ब्रिटनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या पार्लमेंटरी निवडणुकांत ऋषी सुनक आणि त्यांच्या हुजूर पक्षाचा पराभव झाला. सुनक यांनी तो अतिशय अदबीने स्वीकारला. ‘मला तुमचा रोष ऐकू येतोय. अनेक चांगल्या आणि मेहनती उमेदवारांच्या पराभवाची पूर्ण जबाबदारी मी घेतो,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. निकाल जाहीर होताच त्यांनी तातडीने पदाचा आणि दुसऱ्या दिवशी हुजूर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आणि पक्षातील इतर महत्त्वाकांक्षी नेत्यांसाठी पक्षातील सर्वोच्च स्थान रिक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऋषी सुनक यांनी पराभव ज्या पद्धतीने स्वीकारला, ते पाहून माझ्या आणि माझ्यासारखाच विचार करणाऱ्या अनेक भारतीयांच्याही मनातील त्यांची प्रतिमा कित्येत पटींनी उंचावली. नकळत मनातल्या मनात दोन प्रतिक्रियांची तुलना झालीच. एक म्हणजे सुनक यांची पराभवावरील प्रतिक्रिया आणि दुसरी- आपल्या लोकप्रिय पंतप्रधानांनी मागील निवडणुकीत जिंकलेल्या ३०३ जागांपेक्षा ६० जागा कमी मिळविल्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया.

हेही वाचा…के टू शिखरावरील चढाईदरम्यान एका हिमभेगेत तंबूशिवाय मुक्काम करणारा गिर्यारोहक…

या लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदी ‘चारसो पार’च्या बढाया मारत होते. त्यांनी देशभरातील अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उद्घाटनाचा धडाका लावला होता. त्यांच्या परिप्रेक्ष्यातून त्यांनी ‘देश पिंजून काढला’ होता. अयोध्येतील राममंदिराचे उद्घाटनही त्यांनी स्वतःच्या हस्ते केले होते. त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. त्यांनी भाजपचा बालेकिल्ला असलेले उत्तर प्रदेश हे राज्य गमावले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अयोध्येची जागादेखील गमावली. तेथील मतदारांनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या पारड्यात मते टाकली.

पण इतिहासात आपल्यावर सत्ता गाजविणाऱ्या वसाहतवादी ब्रिटनच्या पंतप्रधानांपेक्षा आपले पंतप्रधान अधिक उग्र भासले. मोदींनी ‘पराभव’ हा शब्दही उच्चारला नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय झाल्याचे दावे करत राहिले. त्यांनी चंद्राबाबू नायडू आणि सदैव बाजू बदलत राहणारे नितीश कुमार यांच्या पक्षांशी केलेल्या निवडणूकपूर्व आघाडीने त्यांना निम्म्या जागांपलीकडे नेले.

मोदी अतिशय आत्मविश्वासाने आपल्या सलग तिसऱ्यांदा झालेल्या विजयाचा डिंडिम वाजवत राहिले. त्यांच्यासाठी यात काही नवे नाही. भाजपशासित राज्यांत गोमांस भक्षक आणि गुरांचा व्यापार करणाऱ्यांची हत्या होणे, विविध आरोप असलेल्या मुस्लिमांची घरे आणि दुकाने फोडणे सुरूच आहे. लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याची अस्वस्थता त्यांनी अजिबात दिसू दिली नाही. भाजपने ही निवडणूक खरे तर मोदींच्या नावे लढविली. त्यामुळे त्यात आलेले अपयशही मोदींचे वैयक्तिक अपयशच होते. मात्र त्याबद्दल आपल्या सहकाऱ्यांना कोणतेही स्पष्टीकरण देण्याची गरज त्यांना भासली नाही.

हेही वाचा…गांधीद्वेष आजही का उरतो?

ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे आहेत. त्यांच्या कुटुंबाची पाळेमुळे पंजाबमध्ये रुजलेली आहेत. त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती या ‘इन्फोसिस’च्या संस्थापक नारायण मूर्ती यांच्या कन्या आहेत. त्या मुळच्या दक्षिण भारतातील कर्नाटकच्या आहेत. थोडक्यात दोघेही मू‌ळचे भारतीय. तरीही, आपल्या राजकीय कारकिर्दीला बसलेल्या फटक्यावरील दोघांच्या प्रतिक्रियांत लक्षणीय तफावत आहे. किंबहुना त्या परस्परविरोधी म्हणता येतील, एवढ्या वेगळ्या आहेत.

ऋषी सुनक हे हिंदू धर्माचे पालन करतात. त्यातील मूल्यांचे आचरण करतात. ते नम्र आणि संयमीही आहेत. त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जसे लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर मोदींवर त्यांचे नाव न घेता भाष्य केले, तसेच भाष्य सुनक यांच्याही व्यक्तिमत्त्वाविषयी आणि त्यांच्या वर्तनाविषयीही करावे. शेवटी, जगातील सर्व महान धर्मांची मूळ शिकवण सारखीच आहे. सर्वच धर्म नम्रता शिकवतात आणि अहंकार नाकारतात. खोटेपणा नाकारतात. मोबदल्याची अपेक्षा न करता करुणा आणि सेवेचा उपदेश देतात.

मग, आपले ‘देशी’ राजकारणीच इतर देशांत स्थलांतरित होऊन स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या भारतीयांपेक्षा एवढे वेगळे का असतात? ऋषी सुनक अशा देशाचे पंतप्रधान झाले ज्या देशाने दोन शतके वा त्याहून अधिक काळ आपल्यावर सत्ता गाजविली होती. ज्यांचे मातुल कुटुंब तामिळनाडूतून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते अशा कमला हॅरिस आज जगातील सर्वांत शक्तिशाली देशाच्या उपाध्यक्ष आहेत.

