सुनील स्वामी
भारताला प्राचीन इतिहास असला तरीही ज्या अर्थाने भारत नावाचे राष्ट्र सध्या अस्तित्वात आहे ते भारतीय संविधानाने निश्चित झाले आहे. भारताचे संविधान हा आधुनिक भारताचा प्राण आहे. संविधान अस्तित्वात आहे तोपर्यंत राष्ट्र या अर्थाने भारताचे अस्तित्व आहे. संविधान हाच भारताचा आणि प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा मुख्य आधार आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी परमेश्वर भरून उरला आहे असे परमेश्वराचे जे वर्णन आपण ऐकत आलो ते खऱ्या अर्थाने आपल्या संविधानाला लागू पडते. आपल्या जगण्याशी, अवतीभोवती घडणाऱ्या प्रत्येक व्यवहाराशी संविधानाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आहे. आपल्यासाठी संविधान इतके महत्त्वाचे आहे.
भारतीय संविधान हे लिखित स्वरूपातील जगातील सर्वात मोठे संविधान आहे. या संविधानामध्ये २२ भागात ३९५ कलमे आहेत आणि १२ परिशिष्टे आहेत. या संविधानाची सुरुवात प्रास्ताविकेने होते. भारतीय संविधानाचा गाभा या प्रास्ताविकेत आलेला आहे.
भारत हे राष्ट्र आपल्याला समजून घ्यायचे असेल तर संविधानाच्या प्रस्ताविकेतील प्रत्येक शब्द समजून घेतला पाहिजे. या प्रस्ताविकेची सुरुवात ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांनी होते. सर्व भारतीयांनी मिळून आम्ही भारतीय लोक असा एकत्र उच्चार करणे हीच एका अर्थाने आपल्या देशासाठी अनोखी गोष्ट आहे. कारण आपल्या देशाचा सामाजिक इतिहास विषमतेवर आधारलेला वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्थेचा इतिहास होता हे आपण नाकारू शकत नाही. मानवाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या क्षमता विकसित करण्याच्या सर्व संधी खूप मोठ्या समूहाला नाकारणारी ही विषमता भारतीय समाजावर अन्याय करणारी होती. जातीवर आधारलेली ही विषमता कुणाच्या जेवणाच्या पंक्ती कधी आणि कुठे बसणार इथपासून अगदी देवांच्या वाटणीपर्यंत जाऊन पोहोचली होती. कुणी लढायचे आणि कोणी लढायचे नाही हे सुद्धा वर्णव्यवस्था ठरवत होती आणि त्यामुळे या देशावर झालेल्या अनेक परकीय आक्रमणामध्ये आपण पराभूत झालेले दिसतो. जसे वर्ण आणि जाती होत्या तसे विविध धर्मांचे समूह या देशांमध्ये होते. त्यांचे वेगवेगळे अस्तित्व आणि त्यांच्या परस्परांमधील दुराव्यामुळे धार्मिक विषमतेची समस्याही होतीच. शिवाय पुरुषसत्ताक पद्धतीमुळे लिंगाधारित विषमता घरोघरी अस्तित्वात होती. माणसाचे माणूसपण नाकारणारी ही भेदभावाची स्थिती असताना अनेक स्तरावर विभागलेल्या या समाजाला, या देशाला एक करणे सोपी गोष्ट नव्हती ही सर्व प्रक्रिया स्वातंत्र्याच्या चळवळीच्या वैचारिक देवाणघेवाणीतून झाली आणि स्वतंत्र होत असताना विचारपूर्वक सर्व धर्म, वर्ण, जाती व्यवस्थेपासून दूर राहून, त्याचा त्याग करून संविधानाद्वारे आम्ही सर्व भारतीय एक आहोत असे आपण घोषित केले. फक्त घोषित केले नाही तर आपल्या संविधानामध्ये अशा प्रकारचे कायदे करून जात, धर्म, लिंग, प्रांत, भाषा अशा सर्व प्रकारच्या भेदभावापासून दूर राहून प्रत्येक भारतीयाला समानतेचा हक्क मिळवून देण्याचे काम भारतीय संविधानाने केले. संविधानानुसार आपण सर्व तत्त्वत: एका स्तरावर आलो. त्यामुळे आपण सर्व मिळून संविधानाच्या सुरुवातीला म्हणतो, ‘आम्ही..’
यामध्ये भारतीय हा दुसरा शब्दही खूप महत्त्वाचा आहे. संविधानाच्या पहिल्या कलमानुसार या देशाला ‘इंडिया’ अर्थात ‘भारत’ हे नाव आपण दिले आहे. या नावामध्ये सर्व भारतीयांचा समावेश होतो. आपण भारत असाच या देशाचा उल्लेख केला पाहिजे कारण हे राष्ट्र काही लोकांचे नसून सर्व लोकांचे आहे.
इतिहासामध्ये भारताचा हिंदुस्थान असाही उल्लेख आहे. आजही काही लोक जाणते-अजाणतेपणे भारताचा हिंदुस्थान असा उल्लेख करतात. याचा शब्दशः अर्थ घेतला तर ते राष्ट्र काही समूहांचे होईल आणि उर्वरित लोकांना नाकारणारे होईल. भारतीय या संकल्पनेमध्ये सर्व भारतीयांचा समावेश आहे.
