उंची बेताचीच. अपंगत्वामुळे कायम चाकाच्या खुर्चीचा आधार घ्यावा लागल्याने ती नेमकी किती हे कुणालाच ठाऊक नसलेली. डोळे भेदक. वाणीवर इंग्रजीचे प्रभुत्व. एकदा बोलू लागला की समोरच्यांनी ऐकतच राहावे असे वागणे आणि बोलण्यात डावेपण भिनलेले. ही ऐन दसऱ्याच्या दिवशी निधन झालेल्या आणि ‘जहाल नक्षली’ असा शिक्का बसलेल्या प्रा. जी. एन. साईबाबाची दर्शनी ओळख. नक्षल असल्याच्या आरोपावरून पकडला गेला तेव्हा दिल्ली विद्यापीठात इंग्रजीचा प्राध्यापक आणि जहाल डाव्यांचा ‘आयडियालॉग’ असलेला साईबाबा मूळचा आंध्रप्रदेशातील अमलापुरमचा. विद्यार्थीदशेपासून डाव्या चळवळीशी जोडल्या गेलेल्या या तरुणाने १९९१ मध्ये ‘आंध्र पीपल्स रेझिस्टन्स फोरम’ ही संघटना स्थापन केली. तेव्हा या राज्यात नक्षल चळवळ अतिशय प्रभावी होती. त्यांच्या हिंसाचाराने कळस गाठला होता. त्यांचीच समर्थित म्हणून ओळखल्या गेलेल्या या संघटनेने सरकारी यंत्रणांकडून दलित, शोषित, पीडितांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडायला सुरुवात केली ती मात्र हिंसाचारातून नव्हे तर, सनदशीर लोकशाही मार्गाने.

त्या वेळी या राज्यात कोंडापल्ली सीतारामय्या नेतृत्व करत असलेल्या पीपल्स वॉर ग्रूपचा बोलबाला होता. या कोंडापल्लींची दृष्टी मर्यादित. दंडकारण्याच्या बाहेरचा विचार न करणारी. यावरून गणपती व त्याच्यात मतभेदाला सुरुवात झाली. या चळवळीला देशव्यापी स्वरूप द्यायचे असेल तर विविध राज्यात शस्त्रे हाती घेऊन वेगवेगळ्या नावाने लढणाऱ्या संघटनांनी एकत्र येणे गरजेचे हा गणपतीचा विचार अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला तो साईबाबाने. केवळ हैदराबादमध्ये राहून हे शक्य नाही हे लक्षात येताच त्याने दिल्ली गाठली व तेव्हाच्या बिहारमध्ये सक्रिय असलेल्या ‘माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर’ या संघटनेशी (एमसीसी) बोलणी सुरू केली.

Maharashtra assembly elections 2024 mahayuti
महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती कशी टाळता येईल?
marathi schools education
आता मराठी शाळांना ‘सुसह्य दर्जा’ हवा!
Loksatta lokshivar Decline in production due to root rot of ginger and turmeric crops
लोकशिवार: आले, हळदीची कंदकुज !
loksatta Lokshivar fake onion seeds in the market has increased for sale
लोकशिवार: कांद्याच्या बनावट बियाण्यांचा धोका
global hunger index 2024
भारतात एवढे फुकट देऊनही… भुकेचा प्रश्न गंभीरच
Rohit pawar article on ladki bahin yojana
सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता?
jammu and Kashmir assembly
काश्मीरच्या जनमताचा ‘राष्ट्रवादी’ कौल!
haryana assembly election 2024 result
हरियाणातील भाजपचा धडा!
village is changing but the question is the direction of the change
गाव बदलत आहे… प्रश्न आहे बदलाच्या दिशेचा

हेही वाचा – काश्मीरच्या जनमताचा ‘राष्ट्रवादी’ कौल!

