निशांत सरवणकर
सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळ्या क्लृप्त्यांच्या माध्यमातून पैसे लाटले की आता गेले ते पैसे असे म्हणत हातावर हात ठेवून गप्प बसायचे, हे दिवस आता गेले. १९३० या मदतवाहिनीच्या माध्यमातून तक्रार करणाऱ्या तक्रारकर्त्यांना गेल्या सहा महिन्यान त्यांची लाटली गेलेली एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम परत मिळाली आहे. ही अलीकडची बातमी दिलासादायक आहे खरी, पण तेवढेच पुरेसे नाही. सायबर पोलीस काहीजणांचे पैसे परत मिळवून देऊ शकले असले तरी सामान्य लोकांनी आपली अशा भामट्यांना सहज बळी पडण्याची वृत्ती सोडून देणे आवश्यक आहे. सायबर साक्षर होणे आवश्यक आहे. त्यासाठी ही मदतवाहिनी कसे काम करते तेही आपल्याला माहीत असायला हवे.
बँकेतून सेवानिवृत्ती घेतलेल्या एका आजोबांना त्यांच्याविम्याच्या पॉलिसीचे पैसे मिळणार होते. त्यांना त्याच पद्धतीचा एक फोन आला. समोरच्याने आजोबांना सांगितले की, आता पैसै थेट खात्यात जमा होतात. बँकेचा तपशीलद्या. बँकेचा तपशील दिल्यानंतर लगेच ओटीपीसाठी फोन आला. आजोबांनी तो दिला. परंतु पैसे त्यांच्या खात्यात जमा होण्याऐवजी खात्यातून वळते झाले. तब्बल दोन लाख रुपयांची रक्कम होती. आजोबांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपण फसवले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना कोणीतरीसांगितले की, सायबर पोलिसांच्या १९३० क्रमांकावर तक्रार द्या. त्यांनी लगेच मदत वाहिनीचा क्रमांक फिरविला. पोलिसांनी त्यांचा संपूर्ण तपशील लिहून घेतला. तक्रार देऊ या, पण आता आपले गेलेले काही पैसे परत मिळणार नाहीत, असेच आजोबांना वाटत होते. परंतु काही दिवसांनी ते पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले. त्यांना सुखद धक्का बसला. एका कॉर्पोरेट बँकेत उपाध्यक्ष असलेला इसम, ताबडतोब बिल भरा. नाहीतर आज रात्री ९.३० वाजता तुमची वीज कापली जाईल, या संदेशाला भुलला. मुळात हा संदेश खरा आहे का याची खातरजमा न करताच या इसमाने दिलेल्या नंबरवर संपर्क साधला. तुमचे खाते कार्यान्वित करण्यासाठी तुम्हाला एक ओटीपी येईल. तो ओटीपी दिला आणि त्यांच्या खात्यातूनही रक्कम वळती झाली. या इसमानेही १९३० वर तक्रार केल्यामुळे काही दिवसांनंतर का होईना, पण ते पैसे या इसमाला परत मिळाले.
सायबर फसवणूक ही आता नित्याची बाब झाली आहे. वयोवृद्ध, महिला हे खास फसवणुकीचे लक्ष्य असले तरी आजकाल तरूण पिढीही सायबर फसवणुकीला बळी पडत आहे. ओटीपी कोणालाही द्यायचा नसतो, ही साधी बाबही अजूनही पचनी पडत नसल्यामुळे ही फसवणूक होत आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. फसवणुकीच्या नवनवीन क्लृप्त्याही दररोज लढविल्या जात आहेत. मुंबईत सायबर फसवणुकीला बळी पडलेल्यांचे मदत वाहिनीवर दररोज किमान १० ते १५ कॉल येतात. यापैकी ५० टक्के तक्रादारांचे पैसे परत मिळत आहेत.
