दत्तप्रसाद दाभोलकर

‘असे स्वामीजी स्वीकारणार का?’ हा ‘लोकसत्ता’तील योगेंद्र यादव यांचा लेख (शुक्रवार, ७ जुलै) आणि त्याचा प्रतिवाद करणारा ‘स्वामीजींच्या विचारांचे अपहरण’ हा रवींद्र महादेव साठे यांचा लेख (१३ जुलै) वाचला. या दोन्ही लेखांच्या संदर्भात खालील तीन गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

Tiger-centric tourism prevents tigers from living their private lives peacefully
आर्थिक फायदा होतो म्हणून व्याघ्रपर्यटनाचा तमाशा ?
Coordination between educational institutions and industry is beneficial for both
शिक्षण संस्था आणि उद्योगजगत यांचा समन्वय दोहोंच्याही फायद्याचा…
ugc on Proposed provision
यूजीसीच्या अधिसूचनांचा पुनर्विचार हवाच!
Why is there Simla Office in Pune What is its contribution to Indian meteorology
पुण्यात ‘सिमला ऑफिस’ का आहे? भारतीय हवामानशास्त्रात त्याचे योगदान काय?
Villainization or demonization of Pandit Jawaharlal Nehru
पंडित नेहरूंचे राक्षसीकरण!
financial reforms in india
वास्तववादी आर्थिक सुधारांची प्रतीक्षा!
Pre-Legislative Consultation Policy
लोकांना अंधारात ठेवणारे कायदे!
India Meteorological Department completed 150 years
भारतीय हवामानशास्त्र विभागाची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वाटचाल
elon musk danger for world
इलॉन मस्क नावाचा धोका

१) विवेकानंद अगदी तरुण वयापासून ते अगदी मृत्यूपर्यंत हिंदू धर्मावर घणाघाती टीका करत आहेत. विवेकानंद फक्त २६ वर्षांचे होते. वराहनगर मठातील विविदिशानंद नावाचा एक संन्यासी एवढीच त्यांची ओळख होती. त्या वेळी ७ ऑगस्ट १८८९ रोजी पूज्यपादांना पत्र पाठवून त्यांनी कळविले, ‘आपल्या देशातील प्राचीन मतानुसार जाती या वंशगत मानलेल्या आहेत. याबाबत माझ्या मनात शंका नाही. आणि स्पार्टा देशातील लोकांनी तेथील गुलामांवर अथवा अमेरिकन लोकांनी श्वेतवर्णियांवर जेवढे अत्याचार केले आहेत त्यापेक्षा अधिक अत्याचार आपल्या देशातील शूद्रांवर केले गेले आहेत.’ १७ ऑगस्ट १८८९ रोजी पूज्यपादांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘ज्या परमेश्वरामुळे आपल्याला वेद मिळाले, त्यानेच नंतर बुद्ध होऊन वेदांचे खंडन केले. मग आता या दोघांपैकी आपण कुणाला मानायचे? हा गोंधळ आणखीन भयंकर आहे. वेद म्हणजे देवाची वाणी. आता खगोलशास्त्राच्या साध्यासाध्या नियमांनी त्यांना मूर्ख ठरविले ते कसे काय? हे वेद सांगतात, ‘पृथ्वी त्रिकोणी असून वासुकीच्या मस्तकावर ठेवलेली आहे वगैरे वगैरे! हे ज्ञान बरोबर घेऊन आपण आताच्या जगात कसे वावरणार आहोत?’

