काँग्रेसजनांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीला सामोरे जाताना भावनात्मक मुद्दय़ांचा नव्हे तर वस्तुस्थितीचा विचार करणे गरजेचे आहे. पक्षाचे विचार, धोरण आणि आचरण या त्रिसूत्रीतून नव्या नेतृत्वाची निवड केल्यास आगामी काळात पक्षाचा चेहरा निश्चित बदलेल..

डॉ. आशीष देशमुख

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. प्रदीर्घ काळानंतर होणाऱ्या निवडणुकीत मतदारांची संख्या मर्यादित असली तरी, या प्रक्रियेने देशभरातील नेते, कार्यकर्ते उत्साहात आहेत. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे व शशी थरुर यांच्यात थेट लढत होत आहे. अनेक वर्षांनी गांधी कुटुंबातील उमेदवार या निवडणुकीत नाही. त्यामुळे पक्षाचे नवे अध्यक्ष कोण होणार याची सर्वानाच उत्सुकता आहे. यापूर्वी काँग्रेसने टोकाची लोकप्रियता अनुभवली आहे. देशात सर्वाधिक काळ सत्तेवर राहण्याचा विक्रमही पक्षाने नोंदवला आहे. मात्र देशाची सद्य:स्थिती आणि पक्षासमोरील आव्हाने आता बदलली आहेत. सभा आणि नियोजनाच्या बैठका घेऊन देशाचा व्याप सांभाळणे अवघड आहे. केवळ निष्ठा आणि भावनेच्या भरवशावर पक्ष चालणार नाही ही वस्तुस्थिती स्वीकारण्याची गरज आहे. आपल्या जवळचा कोण यापेक्षा पक्षासाठी उपयोगी कोण याला महत्त्व दिले पाहिजे. काँग्रेसचा परंपरागत मतदार बदलला आहे. नव्या पिढीने भाजपला कौल दिला आहे. त्यामुळे पक्षाला आपले कुठे चुकले याचे चिंतन करावे लागेल. युवा पिढीला काँग्रेसकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेऊन तसा पक्ष घडवावा लागणार आहे.

काँग्रेसने आजच्यासारखी स्थिती यापूर्वीही अनुभवली आहे. गेल्या तीन दशकांचा विचार केल्यास देशात संगणक क्रांती आणणारे राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पक्ष संकटात आला. त्या वेळी संघटन आणि देश अशा दोन्ही स्तरांवरील नेतृत्वाचा प्रश्न उद्भवला. काँग्रेसजनांनी या संकटावर मात केली. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची सत्ता गेल्यानंतर २००४ सालापर्यंत अशीच स्थिती होती. केंद्र व राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता असताना अतिशय बिकट स्थितीत सोनिया गांधी यांनी पक्षाची धुरा सांभाळली. महाराष्ट्रासारख्या राज्यात सत्तेत नसताना तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे ३८ उमेदवार निवडून आले आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले, पण पुढे पक्षात फूट पडली. महाराष्ट्राला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार होती, हे निश्चित. त्यानंतरही सोनिया गांधी डगमगल्या नाहीत. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आली आणि केंद्रातही लक्षणीय यश मिळाले.

केंद्रात संघ विचारांची सत्ता आल्यास राज्यघटना धोक्यात येते, असे आजवरचे निरीक्षण आहे. यापूर्वीही शिक्षण असो वा अन्य संस्था, सर्वाच्या भगवीकरणाचे प्रयत्न झाले. तेव्हा देशभरातून झालेल्या विरोधामुळे तत्कालीन राज्यकर्त्यांचे मनसुबे उधळले गेले. आताही त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे. देशात विघटनवादी शक्ती फोफावल्या आहेत. द्वेष, जातीय तेढ आणि चुकीच्या माहितीचा प्रसार करून जाती-जाती, धर्मात फूट पाडण्याचे प्रयत्न मोठय़ा शिताफीने सुरू आहेत. सामाजिक अस्थिरता आणि भीतीचे वातावरण निर्माण केले जात असताना देशासमोरील इतर ज्वलंत प्रश्न मात्र मागे पडले आहेत. महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांसमोरील संकटाचा विचार करण्याऐवजी काँग्रेसला बदनाम करून समाजात भय निर्माण केले जात आहे. शशी थरुर यांच्यासारखा नेता या विघटनवादी शक्तींविरोधातील लढय़ाचे नेतृत्व करू शकतो.

केंद्रातील सत्तारूढ भाजपने मिशन लोकसभा सुरू केले आहे तर, काँग्रेस नव्या पक्षनेतृत्वासाठी सज्ज होत आहे. एकीकडे संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे, तर दुसरीकडे राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सुरू आहे आणि तिला अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. पक्षाचे निष्ठावानच नाहीत तर, देशातील सर्वसामान्यांनाही याबाबत उत्सुकता आहे. या वयातही सोनिया गांधी यांनी यात्रेत सहभागी होऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला आहे. या दोन्ही बाबी प्रतिस्पर्ध्यासाठी आव्हान म्हणून उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळेच काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. प्रतिस्पर्धी पक्ष साम, दाम, दंड, भेदाचा सर्रास वापर करत आहेत.

