– चिन्मय गवाणकर

दहावी बारावीनंतर पाल्याने अभियांत्रिकी शिक्षण घेण्याचे ठरवले असेल तर अर्थातच संगणक अभियांत्रिकी हा पहिला पर्याय बहुतांश पालक निवडू पाहतात. आज चाळिशीत असलेल्या पालकांच्या उमेदवारीच्या काळातील म्हणजे १९९० च्या दशकात संगणक अभियांत्रिकी ही अभियांत्रिकी शिक्षणाची एक अत्यंत प्रतिष्ठित आणि दुर्मीळ शाखा म्हणून ओळखली जात असे. असे पालक अजूनही त्या स्मरणरंजनातच आहेत हेदेखील ही शाखा निवडण्यामागचे मुख्य कारण आहे. त्यावेळी फक्त निवडक महाविद्यालयांमध्येच ही शाखा उपलब्ध होती आणि प्रवेश मिळवणे हे केवळ सर्वोत्तम विद्यार्थ्यांनाच शक्य होते. आज, २०२५ मध्ये संगणक अभियांत्रिकी सर्वाधिक लोकप्रिय आणि सामान्य अभियांत्रिकी शाखा बनली आहे, हजारो महाविद्यालये या शाखेत प्रवेश देत आहेत. एवढेच नव्हे तर या शाखेच्या संगणक अभियांत्रिकी विथ डेटा सायन्स /विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स /विथ रोबोटिक्स /विथ सायबर सिक्युरिटी वगैरे वगैरे भरपूर उपशाखासुद्धा निघाल्या आहेत.

संगणक अभियांत्रिकीच्या जागांची संख्या वाढलेली असताना यांत्रिक (मेकॅनिकल), स्थापत्य (सिव्हिल), विद्याुत (इलेक्ट्रिकल) आणि रासायनिक (केमिकल) अभियांत्रिकी यांसारख्या पारंपरिक शाखांमधील जागा कमी होत आहेत. या लेखात आपण गेल्या २५ वर्षांत या क्षेत्रात झालेले बदल, कॅम्पस नियुक्ती कल आणि संगणक अभियांत्रिकीचे भविष्य याबद्दल चर्चा करणार आहोत.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) आकडेवारीनुसार,१९९० च्या दशकात, संपूर्ण भारतात संगणक अभियांत्रिकीसाठी दहा हजारपेक्षाही कमी जागा उपलब्ध होत्या. हा आकडा विशेषत: १९९१ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणानंतर आणि मग इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या उदयानंतर वाढू लागला. सन २००० पर्यंत, वायटूके च्या कृपेने अमेरिकेत भारतीयांना भरभरून नोकऱ्या मिळू लागल्या आणि त्याकाळी (९/११ चा हल्ला होण्याच्या आधी) ग्रीन कार्ड आणि अमेरिकेचे नागरिकत्व सहज मिळायचे. त्यामुळे संगणक अभियांत्रिकी जागांची संख्या वाढून ५० हजारच्या जवळपास पोहोचली. २०१० पर्यंत, हा आकडा तीन लाखांपेक्षा जास्त झाला, तर २०२० पर्यंत, भारतात संगणक अभियांत्रिकीच्या जागांची संख्या सहा लाखांपेक्षा अधिक झाली. आज, २०२५ मध्ये, एआयसीटीईच्याअधिकृत आकडेवारीनुसार, देशभरात संगणक अभियांत्रिकी आणि संबंधित शाखांमध्ये (आयटी, एआय आणि डेटा सायन्स) दरवर्षी आठ लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत.

या विस्ताराचा अर्थ असा की १९९० मध्ये ज्या शाखेला ‘विशिष्ट’ आणि ‘अत्यंत प्रतिष्ठित’ म्हणून ओळखले जात असे, ती आता ‘सामान्य’ आणि ‘सर्वत्र उपलब्ध’ अशी झाली आहे. परिणामी प्रवेशाची स्पर्धा कमी झाली आहे, परंतु रोजगाराची विशेषत: ‘कॅम्पस प्लेसमेंट’ची स्पर्धा मात्र वाढली आहे.