जून १८९० मध्ये विवेकानंदांनी वराहनगर सोडले आणि तीन वर्षे भारत उभाआडवा पिंजून काढला. त्यानंतर सर्वधर्मपरिषदेत जायचे म्हणून त्यांनी ३१ मे १८९३ रोजी मुंबईहून बोटीचा प्रवास सुरू केला. या तीन वर्षांत, या हिंदू धर्माने या देशाची काय भयानक अवस्था केली आहे त्यावर त्यांनी अस्वस्थ होऊन मित्रांना पत्रे पाठविली. २२ ऑगस्ट १८९२ रोजी (म्हणजे सर्वधर्मपरिषदेच्या एक वर्ष आधी) हरिदास बिहारीलाल देसाई यांना पत्र पाठवून सांगितले, ‘देवा! ब्राह्मणांच्या रूपात आज या देशात हिंडणाऱ्या या लोकांपासून माझ्या देशाचे रक्षण कर!’ २० ऑगस्ट १८९३ रोजी विवेकानंद अमेरिकेत पोहोचले. त्या दिवशी आपला शिष्य अलसिंगा पेरूमल यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘हिंदू धर्माइतका इतर कोणताही धर्म अगदी ओरडून सारी माणसे समान म्हणून सांगत नाही. आणि हिंदू धर्म गरीब आणि खालच्या जातीच्या लोकांना जितके पायाखाली तुडवितो तितके जगातील इतर कोणताही धर्म तुडवत नाही. माझ्या मनातील भारताचे नवनिर्माण करण्यासाठी मला संन्याशांची संघटना उभारावयाची आहे. भारतात कोणताही धनिक यासाठी एक छदाम देत नाही. मी अमेरिकेत भाषणे देऊन पैसे मिळवीन आणि संघटना उभारेन.’ मग ते झंझावाती भाषणे देत हिंडले. त्या पत्रांपैकी १९ मार्च १८९४ रोजी त्यांनी शशीला पाठविलेल्या पत्रात (हा शशी म्हणजे वराहनगर मठातील त्यांचा मित्र) विवेकानंद लिहितात, ‘दक्षिण भारतात उच्च जातीच्या लोकांकडून खालच्या जातीच्या लोकांवर होणारे महाभयानक अत्याचार मी पाहिले आहेत. आणि यांच्या मंदिरात खालच्या जातीच्या स्त्रियांना देवदासी म्हणून वागवून हे आनंद घेणार. जो गरिबाचे दु:ख दूर करत नाही, त्याला काय धर्म म्हणावे?  ‘मला शिवू नको. मला शिवू नको’ एवढाच आपला धर्म आहे! ज्या देशातील मोठेमोठे धार्मिक नेते किमान दोन हजार वर्षांपासून ‘डाव्या हाताने जेवावे की उजव्या हाताने? गंध उभे लावावे की आडवे?’ अशा महान गूढ प्रमेयांची चर्चा करत बसलेले आहेत, त्या देशाची अधोगती होणार नाही, तर आणखी काय होणार? आपल्या देशातील कोटय़वधी लोक फक्त अर्धपोटी नाहीत, तर केवळ मोहाची फुले खाऊन जगताहेत आणि या देशातील १०-२० लाख साधू आणि जवळजवळ १०० लाख असलेले ब्राह्मण मजेत जगताहेत. आणि त्यांच्या उन्नतीसाठी काहीही करत नाहीत. हा देश आहे की नरक? हा धर्म की हे काय?’

विवेकानंद ही वेदना बरोबर घेऊन आजन्म प्रवास करतात. ते सांगतात, ‘जातिव्यवस्था नष्ट केली तर समाजच नष्ट होईल असे सांगणारे ब्राह्मण आपल्या भोवती आहेत. मात्र समानता निर्माण करणे हेच तर नीतीचे म्हणजे धर्माचे कार्य आहे.’ आणि ब्रुकलीन स्टडी सर्कलमध्ये भाषण देताना त्यांनी सांगितले, ‘भारतातील जातिव्यवस्था संपवावयाची असेल तर भारताचा आर्थिक ढाचा बदलावा लागेल.’ मात्र आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर हे करण्याचा एक नवा मार्ग त्यांच्या मनात आकार घेत होता. ५ मे १८९७ रोजी म्हणजे अमेरिकेतून परत येऊन आपल्या मनातील बेलूरमठ उभा करताना घीरामाता यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘अनेक घृणास्पद गोष्टींनी भरलेला आजचा हिंदू धर्म दुसरेतिसरे काही नसून अवकळाप्राप्त बौद्ध धर्म आहे, हे आपण हिंदूंना पटवून देऊ शकलो तर फारशी खळखळ न करता तो सोडून देणे हिंदूंना शक्य होईल.’

