– अनघा शिराळकर
खगोलशास्त्राचे व हवामानशास्त्राचे महत्त्व लक्षात घेऊन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १७९२ साली मद्रास (चेन्नई), १८२६ साली कुलाबा आणि १८३६ साली त्रिवेंद्रम (तिरूअनंतपूरम) येथे वेधशाळा स्थापन केल्या. १८४१ साली उत्तर भारतात सिमला येथे एक आणि १८४७ साली दक्षिण भारतात दोडाबेट्टा येथे एक अशा दोन उंच ठिकाणांवरच्या वेधशाळा स्थापन झाल्या. १८३५ ते १८५५ या कालावधीत हेन्री पिडिंग्टन या शास्त्रज्ञाचे उष्णकटिबंधीय वादळे (ट्रॉपिकल सायक्लोन्स) या विषयावर ४० शोधनिबंध ‘जर्नल ऑफ दि एशिॲटिक सोसायटी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले. १८४२ साली या शास्त्रज्ञाचा ‘वादळांचे नियम (लॉज् ऑफ सायक्लोन्स)’ हा प्रबंधही प्रसिद्ध झाला. हा देशातील हवामानाच्या विषयातील महत्त्वपूर्ण शास्त्रीय अभ्यास होता.
हवामानाच्या नोंदी आणि त्यांचे विश्लेषण एकाच ठिकाणी व्हावे आणि भारतात हवामान सेवेची राष्ट्रीय स्तरावर व्यवस्था व्हावी यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभाग (इंडिया मिटीऑरॉलॉजिकल डिपार्टमेंट (आयएमडी) १५ जानेवारी १८७५ रोजी कोलकाता येथे स्थापन झाले. हेन्री फ्रान्सिस ब्लॅनफोर्ड यांची हवामानशास्त्राचे पहिले वार्ताहर आणि सर जॉन इलिएट यांची वेधशाळांचे पहिले महासंचालक म्हणून नियुक्ती झाली. या विभागाचे मुख्य, केंद्रीय कार्यालय कोलकाता इथे तर विभागीय वेधशाळा व त्यांची कार्यालये कोलकाता, लाहोर, चेन्नई व अलाहाबाद येथे सुरू झाली.
टेलीग्राफचा शोध लागल्यावर त्याचा वापर करून देशाच्या हवामानाचा पहिला दैनिक अहवाल १५ जून १८७८ रोजी सिमला येथून प्रकाशित झाला. नैऋत्य मोसमी पावसाचा पहिला हंगामी अंदाज ०४ जून १८८६ रोजी जाहीर केला. देशातील हवेच्या दाबाचे स्वरूप, वाऱ्याची दिशा आणि आधीच्या २४ तासांत नोंदवलेला पाऊस हे सर्व दाखविणारा पहिला हवामानाचा तक्ता १ सप्टेंबर १८८७ रोजी प्रसिद्ध झाला. प्रारंभी आयएमडीत सर्व कर्मचारी ब्रिटिश होते. १८८४ साली लाला रुचीराम सहानी व १८८६ साली लाला हेमराज या दोन भारतीयांच्या नियुक्तिंबरोबर हवामान खात्यात भारतीयांचा प्रवेश झाला. भूकंपशास्त्र हा हवामानशास्त्राचाच भाग असल्याने त्यांच्या नोंदींची गरज लक्षात घेऊन कोलकात्यात अलीपोर येथे १८८८ साली भूकंपासंबंधीचे कार्य करणारी पहिली वेधशाळा स्थापन झाली. ब्रिटिश वायू सेनेच्या वायव्य भारतातील हवाई वाहतुकीसाठी हवामानाच्या पूर्वानुमानाची गरज पूर्ण करण्यासाठी उंच जागेवरील वेधशाळा १९१३ साली आग्रा इथे तर १९१८ साली लाहोर इथे स्थापन झाल्या. हवामानाच्या पूर्वानुमानाची बरीचशी कामे सिमला येथील कार्यालयात होत असल्याने भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्य कार्यालय १९०५ साली कोलकाता इथून सिमला येथे स्थलांतरित केले. या कार्यालयातून १९२१ सालापासून टेलीग्राफद्वारे पूर्वानुमान पाठवणे सुरू झाले. भारतात हवाई वाहतुकीच्या विस्ताराबरोबरच हवामान पूर्वानुमान सेवा आणि संपर्क साधनांचाही विकास होत गेला. त्यानंतर हवामानशास्त्राच्या अभ्यास व संशोधनासाठी पुणे हे शहर निवडले गेले. त्यानुसार मुख्य कार्यालय सिमला येथून मार्च १९२८ मध्ये पुण्यातील शिवाजीनगर येथे स्थलांतरित झाले, हे कार्यालय आजही सिमला ऑफीस या नावाने ओळखले जाते. संपूर्ण भारताच्या हवामानाचा अहवाल ०१ एप्रिल १९२८ पासून पुण्याच्या विभागातून प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली. पुण्यातील कार्यालयाच्या इमारतीचे २० जुलै १९२८ रोजी उद्घाटन झाले.
हेही वाचा – भारतीय हवामानशास्त्र विभागाची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वाटचाल
दुसरे महायुद्ध सुरू झाले (१९३९) तेव्हा आवश्यक असणारी हवामानविषयक माहिती त्वरीत उपलब्ध होण्यासाठी हवामान खात्याचा मुख्य अधिकारी देशाच्या मुख्य वायुदलाच्या कार्यालयाच्या नजीक व सतत संपर्कात असण्याची गरज निर्माण झाली. त्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्य कार्यालय १९४५ साली दिल्ली येथे हलविण्यात आले आणि डॉ. एस. के. बॅनर्जी यांची पहिले भारतीय व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली. कोणत्याही अभ्यासक्रमात हवामानशास्त्राचा समावेश नसल्याने भारतीय हवामानशास्त्र विभागातील कर्मचारी व अधिकारी हे भौतिकशास्त्र, गणित, संख्याशास्त्र व तत्सम विषयातील पदवीधर असायचे. त्यांच्यासाठी हवामानशास्त्राचा प्रशिक्षण विभाग १९४२ साली पुण्यात सुरू करण्यात आला.
