श्रीरंग सामंत

युरोपियन युनियन सर्वसमावेशक नसून श्वेतवर्णीय युरोपीयांपुरतीच मर्यादित संघटना आहे, हे मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुस्तकाविषयी..

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
russia ins tushil
रशियाने भारताला सुपूर्द केली क्षेपणास्त्राने सुसज्ज युद्धनौका; ‘आयएनएस तुशील’ काय आहे? भारतासाठी याचे महत्त्व काय?
Russia Discovers Ancient Gold Treasure in Crimea — Ukraine Considers It Looting
“ते आमचा वारसा लुटत आहेत,” युक्रेनचा आरोप; रशियाने क्रिमियामध्ये शोधला प्राचीन सोन्याचा खजिना !
Image of Zelensky
Russia Vs Ukraine War : “जोपर्यंत नाटोचे सदस्यत्व…”, झेलेन्स्की यांनी का केली युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात करण्याची मागणी?
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार

युक्रेन युद्धाच्या सुरुवातीला पाश्चात्त्य देशांनी इतर सर्व देशांना आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला. त्याला हुकूमशाही विरुद्ध लोकशाही असे स्वरूप देत रशिया विरुद्ध इतर राष्ट्रांची मोट बांधायचा प्रयत्न केला. त्या वेळी भारताच्या भूमिकेची आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी एका वाक्यात मांडणी केली होती. तिचा मथितार्थ हा, की युरोपच्या समस्या या संपूर्ण जगाच्या समस्या नव्हेत.

युक्रेन-रशिया संघर्षांची ठिणगी पेटण्याचे आताचे कारण युक्रेनची युरोपियन युनियनचा (ईयू) सदस्य होण्याची अभिलाषा हे आहे. ईयूने युक्रेनला सामावून घ्यायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण ज्या प्रकारे ईयू जगासाठी लोकशाही आणि मानवतेचे मापदंड ठरवते त्यामागचे वास्तव पडताळून पाहणे उद्बोधक ठरेल. ईयूला काहीजण कॉस्मोपॉलिटन अभिव्यक्ती- विविधता, सर्वसमावेशकता आणि वैचारिक मोकळीक मान्य करणारा उपक्रम मानतात. ईयू स्वत: आंतरराष्ट्रीय संदर्भात एक अनुकरणीय मापदंड असल्याचे भासवते, पण हान्स कुंदनानींचे  ‘युरो व्हाइटनेस’ ईयूचा गाभा उलगडत जाते. त्यांच्या पुस्तकाचे उपशीर्षक याबाबत बरेच बोलके आहे- ‘कल्चर, एम्पायर अँड रेस इन द युरोपियन प्रोजेक्ट’. ढोबळपणे- युरोपीय प्रकल्पामागील सांस्कृतिक श्रेष्ठत्ववाद, साम्राज्यवाद आणि वंशवाद. कुंदनानी यांचे मत असे आहे की युरोप म्हणजेच जग असे मानण्याची प्रवृत्ती- जिला ते युरोकेंद्रित भ्रम म्हणतात ती ईयू काय आहे आणि तिची जगात काय भूमिका आहे हे समजण्याच्या आड येते. कॉस्मोपॉलिटन युरोप हे मिथक आहे. त्यास प्रादेशिकतेची अभिव्यक्ती म्हटल्यास ईयूचा खरा अर्थ आणि तिची जगातील स्थिती समजून घेता येईल. दुसऱ्या महायुद्धापासून आतापर्यंत ईयूमध्ये एकत्र आलेले देश केवळ युरोपमधीलच होते. युरोप म्हणजे जग नसल्यामुळे युरोपीय एकात्मता ही जगासाठी एकात्मतेचे उदाहरण होऊ शकत नाही.