२) हिंदू-मुसलमान समन्वय या देशात सुरू झाला आहे आणि आपण तो जपला पाहिजे, जोपासला पाहिजे, असे सांगत विवेकानंद आजन्म उभे आहेत. ज्या वेळी हिंदूंनी म्लेंच्छ हा शब्द शोधला त्या दिवशी या देशाच्या अधोगतीला सुरुवात झाली, असे सांगणाऱ्या विवेकानंदांनी १० जून १८९८ रोजी सर्फराज मोहम्मद हुसेन यांना पत्र पाठवून सांगितले, ‘आमच्या वेदांतातील सिद्धांत कितीही सूक्ष्म आणि सुंदर असले तरी समतेचा संदेश सर्वप्रथम व्यवहारात आणला तो इस्लामनेच.’ आम्ही इस्लामकडून व्यवहारातील समता शिकली पाहिजे एवढेच सांगून विवेकानंद थांबत नाहीत. सर्फराज यांच्या मृत्यूनंतर बेलूर मठाचे प्रमुख ब्रह्मानंद यांना पत्र पाठवून त्यांनी कळविले होते, ‘शिवलेले कपडे घालायलासुद्धा आपण मुसलमानांकडून शिकलोय!’

मात्र त्याच वेळी हा एकमार्गी प्रवास नाही तर हे आदानप्रदान आहे याचीही आठवण ते करून देतात. अमेरिकेत बोस्टन येथे ‘ट्वेटीथ सेंचरी हॉल’मध्ये मुलाखत देताना त्यांनी सांगितले, ‘भारतीय इस्लामवर वेदांतातील उदारमतवादाचा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे तो सहिष्णु आहे. जगभरच्या इस्लामपेक्षा हा इस्लाम वेगळा आहे. दोन्ही बाजूंच्या धर्माध शक्तींनी काही गडबड केली नाही तर आम्ही आनंदाने एकत्र आहेत.’

या देशातील धर्मातरे तलवारीच्या जोरावर झालीत आणि मुसलमान राजवट वाईट होती, असे सांगणाऱ्यांचा विवेकानंदांनी झकास समाचार घेतलाय. दिवाणजी यांना नोव्हेंबर १८९४ मध्ये लिहिलेल्या पत्रात ते लिहितात, ‘माझ्या बंगाल प्रांतात एवढे भूमिहीन शेतमजूर आणि छोटे शेतकरी मुसलमान का झाले? हे धर्मातर तलवारीच्या जोरावर झाले असे समजणे ‘महामूर्खपणाचेच’ आहे. त्यांनी धर्मातर केले ते हिंदू जमीनदारांच्या आणि पुरोहितांच्या अत्याचारापासून सुटका करून घेण्यासाठी, स्वाधीनतेसाठी, सन्मानासाठी. पण पिढय़ान्पिढय़ा ब्राह्मणी व्यवस्थेने त्यांच्यावर लादलेल्या जात या रोगातून त्यांची सुटका होत नाही याची खंत आहे.’ 

मुसलमान राजवट वाईट नव्हती हे विवेकानंदांनी अगदी स्पष्टपणे सांगितले. ‘भारताचा ऐतिहासिक क्रमविकास’ या आपल्या निबंधात ते म्हणतात, ‘मोगलांच्या दरबारात जे बौद्धिक वैभव होते, त्याचा अंशमात्रसुद्धा आपल्याला पुणे आणि लाहोरच्या दरबारात दिसत नाही.’ आणि ‘भारताचा भावी काळ’ या आपल्या भाषणात ते सांगतात, ‘कोणतीही राजवट ही पूर्णपणे चांगली किंवा पूर्णपणे वाईट नसते. मुसलमान राजवटीचे भारतातील योगदान हे की, ‘गरिबांची आणि दलितांची स्थिती सुधारली आणि विशेषाधिकार संपला!’’

