‘अपराध मीच केला’, ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘जास्वंदी’, ‘स्वामी’, ‘महासागर’, ‘जावई माझा भला’, ‘दुसरा सामना’ आदी नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.
सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपटातही देखणा नायक म्हणून त्यांचा प्रवेश झाला होता. ‘अनोळखी’ हा त्यांचा मराठीतील नायक म्हणून पहिला चित्रपट. ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ या चित्रपटातील त्यांची नायकाची भूमिका रसिक कधीही विसरणार नाहीत. १९८९ मधील ‘कळत नकळत’ आणि १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘माहेरची साडी’ या दोन्ही मराठी चित्रपटांतही त्यांच्या वेगळय़ा भूमिका होत्या. ‘कुंकू’, ‘मुक्ता’, ‘लपंडाव’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. ‘वजीर’ (१९९४) या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना त्यावेळचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. त्याच वेळी त्यांनी हिंदी चित्रपटातूनही भूमिका केल्या.
अमिताभ बच्चन यांनीही आपल्याला विक्रम गोखलेंबद्दल प्रचंड आदर असल्याचे जाहीरपणे मान्य केले आहे. दिग्दर्शकाच्या भूमिकेतूनही त्यांनी स्वत:ला आजमावून पाहिले. डॉक्टरी पेशावर आधारित कथेवर ‘आघात’ या २०१० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. विजया मेहता यांच्या मुशीतून तयार झालेल्या विक्रम गोखले यांना विजयाबाईंनी पुन्हा त्यांच्या शिष्यांना एक तास द्यावा, त्यांचे काम पाहावे, त्यांनी नटांना सूचना द्याव्यात आणि ज्या पध्दतीने पाश्चात्त्य रंगभूमीवर नाटक शिकून घेण्याची प्रक्रिया चिरंतन घडत राहते त्या पध्दतीने इथेही जुन्याजाणत्या आणि नव्या कलाकारांमध्ये देवाणघेवाण व्हावी, असे वाटत होते. तसा मानसही त्यांनी बोलून दाखवला होता. अखेपर्यंत चांगल्या भूमिका करत राहण्याची भूक त्यांच्यात होती.
नटसम्राट चित्रपटातील त्यांची छोटेखानी भूमिका असो, करोनाकाळात प्रदर्शित झालेला त्यांचा ‘एबी आणि सीडी’ असो किंवा गेल्याच आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या ‘गोदावरी’ चित्रपटातील त्यांची काहीही न बोलता फक्त नजरेतून खूप काही सांगून हृदयस्पर्शी भूमिका असो.. आपल्या सहज अभिनयाने रसिकांना थक्क करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही.
गाजलेली नाटके
एखादी तरी स्मितरेषा, कथा, कमला, कल्पवृक्ष कन्येसाठी, के दिल अभी भरा नही, खरं सांगायचं तर, छुपे रुस्तम, जावई माझा भला, दुसरा सामना, नकळत सारे घडले, पुत्र मानवाचा, बॅरिस्टर, मकरंद राजाध्यक्ष, महासागर, मी माझ्या मुलांचा, संकेत मीलनाचा, समोरच्या घरात, सरगम, स्वामी’
मराठी चित्रपट
मॅरेथॉन जिंदगी, आघात, आधारस्तंभ, आम्ही बोलतो मराठी, कळत नकळत, ज्योतिबाचा नवस, दरोडेखोर, दुसरी गोष्ट, दे दणादण, नटसम्राट, भिंगरी, महानंदा, माहेरची साडी, लपंडाव, वजीर, वऱ्हाडी आणि वाजंत्री, वासुदेव बळवंत फडके, सिद्धांत, मुक्ता
हिंदी चित्रपट
अकेला, अग्निपथ, अधर्म, आंदोलन, इन्साफ, ईश्वर, क्रोध, खुदा गवाह, जज़्ाबात, तडीपार, थोडासा रूमानी हो जाय, हम दिल दे चुके सनम, हसते हसते, सलीम लंगडे पे मत रो, हे राम
‘न नट’ ते विजयाबाईंचा बॅरिस्टर..
मी नाटकाशी संबंध नसलेला ‘न नट’ होतो. कोणी तरी विजयाबाईंच्या कानावर घातले की ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकातील इतर कलाकारांपेक्षा वेगळा वाटणारा, अभिनय करतो आहे असे न वाटणारा विक्रम नावाचा एक कलाकार आहे. त्या अभिप्रायावरून बाईंनी मला बोलवून घेतले. बॅरिस्टर हे नाटक जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा दामू केंकरे ते दिग्दर्शित करत होते. बाईंना जेव्हा ही भूमिका माझ्याकडे आली आहे हे कळले तेव्हा त्यांनी मला तू ही भूमिका करू नकोस असे सांगितले. तू एक बरा नट आहेस, मात्र बॅरिस्टर समजून घ्यायला तू अजून लहान आहेस, असे त्यांनी सांगितले. ज्यांना मी माझ्या गुरू मानतो, त्यांनीच मला असे सांगितले. तेव्हा वाईट वाटले होते. नंतर बाईंनी हे नाटक दिग्दर्शित करायला घेतले आणि तू या नाटकात नाहीस, हे निक्षून सांगितले तेव्हा मी खूप रडलो. त्यानंतर काही दिवसांनी अगदी नाईलाज आहे म्हणून तुला या भूमिकेसाठी बोलावते आहे, असा बाईंचा फोन आला आणि माझा या नाटकात पुन्हा प्रवेश झाला. पहिल्या अंकाच्या शेवटाला बॅरिस्टरला वेडाचा झटका येतो, असा प्रसंग आहे. तेव्हा काय करायचे हे माझ्या लक्षात येईना. बाई म्हणाल्या, मला असे प्रश्न विचारू नकोस. शेवटी सांगितले की, तुझ्यावर प्रेम करणारी तुझी बायको वेडी झाली आहे असे समज.. आणि काय होते आहे तुझ्या मनात ते बघ. अशा पध्दतीने मला तो सूर सापडला.
