माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ
सेनापती बापट मार्ग हा पश्चिम पुण्यातला एक महत्त्वाचा रस्ता आहे. इथल्या टोलेजंग इमारती काचेच्या तावदानांत बंदिस्त आहेत. पुण्यात वर्षातले निदान आठ महिने अल्हाददायक हवा असते. तिला हद्दपार करून इमारतींच्या आत निष्कारण वीज जाळत पंखे फिरवत गार हवा खेळवली जाते. कोणाच्या जिवावर ही उधळपट्टी सुरू आहे?
उत्तर आहे – यापायी मुळशी पेट्यातल्या ५२ गावांना गेली १०० वर्षे हाल-अपेष्टा सहन कराव्या लागताहेत; तसेच लोणावळ्यापासच्या पठारांवरच्या, कोयना नदीच्या खोऱ्यातल्या हिरकणीच्या वंशातल्या म्हस्के धनगरांना, नर्मदा प्रकल्पातील आणि भारतभरच्या अनेक धरणांच्या विस्थापितांना याची किंमत मोजावी लागते आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या शब्दांत धरणे ही आधुनिक भारताची मंदिरे आहेत. या मंदिरांतील उपासनेतून नानाविध फायदे झालेले आहेत; मुंबईत लोकल गाड्या धावताहेत, तिथल्या उद्याोगधंद्यांची भरभराट झाली आहे, पुण्याला मुबलक पाणी मिळतंय, पाणीपुरवठ्याखालील शेतांत ऊस पिकवत अनेक शेतकरी धनसंपन्न झाले आहेत.
परंतु हे करत असतानाच या मंदिरांच्या वेदीवर अनेकांचे बळी दिले गेले आहेत. यांच्यापैकी मुळशीच्या ५२ गावांतील विस्थापितांच्या कहाण्या ‘सह्याद्रीचे अश्रू’ या अनिल पवारांनी परिश्रमपूर्वक संकलित केलेल्या पुस्तकात वाचायला मिळतील. तसेच (१) असा घडला मुळशी सत्याग्रह (२) मुळशी सत्याग्रहाचे विविधांगी विश्लेषण (३) धरणग्रस्त विस्थापितांसाठी संघर्ष करणारे लढवय्ये (४) मुळशी धरणग्रस्तांचा वर्तमानातील हुंकार व (५) सह्याद्रीच्या रांगेतील विभिन्न धरणग्रस्तांची कैफियत या भागांतील उत्तमोत्तम लेखांत व मुळशी सत्याग्रह्यांची नावनिशी, संपादित जमिनी आणि त्यासाठी दिलेली भरपाई, कुंजबिहारीचा मुळशीचा पाळणा ही कविता उद्धृत करणाऱ्या परिशिष्टात मिळून या पुस्तकाने एक माहितीचा खजिनाच उघडून दिला आहे.
या सगळ्याची पार्श्वभूमी काय आहे? १८१८ साली मराठ्यांचा पाडाव करून इंग्रजांनी पूर्ण देशावर कब्जा केला. या पराभूत देशाच्या नैसर्गिक संसाधनांचे व लोकांचे शोषण करून ती लूट आपल्या देशाकडे वळवणे हे इंग्रजांचे एकमेव उद्दिष्ट होते. या पायी त्यांनी ग्रामसमाजांची मोड-तोड केली. भारतातील ग्रामसमाजांनी आपापल्या क्षेत्रात नैसर्गिक संसाधने व्यवस्थित सांभाळून ठेवली होती. म्हणूनच इंग्रजांनी आपल्या पकडीत आलेला हा देश म्हणजे वृक्षांचा एक महासागर आहे असे वर्णन केले होते. इंग्रजांनी गावांची सर्व निसर्गसंपन्न सामूहिक भूमी वन किंवा महसूल विभागांच्या ताब्यात दिली. इंग्रजपूर्व काळात सत्ताधारी ग्रामसमाजांकडून सामूहिकरीत्या सारा वसूल करत होते. शेतकऱ्यांनी वैयक्तिकरीत्या आपापल्या जमिनीचा जबरदस्त शेतसारा भरला पाहिजे अशी इंग्रजांनी सक्ती केली. विद्योपासून वंचित असलेल्या बहुजन समाजातील शेतकऱ्यांना हा सारा नेटकेपणे भरणे अवघड होते. परिणामत: देशभर शेतकरी कर्जबाजारी होऊन सुशिक्षित उच्चवर्णीय झपाट्याने जमीनमालक बनले. मुळशी पेट्याला जवळचे शहर म्हणजे पुणे. इथल्या ब्राह्मणांसारख्या उच्चवर्णीयांची विद्यासाधनेची परंपरा होती. या मंडळींनी इंग्रजी शिक्षण झटकन आत्मसात केले आणि त्याच्या बळावर इंग्रजी सत्तेतील खालची पदे पटकावली. शिवाय सावकारीसारखे दुसरे उद्याोग आरंभले. यातून मुळशी पेट्यातील जमीन बहुजन समाजातील शेतकऱ्यांच्या हातून निसटून पुण्यातील उच्चवर्णीयांच्या हाती गेली. पुण्यातील याच समाजातून इंग्रजी सत्तेला आव्हान देणारे लोकमान्य टिळकांसारखे खंबीर नेतृत्व पुढे आले. साहजिकच यातील अनेकांना इंग्रज करतील ते मुकाट्याने खपवून घेणे रुचत नव्हते.