 ‘मला प्रतीत झालेले माझे गुरू’ या आपल्या पुस्तकात भगिनी निवेदितांनी लिहिले आहे, ‘इस्लाम शब्दाचा उच्चार करताच स्वामीजींच्या डोळय़ांपुढे बंधुप्रेमाने बांधल्या गेलेल्या, सामान्य माणसांना महत्त्व देणाऱ्या व मोठय़ा व्यक्तींना सामान्यांच्या पातळीवर आणणाऱ्या समाजगटाचे चित्र उभे राही. भारताच्या उत्क्रांतीचा विचार करताना, समाजातील खालच्या थरात जन्माला आलेल्यांना उच्च सामाजिक दर्जा मिळवून देण्यात त्या समाजात संघटित प्रतिकाराची बीजे रोवण्यात इस्लामने केलेल्या योगदानाचा त्यांना कधी विसर पडत नसे.’ 

३) हिंदू धर्माने, म्हणजे सनातन ब्राह्मणी व्यवस्थेने विवेकानंदांना आजन्म मरणप्राय यातना दिलेल्या आहेत. हिंदू धर्माने आपला प्रतिनिधी म्हणून विवेकानंदांना सर्वधर्मपरिषदेत पाठविलेले नव्हते, हे आपणांस माहीत आहे. असामान्य अलौकिक बुद्धिमत्ता आणि प्रचंड आत्मविश्वास याच्या जोरावर त्यांनी ते आमंत्रण मिळविले. ती सभा गाजविली. अमेरिकेतच नव्हे तर जगभर त्यांचा जयजयकार झाला. पण हिंदू धर्म त्या वेळी काय करत होता? २० जून १८९४ रोजी हरिदास बिहारीलाल देसाई यांना पत्र पाठवून त्यांनी आपल्या मनातील व्यथा सांगितली. पत्रात ते लिहितात, ‘मला अमेरिकेत येऊन एक वर्ष झाले. पण माझ्या हिंदू धर्माने, त्यांच्या संस्थांनी, शंकराचार्यानी, माझ्यासाठी ‘हा खरा संन्यासी आहे. कुणी फसविणारा नाही, हा आमच्या हिंदू धर्माचा प्रतिनिधी आहे’ एवढे साधे शब्द अमेरिकेत लोकांना सांगितले नाहीत. आपल्या धर्माची खरोखर धन्य आहे’, हे याहूनही भयंकर आहे. बंगाल आणि अमेरिकेत प्रसिद्ध होणाऱ्या ‘इंडियन रिव्ह्यु’ने लिहिले, ‘हा माणूस ब्राह्मण नाही. हा शूद्र आहे. याला हिंदू धर्माबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही.’ ‘युनिटी ऑफ द मिनिस्टर’ या ब्राह्मो समाजाच्या मुखपत्राने लिहिले, ‘बाबू नरेंद्रनाथ तथा विवेकानंद यांना आम्ही नववृंदावन थिएटर या नाटय़संस्थेच्या रंगभूमीवर काम करणारा एक दुय्यम दर्जाचा नट म्हणून ओळखतो.’

