साप, वन्यप्राणी, दलदलीने भरलेली निबीड अरण्य, पावसाची रिपरिप, नद्यांचं जाळं, अन्न-पाण्याचं दुर्भिक्ष्य, कधी गोठवणारी थंडी, वाट रोखणारं बर्फ, पाय गळून जातात, अंगावरच्या कपड्यांचंही ओझं वाटावं एवढा थकवा येतो, मध्येच कुठेतरी प्रवास कायमचा संपेल हे जाणवू लागतं, याच वाटेवर अनेकांनी प्राण सोडले आहेत, हे देखील माहीत असतं, तरीही लोक इंच इंच लढवत ‘डाँकी रूट्स’वरून चालतच राहतात. लक्ष्य एकच असतं. डॉलर्सच्या देशात पोहोचणं..
गुन्हेगारी आणि गरिबीने ग्रासलेल्या मध्य अमेरिकेतील अनेकजण पूर्वीपासून याच मार्गाने मेक्सिकोत आणि तिथून अमेरिकेत शिरकाव करत. पण गेल्या काही दशकांत हा मार्ग स्वीकारणाऱ्या वर्गाचा चेहरा बदलत गेला. थेट आफ्रिका, आशिया खंडांतील लोकही या वाटेवर दिसू लागले. त्यांची संख्या वाढू लागली. आता या वाटा मळल्या आहेत. त्यांच्याभोवती एक मोठं अर्थकारणाचं जाळंही तयार झालं आहे. पण प्रवास आजही जीवघेणाच आहे.
डाँकी रूट्स आणि धोके
एखाद्या परदेशात नियम धाब्यावर बसवून, यंत्रणांचा ससेमिरा चुकवून बेकायदा शिरकाव करण्यासाठी जे मार्ग अवलंबले जातात, त्यांना ‘डाँकी रूट्स’ म्हणून संबोधलं जातं. अमेरिकेत पोहोचवणारे असे अनेक मार्ग आहेत. काही मध्य अमेरिकेतून जातात तर काही कॅनडातून. ही वाट दाखवणाऱ्या वाटाड्यांना ‘स्मगलर्स’ किंवा ‘डाँकर्स’ म्हटलं जातं. जशी अमली पदार्थ, शस्त्रास्त्रांची तस्करी, तशीच ही माणसांची तस्करी. हे तस्कर २० ते ७५ हजार अमेरिकन डॉलर्स आकारून या प्रवासात सोबत करतात. पुरेसे पैसे नसणाऱ्यांना त्याबदल्यात अंमली पदार्थांची तस्करी करावी लागते. प्रवास सुरू होतो कोलंबियाच्या किनारपट्टीवरच्या एखाद्या खेड्यातून. कोलंबिया आणि पनामाला जोडणारा निबीड अरण्याचा भाग ‘डेरियन गॅप’ म्हणून ओळखला जातो. ‘कायद्याचे हात’ जिथे पोहोचत नाहीत, असा हा भाग. तिथल्या चिखलाने लडबडलेल्या वाटा तुडवत ट्रेक सुरू होतो. पाण्याच्या प्रवाहांतून सतत चालून पायाला जखमा होतात. पाठीवर वाहून आणलेल्या अन्न-पाण्याचा साठा संपतो, सोबतच्या तस्कराने शिजवून दिलेला भात खाऊन चालत राहावं लागतं. विषारी साप, कीटक, माश्या दंश करतात, वन्य प्राणी हल्ले करतात. कायद्याचं राज्यच नसल्यामुळे गुंडांच्या टोळ्यांचा सुळसुळाट असतो. त्यांचे हल्ले होतात. कधी अन्न-पाण्याअभावी, कधी हृदय निकामी होऊन तर कधी सर्पदंशाने अनेकांचा प्रवास या डेरियन गॅपमध्येच संपुष्टात येतो. शरीर-मनाने चिवट, कणखर असणारे तगून राहतात, पण थकवा असह्य झालेला असतो. खांद्यावरच्या बॅगेत सर्वस्व सामावलेलं आहे हे कळत असतं, पण ते सर्वस्वही ओझं वाटू लागतं. अशा असह्य झालेल्या ओझ्याचे- कपडे, बॅगा, बाटल्या, बुटांचे ढीग या वाटांवर साचलेले असतात. यांच्यापैकी कोणाला त्यांच्या देशात गुन्हेगार ठरवलेलं असतं, कोणाच्या पालकांनी आपल्या चीजवस्तू विकून मुलाला इथवरच्या प्रवासाचे पैसे दिलेले असतात, कोणाचे दूरचे नातेवाईक आधीच या मार्गाने अमेरिकेत पोहोचलेले असतात, काहीजण घर-दार विकून कुटुंब कबिल्यासह अमेरिकेत स्थायिक व्हायला आलेले असतात. यात भारतीय, बांगलादेशी, पाकिस्तानी आणि आफ्रिकेतील नागरिक मोठ्या संख्येने असतात.
