राखी चव्हाण

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान बदलावर जगभरात विविध माध्यमांतून कितीही चर्चा घडून आली, तरीही तो नियंत्रणात आणण्यात अजूनही यश आलेले नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम जेवढे माणसांवर होत आहेत, तेवढेच ते आता प्राण्यांवरदेखील होऊ लागले आहेत. माणसांवर होणाऱ्या दुष्परिणामांवर आजतागायत अनेक अभ्यास झाले, पण प्राण्यांवरील आणि प्रामुख्याने तरुण प्राण्यांवरील अभ्यास दुर्लक्षिले गेले. सिडनीतील ‘न्यू साऊथ वेल्स’ विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानंतर हवामान बदलावर माणूस खरेच गांभीर्याने विचार करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या अभ्यासातून तरुण आणि जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना, जलचार प्राण्यांपेक्षा वाढत्या तापमानाचा वाईट पद्धतीने सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे.

सिडनीतील ‘न्यू साऊथ वेल्स’ विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात ‘एक्टोथर्म्स’ म्हणजेच थंड रक्ताच्या प्राण्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, यात पृथ्वीवरील ९९ टक्क्यांपेक्षा अधिक प्राण्यांचा समावेश आहे. मासे, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, कीटक यांचा समावेश या प्राण्यांमध्ये आहे. या प्राण्यांच्या शरीराचे तापमान बाहेरील तापमानाला परावर्तित करत असल्याने उष्णतेच्या लाटांमध्ये त्यांच्या शरीरातील तापमान धोकादायक पद्धतीने वाढू शकते. या वर्षी भारतात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण दुपटीने वाढलेले आढळून आले, पण त्याचबरोबर कधी नव्हे ते अमेरिकेसारख्या देशातही तापमान वाढलेले दिसून आले. हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा तीव्र होत आहेत आणि त्याचेच हे परिणाम आहेत. ‘कॉप’सारख्या परिषदा असोत, वा पॅरिस करार, यात हवामान बदलाविरुद्ध लढा तीव्र करण्याविषयी कितीही चर्चा घडून आल्या तरी, त्यात आपण अपयशी ठरलो आहे, हे या अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

माणसांवर या बदलत्या हवामानाचे तीव्र परिणाम जाणवत असताना आता प्राणीदेखील त्यात गुरफटले गेले आहेत. तरुण आणि थंड रक्ताचे प्राणी या बदलत्या वातावरणात स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्याच प्रजातीतील प्रौढ प्राण्यांपेक्षा हे तरुण प्राणी या बदलत्या हवामानात अधिक असुरक्षित झाले आहेत. तापमान वाढीच्या जगात तापमानाशी जुळवून घेण्याची या प्रजातींची क्षमता महत्त्वाची असते. तरुण आणि थंड रक्ताचे प्राणी मात्र त्यांचा अधिवास गरम झाल्यानंतर या वाढत्या उष्णतेशी सामना करण्यासाठी संघर्ष करतात. हवामान बदलामुळे जैवविविधतेवर त्याचे नाट्यमय परिणाम होतात. माणसांनाच नाही तर आता प्राण्यांनादेखील नुकसान पोहोचवणारी आपत्तीजनक तापमान वाढ रोखण्यासाठी हरितगृह वायू उत्सर्जन तातडीने कमी करण्याची गरज आहे. मात्र, त्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या प्रयत्नात आपण कमी पडत आहोत. या हवामान बदलासाठी माणूसच जबाबदार आहे आणि त्याचे परिणाम आता प्राण्यांना देखील भोगावे लागत आहेत. या प्राण्यांना वाचवायचे असेल तर त्यांच्यासाठी थंड अधिवास त्यांना द्यावाच लागेल आणि तो कायम राखावा लागेल.

