लोकसभा निवडणूक प्रचारात भाजपप्रणीत महायुती आणि महाविकास आघाडीत खणाखणी सुरू असताना जागावाटप, प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना उमेदवारी आणि अन्य पक्षांतून भाजपमध्ये आलेल्यांना मानाचे स्थान यासह अनेक मुद्दयांवर मुंबई भाजप अध्यक्ष तसेच आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ या कार्यक्रमात मनमोकळा संवाद साधला..

महायुतीत सारे काही सुरळीत आहे, असा दावा केला जातो. मग जागावाटपास विलंब का लागला ?

devendra fadnavis likely visit davos
दावोसमध्ये पुढील आठवड्यात जागतिक आर्थिक परिषद; सात लाख कोटींचे करार अपेक्षित
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
Conditional possession to eligible tenants on comprehensive list decision of MHADA Vice Chairman
बृहतसूचीवरील पात्र भाडेकरुंना सशर्त ताबा, म्हाडा उपाध्यक्षांचा निर्णय
Dr Kartik Karkera from Mumbai
मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा नाशिक मविप्र मॅरेथॉन -२०२५ चा विजेता, पहिले तीनही धावपटू महाराष्ट्रातील
Loksatta anvyarth Lok Sabha Elections BJP Narendra Modi Chandrababu Naidu Telugu Desam Party
अन्वयार्थ: आहे ‘डबल इंजिन’ तरीही…
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘पुण्यात ७ दुकानं, १५ कोटींचा संपूर्ण मजला…’, आमदार सुरेश धसांचा ‘आका’कडील संपत्तीबाबत मोठा दावा
Rohit Sharma and Virat Kohli included in India squad for Champions Trophy ODIs
रोहित, विराटच्या समावेशाची शक्यता; चॅम्पियन्स करंडकासाठी राहुल, शमी, जडेजाबाबत संदिग्धता

महायुतीच्या जागावाटपास काहीसा विलंब झाला, हे मान्यच आहे. तो टाळता आला असता, तर बरे झाले असते. कुठल्याही निवडणुकीत नियोजन किंवा योजनाबद्ध पद्धतीने काम झाले, तर चांगलेच असते. एकसूत्रीपणा फायद्याचाच असतो. भाजपला अन्य पक्षांच्या जागा हव्या होत्या, हा आरोप आम्हाला मान्य नाही. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये प्रत्येक जागेवर कोणत्या पक्षाचा आणि कोण उमेदवार निवडून येईल, याविषयी मैत्रीपूर्ण चर्चा सुरू होती. कोठेही विसंवाद नव्हता. तीनही पक्षांच्या प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वितुष्ट नाही की विसंवाद नाही. कोठेही पत्रकबाजी झाली नाही किंवा महायुतीच्या नेत्यांनी जाहीरपणे वादग्रस्त वक्तव्ये केली नाहीत. उलट सांगलीच्या जागेवरून काँग्रेस नेत्यांनी मैत्रीपूर्ण लढू, असे वक्तव्य केले होते. तर एका जागेसाठी पंतप्रधानपदाची संधी गमावू नका, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला होता. नाना पटोले यांना गंभीरपणे घेऊ नका, असे सांगितले होते. जितेंद्र आव्हाडांचीही अशीच वक्तव्ये होती. महायुतीच्या नेत्यांमध्ये मात्र टोकाची भांडणे किंवा वक्तव्ये नव्हती. आम्ही मुंबईत महायुतीच्या कार्यकर्त्यांचे ३६ मेळावे गेल्या काही दिवसांमध्ये घेतले. विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा केल्या. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असल्याचे आम्हाला दिसून आले. आम्ही उमेदवारांना योग्य पद्धतीने मतदारांपर्यंत पोचविणार असून मुंबईतील सहाही जागा निश्चितपणे जिंकू.

हेही वाचा >>> महाराष्ट्रात जैवतंत्रज्ञानासाठी स्वतंत्र खाते हवे!

भाजपचेही काँग्रेसीकरण झाले आहे, असे वाटते का ?

भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश आणि शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी यावरून भाजपवर विरोधकांकडून टीका केली जाते. भाजप वॉशिंग मशीन आहे का, विचारले जाते. पण जेव्हा हे नेते उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांकडे होते आणि भाजप नेत्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, तेव्हा ते ठाकरे किंवा पवार यांना भ्रष्टाचारी वाटत नव्हते. त्यांच्यावर भाजपने केलेले आरोप बिनबुडाचे व राजकीय असल्याचे सांगून ठाकरे व पवार हे त्यांचा बचाव करीत होते. तुमच्याकडे असताना चोर नसलेला नेता भाजपबरोबर आल्यावर भ्रष्टाचारी कसा? आम्ही नेत्यांवर आरोप केले, पण शिक्षा झालेल्या कुठल्याही नेत्याला आमच्याबरोबर घेणार नाही. काही नेत्यांना न्यायालयाने जामीन दिला आहे. राज्यघटना, कायदा आणि नियम यापलीकडे जाऊन भाजपने काहीही केलेले नाही. देशातील न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. त्यामुळे भाजपचे काँग्रेसीकरण होत असल्याचा आरोप चुकीचा असून उलट जे जुने काँग्रेसचे होते, त्यांचे हिंदूत्व किंवा भाजपकरण झाले आहे. अन्य पक्षांमधील नेत्यांना आपल्याबरोबर घेताना भाजपने कधीही अंत्योदय किंवा मूळ विचारधारेशी कधीही तडजोड केलेली नाही. की विकासाच्या मुद्दयावर तडजोड केलेली नाही. भाजपचे ९० टक्के पदाधिकारी मूळ पक्षातीलच आहेत. ‘मोदी परिवार’ आम्हाला वाढवायचा आहे, पण राष्ट्रविरोधी आरोप असलेल्यांना आम्ही कधीही बरोबर घेणार नाही. यामुळेच नवाब मलिक यांच्या महायुतीतील प्रवेशास आम्ही आक्षेप घेतला होता. रवींद्र वायकर, यामिनी जाधव किंवा अन्य काही उमेदवारांबाबत भाजप कार्यकर्त्यांना आक्षेप असणे स्वाभाविक असून पक्षात लोकशाही आहे. पण शिस्त मोडून कोणीही काही केलेले नाही. कुख्यात अरुण गवळी यांच्या पक्षाकडे आम्ही कधीही पाठिंबा मागितलेला नाही. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार सत्तेवर आणायचे आहे.

एकनाथ शिंदे बरोबर आल्याने महायुतीचे सरकार भक्कम झाले होते तर मग भाजपला अजित पवारांची गरज का भासली ?

अजित पवार फुटण्यास उद्धव ठाकरे हेच जबाबदार होते. मुलाच्या आणि मुलीच्यावरील प्रेमापोटी राज्यातील दोन पक्ष फुटले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा शिवसेना नेत्याला  चांगले स्थान दिले असते, नगरविकास खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे जाणार, अशी चर्चा झाली नसती, तर त्या नेत्यांना असुरक्षित वाटले नसते. त्यामुळे फुटीचे बीज भाजपचे नाही. शरद पवारांनीही मुलीऐवजी अजित पवारांना नेतृत्व दिले असते, तर अजित पवारांनाही असुरक्षित वाटले नसते. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी धोका दिल्याने आणि शरद पवार यांनी लबाडी केल्याने दोघांनाही धडा शिकविला पाहिजे, अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भूमिका होती. युतीमध्ये निवडणूक लढवून ठाकरे यांनी २०१९ मध्ये विश्वासघात केला. माझे दरवाजे सर्वांसाठी उघडे आहेत, असे ठाकरे सांगत होते. आम्ही त्यांच्याकडे पाठिंब्यासाठी गेलो नव्हतो, तर तेच आले होते. शरद पवार यांनी २०१४ मध्ये आम्ही न मागता पाठिंबा जाहीर केला होता. शिवसेनेला भाजपपासून दूर ठेवण्यासाठी ही खेळी होती, असे त्यांनीच सांगितले आहे. पवार यांनी २०१७ तसेच २०१९ मध्ये आधी सरकार बनविण्यासाठी स्वत:हून प्रस्ताव दिला आणि नंतर विलंब लावून लबाडी केली. आम्ही मैत्रीला जागत शिवसेनेसह तीन पक्षांचे सरकार असावे, अशी भूमिका घेतली असताना पवार यांनी शिवसेनेला सोबत घेण्यास २०१७ मध्ये विरोध केला होता आणि नंतर भूमिका बदलत २०१९ मध्ये त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केले, हे कुठल्या नैतिकतेत बसते? राजकीय लढाईतून आम्हाला पराभूत केले, तर हरकत नाही. पण धोका किंवा लबाडी केली, तर त्याला चाणक्य नीतीतूनच उत्तर द्यावे लागते. त्यामुळे त्यांना धडा शिकवून भाजपने काहीही चुकीचे केले नाही किंवा त्याचा आम्हाला प्रश्चात्तापही नाही. पक्ष वाढीसाठी आमचे दरवाजे साऱ्यांनाच उघडे आहेत.  

