अ‍ॅड. धनंजय जुन्नरकर

संघ विचारांचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच मनुवादी, जातीयवादी, स्त्रीविरोधी, लोकशाहीविरोधी आहे. राहुल गांधींच्या एका शब्दावरून गदारोळ सुरू आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची आजवरची वक्तव्ये पाहता भाजपच्या परंपरेविषयी अनेक प्रश्न पडतात. ‘पहिली बाजू’ सदरातील ‘हा दोष राहुल गांधींच्या परंपरेचा!’ या लेखाचा (‘लोकसत्ता’- २८ नोव्हेंबर) प्रतिवाद करणारे टिपण..

devendra fadnavis on political extortion
Devendra Fadnavis Exclusive: “काही मध्यम स्तरावरचे नेते हे धंदे करत होते, पण…”, पॉलिटिकल एक्स्टॉर्शनबाबत फडणवीसांची सडेतोड भूमिका!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?
pressure politics Ajit Pawar backing Dhananjay Munde NCP Beed walmik karad
अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी का घालत आहेत ?
Congress to help Aam Aadmi Party against BJP in final phase
अखेरच्या टप्प्यात ‘आप’च्या मदतीला काँग्रेस?
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
congress mla vijay wadettiwar accused election commission of Acting on BJP s warnings
निवडणूक आयोग मनुवादी, भाजपच्या इशाऱ्यावर चालतो… वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘पनवती’ असा करणे हे सरंजामशाहीचे उदाहरण आहे, असा उल्लेख उपरोल्लेखित लेखात आहे. मात्र विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या एक दिवस आधीच ‘एक्स’ या समाजमाध्यमावर ‘पनवती’ हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला होता. हे जगभरातील भारतीयांच्या भावनांचे प्रकटीकरण होते. त्याच्याशी राहुल गांधी किंवा काँग्रेसचा कोणताही संबंध नाही. ज्या दिवशी भारताचा पराभव झाला, त्या दिवशी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांवर हा हॅशटॅग वापरण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले. हा हॅशटॅग आणखी काही काळ ट्रेंड होत राहिला आणि सर्वसामान्य जनताही पंतप्रधान मोदींसाठी हेच टोपणनाव वापरू लागली, तर निवडणुकांच्या मुहूर्तावर पक्षाचे फार मोठे नुकसान होईल, अशी भीती भाजपमध्ये पसरली. त्यातून राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजप आयटी सेलचे संदेश फिरू लागले.

हेही वाचा >>>हे तर लोकांच्या हानीचे लाभार्थी!

भारतीय संघ जर अंतिम सामना जिंकला असता तर निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय संघातील सर्व खेळाडूंची मिरवणूक काढण्याचा भाजपचा मनसुबा होता. त्यासाठी लाखो बॅनर आधीच छापून तयार ठेवले असल्याच्या बातम्याही नंतर पुढे आल्या. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पुलवामात शहीद झालेल्या आपल्या जवानांचे फोटो बॅनरवर लावून मते मागण्यात आली होती. आपल्या शूर जवानांविषयी निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत सत्ता मिळविल्याचे या देशाने पाहिले होते. हे

झाले विश्वचषक अंतिम सामना आणि त्यानंतर ‘पनवती’ या शब्दावरून सुरू असलेल्या वादाविषयी. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि अन्य भाजप नेत्यांच्या आजवरच्या भाषेचाही आढावा घेणे क्रमप्राप्त आहे.

नरेंद्र मोदी यांनी एका माजी पंतप्रधानाच्या पत्नीचा उल्लेख ‘काँग्रेस की विधवा’ अशा शब्दांत केला होता. असे संबोधताना मोदी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरांचा जागतिक सन्मान केला होता, असे आम्ही समजावे का? ‘काँग्रेस की जर्सी गाय’ हे संबोधन कोणती विचारसरणी दर्शविते? देशाच्या खासदाराच्या पत्नीला ‘५० करोडम् की गर्लफ्रेंड’ म्हटले जाते, तेव्हा ते कोणत्या स्वरूपाच्या संस्कारांचे द्योतक समजावे?

पश्चिम बंगालमध्ये जाऊन तेथील महिला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा उल्लेख जाहीर सभेत ‘दिदी ओ दिदी’ असा करणे आणि तोही पंतप्रधानपदी विराजमान व्यक्तीने करणे हे कशाचे द्योतक आहे? देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी कोणत्या स्तराची भाषा नरेंद्र मोदी वापरतात?

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची ‘बाथरूम में रेनकोट पहनकर नहाते है’ अशी खिल्ली उडविली गेली. असे शब्द वापरताना पंतप्रधान देशापुढे नेमके कोणते उदाहरण ठेवतात? संसदेत खासदार राहुल गांधी आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांचे भाषण सुरू असताना जाणीवपूर्वक माइक बंद केला गेला. कॅमेरा अन्यत्र वळविला गेला. भर संसदेत एक खासदार आपल्या सहकारी खासदाराला त्याच्या धार्मिक ओळखीवरून तुच्छ लेखतो, ही कोणती सभ्यता? भाजपचे रमेश बिधुरी संसदेतील चर्चेदरम्यान बसपाच्या दानीश अलींची संभावना अत्यंत गलिच्छ- धर्मवाचक शब्दांत करत असताना मात्र बिधुरी हे हिरोच असल्याप्रमाणे त्यांचा माइक सुरू राहतो आणि कॅमेरा त्यांच्यावरच असतो. ते अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरतात आणि आपल्याच पक्षाच्या या खासदाराच्या अशा भाषेविषयी पंतप्रधान काहीही बोलत नाहीत.. देशाने हे सारे घडताना पाहिले आहे.

