दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पशुपालन हा भारतात शेतीला जोड व्यवसाय म्हणून सर्वत्र केला जातो. परंतु या व्यवसायातही आता बदल करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. हा बदल केवळ व्यवसायाच्या आधुनिकतेचा नसून व्यवसाय पद्धतीचा देखील आहे. कोल्हापुरातील धनंजय खेमलापुरे या तरुण पशुपालकाने हाच नवा अध्याय आपल्या पशुपालनातून घालून दिला आहे.

प्रत्येकाची काम करण्याची, व्यवसाय करण्याची स्वत:ची अशी एक शैली असते. व्यवसाय, उद्योगांमध्ये व्यवस्थापनाला महत्त्व असते. व्यवस्थापनावर स्वत:चा प्रभाव असणे हा यशाचा सुगम मार्ग असतो. पशुपालन व्यवसायात पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकमध्ये खेमलापुरे फार्म हाऊसची यशोगाथा याच अंगाने जाणारी आहे. धनंजय यशवंत खेमलापुरे या ४० वर्षीय तरुण पशुपालकाने सव्वाशे जनावरांचा गोठा कसा असावा याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. एका वाक्यात सांगायचे तर उत्पादित दूध डेअरीला विक्री न करता थेट बाजारात विक्री केली तर ते अधिक लाभदायक, फायदेशीर ठरते याचा मूलमंत्र त्यांनी घालून दिला आहे.

पशुपालन हा सातत्याने वाढत चाललेला व्यवसाय. भारतात तर पशुपालनाची परंपराच दिसून येते. जागतिक बाजारपेठेत भारत दूध उत्पादनात अव्वल स्थानी आहे. ५० टक्के बाजार असंघटित क्षेत्रात आहे. दुधाचे उत्पादन वाढत्या दराने होत असले तरी किमतीत सातत्याने चढउतार होतो. दुधाला मिळणारा अपुरा दर ही तर पशुपालकांची नेहमीची तक्रार बनली आहे. करोना संसर्ग काळात मागणी घटल्याने दुधाचे दर प्रति लिटर २० ते २२ रुपये इतक्या निच्चांकी भावावर पोहोचले होते. प्रति लिटर १२-१५ रुपये नुकसान सोसावे लागले. अजूनही दुधाला मिळणारा तर हा उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा नसल्याचे दूध उत्पादकांचे म्हणणे आहे.

शेतीला पूरक म्हणून व्यवसाय करण्यावर अनेकांचा भर आहे. गैरव्यवस्थापनामुळे उत्पादक क्षमतेचे नुकसान होऊ शकते. अशा काही गोष्टींचा विचार करूनच धनंजय खेमलापुरे यांनी पशुपालनाचा यशदायी मार्ग आखून दिला आहे. चांदी व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या हुपरी गावी घरी दीड एकर शेत जमीन. वडील शेतीच्या बरोबरीने चांदी व्यवसाय करीत होते. स्वाभाविकच याच व्यवसायात धनंजय यांनी यावे ही वडिलांची इच्छा. कला शाखेची पदवी मिळाल्यानंतर त्यांनी पशुपालनाकडे लक्ष देण्याचे ठरवले. आधीच वडिलांना जनावरांविषयीची भलतीच आवड. घरी दोन तीन म्हशी होत्या. जनावरांचे रत्नपारखी अशी वडिलांची ओळख. केवळ एका नजरेने जनावरांची कुंडली ते सांगत असत. त्यांच्यासोबत धनंजय हेही शेतकऱ्यांची जनावरे पाहण्यासाठी जात असत. त्यातून जनावरांच्या आवश्यकतांचे आकलन होत गेले. कोल्हापूर येथील यशवंतराव जाधव यांची १४.३८ एकर जमीन खेमलापुरे कुटुंबीयांनी खंडाने करायला घेतली. ती कसत असताना शेतीला जोडधंदा म्हणून गोठा करण्याचा निर्णय २००६ साली घेतला.

