डॉ. गुरुनाथ थोन्टे
शेती व्यवसायात सर्वात महत्त्वाची ही त्यासाठी लागणारी जमीन असते. मात्र या शेतजमिनीकडेच सातत्याने दुर्लक्ष होते. केवळ उत्पादनाकडे लक्ष दिल्याने काही वर्षांतच या जमिनी क्षारपड होऊन शेतीसाठी नापीक होतात. जगभर वेगाने पसरत असलेल्या या समस्येविषयी..
हरितक्रांतीपूर्वी दोन बैल नांगराने जमीन कसायचे. आता ४५ हॉर्सपॉवरच्या ट्रॅक्टरने हे काम केले जाते. निचऱ्यासाठी नांगराने चर खोदावे लागतात. ९० सेंटिमीटरवरील क्षारतळी सबसॉयलरने फोडतात. त्यासाठी ७० हॉर्सपॉवरचा ट्रॅक्टर लागतो. अशा अवजाराने जमिनीतील सेंद्रीय कर्बाची वाट लागते.
सूक्ष्म जिवाणूंचे ऊर्जा स्रोत सेंद्रीय कर्ब आहे. सूक्ष्म जिवाणू जमिनीत मूलद्रव्याचे स्थिरीकरण करतात. तसेच ती उपलब्धीकरणही करतात. परिणामी खताची कार्यक्षमता वाढते. यामुळे उत्पादन खर्चात बचत होते. सबब सेंद्रीय पदार्थापासून तयार होणाऱ्या सेंद्रीय कार्बनला जमिनीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.
हेही वाचा >>>बहरला फळभाजीचा मळा!
ज्या जमिनीची विद्युतवाहकता चार डीसी सायमन प्रतिमीटरपेक्षा जास्त असते, मुक्त सोडिअमचे प्रमाण १५ टक्के असते. जमिनीचा सामू साडेआठपेक्षा कमी असतो. त्यांना क्षारयुक्त जमिनी असे संबोधले जाते. अशा जमिनीत पीक उत्पादनात घट येते. जगात २० टक्के लागवडयोग्य क्षेत्र क्षारपड आहे. बागायती क्षेत्रापैकी ते ३० टक्के आहे. प्रतिवर्ष त्यात दहा टक्के वाढ होत आहे.
सन २०५० पर्यंत ५० टक्के क्षेत्र जगात क्षारपड बाधित होईल. याची प्रमुख कारणे कमी पर्जन्यमान, उष्णतेमुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन, जमीनअंतर्गत खडकापासून क्षार निर्माण करणारी क्रिया, क्षारपाड पाण्याचा सिंचनासाठी वापर, तसेच वारंवार जमीन उघडी करण्याची मशागतीय पद्धती ही आहेत.
भारतात दर वर्षी १५ लाख हेक्टर बागायती क्षेत्र क्षारपड होते. कोरडवाहूत एक ते दोन टक्के क्षेत्र दर वर्षी क्षारपड होत आहे. भारतात ६.७४ मिलिअन हेक्टर क्षेत्र क्षारपड आहे. हे क्षेत्र पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, तसेच राजस्थानमध्ये विखुरलेले आहे. गुजरात व राज्यस्थानचा शुष्क प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या निम्न शुष्क प्रदेशातही क्षारपड जमिनी आहेत. हे क्षेत्र २०२५ पर्यंत ११.७ मिलिअन हेक्टर होण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा >>>बिग बॉस जिंकणाऱ्या मुनव्वरला एवढी मतं दिली तरी कोणी?
महाराष्ट्रात १२ लाख हेक्टर क्षेत्र क्षारपड व चिबड आहे. देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात १७ जिल्हे क्षारपाडपणाने व्यापले आहेत. पश्चिम महाराष्ट्र यात आघाडीवर आहे. ज्यातील सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, धुळे, जळगाव, वर्धा, अकोला, अमरावती, औरंगाबाद, परभणी, नांदेड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि ठाणे हे जिल्हे क्षारपाडपणाने व्यापले आहेत.
क्षारपड होण्याची कारणे
१) सिंचनासाठी पाण्याचा अवास्तव वापर २) खरेदीची शाश्वतता असल्यामुळे उसासारखी बारमाही पाण्याचे (पाट पाण्याद्वारे) पीक घेणे ३) बदलत्या वातावरणामुळे पावसाचे कमी /जास्त प्रमाण ४) उष्ण व कोरडे हवामानामुळे बाष्पीभवनाचा वेग अधिक ५) निचरा प्रणालीचा वापर न करणे. ६) क्षारयुक्त पाण्याचा वापर ७) जमिनीत निचराप्रणाली सुधारणाऱ्या स्पेक्टाटाइट या खनिज मातीचा अभाव. ८) नैसर्गिक निचरप्रणालीस बाधा निर्माण होणे. ९) सेंद्रीय खताचा वापर न करणे. १०) मुक्त सोडिअमचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा अधिक होणे. ११) सेंद्रीय पदार्थाची कमतरता.
