प्रेमदास वाडकर
एखादी संस्था १०० वर्षाचा टप्पा पार करत असेल ही त्याच्याशी संबंधित घटकांसाठी फार मोठी अभिमानाची बाब ठरते. पारतंत्र्यात उदयाला आलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आजच्या जागतिकीकरणाच्या युगातही कालोचित पैलूंनी विकसित होत आहे. कितीतरी उमलत्या मनांना या ज्ञानसंस्थेने आकार दिला आहे. कित्येकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करीत नवे आकाश, नवे क्षितिज दिले आहे. यंदाच्या ४ ऑगस्टला शंभर वर्षे पूर्ण करणाऱ्या नागपूर विद्यापीठाचा इतिहास देखील गौरवशालीच राहिला आहे. या विद्यापीठातून शिक्षण घेत अनेक नामवंत निर्माण झाले आहे. नवीन संकटे तसेच आव्हानांचा सामना समर्थपणे करीत विद्यापीठाचा विकास अधिक भरभराटीने होताना दिसत आहे.
४ ऑगस्ट १९२३ रोजी नागपूर विद्यापीठाची स्थापना झाली. मात्र त्यापूर्वी जवळपास २० वर्षे त्यासाठी प्रयत्न होत होते. १९१४ च्या सुमारास त्या दिशेने पहिले पाऊल पडले. सॅडलर कमिशनच्या अहवालानंतर एका अधिकृत समितीची स्थापना झाली आणि विद्यापीठाची निर्मिती करण्याबाबत प्राथमिक प्रयत्नांना आरंभ झाला. पहिल्या महायुद्धाची झळ पोहोचली असताना १९२० नंतर या प्रयत्नांना पुन्हा चालना मिळाली. छत्तीसगड, जबलपूर, रायपूर, विदर्भ आणि वऱ्हाड प्रांत या विशाल भागासाठी एक विद्यापीठ स्थापन करण्याचे निश्चित झाले. १९२३ साली संमत झालेल्या कायद्यानुसार नागपूर विद्यापीठ अस्तित्वात आले. मध्य प्रांताचे सरकार आणि त्यामधील शिक्षण मंत्री रावबहादुर एन. के. केळकर यांचे यात मोठे योगदान होते. सर फ्रँक स्लाय यांच्यासारखे कुलपती आणि सर बिपिन कृष्ण बोस यांच्यासारखे संस्थापक कुलगुरू विद्यापीठाला लाभले. विद्यापीठ म्हणजे सरकारचे एक डिपार्टमेंट नव्हे. ‘विद्यापीठाचा प्रमुख उद्देश व कार्य म्हणजे शिकवणे आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे हे होय.’ ही स्वातंत्र्यपूर्व काळात विद्यापीठाच्या धोरणाची प्रमुख सूत्रे होती. विद्यापीठाची अत्यंत साधेपणाने सुरुवात झाली. विद्यापीठाची निर्मिती झाली त्यावेळी प्रथम दोन महत्त्वाची पदे निर्माण करण्यात आली. एक कुलगुरूंचे आणि दुसरे कोषाध्यक्षांचे. बिपिन कृष्ण बोस हे पहिले कुलगुरू तर व्ही. एम. केळकर हे पहिले कोषाध्यक्ष होते.
सर जमशेदजी टाटा यांनी दिलेल्या एक लाख रुपयांच्या देणगीतून विद्यापीठाची मूळ वास्तू उभी राहिली. १९३५ च्या सुमारास विद्यापीठाला एक प्रकारची स्थिरता प्राप्त झाली. त्यानंतर संवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. भौगोलिकदृष्ट्या फार मोठा भूप्रदेश विद्यापीठाच्या अधिपत्याखाली येत असला तरी प्रत्यक्षात हाताच्या बोटावर मोजता येईल एवढीच महाविद्यालये संलग्न होती. यामध्ये मॉरिस कॉलेज, हिस्लाॅप कॉलेज, किंग एडवर्ड कॉलेज, रॉबर्टसन कॉलेज आणि स्पेन्सर ट्रेनिंग कॉलेज यांचा समावेश होता. सहा महाविद्यालये, ९१७ विद्यार्थी आणि ४ विद्याशाखा हे विद्यापीठाचे आरंभीचे चित्र होते. विद्यापीठासाठी जागा नसल्याने नागपूरकरांच्या दातृत्ववृत्तीला आवाहन करण्यात आले. सुरुवातीला जेथे जागेचा प्रश्न होता तेथे आज २६३ एकर जागेवर विद्यापीठाचा भव्य परिसर आहे. अनेक आकर्षक आणि देखण्या वास्तूंनी हा परिसर नटलेला आहे. १९७२-७३ च्या काळात संपूर्ण विदर्भात महाविद्यालयांची संख्या शतक पार करून गेली. महत्त्वाच्या शहरांमध्ये, तालुक्याच्या गावीही महाविद्यालये उघडण्यात आली. १९७३ ते ८३ या दहा वर्षाच्या काळात संलग्न महाविद्यालयांची संख्या १३९ वर गेली. त्यावेळी विद्यापीठाच्या नियंत्रणात चार महाविद्यालय ३१ शैक्षणिक विभाग होते नोंदणीकृत विद्यार्थी ६३ हजार १४० तर एकूण परीक्षार्थींची संख्या १ लाख १३ हजार वर गेली होती. १ मे १९८३ ला नागपूर विद्यापीठामधून अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली. त्यावेळी विदर्भाच्या आठ जिल्ह्यांपैकी चार जिल्हे अमरावती विद्यापीठाकडे गेले. जवळपास अर्धा भाग नागपूर विद्यापीठाच्या अखत्यारीतून गेला. ४ मे २००५ पासून नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. १३ डिसेंबर २००५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत नामविस्तार कार्यक्रम अतिशय भव्य पणे साजरा करण्यात आला. २ ऑक्टोंबर २०११ पासून चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांचा समावेश असलेले गोंडवाना विद्यापीठ हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठापासून वेगळे झाले. आता पुन्हा लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेला लक्ष्मीनारायण अभिमत तंत्र विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला आहे. लक्ष्मीनारायण तंत्र संस्था देखील विद्यापीठापासून स्वतंत्र होत आहे. अशा स्थितीत भौगोलिक दृष्टीने विद्यापीठाचा विस्तार कमी झाला. तथापि सातत्याने वाढणारी महाविद्यालयांची व विद्यार्थ्यांची संख्या इतकी मोठी आहे की व्याप कमी होत असल्याची जाणीवच होत नाही.