साधारण १९५० साली हवामानाचे विशेषतः मोसमी पावसाचे पूर्वानुमान सांख्यिकी पद्धतीने करण्यास सुरुवात झाली. त्यासाठी संगणकाचा वापर सुरू झाला. त्याच सुमारास उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या माहितीचाही वापर करण्यास सुरुवात झाली. हवामानशास्त्राच्या प्रगतीसाठी संशोधन होण्याची नितांत गरज भासू लागली. त्यानुसार देशाच्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये शिफारसही केली गेली. त्याला मंजुरी मिळून १७ नोव्हेंबर १९६२ रोजी भारतीय हवामानशास्त्र विभागातच उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था खास संशोधनकार्यासाठी स्थापन करण्यात आली.
हवामानाच्या विशिष्ट कालावधीत, विशिष्ट भौगोलिक स्थलांवरील निरीक्षणे घेण्याचे काम भारतीय हवामानशास्त्र विभाग करतो. ही निरीक्षणे स्वतःची तसेच इतर संस्थांच्या बरोबर तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर चालू असतात. त्यातील इंटरनॅशनल इंडियन ओशन एक्सपिडिशन (आयआयओई) हा हिंदी महासागराचा बहुउद्देशीय अभ्यास करण्यासाठी व निरीक्षणे नोंदवण्यासाठी बहुराष्ट्रीय प्रकल्प महत्त्वाचा होता. १९५९ ते १९६५ या काळात विविध कार्य गटांनी हा प्रकल्प पार पाडला. यामध्ये १४ देशांतील शास्त्रज्ञांनी भाग घेतला होता. खास संशोधन जहाजे व विमाने निरीक्षणे घेण्यासाठी आवश्यक त्या उपकरणांसह वापरली जात होती. यामध्ये हवामानशास्त्राचा समावेश असणे हे अतिशय महत्त्वाचे होते. या प्रकल्पाच्या कामाची आखणी, नियोजन, आधार आणि सहभागी संस्थांमध्ये समन्वय राखण्यासाठी १ जानेवारी १९६३ रोजी आंतरराष्ट्रीय हवामानशास्त्र केंद्र मुंबईत स्थापन करण्यात आले. या केंद्राला संयुक्त राष्ट्रसंघाने निधी पुरविला. अमेरिकेच्या हवाई विद्यापीठातील प्राध्यापक सी. एस. रॅमेज या वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पातील हवामानाची निरीक्षणे, अभ्यास व संशोधन करण्यात आले. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आणि उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या शास्त्रज्ञांनी या प्रकल्पात भाग घेऊन हिंदी महासागराचा हवामानशास्त्राशी विशेषतः मोसमी पावसाशी असलेल्या संबंधाच्या संशोधनासाठी मोठे योगदान दिले. या प्रकल्पात हवेच्या निरीक्षणांसाठी जहाजावर व विमानात लागणारी उपकरणे भारतीय हवामानशास्त्र विभागातील पहिल्या महिला हवामानशास्त्रज्ञ मिस अॅना मणी यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेली होती. यानंतरही अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बहुराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये भारतीय हवामानशास्त्र विभाग सहभागी होत राहिला.
हेही वाचा – पतौडींचा सैफ आणि समाजाचा कैफ
हवामानाच्या घटकांच्या नोंदी, अहवाल व तक्ते संगणकीय पध्दतीने जतन करून ठेवण्यासाठी १९७७ साली पुणे येथील कार्यालयात राष्ट्रीय माहिती केंद्र स्थापन केले. यामध्ये १८७५ सालापूर्वीच्याही नोंदी जतन केलेल्या आहेत. या नोंदी कोलकाता येथून सिमला आणि नंतर पुणे इथे कायमस्वरूपी आल्या. या नोंदी १९४५ सालापर्यंत हस्तलिखीत स्वरूपात होत्या. त्यातील फार जुन्या नोंदीचे मायक्रोफिल्मच्या स्वरूपात जतन केले. १९४५ सालापासून या नोंदी पंच कार्डांमध्ये स्थलांतरित करण्यात आल्या. १९६८ साली भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेत IBM 1620 हा संगणक आला. IBM 1620 आणि मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा CDC 3600 या दोन संगणकांचा वापर केला गेला. काळानुरूप तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे या नोंदी अद्ययावत संगणकामध्ये साठवण्यात आल्या. या नोंदी जतन करण्यासाठी व हवामानाच्या पूर्वानुमानासाठी कराव्या लागणाऱ्या आकडेमोडींसाठी कमी जागा व्यापणारे व जलद गतीने चालणारे अत्याधुनिक संगणक वापरले जाऊ लागले.
विविध भागांतील वेधशाळांनी केलेल्या निरीक्षणांच्या व हवामानाच्या पूर्वानुमानांच्या नोंदी यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाने भूकंपशास्त्र, भूभौतिकशास्त्र, सौरभौतिकशास्त्र, भूचुंबकशास्त्र, शेतीशास्त्र, पुराचे व पाण्याचे व्यवस्थापन इत्यादी अनेक शास्त्रांच्या प्रगतीला हातभार लावला.
(या लेखाचा उर्वरित भाग दैनिक लोकसत्ताच्या रविवार विशेषमध्ये)
लेखिका भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था, पुणे येथील निवृत्त वैज्ञानिक अधिकारी आहेत