हेही वाचा >>>बंदी कसली… कोचिंग क्लासेसना ‘स्टार्टअप’ दर्जा द्या

कुंदनानी यांचे वडील मूळचे भारतीय होते व आई डच. हान्स ब्रिटिश आहेत पण आपली नाळ युरोपशीही जुळलेली आहे, असे ते म्हणतात. संस्कृतिकदृष्टय़ा त्यांची ब्रिटन आणि युरोप दोघांशीही जवळीक आहे व तिचा उपयोग ते ब्रेक्झिटची कारणं उलगडण्यासाठीही करतात. आपण ब्रिटनच्या एका पूर्वीच्या वसाहतीशी संबंधित होतो, हेही ते विसरत नाहीत. ‘युरोपियन कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स’मध्ये काम करताना त्यांचा ईयूशी संस्थात्मक संबंध आला व त्यांच्या विचारांना दिशा मिळत गेली. ते रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ युरोपियन अफेयर्सच्या युरोप प्रोग्रामवरही काम करत असत. या छोटेखानी पुस्तकाची सुरुवात तिथेच झाली. पुस्तकातील बराचसा भाग हे त्यांच्या विविध ब्रिटिश नियतकालिकांत प्रकाशित लेखांचे संकलन आहे.

कुंदनानी म्हणतात, की आपण ईयूकडे संयुक्त राष्ट्राचा एक प्रगत व छोटेखानी आविष्कार म्हणून न पाहता, क्षेत्रीयतेची अभिव्यक्ती म्हणून पाहणे उचित ठरेल, जे बऱ्याच प्रमाणात अनन्य राष्ट्रीयतेचे प्रतीक आहे- ज्याला ते महाद्वीप आकाराची राष्ट्रीयता असे म्हणतात. या भावनेची उत्पत्ती आणि तिचे आजचे स्वरूप याचे वर्णन त्यांनी पुस्तकातील सहा प्रकरणांत केले आहे व प्रत्येक प्रकरणाचे शीर्षक बोलके आहे. राष्ट्रीयतेप्रमाणेच क्षेत्रीयतेच्या संकल्पनाही वेगवेगळय़ा असू शकतात. नागरी राष्ट्रीयता व वांशिक/ सांस्कृतिक राष्ट्रीयता यातील फरक ते ईयूच्या क्षेत्रीय मानसिकतेच्या संदर्भात वापरतात. निष्कर्ष असा आहे की ईयू ही संकल्पना नागरी वा राजकीय विचारसरणीपुरती मर्यादित नसून त्यास वांशिक/ सांस्कृतिक बाजूही आहेत.

फ्रेंच राजकारणी आणि अर्थतज्ज्ञ ज्यां मोने यांस ईयूचा जनक म्हटले जाते. दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेल्या युरोपला या विनाशाची पुनरावृत्ती टाळायची होती. ईयूचे बीजारोपण झाले ते फ्रान्स आणि जर्मनी यांचे पोलाद आणि कोळशाबाबत एकत्रित धोरण ठरवण्यापासून. यथावकाश याची वाटचाल युरोपियन कॉमन मार्केटमध्ये झाली आणि बऱ्याच दीर्घ वाटचालीनंतर कॉमन मार्केटमधून ईयू उदयास आली. तिच्या घोडदौडीस खीळ बसली ती २०१६ मध्ये जेव्हा ब्रिटन बाहेर पडला तेव्हा. त्यामागे काय कारणे असू शकतील त्यावरही कुंदनानी प्रकाश टाकतात.

ईयू प्रकल्पामागील नागरी संवेदना कालांतरांने प्रादेशिक राष्ट्रवादात कशा परिवर्तित झाल्या व याची सुरुवात कुठून झाली? लेखकांच्या मते २०१५ साली युरोपात आलेल्या शरणार्थी लाटेमुळे नागरी विचारसरणीची जागा वांशिकता आणि सांस्कृतिक सुसंगतता यांनी घेतली. याला ते सभ्यताविषयक वळण म्हणतात. आता युरोपीय आणि युरोपबाहेरचे ही सांस्कृतिक आणि वांशिक विभागणी उफाळून आली आहे आणि त्यातूनच युरोपमध्ये उजवी विचारसरणी फोफावत आहे.