सुरुवात केली ती चार जनावरांपासून. त्यांचा गोठय़ातील शेण खतासाठी वापर करता येईल. दुधाचीही उपलब्धता होईल, असा यामागे विचार होता. हळूहळू पशुपालन व्यवसायात जम बसू लागला. चाराची दुप्पट जनावरे झाली. या व्यवसायातील खाचाखोचा उमजू लागल्या. तिसऱ्या वर्षी हरियाणातील जिंदाल येथून २० म्हशी खरेदी केल्या. तिथूनच या व्यवसायाच्या यशाचे सोपान चढायला सुरुवात केली. कालौघात जनावरांची संख्या वाढत गेली. अनेक जनावरे त्यांच्या गोठय़ात तयार झाली. व्यवसायाची खुमारी वाढत गेली. सध्या खेमलापुरे कुटुंबीयांची १२५ जनावरे आहेत. त्यात दुधाच्या म्हशी ५५ आहेत. ५० रेडय़ा, दोन वळू आहेत. बाकीच्या गाभण किंवा भाकड असतात. या साऱ्यांची निगा, नियोजन धनंजय एकहाती निभावतात. या सर्वाकडून साडेसहाशे ते सातशे लिटर म्हशीचे दूध मिळते. सकाळ, संध्याकाळी दुधाची विक्री हुपरी गावांमध्ये केली जाते. विशेष म्हणजे अवघ्या अर्ध्या तासात सगळे दूध विकले जाते. खंडाने करावयास घेतलेली सगळी १४.३८ एकर जमीन त्यांनी खरेदी केली. त्यातील ६ एकरात वैरण केली जाते. बाकी ऊस आणि अन्य पिके.

कष्ठाला नियोजनाची जोड

अर्थात, नियोजन आणि कष्टही तितकेच केले जाते. सकाळी पहाटे साडेपाच वाजता सगळय़ा जनावरांच्या धारा काढून तयार असतात. सहा वाजता वाहनातून सगळे दूध गावात आणले जात. ६५ रुपये प्रति लिटर दराने किरकोळ विक्री केली जाते. स्वाभाविकच दूध संघापेक्षा चार पैसे अधिक मिळतात. शिवाय, गाई वाढवण्याच्या फंदात ते पडले नाहीत. गोठय़ामध्ये चार खिलार गाई जरूर आहेत. या दुग्ध व्यवसाय करण्यासाठी मनुष्यबळाची ही गरज असते. त्यातही कुशल, प्रामाणिक आणि कष्टाने काम करणारे लोक हवे असतात. यासाठी गोठय़ात पाच भय्या (उत्तर भारतीय मजुरांचे संबोधन) आहेत. दूध धंदा हा स्थानिक मजुरांवर होत नाही. भय्ये हे पाहिजेतच, असा आग्रही सल्ला धनंजय खेमलापुरे देतात. इतर कामासाठी पाच कामगार आहेत. स्वत: धनंजय नेहमी गोठय़ामध्ये असतात. एकूण ११ जणांचा येथे कायमचा राबता असतो. पहिल्या चार-पाच वर्षांत या व्यवसायाचे स्वरूप आतापेक्षा खूपच वेगळे होते. तेव्हा २५ हजार रुपयाला हरियाणाची दुभती म्हस मिळत होती. आज हा दर लाख – सव्वा लाखाच्या पुढे गेला आहे. दलालांकडून होणाऱ्या फसवणुकीची दुखरी किनार या व्यवसायाला चिंता निर्माण करायला लावणारी ठरली आहे. परिणामी दूध धंदा बदनाम होत आहे. गोठे तोटय़ात जाण्याचे, ते बंद पडण्याचे कारण यातच लपले आहे. नवीन गोठेधारकांना दूध व्यवसायांचे किमान ज्ञान असले पाहिजे. त्यांनी किमान वर्षभर भ्रमंती केली पाहिजे. गोठे बारकाईने पाहिले पाहिजेत. त्यातील खाचा-कोचा समजून घेतल्या पाहिजेत. दलाल लुटत असल्याने त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. ही प्राथमिक तयारी असेल तरच या व्यवसायात पाऊल ठेवणे श्रेयष्कर करु शकते, असे खेमलापुरे नमूद करतात.