मान्यवरांची श्रद्धांजली
माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या विक्रमचे जाणे क्लेषदायी आहे. अभिनेता म्हणून त्याची उंची ठरवायला एक ‘बॅरिस्टर’ नाटक पुरेसे आहे. पण, या राजिबडय़ा आणि समर्थ अभिनेत्याला मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीनेही तोलाच्या भूमिका दिल्या नाहीत.
– अमोल पालेकर
‘बॅरिस्टर’ हे जयवंत दळवी यांच्या कादंबरीवर आधारित नाटक विक्रम गोखले यांनी केले. या नाटकातून त्याला सूर सापडला. १९७० नंतरच्या काळात रंगभूमीवर त्याने स्वत:चे स्वतंत्र अभिनयाचे घराणे निर्माण केले असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
– सतीश आळेकर
विक्रम, मी कायम तुझ्यासमोर नतमस्तक होतो.. असेन.. तुझ्यासारखा कलावंत आणि माणूस होणे नाही..
– नाना पाटेकर
मराठी रंगभूमीवरील अत्यंत महान अभिनेत्यांपैकी एक अभिनेता गेल्याचे दु:ख आहे. त्यांची एक खासियत म्हणजे नाटक सादर करताना त्यांची भूमिका झाली तरी ते नाटकातून बाहेर पडत नव्हते.
– विजय केंकरे
विक्रम गोखले यांचे निधन झाले ही बातमी ऐकून खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या निधनामुळे एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे मराठी नाटय़सृष्टी आणि चित्रपटसृष्टीने एक चतुरस्र नट गमावला आहे.
– अशोक सराफ
विक्रम गोखले यांच्या जाण्याने कलाक्षेत्र पोरके झाले आहे. आमची कलाकारांची पिढी त्यांना गुरुस्थानी मानते. ते आम्हा कलाकारांसाठी अभिनयाची शाळाच होते. – अश्विनी भावे
विक्रम गोखले यांना कलेविषयी
प्रचंड प्रेम होते. त्याचे अभिनयाबद्दल व्यापक वाचन होते. अशा परिपूर्ण माणसाचा मला सहवास लाभला, हे मी माझे भाग्य समजते.
– नीना कुलकर्णी
बोलके डोळे, प्रभावी उच्चारशैली आणि संवादफेक.. आमच्या पिढीसाठी ते अभिनयाची शाळाच होते. त्यांची एक वेगळी शैली होती आणि आता त्या शैलीचा अभिनेताच नाही.
– अलका कुबल
विक्रम काकांसोबत एका मालिकेत आणि चित्रपटात काम केले होते. त्यांच्यासोबत काम करताना त्यांच्या डोळय़ात बघूनच आम्ही शिकत होतो.
– सुकन्या मोने
आम्ही ‘नकळत सारे घडले’ या नाटकाचे जवळजवळ ७०० प्रयोग आणि ‘संकेत मिलनाचे’ या नाटकाचे दोन-अडीचशे प्रयोग एकत्र केले. एका सह कलाकाराने कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे विक्रम होता.
– स्वाती चिटणीस
प्रयोगादरम्यान कोणाचीही अक्षम्य चूक झाली तरी त्यांचा तोल ढळत नसे. प्रयोगादरम्यान कितीही अडचणी आल्या तरी धैर्याने, कुठलेही दडपण – भीती न बाळगता अगदी चिडलेल्या प्रेक्षकांसमोर, गुंडांसमोर ते जात असत. नाटकांच्या दौऱ्यांदरम्यान विक्रम गोखले आपल्याबरोबर आहेत ही जाणीवसुद्धा दिलासा देणारी असायची.
– शेखर ढवळीकर
ते माझे अभिनय क्षेत्रातील गुरू. आज मी नट म्हणून सगळय़ांसमोर आहे तो केवळ त्यांच्यामुळे. दिग्दर्शक म्हणून त्यांनी मला प्रोत्साहन दिले.
– अद्वैत दादरकर
(‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात विजयाबाईंनी नट म्हणून कसे घडवले याबद्दल त्यांनी सांगितलेली आठवण)