पण संगणक अभियांत्रिकीची मागणी वाढली, तसतशी यांत्रिक, स्थापत्य, विद्याुत आणि रासायनिक अभियांत्रिकी या पारंपरिक शाखांमधील प्रवेश आणि जागांची संख्या कमी होत गेली, उदा. मेकॅनिकल इंजिनीयरिंग. अगदी १९९५-१९९८ पर्यंत ही हुशार विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची शाखा होती. मात्र आज काय स्थिती आहे ? या एआयसीटीईच्या आकडेवारीनुसार १९९५ मध्ये, यांत्रिक अभियांत्रिकीच्या जागा संगणक अभियांत्रिकीच्या तुलनेत तीन पट अधिक होत्या. २०१० पर्यंत, दोन्ही शाखांमध्ये जागा सारख्याच झाल्या, तर २०२५ पर्यंत, संगणक अभियांत्रिकीच्या तुलनेत यांत्रिक अभियांत्रिकीच्या जागा फक्त ४० टक्के इतक्या राहिल्या आहेत. विशेष म्हणजे, गेल्या १० वर्षांत, बऱ्याच महाविद्यालयांनी पारंपरिक अभियांत्रिकी शाखांमधील जागा कमी किंवा बंद करून संगणक अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्रांसाठी वापरल्या आहेत.

तसेच पूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयात हमखास मिळणारे कॅम्पस जॉब्ससुद्धा हल्ली दुर्मीळ झाले आहेत. गेल्या दहा वर्षांतील कॅम्पस भरती प्रवृत्तींचा अभ्यास करताना, मोठे बदल स्पष्ट दिसून येतात. नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अॅण्ड सर्व्हिसेस कंपनीज (NASSCOM) आणि भारतीय उद्याोग महासंघ (CII) च्या अहवालांनुसार:

२०१५ मधील स्थिती:

टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, कॉग्निझंट यांसारख्या मोठ्या आयटी कंपन्या प्रत्येकी ३० ते ४० हजार पदवीधरांना दरवर्षी नोकरी देत होत्या.

त्या वेळी सरासरी ८० टक्क्यांहून अधिक संगणक अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थी कॅम्पसवरून थेट नोकऱ्या मिळवत आणि बाकीचे सहसा उच्च शिक्षणासाठी जात.

कॅम्पसवर मिळणाऱ्या नोकऱ्यांचे सरासरी प्रारंभिक वेतन रु. ३.५ लाख ते ४.५ लाख प्रतिवर्ष होते. ते साधारण २००० सालापासून त्याच पातळीवर होते.

२०२० मधील स्थिती:

मोठ्या आयटी कंपन्यांची भरती २०-३० टक्क्यांनी कमी झाली.

केवळ ६० टक्के संगणक अभियांत्रिकी पदवीधरांनीच कॅम्पसवरून थेट नोकऱ्या मिळवल्या( पाच वर्षांत २० टक्के घट).

नवीन क्षेत्रे जसे की एआय, मशीन लर्निंग, आणि डेटा सायन्स उदयास आली होती, जिथे उच्च कौशल्य असलेल्या उमेदवारांना चांगले वेतन मिळत होते.

२०२५ (आजची स्थिती):

फक्त वरच्या श्रेणीतील आणि टॉप-टायर संस्थांमधील काही विद्यार्थ्यांनाच कॅम्पसवरून चांगल्या नोकऱ्या मिळतात. अगदी आयआयटी मुंबईतही गेल्या वर्षी सगळ्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत, ही बातमी प्रसिद्ध झाली होती!

केवळ ४०-४५ टक्के संगणक अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थीच कॅम्पसवरून थेट नोकऱ्या मिळवितात.

सामान्य प्रोग्रामिंग नोकऱ्यांचे वेतन स्थिर राहिले आहे किंवा घटले आहे (फुगवट्याचा विचार करता). २५ वर्षांपूर्वी कॅम्पसवर मिळणाऱ्या वार्षिक २.५ ते ३ लाख रुपयांच्या नोकऱ्या अजून त्याच श्रेणीमध्ये अडकल्या आहेत. महागाई निर्देशांक लक्षात घेता ही परिस्थिती किती दारुण आहे ते लक्षात येते.

विशेष कौशल्ये असलेल्या उमेदवाराच्या (एआय, क्वांटम कम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी) वेतनात लक्षणीय वाढ झाली आहे.