 जानेवारी १८९७ साली अमेरिका व इंग्लंडचा दौरा संपवून विवेकानंद भारतात परत आले. सामान्य हिंदू आणि मुसलमानांनी त्यांचे स्वागत केले. मात्र त्याच वेळी हिंदू धर्मातील ढुढ्ढाचार्यानी त्यांच्यावर घणाघाती हल्ले केले. महामहोपाध्याय गोपाळशास्त्री कराडकर यांनी वेदशास्त्रसंपन्न त्र्यंबकशास्त्री वैद्यांना सांगितले, ‘हा माणूस शूद्र आहे. समुद्रवास करून आलाय. प्रायश्चित्त देऊनही त्याला आता शुद्ध करता येणार नाही!’ विवेकानंद कोलकाता येथे पोहोचले. त्या वेळी ‘बंगवासी’ने लिहिले, ‘हा माणूस शूद्र आहे. याला संन्यास घेण्याचा आणि हिंदू धर्मावर बोलण्याचा काही अधिकार नाही.’ २८ फेब्रुवारी १८९८ रोजी विवेकानंद भगिनी निवेदितांना घेऊन दक्षिणेश्वरच्या मंदिरात ‘श्रीरामकृष्णा जयंती’ साजरी करावयास गेले. मंदिराच्या पुजाऱ्याने त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. १४ सप्टेंबर १८९९ रोजी आपले लंडनमधील मित्र ई. टी. स्टडी यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘भारतात पाय ठेवल्यावर लगेच मला मुंडन करावयास लावले. कफनी घालावयास लावली. त्यामुळे माझे मधुमेहासारखे अनेक आजार बळावले. मात्र येथे आल्यावर मला ज्या या अनेक यातना भोगाव्या लागल्या त्याबद्दल मला आनंद आहे. त्यामुळे काही काळ तीव्र वेदना होत असल्या तरी आयुष्यातील एक फार मोठा अनुभवही मला मिळाला आहे.’

भारतात परतल्यावर विवेकानंदांनी त्यांच्या मनातील बेलूर मठ स्थापन केला. त्याच्या जागेची रक्कम हेनारिटा मुल्लर या त्यांच्या लंडनमधील मैत्रिणीने दिली. मठाचा दैनंदिन चालवण्यासाठी देणगीची एकरकमी रक्कम सारा ओली बूल या त्यांच्या अमेरिकन शिष्येने दिली. हा मठ सर्वासाठी खुला होता. तेथे सर्व धर्मातील धर्मग्रंथांचा, प्राचीन आणि अर्वाचीन तत्त्वज्ञानाचा आणि विज्ञानाचा अभ्यास होणार होता. पण असा मठ असू शकत नाही, हे विवेकानंदांचे आरामगृह आहे म्हणून कोलकाता महानगरपालिकेने बेलूर मठावर भला मोठा कर आकारला. विवेकानंदांच्या आयुष्यातील काही काळ हा खटला लढविण्यात गेला.

आता प्रश्न एवढाच की, स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे अपहरण नव्हे तर विकृतीकरण कोण करत आहे? एका परिवाराला असे काही करण्याची गरज का वाटली असेल? मला एक शक्यता दिसते, संघाचे एकवेळचे प्रचारक, आजन्म संघाचे स्वयंसेवक, ज्येष्ठ विचारवंत प्रा. वि. रा. करंदीकर यांनी ‘तीन सरसंघचालक’ या पुस्तकात नकळत एक अडचण सांगितलेली आहे. महाराष्ट्रात संघाची सभा, कार्यक्रम वगैरे असेल तर व्यासपीठाच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवावा लागे. राजस्थानात राणा प्रताप यांचा, पंजाबमध्ये गुरूगोविंदसिंग यांचा. पूर्ण भारतभर आपण वापरू शकू असे एक सुवर्णनाणे त्यांना हवे होते! त्यांना विवेकानंदांबद्दल खरे प्रेम असते तर त्यांनी बेलूर मठ, रामकृष्ण संघ यांना मदत करत संघस्थानावर कवायत ठेवावयास हवी होती. पण त्यांना आपल्या मनातील आपल्याला हवे तसे विवेकानंद बनवून त्यांना त्यांचे कन्याकुमारीला विवेकानंद रॉक मेमोरियल बनवायचे होते. याबाबत आणखी दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. विवेकानंद पोहत त्या खडकावर गेले होते हे खरे की खोटे यावर वाद आहेत. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या खडकावर ख्रिश्चनांना पवित्र असलेला क्रॉस होता. तो हटवण्यात आला. त्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली. १४४ कलम पुकारून शांतता प्रस्थापित करावी लागली.

dabholkard155@gmail.com

Story img Loader