ईस्ट इंडिया कंपनीने आपली पहिली वखार पारशी समाजाची मुख्य वस्ती असलेल्या सुरतेला प्रस्थापित केली होती. तिथले पारशी बोटी बांधण्याच्या कामात निष्णात होते. सगळा पारशी समाज सुशिक्षित होता, शिवाय हाताने काम करण्यात तरबेज होता. यामुळे त्यांच्यातून टाटांसारखे अग्रगण्य उद्याोगपती पुढे आले. मुंबई बंदर इंग्रजांच्या व्यापाराचे महत्त्वाचे ठाणे होते. इथे त्यांना विजेच्या पुरवठ्याची निकड होती. यासाठी त्यांनी टाटांमार्फत जलविद्याुत उत्पादनाचा घाट मांडला. टाटांची पहिली काही विद्याुत उत्पादन करणारी धरणे लोणावळ्याच्या परिसरातील पठारांवर बांधली गेली. तिथे मुख्यत: म्हस्के धनगरांची वस्ती होती आणि जशी धरणे बांधली गेली तसे ते निमूटपणे निघून गेले.
मग टाटांनी मुळशी धरण हाती घेतले आणि इथे अगदी वेगळ्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले. इथले जमीनमालक हे प्रामुख्याने पुण्यातील सुशिक्षित वर्गातील होते, त्यांच्यापैकी अनेक जण इंग्रजांविरुद्ध लढा द्यायला सज्ज होते. या लढ्यासाठी विनायकराव भुस्कुटे यांनी प्रथम शिंग फुंकले, मग तो लढा पांडुरंग महादेव बापटांनी अत्यंत समर्थपणे पुढे नेला, आणि त्यासाठी त्यांना जनतेने सेनापती हे बिरूद बहाल केले. मुळशीचा सत्याग्रह हा जगातला पहिला-वाहिला धरणविरोधी लढा होता.
हा जनसामान्यांचा नाही तर उच्चवर्णीय सावकारांचा लढा आहे असा प्रचार करण्यात आला. बहुधा यामुळे महात्मा गांधींनी या लढ्याला पाठिंबा दिला नाही. टिळकांनंतर काँग्रेसची सूत्रे गांधींच्या हातात जात होती; त्यांनी पाठिंबा न दिल्याने हा लढा डिसेंबर १९२४ मध्ये कोलमडून पडला. मुळशी सत्याग्रहात समाजाचे कोणते घटक आपले हितसंबंध सांभाळत होते हा विषय जरा बाजूला ठेवून भारतभरच्या वेगवेगळ्या धरणांत काय चालले आहे याची छाननी केल्यास अशा धरणांच्या व्यवस्था प्रणालीमुळे ही धरणे ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ नाही तर ‘अल्पजन हिताय अल्पजन सुखाय, बहुजन घाताय, बहुजन दु:खाय’ कारणीभूत आहेत हे स्पष्ट दिसते.
विज्ञानाधारित सर्वांगीण अभ्यास करून १९७८ साली केरळ शास्त्र साहित्य परिषदेने जैवविविधता संपन्न सायलेंट व्हॅलीवरचा जलविद्याुत् प्रकल्प स्वीकारणीय नाही हे दाखवून दिले, मग तो प्रकल्प रद्द केला गेला. अतिरप्पिल्ली जलविद्याुत् प्रकल्पाचा चालकुडी नदी संशोधन केंद्राचा २००६ सालचा अभ्यास हा याच परंपरेतील एक उत्कृष्ट प्रयत्न आहे. प्रकल्पाचे प्रस्ताव तयार करणारी शासकीय यंत्रणा आपले काम प्रामाणिकपणे करत नव्हती, तरी सुदैवाने भारताचे अनेक नागरिक जागृत आहेत, आणि आज माहिती हक्काखाली संबंधित माहिती मिळवता येते. तेव्हा अशी माहिती मिळवून या सेवाभावी संस्थेच्या शास्त्रज्ञांनी व इंजिनीयर्सनी तिचे काळजीपूर्वक विश्लेषण केले. त्यांचा स्पष्ट निष्कर्ष होता की हा आतबट्ट्याचा प्रकल्प म्हणजे १०० माप ऊर्जा खर्च करून ८० माप ऊर्जेचे उत्पादन आहे. २०१८ ऑगस्टमध्ये याच चालकुडी नदीवरील धरणांच्या मालिकेच्या गैरव्यवस्थेतून प्रचंड पूर येऊन मोठी जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान झाले. हा फटका समाजातील केवळ दुर्बल घटकांना नाही तर आर्थिक सुस्थितील सुशिक्षितांनाही बसला. यातून एक वेगळीच जागृती निर्माण होऊ लागली आहे आणि आजच्या हवामान बदलाच्या जाणिवेच्या संदर्भात ती वाढतच जाईल अशी सुचिन्हे आहेत.
madhav.gadgil@gmail.com