फसवणूक झाली तर लगेच तक्रार करणे हाच गेलेले पैसे परत मिळविण्याचा मार्ग असल्याचे मुंबई सायबर विभागाचे उपायुक्त बाळसिंग राजपूत यांनी सांगितले. मुंबई सायबर पोलिसांची सेवा सध्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे सकाळी दहा ते सायंकाळी सहा अशी सुरू आहे. ती रात्रंदिवस करण्याचा सायबर उपायुक्त बाळसिंग राजपूत यांचा प्रयत्न आहे. मात्र ही सेवा रात्रंदिन सुरू होईल तेव्हाच त्याचा खरा उपयोग होणार आहे. फसवणुकीचे हे सर्व प्रकार रात्रीच्या वेळीच प्रामुख्याने घडत असतात. ते रोखण्यात यंत्रणा यशस्वी होत नसली तरी सध्या पैसे रोखण्यात काही प्रमाणात यश येत आहे, ही बाब महत्त्वाची ठरत आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या १९३० या सर्वसमावेशक मदत वाहिनीचा त्यात मोलाचा वाटा आहे. या मदत वाहिनीशी देशभरातील पोलीस, सर्व केंद्रीय तपास यंत्रणा, सर्व बँका, खासगी वॉलेट सेवा जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे तक्रार आली की, फसवणुकीच्या माध्यमातून आलेले पैसे रोखण्यात यश येत आहे.
१९३० ही मदत वाहिनी मुंबई आणि महाराष्ट्र सायबर पोलिसांशी ती जोडली गेलेली आहे. तक्रारदार १९३० हा क्रमांक फिरवतो तेव्हा तो मुंबईतील असेल तर मुंबई सायबर पोलिसांशी वा महाराष्ट्रातील असेल तर महाराष्ट्र सायबर पोलिसांशी त्याचा संपर्क होतो. कुठल्याही स्वरुपाची सायबर फसवणूक झाली की, लगेच तक्रार केली तर त्याचा निश्चितच फायदा होतो. मुंबई सायबर पोलीस मदत वाहिनीतील उपनिरीक्षक रुपाली कुलथे यांनी सांगितले की, तक्रार आली की, आमच्या दृष्टीने ट्रान्झॅक्शन आयडी महत्त्वाचा असतो. त्यानंतर बँकेचा तपशील व पैसे कुठे पाठवले त्या बँक खात्याचा तपशील आदी बाबी मिळाल्या की, आम्ही त्या केंद्र सरकारच्या १९३० या पोर्टलवर टाकतो. ही मदत वाहिनी देशांतील सर्व पोलीस, बँका, खासगी वॉलेट कंपन्याशी जोडली गेलेली आहे. पोलिसांकडून तक्रार आल्यानंतर लगेच ज्या बँकेच्या खात्यात वा पेटाईम, गुगल पे वा तत्सम खासगी वॉलेटमध्ये पैसे जमा झाले आहेत ते खाते गोठवले जाते. त्या खात्यातून अन्य बँकेत रक्कम वळती करण्यात आलेली असली तर ते खातेही गोठवले जाते. या काळात ही तक्रार सायबर पोलिसांकडून संबंधित पोलीस ठाण्यात पाठविली जाते. पोलीस ठाण्याकडून नंतर गोठवलेले पैसे तक्रारदाराला परत मिळावे यासाठी आवश्यक तो पत्रव्यवहार केला जातो. गेलेले पैसे सुरक्षित असतात. ते काही दिवसांनी का होईना, संबंधित तक्रारदाराला परत मिळतात. सध्या ही खूप मोठी दिलासा देणारी बाब ठरली आहे.
खरेतर हे पोर्टल सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांनी वापरावे, असे केंद्राचे आदेश आहेत. मुंबईतील ९३ पोलीस ठाण्यापैकी फक्त १५-२० पोलीस ठाणी या पोर्टलचा प्रभावी वापर करत आहेत. सायबर पोलिसांवर असलेला ताण पाहता स्थानिक पोलीस ठाण्यानेही त्यात रस घेणे आवश्यक असल्याचे मत या घडामोडींशी संबंधित एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.
नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर थेटही तक्रार करता येते. सकाळी १० ते ६ या काळात कार्यरत असलेले हे पोर्टल खूपच उपयोगी ठरत आहे. या पोर्टलवर देशभरातील सर्व सायबर पोलीस प्रमुखांचा ईमेल आयडीही उपलब्ध आहे. फसवणुकीच्या माध्यमातून आलेली तक्रार पोलिसांच्या माध्यमातून आली तर त्याची लगेच दखल घेतली जात आहे. त्यामुळे तक्रारदारांनी स्थानिक पोलीस ठाणे किंवा १९३० या मदत वाहिनीवरच तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. फसवणूक झाल्यानंतर लगेच तक्रार केली तर गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता अधिक आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार, सायबर फसवणुकीला बळी पडणाऱ्यांमध्ये कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. त्या खालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. लोकांनीच जागरुकता बाळगली तर हा आकडा आणखी तळाला जाऊ शकेल.
nishant.sarvankar@expressindia.com