इतिहासामध्ये भारतात राजेशाही होती. आता आपण लोकशाही स्वीकारली आहे. राजेशाहीमध्ये राजा मालक असतो तसे लोकशाहीमध्ये लोक हे राष्ट्राचे मालक असले पाहिजेत. त्यामुळे लोक हा शब्द या देशाचे मालक या अर्थाने आपण वापरला पाहिजे. बऱ्याच वेळेला २६ जानेवारी हा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन असा उल्लेख आपण करतो. पण तो योग्य आहे का? कुणीतरी राजा होता तेव्हा आपण प्रजा होतो. राजेशाही नाकारली तशीच प्रजा ही संकल्पना नाकारली पाहिजे. प्रजासत्ताकऐवजी आपण या दिवसाला लोकसत्ताक दिन असे म्हटले पाहिजे.
आम्ही भारताचे लोक या शब्दाच्या व्यापक अर्थातून पाहिले तर आजचे वास्तव आपला काय दिसते? आम्ही अजून ‘आम्ही’ झालो आहोत का? की अजूनही धर्म, वर्ण, जाती, लिंग अशा भेदांमध्येच अडकून पडलो आहोत? आम्ही सर्व ‘भारतीय’ झालो आहोत का? या देशातल्या सर्वांचे एक राष्ट्र आहे असे मानले जाते का? की या राष्ट्रांमध्ये कुणीतरी महत्त्वाचा आणि दुसरे दुय्यम असे मानले जाते ? या देशातले लोक खरेच लोक किंवा नागरिक बनले आहेत का? की अजूनही ते प्रजेच्या किंवा गुलामाच्या भूमिकेतच आहेत?
अलीकडे अवतीभवती घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे जातीच्या आणि धर्माच्या दृष्टीनेच पाहायचे अशी पद्धत रूढ होत आहे. एखाद्या मुलीवर बलात्कार झालेला असेल तर आधी ती मुलगी कोणत्या जातीची आहे हे पाहिले जाते आणि मग प्रतिक्रिया द्यायची किंवा नाही किंवा काय प्रतिक्रिया द्यायची हे ठरवले जाते. हे एक उदाहरण आम्ही किती ‘आम्ही’ आहोत हे ठरवण्यासाठी पुरेसे आहे.
स्वातंत्र्यदिनादिवशी किंवा लोकसत्ताक दिनादिवशी गावागावांमध्ये ध्वजारोहण होते. ग्रामपंचायतीसमोर होणाऱ्या ध्वजारोहणासाठी किती गावकरी उपस्थित असतात? ग्रामपंचायतच्या शेजारी असलेल्या कुटुंबातील लोक तरी उपस्थित असतात का? मात्र आपल्या जातीचा मेळावा अगदी ५००-६०० किलोमीटर अंतरावर असला तरीही गावातून शेकडो आणि हजारोंच्या संख्येने लोक त्या मेळाव्याला जातात. हे आपण ‘भारतीय’ बनल्याचे उदाहरण आहे का? निवडून आलेल्या व्यक्तीकडे लोकप्रतिनिधी म्हणून न पाहता एखादा राजा किंवा संस्थानिक म्हणून पाहण्याची वृत्ती आणि त्याच्यापुढे गुलामासारखे मुजरे करण्याची पद्धत आपण पाहतो तेव्हा आपण या देशाचे लोक किंवा नागरिक झालो का असा प्रश्न पडतो. आपल्या नागरिकत्वाची राष्ट्रीयत्वाची जाण इतकी बोधक आणि चुकीची असेल तर हे राष्ट्र कसे घडेल?
असे होण्याचे कारण काय? आज आपण सहजपणे लोकांना विचारले की हा देश ज्या संविधानावर चालतो ते संविधान आपण पाहिले आहे का? तर पाच टक्के लोकसुद्धा होय म्हणत नाहीत. शाळा-महाविद्यालयामधून नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र शिकवले जाते पण शिक्षक किंवा प्राध्यापक हे संविधान विद्यार्थ्यांना दाखवत नाहीत. अनेक शिक्षक, प्राध्यापकानी सुद्धा संविधान पाहिलेले नसते. समजून घेणे किंवा त्याप्रमाणे वागणे हे दूरच. मग उद्याचा नागरिक तरी कसा घडणार?
‘आम्ही भारताचे लोक’ हे शब्द संविधानाच्या प्रास्ताविकेच्या एका मोठ्या आणि अतिशय गंभीर, महत्त्वपूर्ण अशा वाक्याचा ‘कर्ता’ आहेत. याचा अर्थ या राष्ट्राचे जे काही चांगले करायचे आहे ते या देशातील लोकच करतील.
आपल्याला खरोखरच भारतीय नागरिक व्हायचे असेल, ‘आम्ही भारतीय लोक’ म्हणायचे असेल तर संविधानाचा संवाद वाढला पाहिजे. संविधानाचा किंवा संविधान निर्माण करणाऱ्यांचा केवळ जयजयकार करून चालणार नाही तर साध्या-सोप्या आणि आकर्षक भाषेत संविधानाचं महत्त्व समजून देत ‘आम्ही भारतीय लोक…’ पर्यंतचा प्रवास घडवायला हवा.
लेखक लोकराजा शाहू संविधान संवादक प्रशिक्षण केंद्राचे महाराष्ट्र विभागाचे कार्याध्यक्ष आहेत.
navnirmanindia@gmail.com