शहराच्या विविध ११ भागात या विद्यापीठाच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा पसरल्या आहेत. लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेचा परिसर, विधि महाविद्यालय परिसर, रामदास पेठेतील ज्ञान स्त्रोत केंद्राचा परिसर, शंकरनगरच्या भागातील गांधी भवनाचा परिसर, अंबा विहार परिसर या व्यतिरिक्त विद्यापीठाची संबंधित संलग्न महाविद्यालय हा सगळा व्याप लक्षात घेतला तर नागपूरच्या जनजीवनाचा किती मोठा भाग व्यापला आहे याची जाणीव होते. जिथे सहा महाविद्यालये होती तेथे आता ५१२ महाविद्यालये आहेत. विद्यार्थ्यांची संख्या हजारांवरून लाखांवर पोहोचली आहे. पहिल्या तीन दशकांमध्ये विद्यापीठाचा एकही पदव्युत्तर शिक्षण विभाग नव्हता, तिथे आज जवळपास ४८ पदव्युत्तर विभाग कार्यरत आहे.
क्रीडानैपुण्याचीही कदर
विद्यापीठांमध्ये क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग कार्यरत आहे. शहराच्या मध्यभागी रावबहादूर बी. लक्ष्मीनारायण परिसरात १४ एकरामध्ये क्रीडांगणे विकसित करण्यात आली आहेत. त्यामध्ये नव्याने तयार करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक व बॅडमिंटनसाठी राष्ट्रीय स्तरावरचे सुभेदार सभागृह यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात आल्याने नागपुरातील खेळाडूंना उच्च दर्जाच्या सोयीसुविधा प्राप्त होणार आहे. विद्यापीठाने सोळावी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमान पद देखील प्राप्त केले होते. महाराष्ट्राचे राज्यपाल व विद्यापीठांचे कुलपती यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने यंदा पुन्हा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा (अश्वमेध) आयोजित करण्याचा बहुमान विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. विद्यापीठाने २००० मध्ये दक्षिण आशियाई देशातील आंतर विद्यापीठ युवक महोत्सवाची देखील यशस्वी आयोजन केले आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील युवकांना व शेतकऱ्यांना लाभ व्हावा या हेतूने नागपूर विद्यापीठाने १९८८ मध्ये सेंटर फॉर सेलिकल्चर अँड बायोलॉजिकल पेस्ट मॅनेजमेंट रिसर्च या केंद्राची स्थापना केली. अमरावती मार्गावरील विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील व स्व. पी. व्ही. नरसिंहराव स्मृती ग्रंथालय हे गंभीर संशोधक व अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे त्याचप्रमाणे रामदास पेठ परिसरातील डॉ. वि. भि. उपाख्य भाऊसाहेब कोलते विद्यापीठ केंद्र हे अत्यंत दुर्मिळ व मौलिक ग्रंथ संग्रहासाठी विशेष प्रसिद्ध आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायान परिषदेमार्फत पुनर्मूल्यांकन करून विद्यापीठाला ‘अ’ दर्जा उच्च प्रदान केला आहे. शताब्दी महोत्सवी वर्षात ३ ते ७ जानेवारी २०२३ दरम्यान इंडियन सायन्स काँग्रेस व १९ ते २१ फेब्रुवारी २०२३ दरम्यान फार्मस्युटिकल सायन्स काँग्रेसचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे २१ सप्टेंबर २२ रोजी ‘स्वातंत्र्यसंग्राम में जनजातीय नायकों का योगदान’ या विषयावर भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याच कार्यक्रमात देशात पहिल्यांदाच ‘ट्रायबल सायन्स काँग्रेस’चे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रसंतांच्या कार्यात प्रसार प्रचार व्हावा म्हणून प्रथम साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत व्याख्यानमाला देखील सुरू करण्यात आल्या. नागपूर हे शैक्षणिक, उद्योग आणि वैद्यकीय क्षेत्राचे हब म्हणून विकसित होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता पारंपारिक शिक्षणासोबत व्यवसाय कौशल्याचे धडे देणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यापीठाने शंभरपेक्षा अधिक कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत सुरू केले आहे. परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करून श्रेयांक नोंदणी सुरू केली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील रोजगार लक्षात घेता फोर्ड कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. विद्यापीठात ‘डिफेन्स स्टडीज सेंटर’ सुरू केले असून त्यासाठी ‘आयुध निर्माण’शी करार केला आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि नोकरीची संधी यातून मिळणार आहे. रोजगार व प्रशिक्षण सेल निर्माण करून, विविध कंपन्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. शताब्दी वर्षात विद्यापीठाने ‘रीच टू अनरीच्ड’ हा उद्देश