वैरण उपलब्धता

दुग्ध व्यवसाय हा निश्चितच परवडणारा व्यवसाय आहे. त्यात किमान २० टक्के नफा आहे. तथापि, अत्याधुनिकतेच्या नावावर हाय-फाय गोठा करण्याच्या फंदात न पडणे चांगले. हवेशीर, साध्या पद्धतीचा निवारा देणारा आणि मुक्त गोठा पाहिजे. जनावरे एका जागेवर बांधून जादा दूध मिळत नाही. मुक्त गोठय़ातून जनावर काही वेळ तरी फिरली पाहिजेत. दूध व्यवसायात सर्वाधिक खर्च होतो तो चंदीवर. यासाठी किमान ओल्या चाऱ्यासाठी स्वत:ची व्यवस्था असली पाहिजे. जनावरांच्या संख्येच्या प्रमाणावर हत्ती ग्रास, नेपिअर गवत, शाळू, ऊस यातून ओली वैरण दिली गेली पाहिजे. ती स्वत:च्या शेतावर तयार होत असल्यास अधिक उत्तम. कोरडय़ा चाऱ्याचे नियोजन करता आले पाहिजे. आजू-बाजूच्या शेतकऱ्यांकडून गहू काड, कोंडा, हरभरा कोंडा, कबडा आणून त्याचे ‘सायलेज’ केले पाहिजे. विकतचे पशुखाद्य या पुढच्या काळात अजिबात परवडणारे नाही, असा सूचक इशाराही खेमलापुरे यांचा असतो.

छोटय़ा शेतकऱ्यांना अनेक बाबतीत पर्याय नसतो. गोठेधारकांनी काही पथ्य पाळणे फायद्याचे ठरते. दूध कोणाला विकणार हाच या व्यवसायातील नफ्या तोटय़ाचा महत्त्वाचा मूलाधार आहे. अशा गोठेधारकांनी आपले दूध शक्यतो दूध संघांना विक्री करू नये. किरकोळ दूध विक्रीमध्ये (रिटेिलग) व्यवसाय त्यांनी उतरले पाहिजे. उपपदार्थ निर्मितीकडे लक्ष द्यायला हवे. संघाला दूध घालणे परवडणारे नाही. यासाठी व्यापक नियोजन करावे लागेल. गोठय़ावर जातिवंत जनावरे तयार झाली पाहिजे. प्रत्येक वेळी हरयाणाला जाऊन म्हशी आणून दुधाचा व्यवसाय करीन अशी परिस्थिती आता उरलेली नाही. यासाठी वासरू संगोपन केले पाहिजे. जादा दूध देणारी जनावरे विकसित करता आली पाहिजेत. रेडय़ा विकून आणि शेणापासून दरवर्षी मी २० ते २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवतो. हेच माझ्या गोठय़ाचे खास वैशिष्टय़ आहे, असे खेमलापुरे सांगतात.

काय कराल, काय टाळाल

खेमलापुरे यांचा गोठा पाहण्यासाठी राज्यभरातून शेतकरी, लोक येत असतात. दुपारची दोन तासाची विश्रांती वगळता उर्वरित काळ गोठय़ात असलेले धनंजय रोज २५-३० अभ्यागतांच्या प्रश्नांना सामोरे जातात. शंका निरसन करताना काही बाबतीत सल्ला देतात. जनावरांना लाळीचे लसीकरण केले जाते. दूध व्यवसायात उतरू पाहणारे अनेक नवउद्योजक खेमलापुरे यांच्याशी सल्लामसलत करतात. काय करायला हवे, काय टाळायला हवे याविषयी धनंजय त्यांना मोकळेपणाने मार्गदर्शन करतात. त्यांच्या मते गोठे दुग्ध व्यवसाय अपयशी होण्याची कारणे म्हणजे जनावरांची काळजी हवी, वळूची सोय हवी. चारा, पशुखाद्यावरील खर्च नियंत्रणात ठेवला पाहिजे. न पेक्षा तोटा वाढत जातो. किरकोळ दूध विक्रीतून प्रतिलिटर दहा रुपये अधिक मिळू शकतात. जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ नसेल तर रात्रीतून गोठा संपू शकतो याची जाणीवही धनंजय खेमलापुरे करून देतात.

(संपर्क – धनंजय यशवंत खेमलापुरे, खेमलापुरे फार्म हाऊस, रानमळा, हुपरी-इंगळी रोड, हुपरी, ता. हातकणंगले ) (९८६०३५७७६६)dayanand.lipare@expressindia.com