केतन गजानन शिंदे

घरात कधीतरी ते अमक्या जातीचे आहेत असा दबक्या आवजात भुवया उंचावून झालेला संवाद, पुसटसा का होईना पोरांच्यात उतरतो. वय वाढल्यावर, कॉलेजमध्ये विशिष्ट जातीच्या मुलांना कमी गुण मिळूनही प्रवेश मिळाला अन आपण काय पाप केलं ही भावना डंख मारू लागते किंवा मग फी मध्ये अमक्या जणांना तमुक सूट कशाला म्हणून नसा फुगतात. या एकूण प्रक्रियेत मग दुराग्रह आकार घेतात. दृष्टी अधू होत जाते. तोवर मhत्र ‘जात’ सर्वांच्याच आयुष्यात डोकावत नाही… ‘जगताना’ जात ज्यांच्या कधी आडवी आलीच नाही त्यांची भावना मग ‘कुठेय जात? कुठेय भेदभाव?’ अशी होत जाते! अशांना जातीची जाणीव होते ती इतरांच्या… मग, ‘त्याचं बर आहे, आपणच कमनशिबी’ अशा सौम्य प्रतिक्रियेपासून ते ‘माजलेत साले, भिकारी फुटके कुठले’ अशा प्रतिक्रियांमधून, मानसिकता उघड होत जाते…

मग एके दिवशी या देशातल्या सर्वोत्तम शैक्षणिक संस्थेत गणल्या जाणाऱ्या ‘आयआयटी मुंबई’मध्ये होस्टेलच्या इमारतीवरून दर्शन सोळंकी नावाचा अठरा वर्षाचा पोरगा धाडकन खाली पडतो. आयुष्य नावच स्वप्न रक्ताच्या थारोळ्यात उद्ध्वस्त होतं. त्याच्या आईनं फोडलेला टाहो वर्तमानपत्राच्या एका कोपऱ्यात तसाच पडून राहतो. अरे त्या कोपऱ्यात बघा, त्या मायच्या डोळ्यात समाज म्हणून आपल नाकर्तेपण दिसतय असं कितीही वाटलं तरी गोंगाट फार असतो… मग जाणवतं, दर्शन कोसळण्याच्या आधीच हा समाज केव्हाचाच पडला आहे.

दर्शन सोळंकीचा बळी जातीमुळेच गेला की नाही, हे शोधण्यासाठी समिती नेमायलाही आठवडा जावा लागला. मागण्या कराव्या लागल्या. जात व्यवस्थेच्या आड उभे राहून दात विचकत माणसांनी माणूस मारल्याचं दर्शन हे एकमेव उदाहरण नाही. शिवाय तो अपवाद देखील नाही, असेलच तर तो या समाजाचा नियमच आहे. मुख्य प्रवाहात दर्शन ठळकपणे दिसला इतकंच. बाकी वाड्या वस्त्यांवरचे, स्त्रियांच्या आयुष्यातलं अन लेकरांच्या जडणघडणीतलं जातीचं विवेचन अधिक थरकाप उडवणारं आहे. जात समाजाच्या मानगुटीवर तशीच लटकली आहे. ती आपल्याला स्पष्ट दिसत नाही इतकंच किंवा मग आपण डोळे मिटून दूध पितो असा त्याचा अर्थ. बलात्कार, गरिबी, भूकबळी, शिक्षण, आरोग्य, कुपोषण; समाजातल्या कुठल्याही दाहकतेचं स्वरूप उलगडताना त्यात जातीचं प्रकटीकरण आहेच.

जातीवर बोलायचं कुणी? इथली कुटुंबव्यवस्था जातीयवादी आहे. शालेय जीवनात जात चर्चिली जात नाही. परिणामी जातीचं संवेदीकरण कुठल्याच टप्प्यावर झालं नसल्यानं सुप्तपणे जातीवाद तग धरून राहतो. मग तो उफाळून येतो मेरिट लिस्ट बघून किंवा फी बघून. त्यापलीकडे आपलं जातीचं आकलन नाही. माणसासारखी दिसणारी माणसं, पण त्यात भिन्नता का? आपण अन ते वेगळे कसे काय? समजण्या, न समजण्याच्या वयात असे प्रश्न पडत नाहीत असं नाही पण ते विचारावे कुणाला हा प्रश्न आहे. कारण इथं भिन्नतेची मुळासकट तपासणी करणारी चर्चाच होत नाही.