दरम्यान, पारंपरिक अभियांत्रिकी क्षेत्रातील कंपन्या चांगल्या प्रतिभेची भरती करण्यासाठी संघर्ष करत आहेत. लार्सन अँड टुब्रो, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) यांसारख्या संस्थांच्या अहवालांनुसार, त्यांच्यापुढील मुख्य आव्हान म्हणजे योग्य कौशल्य असलेले यांत्रिक, नागरी आणि विद्याुत अभियंते मिळणे.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या एचआर विभागाच्या एका अहवालानुसार: ‘‘गेल्या दहा वर्षांत, आम्हाला उच्च श्रेणीच्या यांत्रिक अभियंत्यांसाठी रिक्त पदे भरण्यासाठी तीन ते चार पटीने अधिक कॅम्पस भेटी द्याव्या लागतात, कारण अधिकांश प्रतिभावान विद्यार्थी संगणक अभियांत्रिकीची निवड करतात.’’

लार्सन अँड टुब्रोचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणतात: ‘‘बहुतांश महाविद्यालयांमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागाची जागांची संख्या इतकी कमी झाली आहे की आम्हाला आता आमच्या मूलभूत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक गुंतवणूक करावी लागत आहे. कारण पदवीधर आवश्यक तांत्रिक कौशल्यांसह येत नाहीत.’’

हे सर्व कमीच की काय म्हणून साधारण २०२२ मध्ये चॅट जीपीटीच्या झंझावाताने एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय वेगाने झाला. २०२३-२५ या काळात, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ऑटोमेशन तंत्रज्ञानाने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि आयटी उद्याोगावर लक्षणीय प्रभाव पाडला आहे. एआय-आधारित कोड जनरेशन टूल्स जसे की GitHub Copilot, CodeWhisperer, आणि अन्य लार्ज लँग्वेज मॉडेल्स (LLMs) साध्या प्रोग्रामिंग कामांना स्वयंचलित करू लागले आहेत . त्यामुळे फ्रेशर्सना प्रोग्रॅमर्स म्हणून घेण्याची गरज हळूहळू कमी होत चालली आहे .

नासकॉमच्या एका अध्ययनानुसार:

२०२५ संपेपर्यंत, एन्ट्री-लेव्हल कोडिंग जॉब्सपैकी ३० टक्के एआय टूल्सद्वारे किंवा कमी मनुष्यबळाने केले जाऊ शकतात.

भारतातील आउटसोर्सिंग नोकऱ्यांपैकी २५ टक्के आता एआय ऑटोमेशनने होत आहेत.

उमेदवारांकडे केवळ बेसिक कोडिंग कौशल्य असणे आता पुरेसे नाही; त्यांना अॅडव्हान्स्ड प्रोग्रामिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, एआय इंटिग्रेशन, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कम्प्युटिंग अशा विशिष्ट कौशल्यांची गरज आहे.

या बदलांमधून असे दिसून येते की ‘संगणक अभियांत्रिकी पदवी = सुरक्षित नोकरी’ हे समीकरण आता तसे राहिलेले नाही. केवळ पदवी असणे पुरेसे नाही; विशिष्ट कौशल्ये, प्रॅक्टिकल अनुभव, आणि सतत शिकण्याची क्षमता अधिक महत्त्वाची झाली आहे.

म्हणून संगणक अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी, पालक आणि विद्यार्थ्यांनी खालील गोष्टींचा विचार करावा:

१. संस्थेची गुणवत्ता आणि प्रतिष्ठा

सर्व संगणक अभियांत्रिकी पदव्या समान नाहीत. एनआयटी, आयआयटी, किंवा टॉप-रँकच्या खासगी संस्थांमधून पदवी मिळवणे हे अधिक मध्यम दर्जाच्या संस्थांच्या तुलनेत अधिक मूल्यवान आहे. ‘संस्थेची निवड ही शाखेच्या निवडीपेक्षा अधिक महत्त्वाची असू शकते,’ असे भारतीय उद्याोग महासंघाचे अध्यक्ष चंद्रशेखर घोष म्हणतात. ‘उत्कृष्ट संस्थेतील कोणतीही शाखा अनेकदा निम्न-दर्जाच्या संस्थेतील संगणक अभियांत्रिकीपेक्षा चांगली असू शकते.’ माझ्याकडे करिअर गायडन्ससाठी येणाऱ्या पालकांना मी नेहमी हाच सल्ला देतो. पण फार कमी पालक चांगल्या संस्थेत यांत्रिकी अथवा स्थापत्य शाखा निवडण्यापेक्षा, मिळेल तिकडे संगणक शाखेत प्रवेश घेण्याचे ठरवतात आणि मुलांचे नुकसान करतात .