हेही वाचा…पुरस्काराआधीच पुस्तकवापसी…

अधिक चांगल्या राहणीमानाच्या शोधात पाश्चिमत्य देशांत स्थलांतरीत झालेल्या भारतीयांबरोबरच जगातील अनेक लहान देशांतही भारतीय वंशाचे नागरिक आढळतात. त्यांच्या पूर्वजांना वेस्ट इंडीज, मॉरिशस आणि फिजीमधील ब्रिटीशशासित वसाहतींत कापूस आणि उसाच्या शेतात मजूर म्हणून नेण्यात आले होते. सर सेवूसागर रामगुलाम हे त्यातील एक ठळक व्यक्तिमत्त्व. भारतीय वंशाचे सेवूसागर मॉरिशसचे पंतप्रधान होते. सर विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल, हे बिहारच्या एका खेडेगावातील दुबे कुटुंबातील होते. ते आज इंग्रजी भाषेतील महान लेखकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्याचे कुटुंब दोन शतकांपूर्वी वेस्ट इंडिजला स्थलांतरित झाले. ‘अ हाऊस फॉर मिस्टर बिस्वास’, ‘ॲन एरिया ऑफ डार्कनेस’, ‘इंडिया – अ वुंडेड सिव्हिलायझेशन’ इत्यादी पुस्तकांचे लेखन केलेल्या नायपॉल यांना साहित्याच्या नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते. भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांनी साध्य केलेल्या यशाचा भारतीयांना सामान्यपणे असतो, तसा अभिमान नायपॉल यांच्याविषयीही आहे. आपले पंतप्रधानही परदेशांत जातात तेव्हा तेथील भारतीय वंशाच्या व्यक्तींनी मिळविलेल्या यशाचे गोडवे गात असतात.

भारतात आता २०२९ पर्यंत मोदी सत्तेत राहतील हे निश्चित झाले आहे. त्यांनी २०१४ ते २४ या कालावधीत ज्या पद्धतीने कारभार केला, त्याच पद्धतीने यापुढेही करावा असे वाटते का? कारण यावेळी अवघ्या ३७-३८ टक्के मतदारांनी त्यांच्या पारड्यात मते टाकली आहेत, तर तब्बल ६२ ते ६३ टक्के मते त्यांच्या विरोधात गेली आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीत लक्षणीय बदल करणे अपेक्षित नाही का? विशेषत: त्यांच्या सध्याच्या कार्यकाळातील तिसऱ्या वर्षापासून किंवा महाराष्ट्रात भाजप पराभूत झाल्यास (ज्याची शक्यता दिसू लागली आहे.) दुसऱ्या वर्षापासूनही…

हेही वाचा…सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील खनिजे वाहून नेण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग?

सर्वप्रथम त्यांनी मुस्लीमद्वेषाचे राजकारण बंद केले पाहिजे. अशा स्वरूपाच्या राजकारणामुळे देशात भेदभावाला खतपाणी मिळत आहे. चीन सध्या आहे, त्यापेक्षा अधिक आक्रमक झाल्यास मुस्लीमद्वेष निश्चितच घातक ठरेल. अमेरिका सध्या आपल्या बाजूने असली, तरीही ही परिस्थिती धोक्याची ठरू शकते.

केवळ विरोधीपक्षांच्या नेत्यांवर आणि मोदींच्या विरोधकांवर कारवाई करण्याचा प्रचंड उत्साह असलेल्या ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांवर मोदींना नियंत्रण ठेवावे लागेल. तसे झाल्यास अन्य पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा ओघ आटेल, पण त्याच वेळी मोदींची पक्षांतर्गत प्रतिमा सुधारेल. सध्या आपला तो बाळ्या ही पक्षाची भूमिका टीकेचा विषय ठरत आहे. त्यात त्वरित सुधारणा न झाल्यास मोदींच्या प्रतिमेला आधी राष्ट्रीय स्तरावर आणि नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठा फटका बसेल.

हेही वाचा…शेतकऱ्यांना सक्षम करायचे आहे की कमकुवत?

तिसरे म्हणजे, त्यांनी लागू केलेले कायदे चांगले आणि जनहिताचे असले तरीही, त्यांनी ते नाट्यमयरित्या जाहीर करण्याची घाई करू नये. त्याऐवजी संबंधित तज्ज्ञांशी, धोरणकर्त्यांशी टप्प्याटप्प्याने चर्चा करावी आणि कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे होणाऱ्या परिणामांसाठी तयार रहावे. कृषी कायद्यांमुळे बसलेल्या फटक्याविषयी चिंतन करावे. अनेकांच्या मते ते कायदे हिताचे होते, मात्र सरकार त्यांचे लाभ शेतकऱ्यांना पटवून देण्यात कमी पडले. आपले व्यक्तिमत्त्व पुढच्या पिढ्यांच्याही स्मरणात राहावे, असे मोदींना वाटत असेल, तर त्यांनी एकवेळ त्यांना मते देणाऱ्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले तरी चालेल, मात्र किमान सरसंघचालकांचा सल्ला तरी ऐकावा.

(लेखक निवृत्त पोलीस अधिकारी आहेत.)

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comparing leadership rishi sunak s humble resignation vs narendra modi s aggressive approach psg
Show comments