डेरियन गॅप ओलांडणं हे शरीर-मनाची अतिकठोर परीक्षा घेणारं सर्वांत मोठं दिव्य असतं. ते पार केलं की सुरू होतं कायद्याचं राज्य. मग तिथल्या कायद्यांचं रक्षण करणाऱ्या यंत्रणांशी संघर्ष सुरू होतो. पनामा, कोस्टा रिका, होंडुरस, ग्वाटेमाला अशी मजल दरमजल करत पुढचा प्रवास सुरू होतो. प्रत्येक ठिकाणी यंत्रणांशी संघर्ष, स्थानिकांचा विरोध, रिता झालेला खिसा, आरोग्याचे प्रश्न यांचा समाना करणाऱ्या या तांड्यांचा शेवटचा थांबा असतो मेक्सिकोत! तिथे पोहोचेपर्यंत तांडे रोडावलेले असतात. मेक्सिको हे अशा बेकायदा स्थलांतरितांचं ‘हब’ झालं आहे. इथे तिन्ही त्रिकाळ छावण्या पडलेल्या असतात. योग्य संधी साधून अमेरिकेत शिरण्याच्या प्रतीक्षेतील हजारोजण तिथे तळ ठोकून राहतात.
याव्यतिरिक्त अन्यही डाँकी रूट्स आहेत. अलिकडच्या काळात कॅनडातून अमेरिकेत जाणाऱ्यांचं प्रमाण वाढू लागलं आहे. पर्यटनाचा किंवा शिक्षणाचा व्हिसा मिळवून कॅनडात येऊन तिथून अमेरिकेत जाऊ पाहणाऱ्यांचीही कथाही फारशी वेगळी नसते. हा मार्ग तुलनेने अधिक जवळचा मात्र तेवढाच जीवघेणा आणि अधिक खर्चिक ठरतो. भारतातून जाणारी अनेक गुजराती आणि पंजाबी कुटुंबं हा मार्ग स्वीकारतात. यात कॅनडातून थेट अमेरिकेची सीमा दाखवली जाते आणि फक्त तिथवर पोहोचलात की झालं, असं सांगितलं जातं. पण तिथवर पोहोचताना उणे ३५ ते उणे ३८ अंश सेल्शियस तापनामानाचा सामना करावा लागणार असतो. ज्यांनी कधी बर्फ पाहिलंच नाही, अशांसाठी कमरेएवढ्या बर्फात रुतणारं प्रत्येक पाऊल वर उचलून पुढे ठेवणं हे दिव्य असतं. फ्रॉस्ट बाईट, बुटांतून पाणी आत शिरून पाय गारठणे, श्वसनास त्रास यातली कोणतीही समस्या जीवघेणी ठरू शकते आणि ठरतेही. कितीही उबदार कपड्यांची आवरणं चढवली आणि कितीही उत्तम दर्जाचे बूट घातले तरी हिवाळा अनेक जीव घेतो.
डाँकी रूट्सचं अर्थकारण
या मार्गावर जसे तस्कर आहेत, तसेच या वाटसरूंना गरजेच्या वस्तू पुरवणारी दुकानं, त्यांना स्वस्तात जेवण देणारी हॉटेल्स, गरजेच्या वस्तूंची दुकानं, दाटीवाटीने का असेना पण राहण्यासाठी परवडणारी जागा देणारे लॉज, त्यांच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या संस्था आहेत. एक मोठं अर्थकारण याभोवती उभं राहिलं आहे. या तस्करांशी आणि स्वयंसेवी संस्थांशी त्या-त्या देशांतल्या यंत्रणांचा उभा दावा असतो. आपल्या देशातील व्यवस्थेवर स्थलांतरितांचा बोजा पडतो, असं स्थानिकांना वाटतं, त्यामुळे त्यांचाही रोष असतोच. मात्र अनेकांसाठी हा उदरनिर्वाहाचा मार्ग ठरतो. जगभरातल्या गरजूंची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण हातभार लावत आहोत, त्यांना वन्य प्राण्यांपासून, नदीत वाहून जाण्यापासून वाचवत आहोत, अशी स्वतःचीच समजूत त्यांनी घालून घेतलेली असते. स्वयंसेवी संस्थांना यातून मोठा मलिदा मिळत असल्याचे आरोप होतात, मात्र आम्ही बेघर गरिबांच्या राहण्याची खाण्याची सोय करतो, त्यांना औषधं पुरवतो, आपण मदत केली नाही, तर त्यांचे भुकेने किंवा आजारांनी मृत्यू होतील, असा त्यांचा दावा असतो.
