प्रतिमा जोशी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कुणाही व्यक्तीने काय ल्यायचं, खायचं, प्यायचं हा तिचा प्रश्न. त्याची उठाठेव इतरांनी करण्याची गरज नसते. पण ती व्यक्ती स्त्री असते, तेव्हा तिने काय करायचं हे ठरवायचा आपल्याला जणू परवानाच मिळाला आहे, अशा थाटात वावरणाऱ्यांचं काय करायचं? त्यांचा हा वैचारिक गोंधळ नाही हे स्पष्टच आहे. मग हा जाणूनबुजून घेतलेला पवित्रा नेमके काय सांगू पाहतो आहे?
स्थळ तेहरान, इराण. काळ १९८०चं दशक. इराणमधील सत्ताबदलानंतर विधि व न्यायखात्याच्या प्रभारी प्रमुखांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या दालनात आपल्या सहकाऱ्यांसह गेलेल्या शिरीन इबादी यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारण्याआधी, ‘आपल्या प्रिय राष्ट्रप्रमुख इमामांच्या प्रति आदर म्हणून आपले केस झाकलेले असावेत असे तुम्हाला वाटत नाही?’ असा प्रश्न विचारत आधी ‘डोईला स्कार्फ बांधा’ असे प्रभारींनी शिरीनना बजावले. देशातील परिस्थिती बदलली असल्याची त्यांना जाणीव या पद्धतीने करून दिली गेली. शिरीन इबादी या त्या वेळी न्यायाधीश होत्या. त्यांच्या न्यायाधीश असण्यापेक्षा त्यांच्या स्त्री असण्याची अशी नोंद घेतली गेली होती. शिरीन यांच्यासाठी आणि इराणमधील असंख्य लोकशाहीप्रिय नागरिकांसाठी भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची ती नांदी होती. आपल्या ‘इराण अवेकिनग’ या आत्मवृत्तात शिरीन यांनी इराणच्या राजकीय आणि समाजजीवनाची सुमारे तीन दशकांची वाटचाल कथन केली आहे. अन्य जगाबरोबर आपणही ही वाटचाल पाहिली आहे, पाहात आहोत.
नुकत्याच उठलेल्या कुंकवाच्या गदारोळात हा प्रसंग आठवला. देश वेगळे, माणसे वेगळी, भाषा वेगळी.. पण ‘टिकली लाव, मग बोलेन’ या उद्गारात त्याचेच प्रतिबिंब पाहिल्यासारखे वाटत राहिले. संवाद साधू पाहणारी व्यक्ती पत्रकार. तिच्या पत्रकार असण्यापेक्षा ती बाई असण्याची अशी नोंद घेतली जाणे, हे मानवी मूल्यांना सोडून आहे असे बव्हंशांना न वाटणे, कुंकू/ टिकली यावरच चर्चा घोटाळत राहणे ही कुठल्या प्रकारच्या समाजजीवनाची झलक समजायची? प्रश्नाला उत्तर न देणे हे त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे, त्याची काय एवढी चर्चा करता, जाऊ द्या की अशा समजुतीही काढल्या जात आहेत. काही अंशी ते बरोबर आहे. पण एक पत्रकार आणि एक समाजकार्यकर्ता यांच्यातील प्रश्नउत्तराची देवाणघेवाण त्याच पातळीवर होणे अपेक्षित आहे. नि:संशयपणे नेता/ कार्यकर्ता/ सेलेब्रिटी पत्रकाराला उत्तर देण्यास नकार देऊ शकतो. तो त्यांचा अधिकार आहे. अनेकदा तसे घडतेही. त्यात नवे वा विवादास्पदही काही नाही. पण हा नकार पत्रकार या व्यावसायिक व्यक्तीला द्यायला हवा. ती व्यक्ती बाई असेल किंवा पुरुष असेल किंवा पुढे जाऊन एखादी तृतीयपंथीही असेल. ते महत्त्वाचे नाही. महत्त्व आहे ते विशिष्ट शिक्षण आणि अर्हता प्राप्त करून आपल्या पेशाचे पालन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला.
त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे संवादास नकाराचे कारण हे लिंगविशिष्ट प्रथापरंपरा आणि कथित समजुतींवर अवलंबून असेल तर भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला व्यक्ती म्हणून दिलेला दर्जा संबंधितास मान्य नाही असाही त्याचा अर्थ होतो. उत्तर देण्यास नकार देण्याचा पवित्रा पत्रकारापाशी घेण्यास प्रत्यवाय नाही, पण ‘बाई गं.. टिकली लाव मग बोलेन’ असे बजावणे हे त्या व्यक्तीकडे पत्रकार म्हणून नव्हे तर बाई म्हणून बघितले गेले असाच त्याचा अर्थ आहे. आणि बाईने विशिष्ट पद्धतीनेच राहिले पाहिजे असाही आग्रह त्यात दिसतो.