हेही वाचा >>>बातमी बातमीदारापासून मुक्त झाली आहे, पण त्याबरोबरच माध्यमांची जबाबदारी वाढली आहे…

संसदेने असंसदीय शब्दांची एक पुस्तिका छापलेली आहे. त्यात बिधुरी यांनी उच्चारलेले शब्द नाहीत किंवा काय याचा शोध घेणे गरजेचे आहे. ‘पनवती’ शब्दावरून देशाच्या ७५ वर्षांच्या इतिहासात कोठेही साधी अदखलपात्र तक्रारीचीही नोंद नाही. तरीही एवढे आकांडतांडव?

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लोकशाही मार्गाने टीका केली म्हणून अधीररंजन चौधरी, संजय सिंह, राघव चड्ढा या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. बहुजन समाजाच्या एका मुलाच्या तोंडावर मूत्रविसर्जन करण्याचे औद्धत्य भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणत्या परंपरेने आले? रामजन्मभूमिपूजन असो वा सेंट्रल व्हिस्टाचे भूमिपूजन असो या कार्यक्रमांना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निमंत्रण दिले गेले नाही. केवळ ते दलित आहेत, म्हणूनच त्यांना निमंत्रण देणे टाळले गेले का?

सेंट्रल व्हिस्टाच्या उद्घाटनाला आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावले गेले नाही. सेंट्रल व्हिस्टाचे उद्घाटन करण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा असताना त्यांना साधे निमंत्रणदेखील दिले नव्हते. केवळ त्या आदिवासी आहेत म्हणून? त्यामुळे भाजपकडून परंपरा शिकण्याची वेळ अद्याप काँग्रेसवर आलेली नाही.

‘सांस्कृतिक मंथन’, ‘सांस्कृतिक समरसता’, ‘सामाजिक न्याय’ असे बोजड शब्द वापरल्याने देशाची सामाजिक वीण उसविणारी कृत्ये झाकली जाणार नाहीत. संघ आणि भाजपची मुस्लीम, आदिवासी आणि दलितांविषयीची मते देशाला कळली आहेत. ‘भारताला भीक मागून स्वातंत्र्य मिळाले आहे’ असे म्हणणाऱ्या अभिनेत्रीला पद्मश्री पुरस्कार दिला जातो. ही कोणत्या प्रकारची परंपरा निर्माण केली जात आहे? ‘सब का साथ- सब का विकास’ ही घोषणा म्हणजे एक काल्पनिक इमारत आहे, अशी कल्पना केली तर त्या इमारतीत मुस्लीम, दलित, आदिवासींना तळमजल्यावर स्थान दिले असावे आणि उद्योगपती मित्रांना सर्वोच्च शिखरावर ठेवले असावे. निवडणुका जवळ आल्या की हिजाबबंदी, हिंदू उत्सवांमध्ये मांसबंदी, मुस्लीम आरोपीच्या घरावर बुलडोझर चालविणे, उच्चभ्रू मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी त्यांच्या विद्यार्थी संघटनांना त्रास देणे, मुस्लीम व्यापारी, विद्वान, पत्रकार यांना तुरुंगात टाकणे हे कोणत्या परंपरेनुसार सुरू आहे?

दलित किंवा आदिवासी राष्ट्रपती निवडल्याने समाजात व जीवनमानात कोणताही फरक पडलेला नाही. हाथरस, लखीमपूर हत्याकांड, आंबेडकरवादी दलित कार्यकर्त्यांवरील कारवाई, रोहित वेमुला आत्महत्या, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी लखनऊ विद्यापीठातील दलित प्राध्यापकावर गुन्हा दाखल करणे, क्षुल्लक कारणावरून आमदार जिग्नेश मेवाणी यांना अटक, अशी अनेक उदाहरणे आहेत. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन जगात भारताची नाचक्की झाली.

भाजपचे एक खासदार मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याची मागणी जाहीर सभेत करतात आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. ही कोणती नवीन परंपरा निर्माण केली जात आहे? स्वत:च्या संघटनेचा कोणताही रोमहर्षक इतिहास नसल्याने, नेते, स्मारके नसल्याने भाजपच्या प्रवक्त्यांना केवळ इतर संघटनांवर आरोप करणे एवढाच पर्याय उरला आहे, त्याला काँग्रेसचा तरणोपाय नाही!

राहुल गांधींना ‘पप्पू’ ठरविण्यासाठी ज्या भाजपने कोटय़वधी रुपये खर्च केले, त्यांना भर सभेत ‘मूर्खो का सरदार’ असे संबोधले गेले, ते कोणती परंपरा जपणारे होते? भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळापासून मनुवादी, जातीयवादी,

स्त्रीविरोधी, लोकशाहीविरोधी आहे. तेव्हा या विचारांचा नि:पात  गांधीजींच्या विचाराने केला होता. आता राहुल गांधी ‘भारत जोडो’च्या माध्यमातून तेच करत आहेत. भाजपच्या जातीयवादी आणि लोकशाहीविरोधी राजकारणाचा मार्ग मोकळा होत नाही कारण, गांधी आडवा येतो!

Story img Loader