२. कौशल्यांचा विचार

संगणक अभियांत्रिकीत प्रवेश करण्यापूर्वी, विद्यार्थ्यांनी स्वत:ला विचारावे की त्यांच्यात पुढील आवश्यक कौशल्य, आवड आहे का?

तार्किक विचार आणि समस्या

सोडवण्याची क्षमता

गणित आणि अल्गोरिदम्समध्ये रुची

सतत शिकण्याची इच्छा

अमूर्त संकल्पनांसह काम करण्याची

क्षमता

बऱ्याच वेळा आपला मुलगा घरी कॉम्प्युटरवर तासंतास गेम्स खेळतो म्हणजे त्याला कॉम्पुटर इंजिनीअरिंगची आवड आहे असे अजब तर्कट पालक लावतात! कॉम्प्युटर चटपटीतपणे वापरणारी सगळीच मुले त्याची प्रणाली बनवायला योग्य आहेत असे नसते.

३. व्यावसायिक अपेक्षांचे मूल्यांकन.

आज प्रत्येक संगणक अभियंता कंपनीच्या कॅम्पसवरून मोठे पॅकेज मिळवेल, ही अपेक्षा वास्तववादी नाही. २०२५ मधील कॅम्पस प्लेसमेंट डेटानुसार :

फक्त वरच्या १० टक्के संस्थांमधील विद्यार्थ्यांना उच्च वेतनाच्या नोकऱ्या मिळतात.

मध्यम दर्जाच्या संस्थांमधील ५० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी कॅम्पसवरून नोकरी मिळवण्यात अयशस्वी ठरतात.

सरासरी प्रारंभिक वेतन मध्यम दर्जाच्या संस्थांमधून फक्त रु. तीन ते चार लाख प्रतिवर्ष आहे, जे आपण वर पाहिल्याप्रमाणे साल २००१-२ च्या स्तरावरच आहे.

४. पर्यायी शाखांचा विचार

आजच्या बदलत्या परिस्थितीत, विद्यार्थ्यांनी इतर अभियांत्रिकी शाखांचाही विचार करावा :

यांत्रिक अभियांत्रिकी- रोबोटिक्स

/ऑटोमेशन

विद्याुत अभियांत्रिकी – ईव्ही टेक्नॉलॉजी

रासायनिक अभियांत्रिकी – सस्टेनेबल

एनर्जी

‘या पारंपरिक शाखांमध्ये आता चांगली संधी आहे, आम्हाला नवीन यांत्रिक अभियंते मिळवण्यासाठी अधिक वेतन देऊ करावे लागत आहे, कारण ते अपुरे आहेत.’ असे एका प्रख्यात वाहन उद्याोगातील मनुष्यबळ विभाग प्रमुखाने खासगी चर्चेत सांगितले होते.

स्थापत्य आणि विद्याुत शाखांना सोन्याचे दिवस येण्याची शक्यता आहे. कारण पाश्चात्त्य देशांमधले रस्ते, पूल, विमानतळ, मेट्रो वगैरे पायाभूत सोयी सध्या किमान ५० वर्षे जुन्या झाल्यात आणि लवकरच त्याचे पुनर्निर्माण करण्यासाठी लाखोंनी स्थापत्य अभियंते लागतील. इलेट्रिकल कार्स तसेच एआयसाठी लागणाऱ्या डेटा सेंटर्समध्ये आवश्यक विजेसाठी शाश्वत ऊर्जास्राोत लागतील आणि रसायन आणि विद्याुत अभियंत्यांचीही मागणी वाढेल.