प्रत्येक बाईत भारतमाता ज्यांना दिसते त्यांनी बाईच्या कपाळावर असलेली किंवा नसलेली टिकली कशाकशाचे प्रतिनिधित्व करते याचा आत्मीयतेने शोध घ्यायला हरकत नाही.
भारतीय प्रथापरंपरा काय सांगतात? बाई कुंकू लावते ते कोणाच्या तरी, म्हणजे पतीच्या नावाचे. थोडक्यात कुंकवाला पतीच्या नाममुद्रेचा दाखला असतो. विवाहित बाईला नाव/आडनावातील बदलासकट हा दाखला मिळतो. कुंकवाचा धनी वगैरे रुळलेले शब्दप्रयोग हे त्याचेच लक्षण. नुसत्या एकमेकींना भेटायला गेल्या, तरी सवाष्ण बाया गळय़ातले मंगळसूत्र नीटनेटके करून परस्परांना हळदीकुंकू लावतात. संक्रांतीला, चैत्रात, अश्विन नवरात्रात सवाष्ण बायांचीच हळदीकुंकवं होतात. नवरा असण्याशी आणि तो हयात असण्याशी कुंकवाचा जिवाशिवाचा संबंध आहे. बाईचे भाग्य त्यावर तोलले जाते, मोजले जाते, मापले जाते. पतीनिधन झालेल्या बाईच्या कपाळीचे कुंकू पुसले जाते. गळय़ातील मंगळसूत्र तोडले जाते. हातातील बांगडय़ा फोडल्या जातात. तिचा आता यावर काही अधिकार राहात नाही, जरी ती नाव नवऱ्याचेच लावत असली आणि त्याच्या माघारी त्याची मुलेबाळे नि त्याच्याशी मांडलेला संसार निष्ठेने आणि कष्टाने चालवत असली तरी! तिचे संबोधन विधवा असे केले जाते. तेही धन्याशी जोडलेले म्हणजे अमुक तमुकाची विधवा असे. तिला शुभकार्यात मान नाही. तिला हळदीकुंकवाचा, फुलंगजऱ्याचा मान नाही. तिचे तोंडही पाहू नये अशी आजही अनेकांची समजूत. थोडक्यात, सवाष्ण शुभ तर विधवा अशुभ. एक चिमटीभर पिंजर किंवा एक छोटी गोल लाल टिकली तुमचा दर्जा, तुम्हाला मिळणारी वागणूक, तुमचा सन्मान ठरवते.
भारतमाता विधवा नाही या वाक्यात हा सारा दंभ, बाईला व्यक्ती म्हणून सन्मानाचे जिणे नाकारण्याचा कट्टरपणा हे कोणीही कितीही प्रतिवाद करायचा म्हटले तरी ठासूनच भरलेला आहे. हा दंभ सर्वसामान्य बाया तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा तशा सहन करतातच. पण तो वेळोवेळी आपला अतिशय कुरूप चेहरा उघड करत राहतो. एकच उदाहरण यासाठी पुरेसे आहे. विधवेची सावलीही अंगावर पडू नये या तथाकथित शास्त्रानुसार कांचीकामकोटीच्या शंकराचार्यानी इंदिरा गांधींना वेगळय़ा दालनात बसवून त्यांच्याशी संवाद साधला होता. हे घडले तेव्हा इंदिरा या भारताच्या (गुरुजींच्या भावनेनुसार भारतमातेच्या) पंतप्रधान होत्या. बाईचे पद, तिचे कर्तृत्व, तिच्या क्षमता, तिचे गुण यापेक्षा महत्त्वाचे काय? तर हयात असलेल्या पुरुषाच्या नावाने कपाळी कुंकू मिरवण्याची तिला आयुष्याने दिलेली संधी? पती निधनानंतरही कर्तबगारीने तळपणाऱ्या जिजामाता, ताराराणी, अहिल्यादेवी, राणी लक्ष्मीबाई आणि इतिहासातील नि वर्तमानातीलही अगणित विविध स्तरांतील तेजस्वी स्त्रियांनाही मग काय विधवा म्हणून हिणवणार काय? नवरा हयात असणे यात कोणाचे कसले कर्तृत्व आहे?
