राजा देसाई
सनातन धर्म या विषयावर गेले काही दिवस वाद- चर्चा सुरू आहे. मुळात सनातन धर्म म्हणजे काय आणि स्टॅलिनपुत्र उदयनिधी म्हणतात, त्याप्रमाणे तो खरोखरच विषमतामूलक आहे का?
आता विचारांच्या वादांचे दिवस संपले; आले आहेत ते केवळ सत्ताकारणासाठी वापरावयाच्या शब्दच्छलाचे, आरोप-प्रत्यारोपांचे. ज्याची प्रचार साधनांवर पकड तो ‘सत्य’-पारधी !
‘विषमतामूलक सनातन धर्म मलेरियासारखाच नष्ट केला पाहिजे’ : स्टॅलिनपुत्र उदयानिधी, द्रमुक नेते; ‘‘हा ‘इंडिया’ आघाडीचा हिंदू धर्मावरील हल्ला, सनातन धर्म नष्ट करण्याचा छुपा अजेंडा!’ : एनडीएचा (अगदी देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाखालीच) पलटवार! हिंदूंमधील अस्पृश्यतेसहित भयाण सामाजिक विषमतेच्या पार्श्वभूमीवर ५०-६० वर्षांपूर्वीची दक्षिणेतील पेरियार आंदोलनातील अशी भाषा वगैरे हा शतकानुशतकाविरुद्धचा समतेचा आक्रोश होता. ते पूर्णत: समजण्यासारखं होतं. मात्र आजही तीच भाषा? यातून सामाजिक ऐक्याला बळ मिळेल की द्वेषाच्या फुटीच्या विचारांना बळकट होण्याची संधी? संपूर्ण समाजासाठी इतका भावनात्मक असलेला विषय देशाच्या आजच्या परिस्थितीत जणू तबकातून कोणाच्या हाती दिला जावा हे केवळ आश्चर्यच ! (आठवा : हरिद्वारच्या तथाकथित ‘धर्म-संसदे’तील मुस्लिमांविषयीची वक्तव्ये! ) आणि कोणाच्याही समूह-अस्मितांना जाणीवपूर्वक दुखवून, कठोरतम शब्द वापरून समाज बदलतो का? त्याशिवाय एवढय़ा काळात सामाजिक समतेच्याबाबतीत हिंदू काहीच बदललेला नाही का? आदर्शवादासाठी वाइटाकडून चांगल्याकडे जाण्याचा कोणत्याही समाजाचा वेग हा नेहमीच फारच कमी असतो ( प्रत्येकच क्षेत्रात ) पण माणूस-समूह, विशेषत: धार्मिक मनोधारणांच्या बाबतीत, बदलण्याचा वेग जगाच्या वास्तवाकडे ऐतिहासिक दृष्टिकोनातून तटस्थपणे पाहिलं तर काय दिसून येतो?
असो. पण तत्पूर्वी मुळात सनातन धर्म म्हणजे काय व तो ‘विषमतामूलक’
(उदयनिधींचा शब्द) आहे का याचा त्रोटक मौलिक विचार करू या : राजकारणासाठी नव्हे, धार्मिकांसाठी!
विद्वत्ता ही जीवनदर्शनाच्या सम्यकतेची हमी नसली (‘मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिध्यये।..’ गीता: ७.३) तरीही पूर्वी अभ्यासाची गरज मान्यताप्राप्त होती व अभ्यासाला प्रतिष्ठाही होती. मात्र धर्माला जसजसं अधिकाधिक राजकारणग्रस्त बनवलं जातं तसतशा अशा लढाया या अज्ञानाच्या अज्ञानाशी तर होत नाहीत ना असा प्रश्न आम्हा सामान्य धार्मिकांनाही पडतो! वायव्येकडून आलेल्या परकीयांनी सिंधू नदीच्या नावावरून आम्हाला ‘सिंधू’ऐवजी ‘हिंदू’ म्हटलं; एरवी इथल्या विचाराला ‘सनातन’ धर्मच म्हटलं जायचं हे अनेक अभ्यासकांचं मत आम्ही ऐकत आलो. सनातन का? सनातन म्हणजे ‘शाश्वत / अविनाशी’ : इटर्नल. (काळाच्या ओघात रुढीग्रस्त कर्मठ धार्मिकांसाठी तो वापरला गेला हे त्या शब्दाचं दुर्दैवच! उदयनिधींचा अर्थ तोच असावा) काय आहे ही ‘सनातन’ संकल्पना? ती विषमतामूलक आहे का वा असे ‘हल्ले’ (वा अगदी कोणतेही!) त्याला नष्ट करू शकतील का? अगदी सामान्य धार्मिक म्हणूनही त्याचं साध सोपं उत्तर उपनिषदं व भगवद्गीता यांच्या दोन-चार श्लोकांच्या भाषांतरातही आमच्या ‘धर्म-खर्चा’पुरतं आम्हाला सापडून जातं व त्यासाठी आवश्यक ते धाडसही तुकोबांनी आम्हाला देऊन ठेवलंच आहे: ‘वेदांचा तो अर्थ आम्हांसची ठावा’!