क्षारपडपणाचे दुष्परिणाम :
पिकाच्या मुळाभोवती आस्मोटिक दाब वाढतो. पिकाची वाढ खुंटते. मूळ अन्नद्रव्ये व पाणी व्यवस्थित शोषण करू शकत नाहीत. सेंद्रीय पदार्थाच्या कमतरतेमुळे जमिनीत कमी सेंद्रीय कर्ब तयार होतो. रायझोबिअम जिवाणूद्वारे निर्मित नायट्रोजनएज विकरावर विपरीत परिणाम होतो. परिणामी नत्र स्थिरीकरण व्यवस्थित होत नाही. त्यांच्या गाठीची संख्या वाढते. मात्र वाढ होत नाही. तसेच पूर्वी निर्माण झालेल्या गाठीची कार्यक्षमता घटते. ऑझेटोबॅक्टरसारखे नत्र स्थिर करणारे जिवाणू यास सहनशील असतात. ते निर्माण करत असलेल्या ऑक्झिन, जिबरलीन, सायटोकाइनिन या संप्रेरकामुळे क्षारपाडपणाचा विपरीत परिणाम पिकावर कमी होतो. क्षारपाडपणात जमिनीत फॉस्फरसची उपलब्धता कमी होते. तो द्रव स्वरूपातून घनस्वरूपात रूपांतरीत होतो. तसेच ज्या वेळेस क्लोराईड व सल्फेटचे क्षार अधिक असतात त्या वेळेस फॉस्फरसचे स्थिरीकरण होते. क्षारपडपणात पोटॅशिअमचे शोषण कमी होते. तसेच निचऱ्याद्वारे निघून जातो. परिणामी उपलब्धता कमी होते. या व्यतिरिक्त लोह, मंगल, झिंक, बोरॉन इत्यादी सूक्ष्म मूलद्रव्ये उपलब्ध स्वरूपात मिळू शकत नाहीत. याचा विपरीत परिणाम वाढीवर, पक्वतेवर, फळधारणेवर, रंग व स्वाद, तसेच गोडीवर होतो.
हेही वाचा >>>महाराष्ट्राचे राजकीय अधःपतन चिंताजनक!
बियांची उगवणक्षमता क्षारपडपणामुळे कमी होते. बियाणे उगवणीचा कालावधी वाढतो. उगवलेली रोपे खुजी राहतात. पानावर निळसर छटा दिसते. काही प्रमाणात कडाही जळतात. पुंकेसर फिलामेंटच्या लांबीवर परिणाम होतो. लघुबीज गुणन होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. पेशीचे निर्जलीकरण होते आणि मरते. पानातील अन्नाचे वहन व्यवस्थित होत नाही. प्रथिने निर्मितीत पोटॅश कमतरतेमुळे बाधा येते. प्रथिनाच्या वहनावर मर्यादा येतात. वनस्पतीच्या विविध, जैव व रासायनिक प्रक्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होतो.
मुक्त सोडिअममुळे मातीचे सूक्ष्म कण विलग होतात. उपलब्ध पाण्याचे प्रमाण कमी होते. पाणी शोषण करण्यास वनस्पतीला अधिक ऊर्जा लागते. जमिनीतील पाणी निचरा होणाऱ्या रेषा बंद होतात. परिणामी पाणी साचून मुळांना इजा होते. सोडिअमचे अयान मोठे असल्याने मातीच्या कणातील मोठय़ा छिद्रात बसतात व (मॅक्रो) छिद्र बंद होतात. यामुळे जमिनीतील हवेचे व्यवस्थापन बिघडते. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. कॅल्शिअम व मॅग्नेशिअमच्या क्षाराचे अयान लहान असल्याने विपरीत परिणाम तुलनेने कमी होतो.
क्षारपड जमीन सुधारण्याचे उपाय
जमीन सुधारण्यासाठी खालीलप्रमाणे विविध उपाय आहेत १) अपविष्ठ पदार्थाचा वापर २) जैविक पद्धती, ३) कृषी संजीवनी पद्धत, ४) निचरा व्यवस्था सुधारणे, ५) सेंद्रीय/ हिरवळीच्या खताचा वापर, ६) विद्युत चुंबकीय ऊर्जेचा वापर, ७) रासायनिक पद्धत, ८) क्षार सहनशील पिकाचा अंतर्भाव, ९) शेतीसाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर, १०) शेती पद्धतीत बदल.
हे उपाय कसे योजायचे, त्याचा वापर -फायदा काय होतो या विषयी पुढील भागात पाहूयात.