जयप्रकाश विनायक
भारतात चित्रपटांचा पाया घातला गेला तो ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांनी. लोकांना माहीत असलेल्या कथानकांवरील हे चित्रपट भरपूर गर्दी खेचत. साहजिकच त्याच प्रकारचे चित्रपट काढण्याकडे त्यावेळच्या चित्रपटकर्मींचा प्रयत्न असायचा हे स्वाभाविकच होतं. व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर यांनीही सुरुवातीला तोच मार्ग चोखाळला यात नवल नाही. व्ही. शांताराम यांनी १९३२ साली ‘अयोध्येचा राजा’ हा चित्रपट काढायचं ठरवलं तेव्हा त्यांना आपले मावसभाऊ मा. विनायक यांची आठवण झाली. तेव्हा मा. विनायक शिक्षकी पेशात होते. ते इंग्रजी आणि मराठी हे विषय शिकवीत. कुठलाही विषय तळमळीने शिकवायची त्यांची हातोटी होती. ते कविताही गाऊन शिकवत. त्यांचा गळा गोड होता. ते दिसायलाही देखणे होते. साहजिकच ‘अयोध्येचा राजा’च्या वेळी व्ही. शांताराम यांना ते आठवले. त्यांनी त्यांना चित्रपटात येण्याविषयी विचारलं. आणि मा. विनायक या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण करते झाले. बोलका चेहरा, मधुर आवाज, देखणं रूप यामुळे त्यांना नारदाची भूमिका त्यात दिली गेली. हा चित्रपट सुपरहिट् ठरला. त्यांचा पुढचा चित्रपट ‘अग्निकंकण. त्यात त्यांना प्रमुख हिरोची भूमिका मिळाली. हाही चित्रपट भरपूर चालला आणि त्यांच्याकडे चित्रपटांची रांगच लागली. तोवर ते व्ही. शांताराम यांच्याकडे प्रमुख साहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही धडे घेऊ लागले होते. त्यानंतर ‘माया मच्छिंद्र’, ‘सिंहगड’, ‘आकाशवाणी’, ‘भिकारन’ अशा चित्रपटांची रीघ त्यांच्याकडे लागली.

हेही वाचा >>>महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्था म्हणजे अनागोंदी आणि विषमतेची महायुती

…आणि एक शाळामास्तर चित्रपटांत स्थिरावू लागला. त्यांचं वाचन भरपूर होतं. मोठमोठे साहित्यिक त्यांनी वाचले होते. तोवर नाटक-चित्रपटांतून भडक अभिनयाची पद्धत रूढ होती. ती मा. विनायक यांना काही मान्य नव्हती. चित्रपटाचा कॅमेरा अत्यंत सूक्ष्म हालचाली, हावभाव टिपत असताना असं करणं त्यांना पटत नव्हतं. शिवाय त्याच त्या ऐतिहासिक-पौराणिक कथाविषयांतून चित्रपटांना बाहेर काढायला हवं असंही त्यांना वाटू लागलं होतं. त्यावेळच्या कलाकारांच्या भडक अभिनयाला छेद देत मा. विनायक नैसर्गिक अभिनय करत. आणि लोकांनाही तो आवडत असे. एक नैसर्गिक अभिनय करणारा कलाकार म्हणून त्यांची ओळख हळूहळू प्रेक्षकांना होत होती.

१९३५ साली त्यांनी ‘विलासी ईश्वर’ हा चित्रपट प्रथमच हिंदी-मराठीत दिग्दर्शित केला. त्यात तनुजा आणि नूतन यांच्या आई शोभना समर्थ या हिरॉइन होत्या. त्या या चित्रपटाआधीच खरं तर लोकप्रिय झालेल्या होत्या. मा. विनायकांनी या चित्रपटात दिग्दर्शनासह अभिनेते म्हणूनही काम केलं. हा चित्रपट तुफान चालला. त्यानंतरचा त्यांचा चित्रपट होता- ‘छाया.’ मराठी आणि हिंदीतही त्यांनी तो केला. त्यात प्रमुख नायिकेच्या भूमिकेत होत्या लीला चिटणीस आणि सुमती गुप्ते. मा. विनायक यात प्रमुख भूमिका आणि दिग्दर्शनही करत होते.

चित्रपटांचा प्रचलित साचा मोडायचं त्यांनी ठरवलं आणि वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे यांच्यासारख्या दिग्गज साहित्यिकांकडून त्यांनी चित्रपट लिहून घेतले. कुमारी मातासारखा विषय घेऊन त्यांनी चित्रपट करायचं ठरवलं तेव्हा व्ही. शांताराम यांनी त्यांना सावध करायचा प्रयत्न केला. असे विषय लोकांना रुचणार नाहीत असं ते म्हणाले. पण मा. विनायक आपल्या म्हणण्यावर ठाम होते. सामाजिक विषय हाताळून ते यशस्वी करून दाखवायचा त्यांनी जणू विडाच उचलला होता. ‘माझं बाळ’ या चित्रपटाने त्यांनी आपण काळाच्या पुढचा विचार करणारे चित्रपटकार आहोत हे लोकांच्या मनावर ठसठशीतपणे बिंबवलं… ज्यावर पुढच्या काळात ‘धूल का फूल’ हा सिनेमा निघाला.