कुंकू का लावावे याबाबत छद्मविज्ञानाचा आधार घेत हल्ली उपदेश केले जातात. पिटय़ुटरी ग्रंथींपासून ते शरीरातील ऊर्जाबिंदूंपर्यंत कुंकू, मंगळसूत्र, बांगडय़ा, जोडवी कशी उपयुक्त असतात याचे मासले दिले जातात. पुरुषांच्या शरीरातील ग्रंथी आणि चक्रे आणि बिंदू वगैरेंबाबत मात्र अशा काही आज्ञा नाहीत. खरे तर त्यांच्या वैवाहिक दर्जाची एकही खूण त्यांच्यापाशी असण्याची कोणतीच सक्ती नाही, ना छद्मविज्ञानाचे युक्तिवाद असत! हे झाले विवाहित सवाष्ण महिलांबाबत. पण प्रौढ कुमारिका, विधवा, एकल महिलांचे काय? की त्यांच्या आयुष्यात पती नसल्यामुळे त्यांना या ग्रंथी, चक्रे आणि बिंदू नसतात? की त्या बिनमालकीच्या समजल्या जाऊन पुरुषी आक्रमणाला पात्र असतात? नेमके काय समजावे? निसर्गक्रमाने माणूस मरतो, त्याला वैधव्याची, अशुभाची झालर लावण्याची ही कोणती मनोवृत्ती? आणि मग विधुर पुरुषाचे काय? बाजूबाजूला उभे केले तर सधुर आणि विधुर यात फरक करून दाखवता येईल काय? बाईवरील मालकी हक्काची ही मानसिकता सर्वसामान्यांनीही धार्मिकतेच्या अंगाने घेण्याच्या व्यूहात सापडून स्वीकारावी अशा प्रकारे प्रदर्शित करण्यामागचे हेतू काय असावेत? किंवा हे हेतूत: नसेल तर मग अधिकच चिंता वाटण्यासारखे आहे, कारण याचा अर्थ या मानसिकतेने आपला इतका कब्जा घेतलेला आहे, की आपल्याला त्यात गैर असे काहीच वाटत नाही!
बरे, प्रत्येक स्त्रीमध्ये भारतमाता दिसते.. चांगले आहे. मग ती खरोखर जात/ धर्म/ वंश आणि वैवाहिक दर्जा या पलीकडे जाऊन प्रत्येक स्त्रीत दिसायला हवी. ती खैरलांजीच्या प्रियंका भोतमांगे आणि तिच्या आईत दिसायला हवी, ती हाथरसच्या बलात्कारितेत दिसायला हवी, ती बिल्किस बानोत दिसायला हवी आणि हो, गौरी लंकेशमध्येही दिसायला हवी. ही प्रत्येक स्त्री आपापल्या उपासना पद्धतीप्रमाणे वर्तन करणारी असेल किंवा न पटणाऱ्या प्रथा सोडून देणारी असेल. हिजाबला विरोध आणि कुंकवाची सक्ती असे दुहेरी मापदंड कसे लावता येतील?
पण टिकलीपेक्षाही गंभीर आहे ते भारतमाता विधवा नाही असे विधान करणे, भारत नावाच्या देशाला माता संबोधत स्त्रीरूपात उभे करणे, इतकेच नाही, तर ती विधवा नाही असे बजावून सांगताना कोणीतरी तिच्या कुंकवाचा धनी अस्तित्वात असल्याचे अप्रत्यक्ष सुचविणे! कोण आहे सवाष्ण भारतमातेच्या भाळावरील कुंकवाचा धनी? कोणाकडे बोट करायचे आहे? काय प्रस्थापित करायचे आहे? या प्रश्नांची उत्तरे प्रश्नांपेक्षा अधिक गंभीर असू शकतात. या देशाची मालकी विशिष्ट समुदायाकडे असल्याचे हे सूचन असू शकते. ते तसे आहे किंवा नाही हे ते उच्चारणारेच सांगू शकतील, पण हे सूचन भारतीय राज्यघटनेच्या गाभ्यालाच नख लावणारे आहे हे मात्र नक्की. जगभरात ज्या ज्या देशात विशिष्ट समुदायाची मालकी असल्याचे आधी सूचन झाले आणि मग उघड सक्ती झाली, ते ते देश धर्माधतेच्या आगीत जळून आज अत्यंत दयनीय स्थितीत पोहोचलेले दिसतात. ७५ वर्षांपूर्वी आपल्या देशातील दूरदृष्टीच्या आणि विशाल भारतीय संस्कृतीचे पाईक असलेल्या नेत्यांनी परस्परांना समजून घेत, सामावून घेत सामंजस्याने प्रगती करणाऱ्या देशाचा पाया घातला. हा संविधानिक पाया खणून काढण्यात कोणतेही शहाणपण नाही.
लेखिका मुक्त पत्रकार आहेत.