‘एक्टोथर्म्स’ म्हणजेच थंड रक्ताच्या प्राण्यांच्या शरीराचे तापमान अत्यंत परिवर्तनशील असते. त्यांच्या अधिवासातून बाहेर पडल्यानंतर बाहेरच्या परिस्थितीनुसार त्यांच्या शरीराचे तापमान बदलत असते. उष्णतेच्या लाटेदरम्यान शरीराचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्यातच त्यांचा मृत्यूदेखील होऊ शकतो. थंड रक्ताच्या प्रजाती पिढ्यान् पिढ्या विकसित होऊन कालांतरणाने त्यांच्या वातावरणातील आव्हानाशी जुळवून घेऊ शकतात. मात्र, जागतिक तापमान ज्या वेगाने वाढत आहे, त्या तुलनेत हे अनुकूलन वेगाने होत नाही. अनेक तरुण प्राणी हे हालचाल करण्याची क्षमता गमावू शकतात. परिणामी ते थंड तापमानाच्या जागेचा शोध घेऊ शकत नाहीत. तीव्र उष्णतेच्या लाटांमध्ये तरुण प्राणी असुरक्षित होतातच, पण उच्च तापमानाला ते कसे अनुकूल होऊ शकतात याबाबतही अभ्यास करण्यात आला आहे. जगभरातील १३८ ‘एक्टोथर्म्स’ म्हणजेच थंड रक्ताच्या प्राण्यांच्या प्रजातींवर हा अभ्यास आहे.

भ्रूण आणि नवजात थंड रक्ताच्या प्राण्यांमधील तापमान सहन करण्याच्या क्षमतेत फार वाढ झालेली नाही. ०.१३ अंश सेल्सिअसनेच त्यात वाढ झाल्याचे अभ्यासकांना दिसून आले. जलचर प्राण्यांमध्ये उष्णता सहन करण्याची क्षमता ही जमिनीवरील प्राण्यांपेक्षा अधिक आहे. जमिनीवरील प्राण्यांमध्ये उष्णतेशी जुळवून घेण्याची क्षमता विकसितच झालेली नसते. क्वचितच एखाद्या प्रजातींमध्ये उष्णता सहन करण्याची क्षमता बदलू शकते. म्हणजेच एखाद्या प्राण्याने त्याच्या एकूण जीवनकाळात कोणत्या तापमानाचा अनुभव घेतला आहे आणि ते तापमान सहन करण्याची त्यांची क्षमता किती प्रमाणात वाढली आहे, यावरच ते अवलंबून असते. एखादा तरुण प्राणी कधीतरी उच्च तापमानाच्या संपर्कात आला असेल आणि त्याला भविष्यातील उच्च तापमानाचा सामना करावा लागला असेल तर ते त्यात तग धरू शकत नाहीत, असेही हा अभ्यास सांगतो. भ्रूण हे अतिउष्णतेसाठी अधिक असुरक्षित समजले जातात. तरुण आणि थंड रक्ताचे प्राणी आधीच वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी संघर्ष करत आहेत आणि त्याचा त्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. हवामान बदलाचा प्राण्यांवर होणारा परिणाम अभ्यासताना आजतागायत प्रौढ प्राण्यांवरच लक्ष केंद्रित करण्यात आले. मात्र, त्याही आधीपासून म्हणजेच तरुण असताना किंवा भ्रूणावस्थेत असतानाच उष्णतेच्या लाटेमुळे त्यांना नुकसान होऊ शकते. मुळातच आपण हवामान बदलामुळे जैवविविधतेला होणाऱ्या नुकसानीला कमी लेखून त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

पॅरिस करारात भारतासह अन्य काही देशांनी जागतिक हरितगृह वायू उत्सर्जन विशिष्ट कालावधीपर्यंत कमी करण्याचे आश्वासन दिले, पण त्या दृष्टीने होणारे प्रयत्न संथ आहेत. माणूस हवामान बदलापासून स्वत:चा बचाव करू शकतो, पण आता या प्राण्यांच्या बचावासाठी माणसाला पुढे यावे लागणार आहे. या प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांचा अधिवास कसा थंड राहील, या दृष्टीने माणसाला प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी झाडे लावणे, गुहा, तलाव आदीची व्यवस्था त्यांच्या अधिवासात करावी लागणार आहे. असा परिपूर्ण अधिवास तयार करूनच तो संरक्षित करावा लागणार आहे. तरच तापमानवाढीच्या या जगात प्राणी तग धरू शकतील. अन्यथा काही कालावधीनंतर त्यांचे अस्तित्वदेखील आढळून येणार नाही.

rakhi.chavhan@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cold blooded species are more vulnerable in global warming said study report of new south wales asj