लेखक म्हणतात, युरोपची संकल्पना ही ख्रिस्ती धर्माशी समानार्थी होती आणि त्यातूनच युरोपची सभ्यताविषयक मोहीम उदयास आली. पुढे ते दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालखंडातील ईयूचे टप्पे व त्यामागील घडामोडींचा आढावा घेतात. शीतयुद्धानंतरच्या काळात युरोप एका आशावादी मानसिकेतेला बळी पडला आणि त्यातून पूर्व युरोपास ईयूमध्ये सामावून घ्यायची घाई झाली. यामागे सामरिक करणे होतीच, पण पूर्व युरोपीय देश ‘गोरे’ होते ही धारणाही होती, असे म्हणण्यास जागा आहे. मात्र पश्चिम युरोपीय किंवा ईयूचे मूळ घटक देश आणि नव्याने सदस्य होणारे देश यांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय विचारांत तफावत होती.

हेही वाचा >>>वाघापर्यंत प्लास्टिक पोहोचणे चुकीचेच, पण ती एकट्या वनविभागाचीच जबाबदारी कशी?

युरोपच्या पूर्वेच्या सीमा विस्तारल्या गेल्या तशा दक्षिणेकडील सीमा आणखी ठळक झाल्या व युरोपची ओळख, संस्कृती आणि धर्माच्या वेष्टनात गुंडाळली गेली. युरोपची वाटचाल सभ्यता- मोहिमेकडे होत गेली. यात एक विरोधाभास होता. एकीकडे युरोपमधील विविधता वाढली तर दुसरीकडे नागरी परिभाषेची जागा (अलिखित) सांस्कृतिक व धार्मिक सुसंगततेने घेतली. ईयूने या टप्प्यात आपण म्हणजे आंतररराष्ट्रीय राजकारणासाठी एक सभ्यता मोहीम आहोत, अशी स्वत:ची समजूत करून घेतली. त्याच काळात युरोपात आलेल्या शरणार्थीच्या लाटांनी तेथील सांस्कृतिक गाभ्याला धोका निर्माण होईल, ही धारणा बळावत गेली व ईयूचे धोरण ‘यूरोपीयन जीवन पद्धतीचे संरक्षण’ करणे हे झाले. हे शरणार्थी मुख्यत्वे अ-श्वेत असल्यामुळे युरोपची ओळख ही वांशिक व सांस्कृतिकदृष्टय़ा टिकवली पाहिजे व या धारणेला कुंदनानी ‘युरोव्हाइटनेस’ हे नाव देतात.

पुस्तकाचा रोख युरोपची ओळख श्वेतवांशिकतेकडे कशी वळत गेली व त्यामुळे ईयूची सभ्यता मोहीम ही धारणा किती उपयुक्त ठरते, हे पडताळून पाहण्याकडे आहे. ईयूची सुरुवात सामायिक आर्थिक धोरणांच्या गरजेपोटी झाली असली तरी आता या विषयावरील राजकारण मागे पडून युरोपचे राजकारण आयडेंटिटी, इमिग्रेशन आणि इस्लाम  या विषयांकडे वळले आहे. ईयूचे अप्रूप असणाऱ्यांचे असे म्हणणे आहे की ईयू राष्ट्रवादासारख्या जुनाट धारणांच्या पलीकडे गेली आहे, पण याचा अर्थ असा की ईयू एक प्रादेशिक गोतावळा आहे. टेरेसा मे एकदा म्हणल्या होत्या की ‘जे स्वत:ला जगाचा नागरिक म्हणवतात ते कुठलेच नागरिक नसतात’.  तसेच आम्ही युरोपीय आहोत, असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांची मनोवृत्ती स्वत:ला जगाचे नागरिक समजण्यापर्यंत पुढारली आहे.