हेही वाचा >>> समोरच्या बाकावरून : गोबेल्सलाही वाटेल भाजपचा अभिमान..

उद्धव ठाकरे तर नेहमी भाजपला दोष देतात..

आम्ही शिवसेनेला कधीच दूर केलेले नाही. २०१७ मध्ये शरद पवार आमच्याबरोबर येण्यास तयार झाले होते. पण शिवसेनेला दूर करावे ही पवारांची अट होती. पण आम्ही शिवसेना या जुन्या मित्राला फेकून दिले नाही. उलट आमच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे तसेच अन्य नेते अनेक बाबतीत विरोधी भूमिका घेत. पण आम्ही कधीच त्यांना दुखावले नाही. शिवसेनेने आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला विरोध केला असतानाही आम्ही तसे वागलो नाही. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी दादरची महापौर निवासाची जागा दिली. वास्तविक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मारकासाठी महापौर बंगला दिला नसता, तर बरे झाले असते, असे मुंबईतील सामान्य मराठी माणसाला आणि शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांना वाटते. पण बाळासाहेबांबद्दल प्रेम, आदर, श्रद्धा, अनेक वर्षांचे संबंध याचा विचार करून भाजप सरकारने महापौर बंगला देण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल पश्चात्ताप नाही. पण उद्धव ठाकरे स्मारकावर मालकी गाजवायला लागले आहेत. ही सार्वजनिक मालमत्ता असली पाहिजे, ही जनतेची अपेक्षा आहे आणि त्याची जाणीव आम्ही ठाकरे यांना करून देऊ. आम्ही कालही मोठा भाऊ होतो आणि आजही आहोत. निर्णय घेताना घर तुटणार नाही, यासाठी मोठया भावाने समजूतदारपणा दाखवत आवश्यक गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधामुळे नाणार, वाढवण हे राज्यहिताचे प्रकल्प रखडले. त्याला ठाकरेच जबाबदार आहेत. शिवसेनेच्या जीवावर भाजप निवडून येत होता, हे निखालस खोटे आहे. आम्ही एकमेकांना पूरक ठरलो, आम्हाला एकमेकांचा उपयोग झाला, हे सत्य आहे. जनसंघाचे नगरसेवक शिवसेनेच्या जन्माआधी होते आणि आमचे सदस्य मंत्रिमंडळातही होते. भाजपने मैत्री केली नसती, तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडाच, दिल्लीचे सरकार आणि लोकसभेचे अध्यक्षपदही दिसले नसते.

राज्यात भाजपला अनुकूल वातावरण असल्याचे सातत्याने सांगण्यात येते. पण भाजपला १४४ चा जादूई आकडा गाठता आलेला नाही. असे का?