हेही वाचा >>>बांगलादेशला सापडेल का, त्याची खरी ओळख?

१९३८ साली त्यांनी ‘ब्रह्मचारी’ या चित्रपटाची निर्मिती केली. मोठ्या पडद्यावर विडंबनात्मक चित्रपटांचा एक नमुना त्यांनी याद्वारे पेश केला. शालूतून जोडे मारण्यासारखा हा प्रकार होता. चित्रपटाचा विषय वरकरणी उथळ वाटला तरी त्यात पाचकळ विनोद, अश्लील हावभाव, अंगविक्षेप असले प्रकार नव्हते. नायिका मीनाक्षी यांचा पाण्यात पोहण्याचा सीनही व्हल्गर होणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली होती. हा चित्रपट खूप गाजला, परंतु त्यांच्यावर अश्लीलतेचा आक्षेप कुणी घेतला नाही. कारण तशाच पद्धतीनं तो चित्रित केलेला होता. १९३८ सालीच त्यांचा ‘ज्वाला’ हा दुसरा बिग बजेट चित्रपट आला. प्रचलित साचे मोडायचा त्यांनी जणू चंगच बांधला होता. मोठमोठे सेट्स वगैरेचा वापर त्यात होता.

‘लग्न पाहावं करून’पासून त्यांनी आपली ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ ही कंपनी सुरू केली. त्याद्वारे ‘देवता’, ‘ब्रॅण्डीची बाटली’ (‘ब्रँडी की बोतल’), ‘अर्धांगिनी’ (‘घर की रानी’), ‘अमृत’, ‘सरकारी पाहुणे’, ‘सुभद्रा’ अशा अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. ‘जीवनयात्रा’सारखा बसप्रवासावर आधारित चित्रपट त्यांनी त्याकाळी काढला. चित्रपटाला नेहमीपेक्षा हटके, वेगळी ट्रीटमेंट देण्याचे त्यांचे नेहमीच प्रयत्न राहिले. त्यावेळी राम गबाळे, दिनकर द. पाटील यांच्यासारखे पुढे दिग्दर्शक म्हणून नावाजलेले चित्रकर्मी त्यांचे असिस्टंट म्हणून काम करीत होते.

त्यांच्या ‘बडी मां’ या चित्रपटात त्याकाळची ख्यातनाम गायिका-अभिनेत्री नूरजहाँ ही हिरोईन होती. ‘एका मोठ्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचं सौभाग्य मला या चित्रपटाने मिळालं,’ असे उद्गार त्यांनी तेव्हा काढले होते.

आधी कोल्हापूर, नंतर पुणे आणि पुढे मुंबईत मा. विनायक यांनी स्थलांतर केलं तरी त्यांनी आपल्याबरोबर आपले सहकारी कलावंत, तंत्रज्ञही सोबत आणलं. नुसतं सोबत आणलं नाही, तर त्यांची इथे राहण्या-प्रवासाचीदेखील सोय त्यांनी केली. ते प्रचंड देशप्रेमी होते. अनेक भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांना ते आपल्या घरी आसरा देत. त्यांची ऊठबस करत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्यांनी बंगल्यात ध्वजवंदन करून आपल्या मुलांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची माहिती दिली होती.

मा. दीनानाथांचे ते प्रचंड चाहते होते. त्यामुळे त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांनी त्यांच्या मुलांना आपल्या घरी आणलं. त्यांची मोठी मुलगी लता मंगेशकर यांना त्यांनी आपल्या चित्रपटांतून आवर्जून भूमिका देऊन आणि गाण्याची संधी देऊन त्यांनी आयुष्यात उभं केलं. मंगेशकर भावंडांनीही त्यांच्या या ऋणाची कायम जाण ठेवली.

१९४७ मध्ये त्यांनी ‘मंदिर’ या चित्रपटाचा घाट घातला. त्यात लता मंगेशकर दोन बहिणींपैकी एका बहिणीची भूमिका साकार करणार होत्या. दुसऱ्या बहिणीच्या भूमिकेसाठी मा. विनायक यांनी आपली मुलगी बेबी नंदा हिला घ्यायचं ठरवलं. पण नंदाला तेव्हा चित्रपटांतून काम करायचं नव्हतं. तिला भरपूर शिकायचं होतं. मात्र तिला भूमिका द्यायचा वडलांचा निर्धार पक्का होता. तिने काहीसा विरोध करून बघितला. पण ते आपल्या हट्टावर ठाम होते. शेवटी ती नाइलाजानं दुसऱ्या दिवशी चित्रीकरणासाठी त्यांच्यासोबत गेली. तिथे अचानक तिला मुलीऐवजी मुलाच्या भूमिकेत त्यांनी उभं केलं. रात्री उशिरापर्यंत चित्रीकरण चाललं. रात्री उशिरा ते घरी परतले तेव्हा त्यांना प्रचंड ताप भरला होता. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी तुम्ही चित्रीकरणाला येऊ नका, आम्ही सगळं बघतो असं त्यांना सांगितलं होतं. पण त्यांचा ताप दिवसेंदिवस वाढतच गेला आणि त्यातच त्यांचं १९ ऑगस्ट १९४७ रोजी निधन झालं.

एक धगधगतं अग्निकुंड निमालं. नेहमी काळाच्या पुढचा विचार करणारा एक चित्रपटकार अनंतात विलीन झाला.