कुंदनानी म्हणतात, मध्ययुगीन युरोपसाठी ख्रिस्ती धर्मनिष्ठा हे त्यांच्या वेगळेपणाचे चिन्ह होते. यथावकाश युरोपमधील प्रबोधनकाळ व त्यातील विज्ञाननिष्ठ विचारप्रणाली, धर्म आणि राज्य यांची फारकत, यामार्फत युरोपीय लोकांनी स्वत:ची एक नवीन ओळख निर्माण केली. पण जेव्हा वसाहती वाढून युरोपीय लोकांचा अ-श्वेत- आशियाई, अफ्रिकी लोकांशी संपर्क आला तेव्हा त्यांची वेगळी वांशिक ओळख निर्माण होत गेली आणि कालांतराने आधुनिक युरोपने त्याच्या युरोपीयत्वाची कल्पना श्वेत असण्याशी जोडून घेतली. लेखक अनेक उदाहरणे देऊन मांडतात, की आज युरोप गाजावाजा करत असलेली वैश्विक मूल्ये त्यांच्या वसाहतवादी इतिहासाचे औचित्य सिद्ध करण्याच्या मानसिकतेतून उद्भवली. ज्याला आपण युरोपीय ‘प्रबोधनकाळ’ म्हणतो, त्या काळात सुरू झालेला वसाहतींच्या विस्ताराचे युरोपीय देश त्यांची सभ्यता मोहीम म्हणून समर्थन करतात. त्या काळातील गुलामांचा व्यापार तर सर्वश्रुत आहे. आणि वांशिकेतेचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गेल्या शतकातील ३० आणि ४०च्या दशकांत ठरवून केलेला ज्यूंचा संहार (होलोकास्ट), ज्यात ईयूमधील पूर्वेकडील देश हिरिरीने सामील झाले होते.

हेही वाचा >>>म्यानमारच्या सीमेवरले संभाव्य कुंपण कुणाला टोचणार?

ईयूच्या उगमाला वसाहतवादाची किनार होती. फ्रान्स आणि बेल्जियमच्या आफ्रिकेतील वसाहती युरोपीय व्यापार क्षेत्रात सामील करून घेण्याचा प्रस्ताव १९५७ च्या ‘ट्रीटी ऑफ रोम’मध्ये मान्य केला गेला होता आणि त्या अनुषंगाने बेल्जियन, डच, फ्रेंच आणि इटालियन वसाहतींना सहयोगी सदस्य करण्यात आले. मोरक्को, जो फ्रान्सची वसाहत असताना युरोपीय आर्थिक समुदायाचा असोसिएट मेंबर होता, त्याने १९८७ मध्ये जेव्हा पूर्ण सदस्यतेसाठी अर्ज केले तेव्हा मोरक्को युरोपीय देश नसल्याचे कारण देऊन तो नाकारण्यात आला. यात तुर्कस्तानचे (टर्की) उदाहरण बोलके आहे. त्या देशाने १९६३ मध्ये ईयूबरोबर सहयोगी सदस्य  म्हणून करार केला, पण त्यानंतर १९८७ मध्ये जेव्हा तुर्कस्तानने त्या वेळच्या ईईसीच्या सदस्यतेसाठी अर्ज केला तेव्हा तो टोलवण्यात आला. शेवटी त्या देशास उमेदवारी (कॅन्डिडेट स्टेटस) मिळण्यासाठी १९९९ उजाडले. तुर्कस्तान नाटोचा सदस्य असूनसुद्धा अजूनही ईयूचा सदस्य होऊ शकलेला नाही. युक्रेनला युरोपियन युनियनमध्ये प्रवेशासाठी गेल्या वर्षीच उमेदवाराचा दर्जा दिला आहे.