महाराष्ट्रात आम्ही १२५ हून पुढे गेलो नाही, हे सत्य आहे. ताकद वाढविण्यासाठी आम्ही अजूनही प्रयत्न करू. शत प्रतिशत भाजप असे म्हटल्यावर भाजपला विरोधक शिल्लकच ठेवायचे नाहीत, हुकूमशाही आणायची आहे, असा अपप्रचार केला जातो. पण अजूनही आम्ही शतप्रतिशत भाजपसाठी प्रयत्न करणार. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह अगदी एमआयएमलाही पक्षविस्तार करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पाहिला, तर १९८० नंतर विधानसभा निवडणुकीत तीन आकडी आमदारसंख्या गाठलेला भाजपच आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मित्रपक्षांसह ११२ व १२५ ही संख्या दोन वेळा गाठली आहे. तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची दोन आकडी संख्या गाठतानाही दमछाक होते. तरीही राजकीय विश्लेषकांच्या मते ठाकरे व पवार हे राज्यातील सर्वोच्च नेते असतात. मोदींचा राज्याशी संबंध काय, असा प्रश्न विचारला जातो. पण मुंबईत जन्माला आलेला राष्ट्रीय पक्ष भाजपच आहे.

उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेसाठी आपल्या नावाची चर्चा होती. दिल्लीत जाण्याचे का टाळलेत?

भाजपने मला नगरसेवक, गटनेता, विधानसभा व विधान परिषद आमदार, मुंबई भाजपचे तीनदा अध्यक्षपद ही पदे दिली. ऑलिम्पिकसाठी यंत्रणा उभारण्याऱ्या संघटनेत नियुक्ती आणि बीसीसीआयच्या खजिनदारपदासाठी पक्षाची मदत झाली. लोकसभा उमेदवारीसाठी माझे नाव चर्चेत होते. पण मला महाराष्ट्राची आणखी सेवा करायची आहे, आणखी काही विषयांचा अभ्यास करायचा आहे. निर्णयप्रक्रियेत असलेल्या नेत्यांमध्ये माझा समावेश असून अजून काही गोष्टी राज्यात मला आकर्षित करीत आहेत. त्यामुळे पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारीन.

‘४०० पार’च्या घोषणेने राज्यातील दुर्बल घटक तसेच विविध समाजघटकांमध्ये वेगळा संदेश गेला आहे. त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे?

राज्यघटनेबाबत विरोधकांकडून अपप्रचार असून आमचा जाहीरनामा, मोदी, शहा किंवा वरिष्ठ नेत्यांनी राज्यघटनेबाबत काहीही म्हटलेले नाही. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देताना आम्ही प्रामाणिकपणे खरी भूमिका मांडत आहोत. काँग्रेसला धर्माच्या आधारावर आरक्षण द्यायचे असून कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील उदाहरणांवरून हे स्पष्टच दिसते. आम्ही मराठा समाजाला, आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण दिले. धर्माच्या आधारावर आरक्षण घटनाबाह्य असून ते देण्यासाठी काँगेसला घटनेची तोडफोड करायची आहे किंवा ती बदलायची आहे आणि अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा मनोदय आहे. राहुल गांधी हे सर्वेक्षण करण्याची भूमिका मांडतात, अल्पसंख्याकांचा राष्ट्रीय संपदेवर पहिला हक्क आहे, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले. सॅम पित्रोदा यांनी वारसा हक्क करावर भाष्य केले. धर्माच्या आधारावर आरक्षण देणार नाही, असे काँग्रेस जनतेला लेखी देण्यास तयार नसल्याने त्यांच्या मनात पाप आहे, हेच दिसून येते.

* भाजपला अमराठी समजणे विपर्यास. विनोद तावडे, भाई गिरकर मुंबई अध्यक्ष झाले. अजित पवार भाजपबरोबर सत्तेत येण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार

* देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनेच राज्यातील निर्णय

* फडणवीस यांनी पक्षासाठी कमीपणा घेऊन त्याग केला

* अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी हे संघटनाशरण नेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ‘हायकमांड’ नाही. आमचे ऐकलेच पाहिजे, अशी भूमिका नसते

* राज्यात महाविकास आघाडीने १८ हून अधिक जागा जिंकल्यास मी राजकारणातून निवृत्ती घेईन  विधानसभा निवडणूकही महायुतीतच लढणार शब्दांकन- उमाकांत देशपांडे

Story img Loader