५. विशेष कौशल्यांवर लक्ष केंद्रित करा

संगणक अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेतल्यास, विशिष्ट क्षेत्रात विशेषज्ञता मिळवण्यावर लक्ष केंद्रित करा. सध्या हे कोर्सेस करण्यासाठी आपल्या सरकारने सुरू केलेले ‘स्वयं’सारखे विनामूल्य अथवा अल्प फीमध्ये शिकवणारे खूप छान प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. तसेच बऱ्याच खासगी विद्यापीठांचे MOOC (Massive Online Open Courses) सुद्धा अगदी विनामूल्य उपलब्ध आहेत.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स / मशीन लर्निंग

सायबर सिक्युरिटी

क्लाउड कम्प्युटिंग

क्वांटम कम्प्युटिंग

इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT)

६. फक्त पदवीवर अवलंबून राहू नका

‘नोकरीदात्यांना आता पदवीपेक्षा वास्तविक कौशल्ये अधिक महत्त्वाची वाटतात,’ असे इन्फोसिसचे सीईओ सलिल पारेख म्हणतात. ‘प्रत्यक्ष प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप्स, हॅकाथॉन्समध्ये सहभाग, आणि प्रॅक्टिकल स्किल्स हे अनेकदा डिग्रीपेक्षा अधिक महत्त्वाचे असतात.’ तसेच आपल्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर देणे खूप आवश्यक आहे. नेतृत्वगुण, टीमवर्क ही कौशल्ये प्रत्येक विद्यार्थ्याला अनिवार्य आहेत.

उद्याची अभियांत्रिकी शिक्षण पद्धत

एआयसारख्या तंत्रज्ञानाने बेसिक कोडिंग आणि प्रोग्रामिंग सोपे केले आहे, तेव्हा संगणक अभियांत्रिकी शिक्षणाला विकसित होण्याची आवश्यकता आहे. सॉफ्टवेअर अभियांत्रिकी कौशल्यांचे स्वरूप बदलत आहे:

कोड लिहिण्याऐवजी, उद्याचे अभियंते एआय टूल्सचा वापर करून जटिल समस्या सोडवतील.

नवीन कौशल्यांमध्ये प्रॉम्प्ट इंजिनीअरिंग, एआय सिस्टम्स इंटिग्रेशन आणि अॅडव्हान्स्ड प्रोग्रामिंग आर्किटेक्चरचा समावेश असेल.

एथिकल हॅकिंग, सायबर सिक्युरिटी आणि डेटा गोपनीयता उद्याच्या अभियांत्रिकीचा अविभाज्य भाग असतील.

१९९० च्या दशकात, संगणक अभियांत्रिकी हा ‘सोनेरी मार्ग’ होता, जिथे फक्त शाखेमध्ये प्रवेश घेणेच यशाची हमी देत असे. २०२५ मध्ये, परिदृश्य बदलले आहे. संगणक अभियांत्रिकीच्या जागांच्या विस्ताराने आणि एआय टेक्नॉलॉजीच्या उदयामुळे, आता केवळ पदवी मिळवणेच पुरेसे नाही.

पालक आणि विद्यार्थ्यांनी संस्थेची गुणवत्ता, स्वत:ची कौशल्ये, रुची आणि उद्याोगातील बदलत्या गरजांचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे. शब्दश: शाखेवर अवलंबून राहण्याऐवजी, विद्यार्थ्यांनी अशी शिक्षण पद्धत शोधावी जी त्यांना सतत शिकण्यास आणि विकसित होण्यास सक्षम करेल. संगणक अभियांत्रिकी हा अजूनही करिअरचा एक आकर्षक मार्ग आहे, परंतु तो आता सर्वांसाठी नाही. संपूर्ण माहिती घेऊन निर्णय घेणे, विशिष्ट कौशल्ये विकसित करणे, आणि वास्तववादी अपेक्षा ठेवणे हेच उद्याच्या डिजिटल जगात यशस्वी होण्याचे मार्ग आहेत.

त्यामुळे कुठलाही निर्णय घेण्याआधी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करून तसेच चांगल्या करियर सल्लागाराची मदत घेऊन, विद्यार्थ्यांनी अचूक निवड करावी.

लेखक एका बहुराष्ट्रीय सल्लागार संस्थेचे भागीदार असून त्यांना गेली २४ वर्षे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा अनुभव आहे.

chinmaygavankar@gmail.com