दर्शन आयआयटीत येतो खरा पण मग त्याला रँक विचारली जाते. अरेच्चा म्हणजे खालची रँक अन तरीही आयआयटी बॉम्बे?म्हणजे ‘खालच्या’ जातीचा असणार. एकूण हेटाळणीचे उग्र रूप पाऊल टाकतो न तोवर समोर उभे असते. हळूहळू एक कंपू सभोवताली उभा राहतो. अभिजन वातावरणात अगदी कपड्यांपासून ते खाण्यापिण्यात पदोपदी तो बाहेर फेकला जातो. त्याला कळत नकळत त्याच्या वर्गाची, जातीची जाणीव करून दिली जाते अन मेरिटवर (जणू, म्हणजेच कर्तुत्वावर!) बोट ठेवून आधीचा कैक पिढ्यांचा साचलेला न्यूनगंड अधिक बळकट केला जातो.

पण आपल्या ‘मेरिट’च्या व्याख्येत तसं काही ‘मेरिट’ नाहीच. वॉरन बफे यांनी ‘ओव्हेरियन लॉटरी’ नामक संकल्पना वारंवार मांडली आहे. त्याचा थोडक्यात सारांश असा की तुम्ही कुठे, कुठल्या वेळी, कुणाच्या पोटी, कुठल्या धर्मात, कुठल्या जातीत जन्म घेता इत्यादी अनियोजित घटना आहेत. उच्च म्हणवल्या जाणाऱ्या जातीत, बहुसंख्याक धर्मात, सधन घरात जन्म घेणे हा ‘मॅटर ऑफ चान्स’ म्हणजेच ‘संभावनेची शक्यता’ आहे.

‘मेरिट’ ची चर्चा करताना याचा अर्थ असा की, ‘कोटा’ शहरातल्या- किंवा त्यासारख्याच ‘हमखास यश’ देणाऱ्या महागड्या क्लासेसचा कोटा साऱ्यांना मिळत नाही. कोट्यातून आलेल्यांची एक मेरिट लिस्ट वेगळी लावल्यास काय चित्र दिसेल? तिथले लाखोंचे बाजारभाव केवळ मूठभर जणांना परवडणारे. वर्गीय दृष्टीकोनातून पाहिल्यास उच्च म्हणविल्या जाणाऱ्या जातींत असलेली तफावत देखील स्पष्ट होते. एकीकडे देशातले सर्वोच्च मार्गदर्शन दुसरीकडे स्टेट बोर्डाचे सुमार कॉलेज. एकीकडे झोपताना खाताना पिताना एसी अन दुसरीकडे हातावर असलेली पोटं. कुठली स्पर्धा? कुठलं मेरिट?

शिवाय अमुक परीक्षेतले मार्क म्हणजे मेरिट अशा संकुचित व्याख्या आपले अज्ञान अधोरेखित करतात. तो अनेकांपैकी एक निकष फारतर होऊ शकतो. यातून मग ही आजकालची रॅट रेस उभी राहते. योग्यतेचा आणखी वस्तुनिष्ठ अन व्यापक अर्थ आपल्याला गवसेल का? त्याला मानवी मूल्यांची, सहकाराची अन सद्भावनेची जोड देता येईल का?

आरक्षण का? कशाकरिता? यावरही मुळापासूनची चर्चा आपल्या कुणाच्या आयुष्यात कधी घडलीच नाही. उपेक्षित समाजाला अशा जागा का राखीव आहेत याचं नेमकं उत्तर कधी कुणी दिलंच नाही. उपेक्षित समाजाची जडणघडण, त्यांचे प्रश्न, त्यांचा भूतकाळ, त्यांचा वर्तमान अन् त्यांचं भविष्य यावर कुणी बोललंच नाही. ही संभाषणातली दरी जातव्यवस्थेची पुनर्स्थापना करत गेली आहे. बिनलाजी राजकारण्यांनी याचंच भांडवल केलं. त्यामुळे आपली सामाजिकीकरणाची प्रक्रियाच अपुरी राहिली.