दीर्घकाळ चर्चेचा कीस पाडल्यावरच निर्णय घेणे हे डाव्यांचे वैशिष्ट्य. त्यामुळे १९९५ पासून सुरू झालेल्या या वाटाघाटींनी मूर्त स्वरूप घेतले तोवर सप्टेंबर २००४ उजाडला. यातून आकाराला आला भाकप (माओवादी) हा पक्ष. तोवर नक्षली म्हणजे हातात बंदुका घेऊन हिंसाचार करणारे अशीच या चळवळीची देशभर प्रतिमा होती. सरकारे व समाज याच नजरेतून त्यांच्याकडे बघत होते. या चळवळीमागे एक निश्चित विचार आहे व त्याला राजकीय अधिष्ठान आहे हे अनेकांना ठाऊक नव्हते. हा विचार नागरी समाजात रुजवायचा असेल तर समर्थित संघटनांचे देशभर जाळे विणणे गरजेचे आहे हे सर्वप्रथम लक्षात आले ते साईबाबाच्या. त्यामुळे विलीनीकरणानंतर त्याने सर्वप्रथम स्थापना केली ती ऑल इंडिया रेझिस्टन्स फोरमची. त्याचा सचिव झाला एमसीसीचा राजकिशोर, तर उपसचिव साईबाबा.

याच काळात देशात जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले होते. त्याला विरोध करण्यासाठी समाजवादी व डाव्यांनी ‘वर्ल्ड सोशल फोरम’ स्थापन केलेले होते. त्यात सहभागी होण्याचे निमंत्रण साईबाबालाही होते, पण ते त्याने धुडकावले व देशभरातील आदिवासींना एकत्र आणून मुंबईत ‘मुंबई रेझिस्टन्स’ या नावाचा स्वतंत्र कार्यक्रम ठेवला. नेमकी याच काळात राजकिशोरला अटक झाली. असे काही घडले रे घडले की संघटनेचे नाव त्वरीत बदलणे ही नक्षलींची पद्धत. यातून आकाराला आली ‘रिव्हाेल्यूशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट’ (आरडीएफ) ही २००५ सालची घटना. नक्षलींचे शहरी भागातील स्वरूप कसे असेल याचा पायाच या फ्रंटने घालून दिला. या चळवळीसाठी काम करणाऱ्या दोनशेच्या वर समर्थित संघटना देशभर कार्यरत होत्या. त्यांना या ‘फ्रंट’खाली एकत्र आणले ते साईबाबाने. तो एवढ्यावरच थांबला नाही तर शहरात काम करण्याची पद्धत कशी असेल, कुणी कोणते काम करायचे, त्याचे स्तर काय असतील, प्रत्येक स्तरावर नेतृत्त्व कुणाकडे असेल, याची रचना साईबाबाने आखली. त्यातून आकाराला आले नक्षलींचे ‘शहरी काम के बारे मे’ हे पुस्तक. याचाही जनक साईबाबाच. एवढेच नाही तर त्याने दिल्लीत असल्याचा फायदा घेऊन जगभरातील फुटीरतावादी संघटनांशी संपर्क प्रस्थापित केला. नक्षली विचाराला जागतिक पातळीवर ओळख मिळाली ती यातून. हातात कुठलेही शस्त्र न घेता या समर्थित संघटना लोकशाहीच्या मार्गाने शहरी भागात असंतोष निर्माण करताहेत हे सरकारच्या लक्षात आले; पण कारवाई कशी करावी हा पेच तपासयंत्रणांसमोर होता. त्यातून मार्ग काढला गेला तो या संघटनांवर बंदी घालण्याचा. त्याचा कुठलाही परिणाम साईबाबाच्या कामावर झाला नाही. ताे वेगवेगळ्या संघटना व विविध नावे वापरून या चळवळीच्या नागरी भागातील समन्वयाची जबाबदारी निष्ठेने पार पाडत राहिला. एक ना एक दिवस आपल्याला अटक होईल हे ठाऊक असूनसुद्धा.

शस्त्रधारी नक्षलींचा वावर जंगलात, त्यांचे मुख्यालय संपर्कक्षेत्राच्या सदैव बाहेर असलेल्या अबूजमाड पहाडात. अशा प्रतिकूल स्थितीत संदेशाची देवाणघेवाण करणे प्रचंड गैरसोयीचे. त्यावर मात करत शहरी भागात कार्यरत असलेल्यांशी जंगलात काम करणाऱ्यांची सुसूत्रता साधणे हे तसे कठीण काम. ते साईबाबाने लीलया पेलले. हे करताना कुठेही कायदेशीर कारवाईच्या चौकटीत अडकणार नाही याची खबरदारी घेत. गडचिरोली पोलिसांनी अटक केल्यावर त्याच्या संगणकातून जप्त करण्यात आलेली अनेक पत्रे मुळातून वाचण्यासारखी. बौद्धिक प्रगल्भतेचा परिचय देणारी.

