ॲड. संदीप ताम्हनकर
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उद्दिष्ट काय किंवा भारत जोडो यात्रेनंतर पुढे काय, याची चर्चा होत आहे. काँग्रेससाठी स्वबळावर किंवा एखादी आघाडी करून सत्ता आणि पंतप्रधानपद मिळवणे याची शक्यता अद्याप तयार झाली नाही. तरीही भाजपला निर्विवाद बहुमत मिळणार नाही अशी चिन्हे दिसू लागली आहेत आणि हेच विरोधकांचे प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजे.
२०१९ मध्ये ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी ३०३ ठिकाणी भाजपचे खासदार निवडून आले होते. ३३ जागा एनडीए घटक पक्षांना मिळाल्या होत्या. याचाच अर्थ असा की साधारण २०० मतदारसंघांत भाजपविरोधी उमेदवार विजयी झाले होते, तसेच ३०३ पैकी अनेक ठिकाणी मतविभाजन झाले होते. विजयी भाजप खासदाराच्या मतांपेक्षा महत्त्वाच्या विरोधी उमेदवारांच्या मतांची एकत्रित संख्या खूप जास्त होती. देशभरात भाजपला ३७ टक्के मते मिळाली आणि काँग्रेसला भाजपच्या निम्मी मते मिळाली. या आकडेवारीनुसार केवळ १० ते १२ टक्के मतदारांचा कल बदलला तरी भाजपची दाणादाण उडेल. नितीशकुमार यांनी भाजपशी काडीमोड घेतल्यामुळे बिहारमध्ये एनडीए व भाजपच्या ४० जागा धोक्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र लढली तर भाजपला २०- २५ जागांचे नुकसान होईल. उद्धव ठाकरेंबाबत जनतेमध्ये सकारात्मक भावना आहेत. या वेळी उत्तर प्रदेशात पूर्वीएवढा एकतर्फी निकाल लागणार नाही. दक्षिण भारतात, हिमाचल, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला ठोस अस्तित्व आहे. ही परिस्थिती लक्षात घेता भाजपचा पराभव करण्याची ही एक ऐतिहासिक संधी काँग्रेस आणि अन्य विरोधकांकडे आहे.
भाजप, मोदी-शहा आणि संघ परिवार हे सतत निवडणुकीसाठी सज्जच असतात. याची कारणे स्पष्ट आहेत. २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकली नाही तर भाजपला पुन्हा सत्ता मिळवायला फार वेळ लागेल आणि परिश्रम करावे लागतील. सत्ता गेली तर त्यांच्या सगळ्या बड्या नेत्यांना आरोप, फिर्यादी, तुरुंगवास, खटले, चौकशीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे दोन टर्म मिळालेली सत्ता वापरून पुढील निवडणुकीत काहीही करून सत्ता टिकवणे त्यांच्यासाठी अनिवार्य आहे. यासाठी भाजपचे मिशन १४४, लोकसभेच्या निवडणुकीला अडीच वर्षे असल्यापासूनच सुरू झाले आहे. याच वेळी प्रमुख विरोधक म्हणून काँग्रेस पक्ष ‘मिशन २८८’नक्कीच यशस्वी करू शकतो हे समजून घेतले पाहिजे.
‘भारत जोडो’ला पूरक कार्यक्रम
प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्षही राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली कात टाकत आहे. भाजप केडर बेस पक्ष असून शिस्तबद्ध पद्धतीने काम करतो. काँग्रेस मास बेस पक्ष असून फार काही नियोजन, रणनीती असे डावपेच वापरत नाही, असे सर्वसाधारण निरीक्षण आहे. तरीही काँग्रेसला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तुल्यबळ लढत द्यायची असेल तर त्यासाठी काही किमान नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावे लागतील. भारत जोडो यात्रा हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. पण केवळ तेवढ्याने भाजपसारख्या अनेक हातांच्या ऑक्टोपसचा पराभव करता येणार नाही.
मिशन २८८
(१) सध्या भाजपेतर पक्षांनी जिंकलेल्या सुमारे २०० जागा कायम ठेवणे.
(२) भाजप/ एनडीएच्या उमेदवारांपेक्षा विरोधी पक्षांना एकत्रित जास्त मतदान झाले अशा ८८ जागांवर लक्ष केंद्रित करणे.
(३) अशा एकूण २८८ मतदारसंघांची यादी करणे.
(४) तिथे असलेल्या सर्व दखलपात्र पक्षांमधील इच्छुक उमेदवारांची चाचपणी करून पुरोगामी विचारधारेच्या आणि निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारीचा प्रस्ताव देणे.
(५) ते मान्य न झाल्यास अशा उमेदवारांच्या पक्षाबरोबर निवडणूकपूर्व आघाडी करणे आणि तो उमेदवार निवडून येईल असे पाहणे. या पद्धतीने किमान २८८ मतदारसंघांत बारकाईने नियोजन करणे.
(६) याचा प्रभाव आसपासच्या इतर मदारसंघांतही होतोच. परिणामी भाजप/ एनडीएला बहुमताचा २७२ हा आकडा गाठण्यापासून रोखणे.
सर्वसाधारण निवडणुकांमध्ये कोणत्या विचारधारेची सत्ता येणार हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. ही संधी गेली की पुढील पाच वर्षे वाट पाहात बसावे लागते. भाजपचे सरकार सलग दोन वेळा बहुतेक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यांची विचारधारा वर्णवर्चस्ववादी, समताविरोधी, संविधानविरोधी, विज्ञान आणि तर्क विरोधी असून जुनाट, परंपरागत, भांडवलदार स्नेही, गरीब, शेतकरी, कामगार आणि तरुणांच्या विरोधी म्हणजेच एकंदरीत दिशाहीन आहे. हे सरकार काही मोजक्या लोकांच्या फायद्याचे आणि जनसामान्यांच्या हितसंबंधांविरोधी आहे, प्रतिगामी आहे. म्हणून या विचारधारेचा पराभव झाला पाहिजे आणि तो लोकशाही मार्गाने निवडणुकीतून झाला पाहिजे.
मी काही निवडणूक रणनीतीकारतज्ज्ञ नाही किंवा राजकीय सल्लागारही नाही. कोणी माझा सल्ला मागितलेलाही नाही. तरीही माझ्या लोकशाही स्वातंत्र्याचा वापर करून किमान तारतम्य, तर्क, परिस्थितीचे आकलन आणि थोडा अभ्यास याच्या आधारे पुढील लोकसभा निवडणुकीबाबत वरील निरीक्षण मी मांडले आहे.
advsnt1968@gmail.com