सोनिया गांधींनी २००० साली ‘संविधान बचाओ रॅली’चा बिगूल दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेऊन फुंकला होता. शशी थरुर यांनी याच पवित्र भूमीतून पक्षाचे नेतृत्व करण्याचे आव्हान स्वीकारले आणि प्रचार सुरू केला. त्यांची ऊर्जा, कार्यशैली आणि उत्साह पाहून देशातील तरुणांमध्ये चैतन्य निर्माण होईल, हे निश्चित. त्यांनी जयंतीदिनी गांधीजींच्या पावनभूमीवर जाऊन त्यांचेही आशीर्वाद घेतले. इंदिरा गांधींनी कठीण काळात ज्या विनोबा भावेंचे मार्गदर्शन घेतले आणि पक्षाला दिशा दिली त्यांच्या पावनार आश्रमातही थरूर गेले. महाराष्ट्राने नेहमीच काँग्रेसला, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधींना साथ दिली आहे. ही आंबेडकर, गांधी यांना मानणारी भूमी आहे. सावरकर, हेडगेवार यांना मानणारी नाही. काँग्रेस अधिक बळकट व्हावी, परिवर्तन घडावे, यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत.

भारत हा तरुण देश आहे. या देशातील तरुणांना आपले नेतृत्वही आपल्याप्रमाणेच तरुण असावे, असे वाटते. आपला नेता नवी आशा निर्माण करणारा, नव्या संधी देणारा असावा, असे वाटते. देशातील ५२ टक्के तरुण २५-३० वयोगटातील आहेत. ते काँग्रेसपासून दूर का आहेत, याचा विचार व्हायला हवा. त्यांना काँग्रेसच्या विचारसरणीशी जोडण्याचे काम होणे आवश्यक आहे. ‘मोदी जाल’मधून मुक्ती मिळावी, असे देशातील बहुसंख्य नागरिकांना वाटते. जनतेच्या या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता शशी थरूर यांच्यात आहे. काँग्रेसचा मतदारांचा पाया आजही भक्कम आहे. त्यांना फक्त दिशा देण्याची गरज आहे. थरूर यांच्यासारखा नेता मिळाल्यास काँग्रेसची सत्ता येणे शक्य आहे. तसे झाल्यास देशाच्या विकासाचे स्वप्न साकार होईल.

पक्ष अनेक वर्षे जैसे थे स्थितीत आहे. यातून बाहेर निघण्यासाठी मोठय़ा शस्त्रक्रियेची गरज आहे. त्यासाठी एक उत्कृष्ट शल्यचिकित्सक हवा. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवा, मुत्सद्दी, संसद, राजकारण आणि संघटनेचा अनुभव लक्षात घेता शशी थरुर ही भूमिका उत्तमरीत्या पार पाडू शकतात. त्यासाठी पक्षातील सर्वानी त्यांना साथ देणे आवश्यक आहे.

सत्तेचे विक्रेंद्रीकरण होणे ही काळाची गरज आहे, असे थरुर यांचे मत आहे. ‘हायकमांड संस्कृती’ संपुष्टात आणणे त्यांना गरजेचे वाटते. या दोन मुद्दय़ांवर आमच्यासारखे लाखो कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत. नवतरुणांसाठी एक आदर्श नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. कृषी, औद्योगिक तंत्रविज्ञान व आर्थिक क्रांतीची मुहूर्तमेढ काँग्रेसने रोवली. आज राजीव गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली जात आहे. भाजप त्यांचीच अनेक धोरणे, योजना राबवून श्रेयही लाटत आहे. स्वातंत्र्य लढा, काँग्रेसचे योगदान या खुणा मिटविण्याचा प्रयत्न होत आहे.

पक्षांतर्गत निवडणुकांमध्ये मतभेद किंवा गटतट राहणे स्वाभाविक आहे, पण आज जात, धर्म किंवा भावनिक मुद्दय़ांचा विचार न करता पक्ष आणि देशासमोरील आव्हानांचा विचार करून नेतृत्व निवडणे गरजेचे आहे. भाजपने भलेही लोकसभा निवडणुकीसाठी व्यूहरचना केली असेल, तरीही काँग्रेस एकसंध राहून निवडणुकीला सामोरी गेल्यास त्यांचे मनसुबे पार उधळून लावू शकतो. इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांनी यापूर्वीही मनाचा कौल स्वीकारला होता. व्ही.व्ही. गिरी व नीलम संजीव रेड्डी यांच्या वेळी इंदिरा गांधी यांनी तशी भूमिका घेतली होती. सोनिया गांधी यांनीही पंतप्रधानपद न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाचा संथ झालेला प्रवाह, आलेली शिथिलता, पडलेला खंड व तरुणांचे भविष्य याचा विचार करून कोणता उमेदवार चांगला, हे स्वत:च्या मनाला विचारावे. गुणात्मक परिवर्तनासाठी शस्त्रक्रिया अपरिहार्य आहे आणि त्यासाठी शशी थरुर यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे.

लेखक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत.

Story img Loader