विशिष्ट समूहावर हजारो वर्षे झालेला सामजिक भेदभाव, त्यांचं मुख्य प्रवाहातून केलेलं विलगीकरण, गावाच्या वेशीवरच्या झोपड्या, नाकारलेलं पाणी, सावलीचा देखील केलेला अव्हेर, या सगळ्यातून घडणारी शारीरिक, मानसिक कुचंबणा… या साऱ्याचं मानसशास्त्रीय विश्लेषण हे व्यक्तीचं सामाजिकीकरण होत असताना कुठेच आढळून येत नाही.

ज्या आरक्षणाचं इतकं – अक्षरश: जीवघेण्या पातळीपर्यंत- भांडवल केलं जातं त्या आरक्षणानं पंच्याहत्तर वर्षात कितपत दरी भरून काढली हा ही प्रश्न आहेच. आनंद तेलतुंबडे यांच्या ‘रिपब्लिक ऑफ कास्ट’ या पुस्तकात आरक्षण आणि जातव्यवस्थेचं उत्कृष्ट विवेचन आहे. आजचं आरक्षण नेमकं उपेक्षितांपर्यंत पोहचतं का? जाती निर्मूलनाची आपली वाट भटकली तर नाही? आरक्षणाच्या मूळ हेतूचाच आपल्याला विसर पडला आहे का? असे कैक प्रश्न आहेत. प्रस्तुत लेखात आरक्षणावर व्यापक लिहिता येणार नाही. पण मुद्दा इतकाच की आरक्षणाकडे इतके सहज पाहता येणं शक्य नाही. राहिली गोष्ट त्याच्या आवश्यकततेची तर दर्शनच्या मृत्यूने ती अधोरेखित केली आहेच. जात वरवर पडद्याच्या मागे गेलेली दिसत असेलही, तरी जाती व्यवस्थेचं संस्थात्मीकरण आजही किती प्रबळ आहे याची साक्ष दर्शन देऊन गेला.

दर्शन एकटा नाही.. त्याच्या आधीचे रोहित वेमुला, पायल ताडवी, चुनी कोटला, बाल मुकुंद, फातिमा लतीफ, प्रदीप मेघालय किंवा दर्शनच्या नंतर घडलेली आत्महत्या- तेलंगणाच्या ‘गिरनी तांडा’ या आदिवासी गावातून येऊन काकतीय मेडिकल काॅलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डी. प्रीती हिची… हे हिमनगाचं वरवर दिसणारं टोक आहे. ही शिक्षण क्षेत्रातली परिस्थिती. व्यावसायिक, प्रशासकीय, सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय अन तत्सम क्षेत्रात जातीचं प्रकटीकरण दाहक आहे.

भारताचे सरन्यायाधीश धनंजय य. चंद्रचूड यांनी अलीकडेच हैदराबादेत विद्यार्थ्यांशी बोलताना ‘उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येचे प्रमाण फक्त आकडेवारी नसून ती उपेक्षित घटकांची हजारो वर्षांची कहाणी आहे’ असं नोंदवलेलं निरीक्षण महत्त्वाचं आहे. प्रस्तुत विषयाला हात घालत कायद्यात ‘करुणेचं’ असलेलं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं. पण निव्वळ कायद्यातच कशाला, एकूण आयुष्यात देखील आपणाला तो करुणेचा अंश सापडेल का?

जातीची, धर्माची, पुरुषसत्ताक अहंभावाची झापड बाजूला सारून काहींनाच हे जग पाहता येतं. ते तसं ज्यांना दिसतं त्यांनाच जगण्याचा अर्थ गवसतो. स्पर्धा, सत्ता, पैसा, स्वार्थ ही आधुनिकीकरणाच्या रेट्यात अधिक बळकट झालेली मूल्यं म्हणजे पोकळ डोलारा. आजच्या घडीला ‘माणूस’ होण्याचा प्रवासच महत्त्वाचा आहे.

लेखक पुणे येथील स. प. महाविद्यालयात पदवी-शिक्षण घेत आहे.

ketanips17@gmail.com