डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी
मराठी वाङ्मयाच्या समग्र इतिहास लेखनात महाराष्ट्रातील विदर्भासह, विविध विभागांच्या मराठी भाषा आणि विविध वाङ्मय प्रकारांमध्ये असलेल्या स्वतंत्र योगदानाची नोंद व दखल पुरेशी घेतलीच गेलेली नाही. वाङ्मयाचा, भाषेचा असा प्रादेशिक इतिहास लिहिण्याचे कामही याआधी कोणी केलेले नाही. ज्या विभागीय साहित्य संस्थांचे ते घटनात्मक कार्य आहे, त्यांनीही नाही, विद्यापीठांनीही नाही, प्रकाशकांनीही नाही.
एखाद्या वाङ्मय प्रकाराचा त्या त्या प्रदेशातील समग्र इतिहासाचा ग्रंथदेखील उपलब्ध नाही. त्यामुळे विदर्भासारख्या महाराष्ट्रातील सर्वच प्रदेशातील मराठी भाषा, लेखन, लेखक, त्यांचे कार्य, कर्तृत्व, प्रादेशिक प्रतिभा यांचे उल्लेखही मराठी वाङ्मयाच्या उपलब्ध समग्र इतिहासात जवळजवळ वगळलेच गेले आहेत. त्यांचे धावते, पुसटसे, अपवादात्मक उल्लेखच तेवढे येतात.
त्यामुळे मराठी भाषा, वाङ्मय या संदर्भात विदर्भाचे नेमके योगदान ठसठशीतपणे मांडण्याचा प्रयत्न कोणी केलाच तर त्याला हाताशी असा कोणताही ग्रंथदेखील अद्याप उपलब्ध नाही.
हेही वाचा >>>कौतुक कमला हॅरिसचं आणि..
इतिहासातून सुटून जाणाऱ्या महत्त्वाच्या आणि उल्लेखनीय असूनही अनुल्लेखित राहणाऱ्या प्रादेशिक प्रतिभेचे दर्शन, वेगळय़ा वाटा, प्रवाह, वळणे, प्रतिभा, इ.वर भर असणाऱ्या नोंदींचे स्थानिक, प्रादेशिक वाङ्मय इतिहास लिहिले जाण्याची गरज मोठी आहे, आणि कोणीतरी तर ते करणे आवश्यकच आहे.
त्यामुळे दृष्टीने ‘मराठी वाङ्मयाचा वैदर्भीय इतिहास’ हा १२ खंडांचा एक प्रकल्प प्रस्तुत लेखकानेच, काही लेखकांच्या आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सहकार्याने हाती घेतला आहे.
तो जेव्हा पूर्णत्वास जाईल तेव्हा प्रथमच विदर्भातील कविता, कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा, ललित गद्य, चरित्र -आत्मचरित्र, बालसाहित्य, वैचारिक/शास्त्रीय लेखन, सैद्धांतिक/तात्त्विक लेखन, अनुवादित साहित्य, लोकसाहित्य, भाषा अशा विविध प्रकारांतील प्राचीन काळापासून आजवरच्या या इतिहासाचे खंड उपलब्ध होतील आणि विदर्भाचे मराठी भाषा, वाङ्मययाच्या जतन, संवर्धनासाठीचे योगदान ठसठशीतपणे लक्षात येईल.
हे करणे अतिशय आवश्यक आहे कारण त्याअभावी हे योगदान दाखवणे लेखकांना, अभ्यासकांना शक्य नाही, आजवर ते शक्य झालेलेही नाही. मात्र विदर्भाचे हे योगदान फार मोठे आहे.
महाराष्ट्र या भूभागात केवळ विदर्भ हाच विभाग असा आहे ज्याचा उल्लेख अगदी वेदांमध्ये, विष्णु पुराण, स्कंदपुराण, भागवत, हरिवंश इ. रामायण, महाभारतापासून ते थेट आधुनिक काळापर्यंत सातत्याने येत राहिला आहे. भाषा, रीती, शैली, वाङ्मय यांचा प्राचीन काळापासून संपन्न असलेला वारसा दर्शवणारा तो उल्लेख असतो.
प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रात, नाटय़शास्त्रात, संस्कृतातही जो उल्लेख येतो तो विदर्भ हा प्रामुख्याने प्राकृत भाषा, शब्दांचा म्हणजेच प्राकृत संस्कृतीचा भूभाग असल्याचा आहे. मराठीसाठी विदर्भाचे योगदान असे प्राचीन आहे.
भाषा, शब्द, वाङ्मय, शैली, संस्कृतीने असा हा प्रांत पूर्वापार समृद्ध आहे. वाङ्मयीन भाषा, शैलीचा उल्लेख येतो त्या वैदर्भी रीती, वच्छोमी रीती या विदर्भाच्याच भाषा व वाङ्मयाच्या प्राकृत शैली आहेत.