ईयूची आजवरची वाटचाल मुख्यत्वे शीतयुद्ध काळातील रशियाविरुद्ध तटबंदी म्हणून आणि अमेरिकेवरील भिस्त कमी करण्याच्या गरजेने प्रेरित होती. सोविएत रशिया कोसळल्यानंतर पूर्व-युरोपीय देश ईयूमध्ये आले ते रशियन साम्राज्यवादाच्या भीतीपोटी. लेखक एके ठिकाणी अशी नोंद करतात की शीतयुद्ध संपल्यानंतर जेव्हा ईयूने पूर्वाश्रमीच्या साम्यवादी देशांना सामावून घेतले, तेव्हा काही युरोपीय प्रवक्त्यांस असेही वाटू लागले की एक दिवस पूर्ण जग युरोपची प्रतिकृती होईल व एकविसावे शतक यूरोपधार्जिणे असेल. युरोप कॉस्मोपोलिटन असण्याची धारणा तेव्हा जोर धरू लागली, पण वास्तविकता अशी होती की याच काळात युरोपची वांशिक/ सांस्कृतिक ओळखही उफळून आली, ज्याला ते युरोव्हाइटनेस म्हणून संबोधतात. लेखक सांगतात, की २००४ मध्ये युरोपीय संविधानाच्या वाटाघाटींत आठ युरोपीय देशांनी हा आग्रह धरला होता की प्रस्तावनेत ख्रिस्ती परंपरा टिकवण्याचाही उल्लेख करावा. आता युक्रेन युद्धानंतर हे अघोषित सत्य उघड झाले आहे की ईयू फक्त आर्थिक वा नागरी एकोप्यापुरते मर्यादित राहिले नसून आता ते संरक्षण-संघटनही झाले आहे, जेणेकरून कालांतराने सर्व युरोपीय देश नाटोचेही सदस्य होऊ शकतील.

एका पाहणीनुसार ब्रिटनमधील वांशिक अल्पसंख्याकांनी ब्रेक्झिटच्या बाजूने मतदान केले कारण त्यांच्या मते ईयूपुरस्कृत फ्री मूव्हमेंटमुळे त्यांचे स्वजातीय ब्रिटनला येण्याची मुभा कमी झाली होती. मात्र श्वेतवर्णीय ब्रिटिशांनी नायजेल फराजच्या ‘ब्रेकिंग पॉइंट’ पोस्टरला घाबरून ब्रेक्झिटसाठी मतदान केले- या पोस्टरमध्ये असे दाखवले होते की सीरीया व मध्य पूर्वेतील शरणार्थ्यांचे (अर्थात अ-श्वेत) लोंढे युरोपच्या दारावर उभे आहेत व ब्रिटन ईयूमध्ये असल्यास ते सर्व आपल्याकडे येतील.

सद्य:स्थिती पाहता हे लक्षात येते, की आर्थिक सहकार्यापासून सुरू झालेले युरोपचे एकत्रीकरण फ्रीडम ऑफ मूव्हमेंटच्या मुक्कामापासून आता एकाच चलनाच्या (युरो) मुक्कामावर पोचले आहे. त्यामुळे खरेतर युरोची अनन्यता भक्कम झाली आहे. ईयू जगातील इतर देशांकरिता निश्चितच एक उदाहरण आहे पण ते उदाहरण सध्या तरी व्यापार आणि आर्थिक सहकार्यापुरते असू शकेल.

यूरोपची नागरी मूल्ये प्रशंसनीय आहेत आणि ती ईयूच्या सुरुवातीच्या घटक राष्ट्रांत काही प्रमाणात दिसून येत. पण आताच्या ईयूचे काही घटक उदाहरणार्थ हंगेरी व (निवडणुकी आधीचा) पोलंड हे आजही ख्रिस्ती आणि श्वेतवर्णीय ही ठेवण सोडण्यास तयार नाहीत. समारोपात लेखकाने उद्धृत केलेले एका युरोपीयन नेत्याचे वक्तव्य उल्लेखनीय आहे. ‘‘जर आपण युरोपीयन सभ्यतेचे रक्षण करू इच्छित असाल, तर आपण एकत्र येणे आवश्यक आहे.’’  लेखकांचा निष्कर्ष असा की ईयू श्वेतवर्णीय युरोपीय यांच्यापुरतीच मर्यादित संघटना आहे, जिची वांशिक वा सभ्यताविषयक मानसिकता अद्याप टिकून आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे युरोपमध्ये प्रबळ होत असलेले वंशवादी राजकीय पक्ष. आता इटलीमध्ये असा पक्ष सत्तेवर आला आहे व जर्मनीमध्ये असा एक पक्ष जोर धरत आहे.

युरो व्हाइटनेस

लेखक : हान्स कुंदनानी

प्रकाशक : हर्स्ट पब्लिशर्स

पृष्ठसंख्या : २४८ मूल्य : १४.९९ पौंड

Story img Loader