पद्माकर उखळीकर

नेहरू -गांधी कुटुंब हे एक भारतीय राजकारणातील महत्वाच्या स्थानी असलेले कुटुंब आहे. मोतीलाल नेहरू आणि पं. जवाहरलाल नेहरूंनंतर गांधी कुटुंबाचा सहभाग हा भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. देशात सत्तांतर झाले असले तरी राजकारण गांधी घराण्याभोवती फिरत आहे. पारंपारिकपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसलाच विरोधी पक्ष मानले जाते. कुटुंबातील तीन सदस्य पंडित जवाहरलाल नेहरू , इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले तर कुटुंबातील अन्य अनेकजण स्व-कर्तृत्वानेच संसदेचे सदस्य झाले, असा इतिहास आहे.

मोतीलाल नेहरू,जवाहरलाल नेहरू, कमला नेहरू, विजयालक्ष्मी पंडित, कृष्णा हथीसिंग, इंदिरा गांधी, फिरोज गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, मेनका गांधी, राहुल गांधी, वरुण गांधी ही सारी नावे या घराण्याशी संबंधित आहेत. आता काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी या खूद्द लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून उभ्या आहेत. उत्तर प्रदेशच्या प्रभार , अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस म्हणून त्यांनी पक्षासाठी काम केले. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या कन्या म्हणून जरी ओळख असली तरी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमवेत २००४ पासून काम केले आहे. तेव्हा त्या सामान्य कार्यकर्त्यांशी समन्वय साधत. मात्र २०१९ मध्ये त्यांनी अधिकृतरीत्या राजकारणात प्रवेश केला. पक्षाच्या सरचिटणीस म्हणून पक्षाला उंचीवर घेऊन जाण्यात त्यांचा सहभाग आणि श्रम पक्ष संघटनेत महत्त्वाचे ठरले. २०२३ मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणूक आणि २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्या केंद्रस्थानी होत्या. त्यांच्या नेतृत्त्वाखाली या निवडणुका लढवण्यात आल्या.राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपासून तर त्यांची ओळख आजी इंदिरा गांधी यांची छबी दिसू लागली. आजोबा फिरोज गांधी, आजी इंदिरा गांधी ,वडिल राजीव गांधी,आई सोनिया गांधी,भाऊ खा.राहुल गांधी आणि आता प्रियंका गांधी वाड्रा संसदेत दिसतील?

हेही वाचा >>>भारताचा गरिबीशी लढा कितपत यशस्वी?

प्रियंका गांधी यांनी दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. नंतर २०१० मध्ये बौद्ध अभ्यासात पदव्युत्तर पदवी मिळवली. मानसशास्त्राच्या अभ्यासक म्हणून, मानवी स्वभावाची उत्तम जाण त्यांना आहे. वडील व माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या-कटासंदर्भात त्रिची तुरुंगात असलेल्या नलिनी या महिला आरोपीला १८ मार्च २००८ रोजी भेटून तिच्याशी प्रियंका यांनी केलेला संवाद पुढे तुरुंगाधिकाऱ्यांमार्फत वृत्तपत्राने प्रकाशित केल्यामुळे, तो त्यांच्या सार्वजनिक जीवनातला महत्त्वाचा टप्पा ठरला. ‘हिंसेचा मार्ग योग्य नव्हता… संवाद साधूनही तुम्ही प्रश्न सोडवू शकला असतात’ असे या भेटीत, हत्याकटातील आरोपीला प्रियंका यांनी सांगितले होते! त्या राजीव गांधी फाउंडेशनच्या विश्वस्तही आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द आई सोनिया गांधी व भाऊ राहुल गांधी यांच्या हाताला हात धरून झाली असली , तरी नंतर त्यांनी आई सोनिया गांधी यांच्या आणि भावाच्या रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघांना नियमित भेट देऊन सोनिया गांधी यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आणण्यात आणि २०२४ मध्ये त्याच रायबरेली लोकसभा मतदारसंघात भाऊ राहुल गांधी यांच्या विजयात त्यांची महत्त्वाची भुमिका होती. त्या नेहमी थेट लोकांशी संवाद साधत असायच्या.

२००४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत, त्या आई सोनियांच्या प्रचार व्यवस्थापक होत्या. २००७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी राज्यव्यापी प्रचाराची धुरा सांभाळत असताना, त्यांनी अमेठी रायबरेली प्रदेशातील दहा जागांवर लक्ष केंद्रित केले, जागा वाटपावरून पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील भांडण शमविण्यासाठी दोन आठवडे घालवले. २३ जानेवारी २०१९ रोजी प्रियंका गांधी यांनी अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला, त्यांना उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाच्या प्रभारी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्त केले गेले. ११ सप्टेंबर २०२० रोजी संपूर्ण उत्तर प्रदेश प्रभारी (सरचिटणीस) म्हणून नियुक्ती करण्यात आली. ऑक्टोबर २०२१ मध्ये, पोलीस कोठडीत मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आग्रा येथे जात असताना गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांच्या मेळाव्यावरही बंदी घातली होती. २०२२ साली देशातल्या सर्वात मोठ्या राज्याच्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका लागल्या.प्रियंका गांधी यांनी २३ ऑक्टोबर २०२१ रोजी बाराबंकी येथून काँग्रेस पक्षाच्या उत्तर प्रदेश निवडणूक प्रचाराची सुरुवात केली. काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या. निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले नाही हा वेगळा भाग; पण त्यांनी त्या निवडणुकीत प्रचारासाठी वाहून घेतले होते, हे दिसून आले.

हेही वाचा >>>वसाहतवाद, विकास आणि विषमतेच्या इतिहासातून भविष्याकडे…

राजकारणात सक्रिय असलेल्या आणि काँग्रेसचा धर्मनिरपेक्ष विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या प्रियंका गांधी आता गांधी कुटुंबातील आणखी एक सदस्य म्हणून संसदेत दिसू लागतील, अशी शक्यता आहे. केरळच्या वायनाड या लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढवणार आहेत. या मतदारसंघांतून त्या निवडून आल्या तर त्यांची खासदार म्हणून असलेली नवी कारकीर्द पाहायला मिळेल… सलग २० वर्षे कोणतीही अपेक्षा न ठेवता कार्यरत असलेल्या एका निष्ठावंत महिलेचा हा विजय ठरेल… तरीही याला ‘घराणेशाही’ म्हणणारे काहीजण असतीलच.