मराठी ही महाराष्ट्री प्राकृतच आहे आणि मराठीला जो अभिजात दर्जा नुकताच मिळाला तो महाराष्ट्रीला म्हणजे महाराष्ट्री प्राकृतला मिळालेला दर्जा आहे आणि तिच्या विकासात विदर्भाचे योगदान फार मोठे आहे.
तेव्हाच्या विदर्भाचा भूगोलही फार व्यापक भूभाग असलेला आहे. अगदी भरताचा भाऊ असणाऱ्या विदर्भराजापासून, भीम, भीष्मक, सहदेव, रूक्मी, भोज ते कलचुरी, राष्ट्रकूट, यादव घराण्यांच्या राजवटीपर्यंत हा इतिहास सलग आहे. भाषा, विशेषत: मराठी भाषा ही याच राजवटींच्या काळात सिद्ध होत आकार घेत, साकार होत गेली आहे.
हेही वाचा >>>हमीभावाचा अर्थ व अनर्थ
या भागाचे प्राकृतबहुल म्हणून येणारे हे सारे उल्लेख आणि बौद्ध, जैन धर्माचे या भूभागातले मोठय़ा प्रमाणावरील पसरलेले असणे, आजही उत्खननात त्यांच्याच खुणा सर्वाधिक सापडणे, याचे परस्परसंबंध महत्त्वाचे आणि लक्षणीय आहेत. कारण प्राकृत या प्रामुख्याने श्रमण संस्कृतीच्या भाषा आहेत.
भोजकट ही उत्तर विदर्भाची तर प्रतिष्ठानपूर ही दक्षिण विदर्भाची राजधानी होती.
नजीकच्या काळात इ.स.पूर्व २०० ते २५० या ४५० वर्षांत सातवाहनांनी इथे राज्य केले.
‘याज्ञवल्क्य स्मृती’ ही याच काळातील. प्राकृतातला प्रख्यात ‘गाथा सप्तशती’ हा ग्रंथ याच काळातला. गुणाढय़ाची ‘बृहत् कथा’ याच काळातली. वात्सायनाच्या कामसूत्रातही विदर्भ आणि वत्सगुल्म यांचा उल्लेख येतो. शक, क्षेत्रप, कुषाणांनीही विदर्भावर राज्य केले.
वाकाटक, त्याअगोदर मुंड राजवंश इथलेच. कुषाणांनी बौद्ध धर्म प्रसाराची देणगी विदर्भाला दिली.
उत्तरेला माळवा, पूर्वेला छत्तीसगढ, ओरिसाचा काही भाग, आंध्र, पश्चिमेला मध्य व दक्षिण गुजरात, तर महाराष्ट्रात नाशिकपर्यंत व दक्षिणेस कुंतल म्हणजे दक्षिण महाराष्ट्रापर्यंत विदर्भ पसरलेला होता. आजच्या संयुक्त महाराष्ट्राच्या भूभागातील कितीतरी मोठय़ा भागावर राज्य विदर्भाचे होते. विदर्भेतर महाराष्ट्र तुलनेने, फारच थोडा भूभाग होता.
मराठी भाषिकांचे एक राज्य व्हावे याचा पहिला ठरावदेखील १९३८ च्या नागपूर प्रांतिक असेंब्लीत रामराम देशमुखांनी मांडलेला होता. बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या वैदर्भीय ग. त्र्यं. माडखोलकर यांनीच संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला होता. पुढची चळवळ या पायावरच उभी झाली होती.
सहिष्णुता, बहुधार्मिकता, बहुविधता, बहुसांस्कृतिकता ही महाराष्ट्राची, आज संस्कृती आहे ती विदर्भाचीच प्राचीन देणगी आहे. कालिदासाचे ‘मेघदूत’, सर्वसेनाचा ‘हरिविजय’ हे ग्रंथ विदर्भातलेच. ‘सेतुबंध’ हे प्रसिद्ध प्राकृत काव्य लिहिणारा दुसरा प्रवरसेन विदर्भातलाच. राजशेखराचे ‘विशाल भंजिका’, ‘बालरामायण’, इथलेच.
आधुनिक मराठी भाषेच्या रूपाचा उदय राष्ट्रकूटांच्या काळातला. लातूर ते एलिचपूर त्यांचे राज्य होते. ‘विवेकसिंधू’कर्ते मुकुंदराज, ‘ज्ञानेश्वरी’ त्यानंतरच्या यादव घराण्याच्या काळातली. ‘मालतीमाधव’ लिहिणारा भवभूती हा तर महत्त्वाचा वैदर्भीय नाटककार. मराठीचे भूषण असलेल्या महानुभाव गद्यातील, वाङ्मयातील चित्रित समाज, लीळाचरित्रातील लीळा व जनजीवन हे वऱ्हाड- विदर्भातले आहे.
विदर्भातील संतपरंपरा मोठी आणि त्यांचे लेखनही मोठय़ा प्रमाणावर आहे. ताराबाई शिंदे यांचे ‘स्त्री – पुरुष तुलना’ हे पुरोगामी वैचारिक गद्य ही विदर्भाची देणगी आहे.
सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वाङ्मयीन क्षेत्रातदेखील विदर्भाचे योगदान फार मोठे आहे.
आधुनिक आद्य दलित कवी, पत्रकार किसन फागुजी बनसोडे, ‘जयभीम’चे प्रवर्तक बाबू एल. एन. हरदास, जाईबाई चौधरी हे विदर्भातलेच.
मराठी भाषेच्या विकासात मोठे योगदान देणाऱ्या मराठी पत्रकारितेतही विदर्भातील वृत्तपत्रांची, संपादकांची कामगिरी लक्षणीय आणि मोलाची आहे.
साहित्य प्रांतातील वैदर्भीय प्रतिभा ही उत्तुंग अशी आहे. अगदी बजाबा प्रधानांपासून, वामन दाजी ओक, रेव्हरंड ना. वा. टिळक, आनंदराव टेकाडे, ज. के. उपाध्ये, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कृष्णशास्त्री घुले, श्रीधर व्यंकटेश केतकर, ना. के. बेहेरे, कवी बी, कवी अनिल, भवानीशंकर पंडित, ना.घ.देशपांडे, या.मु.पाठक, म.म.देशपांडे, वा.ना.देशपांडे, पु.य.देशपांडे, कुसुमावती देशपांडे, गीता साने, यमुनाबाई शेवडे, इंदुमती शेवडे, प्रा शरच्चंद्र मुक्तिबोध, वा.वा.भोळे, नाना जोग, वसंत वरखेडकर, विश्राम बेडेकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, डॉ भाऊ मांडवकर, प्रा शरद कळणावत, डॉ य.खु.देशपांडे, प्र.रा.देशमुख, बाळशास्त्री हरदास, द.ह.अग्निहोत्री, ह.ना.नेने, डॉ मा.गो.देशमुख, बाळकृष्ण संतुराम गडकरी, ग.त्र्यं.माडखोलकर, शं.बा.शास्त्री, उद्धव शेळके, शरच्चंद्र टोंगो, पु.भा.भावे, वामनराव चोरघडे, के.ज.पुरोहित, मधुकर केचे, मनोहर तल्हार, कवी ग्रेस, सुरेश भट, शरच्चंद्र सिन्हा, गो.रा.दोडके, पंढरीनाथ पाटील, श्री.ना.बनहट्टी, वा.वि.मिराशी, भाऊजी दप्तरी, विनोबा भावे, बाबा आमटे, ग.त्र्यं.देशपांडे, शं.दा.पेंडसे, वि.बा.प्रभुदेसाई, माणिक कानेड, शरच्चंद्र कोलारकर, मा.म.देशमुख, यादवराव वडस्कर, दादा धर्माधिकारी, चंद्रशेखर धर्माधिकारी, द.ग.गोडसे, दिनकर देशपांडे, प्रभाकर पुराणिक, मालती निमखेडकर आणि अन्य कितीतरी नावे आहेत, ज्यांनी मराठी वाङ्मयनिर्मितीवर स्वतंत्र आणि ठसठशीत मुद्रा उमटवली आहे, आणि मराठीला ज्यांचे मोठे योगदान आहे अशी या व अन्य क्षेत्रातील कितीतरी नावे या सर्व विदर्भाच्याच देणग्या आहेत.
एवढय़ा अल्पशा जागेत साऱ्यांचेच नामोल्लेख शक्य नसल्याने काही प्रातिनिधिक उल्लेख तेवढे केलेले आहेत.
वाङ्मयीन नियतकालिकांच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असणारी, वीणा,वागीश्वरी, मुलांचे मासिक, उद्यम, युगवाणी, इन्किलाब, सावधान, इ. मासिके, नियतकालिके विदर्भातील आहेत.
मराठीचे शासनमान्य प्रमाण लेखन, शुद्धलेखनाचे विद्यमान नियम ही विदर्भ मध्य प्रदेशात असताना, विदर्भ साहित्य संघाने तयार केलेले नियम आहेत.
बापूजी अणे महाविदर्भाचे जे वेगळे राज्य मागत होते, ते राजकीय, आर्थिक कारणांसाठीच, सत्तेसाठीच तेवढे मागत नव्हते.
तर विदर्भाच्या, महाराष्ट्रापासून असणाऱ्या सांस्कृतिक वेगळेपणामुळे आणि मराठी भाषा, साहित्य, संस्कृती घडवण्यात विदर्भाचा जो मोठा वाटा होता, त्या कारणांसाठी मागत होते. बापूजी अणे स्वत: विद्वान भाष्यकार, लेखक होते. त्यांच्यानंतर विदर्भ आंदोलकांनी ही सारी सांस्कृतिक पार्श्वभूमी सोडून स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा जो केवळ राजकीय खुळखुळा करून टाकला त्यामुळे या आंदोलनाची नाळ लोकांशी कधीच जुळू शकली नाही.