एवढे अडथळे पार करून अंतिम रेषा ओलांडून जे अमेरिकेत पाऊल ठेवतात ते सुद्धा तेथील कायद्याच्या कचाट्यात अडकतातच. काहींची लगेचच मायदेशी रवानगी केली जाते. काहींचे खटले वर्षानुवर्षे सुरू राहतात. बेकायदा स्थलांतरितांचे खटले लढवणाऱ्या वकिलांचा एक मोठा वर्ग तिथे आहे. आधीच कंगाल झालेल्या या स्थलांतरितांकडून मोठी फी मिळण्याची शक्यता नसली, तरीही सतत काम मिळण्याची शाश्वती असते.
काहीही झालं तरीही अमेरिका हा बुद्धिमत्ता आणि कष्टांचं पुरेपूर मोल मोजणारा देश आहे. त्यामुळे या अग्निदिव्यातून पार पडलेल्या बहुतेकांना सुरुवातीला राहण्या-खाण्याचं आव्हान असलं, तरीही हळूहळू ते तिथे स्थिरावतात आणि डॉलर्स कमावण्याचं स्वप्न साकार करू लागतात.
बेकायदा स्थलांतरितांचं प्रमाण व अर्थव्यवस्थेतील वाटा
२०२२ च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत ४६ लाख भारतीय राहतात. त्यापैकी पाच लाख २५ हजार बेकायदा स्थलांतरित आहेत. २०२१ मध्ये अमेरिकेच्या यंत्रणांनी मेक्सिकोच्या सीमेवर दोन हजार ५८८ भारतीयांना ताब्यात घेतलं होतं. कोविडच्या साथीपूर्वी ही संख्या आणखी मोठी होती. २०१९ मध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या बेकायदा स्थलांतरित भारतीयांची संख्या सुमारे सात हजार ६०० एवढी होती. २००७ मध्ये मात्र ही संख्या अवघी ७६ एवढी होती. पण यातील महत्त्वाची बाब म्हणजे, या पाच लाख २५ हजार बेकायदा स्थलांतरित भारतीयांची क्रयशक्ती! त्यांची एकत्रित क्रयशक्ती १५५ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी प्रचंड आहे आणि ते अमेरिकेच्या महसुलात दरवर्षी सुमारे २८ अब्ज डॉलर्सची भर घालतात.
हेही वाचा – सर्वांसाठी आरोग्य : ‘या’ सर्वांमध्ये ‘ती’ कुठेय?
दुर्घटना आणि मृत्यू
पटेल कुटुंबियांच्या मृत्यूचे वृत्त ताजे आहे, मात्र यापूर्वीही अनेक भारतीयांचे अमेरिकेकडे जाणाऱ्या वेगवेगळ्या वाटांवर कधी उष्माघाताने, कधी गारठून, कधी उपासमारीमुेळ, तर कधी अपघाती मृत्यू झाले आहेत. २०१९ साली गुरमित सिंग आणि सुरिंदर कौर यांच्या सहा वर्षांच्या मुलीचा गुरप्रीत कौरचा अमेरिकेच्या वाटेवर असताना मृत्यू झाला. गुरप्रीतचे वडील २०१३ मध्ये अमेरिकेत पोहोचले होते. २०१९ मध्ये त्यांची पत्नी आणि मुलगी दोघींनी अन्य भारतीय स्थलांतरितांबरोबर हा जीवघेणा प्रवास केला. अगदी अखेरच्या टप्प्यात अरिझोनाच्या वाळवंटातून जाताना गुरप्रीतचा ४२ अंश सेल्शियस तापमानात उष्माघाताने मृत्यू झाला. २०२२ साली गांधीनगरच्या ब्रिजकुमार यादव यांनी आपली पत्नी आणि मुलासह अमेरिकेत बेकायदा स्थलांतर करण्याचा प्रयत्न केला. आपल्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन सीमेवरील उंच भिंतीवरून उडी मारल्यानंतर जमिनीवर आदळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी आणि मुलगा जखमी झाले होते, मात्र वाचले. ही यादी मोठी आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात त्यांची बेकायदा स्थलांतरितांविषयीची प्रतिकूल धोरणे पाहून अनेकांनी आपला मोर्चा कॅनडाकडे वळविला होता. काहींनी परिस्थिती अनुकूल होण्याची वाट पाहत मेक्सिकोतच मुक्काम ठोकला होता. अमेरिकेत बेकायदा शिरकाव करणाऱ्यांत मेक्सिकन नागरिकांनंतर भारतीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे. असे मार्ग स्वीकारणाऱ्या भारतीयांत गुजरात आणि पंजाबमधील रहिवाशांची संख्या लक्षणीय आहे. डाँकी रूट्सवर दरवर्षी अनेक मृत्यू होत आहेत. अमेरिका आणि कॅनडातली सरकारं यावर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, मात्र त्याला यश येत नाही. डॉलर्स मिळवून देणाऱ्या देशात जाण्याचं वेड काही कमी होत नाही.
(vijaya.jangle@expressindia.com)