डाव्यांचा पत्रव्यवहार बराच कंटाळवाणा असतो. त्यात संदर्भांचा फाफटपसाराच भरपूर. साईबाबा अशी दीर्घ व आटोपशीर पत्रे इतक्या बेमालूमपणे लिहायचा की कळत असूनही तपासयंत्रणांना आरोप ठेवता यायचा नाही. त्याचे हेच लेखन वैशिष्ट्य त्याला जन्मठेपेच्या शिक्षेतून निर्दोष होण्यासाठी कारणीभूत ठरले. अर्थात नंतर “त्याच्या संगणकातून जप्त केलेली पत्रे त्याची नव्हतीच तर ती तपास यंत्रणांनी पेरली होती”, असाही आरोप झालाच; पण न्यायालयात बचाव करताना साईबाबाने यापैकी अनेक पत्रांचे स्वामित्व स्वीकारले होते याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

“नक्षलींचा विचार जोपासणे, त्याच्याशी संबंधित साहित्य जवळ बाळगणे हा गुन्हा नाही,” या न्यायालयीन निवाड्याचा अतिशय योग्य वापर करत साईबाबाने आयुष्यभर चळवळीने नेमून दिलेले काम तडीस नेले. क्रांती हाच अन्याय दूर करण्याचा एकमेव मार्ग आहे व माओचा विचार राबवूनच तो साधला जाऊ शकतो, यावर त्याचा ठाम विश्वास होता. अटकेत असताना चौकशीच्या दरम्यान अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला विचारले : या युद्धात सामान्य आदिवासी भरडला जातोय, अनेकांचे जीव नाहक घेतले जाताहेत याचे समर्थन तू कसे करणार ? यावर त्याचे एकच उत्तर असायचे. सरकारप्रणीत हिंसाचारात लोक मारले जातात त्याला तुम्ही कुणाला जबाबदार ठरवणार? सरकार जबाबदार असेल, तर त्यांना हाच प्रश्न विचारून तुम्ही त्यातल्या माणसांना आत टाकणार का?

हेही वाचा – सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता?

२०१४ ला त्याला अटक झाली. २०१७ला जन्मठेप तर २०२४ मध्ये उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता. जवळपास दहा वर्षे तो नागपूरच्या तुरुंगात होता. या काळात त्याने सुटकेसाठी ढाल म्हणून वापरले ते स्वत:चे अपंगत्व. तीस वर्षांपूर्वी गणपतीने त्याच्या याच शारीरिक अवस्थेचा विचार करून त्याच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपवली होती. अर्थात त्याला जोड होती ती वैचारिक निष्ठा व प्रखर बुद्धिमत्तेची. या काळात साईबाबाने कधीच तो दलित असल्याचा गवगवा केला नाही, हे त्याने जोपासलेल्या जातरहित विचाराचे प्रतीक म्हणावे लागेल.

तुरुंगातून निर्दोष सुटल्यावर त्याच्याविषयी समाजातील एका वर्गात सहानुभूती निर्माण झाली. नेमके हेच या चळवळीला अपेक्षित असते. मात्र, या बंदीकाळात त्याच्या आरोग्याची खूप हेळसांड झाली. यातून तो बरा होऊ शकला नाही. त्याची अखेर वयाच्या अवघ्या ५७ व्या वर्षी मृत्यूने झाली. नक्षलींचा लढा शस्त्र व विचार अशा दोन पातळीवरचा आहे. साईबाबा वैचारिक पातळीवर अग्रेसर होता. हा विचार कायदेशीर कारवाईतून नष्ट होऊ शकत नाही हे साईबाबाने निर्दोष सुटून देशाला दाखवून दिले. या पातळीवर त्याच्याकडे ‘ट्रॅजिक हिरो’ म्हणूनच बघितले जाईल. हिंसेला वैचारीकतेची जोड देत नक्षलीविषयी सहानुभूती निर्माण करण्यात यशस्वी ठरलेला साईबाबा काहींसाठी नायक तर अनेकांसाठी खलनायक ठरला. फक्त जाताना तो त्याला निर्दोष ठरवणाऱ्या उच्च न्यायालयीन निकालाची कवच-कुंडले लेवून गेला इतकेच.

devendra.gawande@expressindia.com