हेही वाचा >>> विवेकवादासमोरील आव्हान
‘ईशावास्यमिदं र्सव..’ (ईषोपनिषद) : चराचराला, त्यातील कणाकणाला एक अविनाशी (सनातन!) चैतन्य तत्त्व अखंडपणे व्यापून आहे व सारी सृष्टी ही त्याचीच अभिव्यक्ती आहे; (बारीकसारीक श्लेष बाजूला ठेवू) यालाच हिंदू ब्रह्मन्, आत्मा, ईश्वर, सत्य इत्यादी अनेक नावं देतो व हा हिंदू-धर्माचा प्राणविचार मानला जातो. (म्हणजेच ‘दोन, दुसरं’ म्हणून काही नाहीच तर भेदाभेद कशात?) गांधी म्हणाले ‘ईशावास्य या एका श्लोकांत सारा हिंदू-धर्म आला, बाकी लाखो पानांचं वाङ्मय ही त्यावरील केवळ कॉमेंट्री! ‘‘किती सहज सुंदर! आणि हे चराचर व्यापून असलेलं तत्त्व कोणी नष्ट करू शकेल? (ते तर ‘बिग बॅन्ग’च्या आधीपासूनच आहे!) भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘नैनं छिन्दति शस्त्राणि नैनं दहति पावक:’ (गीता:२.२३: ‘त्याला शस्त्र मारू शकत नाही, अग्नि जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही..’ वगैरे) एवढंच नव्हे तर ‘यतो वा इमानि भूतानि जायन्ते..’ (तैत्तिरीय उपनिषद) : त्या अविनाशी चैतन्यातूनच सारं वस्तूजात/प्राणिमात्र जन्मतात, त्यांतच जगतात व त्यांतच विलीन होतात. आणखी मजबूत बंधुत्व ते कशात असू शकतं? पुन्हा आठवा गांधी: ‘इतर धर्म मानवाचं बंधुत्व सांगतात, हिंदू-धर्म प्राणिमात्रांचं!’ (खरं तर चर-अचराचंही!)
हाच विचार भगवद्गीतेतील किमान डझनभर श्लोकांत तरी सापडेल (पाहू या दोन-चार!).१.‘नैनं छिन्दति शस्त्राणि..’ (२.२३); ‘अविनाशि तु तद्विद्धि..’ (२.१७); ‘ममैवांशो जीवलोके..’.(१५.७) : ‘ईश्वरतत्व अविनाशी, त्याला कोणीही नष्ट करू शकत नाही व ते प्रत्येक जीवमात्रात आहे हे जाण’. २. ‘मया ततमिदं र्सव.. मत्स्थानि सर्वभूतानि..’
(९.४ : ‘हे ईशतत्त्व अव्यक्त रूपानं सारी सृष्टी व्यापून/धारण करून आहे’); ते कसं? तर ३. ‘यथाकाशस्थितो नित्य वायु: ..तथा सर्वाणि भूतानि..’ (९.६ : आकाश जसं वायूला धारण करून असतं तसं !). यांचा प्रत्यक्ष व्यवहारात अर्थ काय होतो? ४. ‘सर्वभूतस्थमात्मानं ..सर्वत्र समदर्शन:’ (६.२९: ‘स्वत:ला सर्व भूतांत व सर्वाना स्वत:मध्ये समत्वानं पाहातो तो योगी’; प्रत्येक धार्मिकाला तिथं पोहोचायचंय!) ५. ‘समो २हं सर्वभूतेषु..’(९.२९) व ‘अद्वेष्टा सर्व भूतानां..’ (१२.१३): ‘मी सर्वात समत्वानं राहातो, माझा कोणी द्वेष्य/शत्रू नाही ); इथे सर्वत्रच ‘‘मी, श्रीकृष्ण’ हे शब्द म्हणजे तेच अविनाशी ईशतत्त्व. हे हृदयात जेवढं उतरेल तेवढं आपलं जीवन कसं होत गेलं पाहिजे? ६. ‘आत्मौपम्येन सर्वत्र..’ (६.३२: इतरांचंही सुखदु:ख स्वत:चंच वाटलं पाहिजे; आणि अशी अवस्था आली की ) ७. ‘प्रसादे सर्वदु:खानां..’ (२.६५ : कोणीही धर्मी/निधर्मी माणूस आयुष्यभर ज्याच्यामागे धावत असतो ती दु:खमुक्ती तत्क्षणीच प्राप्त! हाच हिदूंचा मोक्ष: हो, याची देही, याची डोळा!). मग भारताच्या ईश्वराचा या क्षणोक्षणीच्या अनंत कोटी सृष्टी व्यवहारांत (आक्रमणं, युद्धं, आर्थिक/सामाजिक विषमता-पिळवणूक, धर्मातरं इ.) भूमिका काय ? त्याचा काही संबंध, हेतू (डिझाइन) वगैरे ? शून्य! ‘मयाध्यक्षेण..
‘..हेतुनानेन कौन्तेय जग्द्विपरिवर्तते’ (९.१०) आणि ‘न कर्तुत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु:’ (५.१४).( बिचारे उदयनिधी! ) कसं करणार या ‘सनातना’चं निर्मूलन? बरं असं हे ‘सनातन’, कोणता ‘छुपा अजेंडा’ वगैरे यशस्वी होऊ नये म्हणून कोणा स्वयंघोषित ‘विश्वगुरू’कडून कुमक येण्याची जिवाच्या आकांतानं वाट पाहात असेल का? असेल तर ते ईश्वर-तत्त्व अविनाशी असेल का ?
हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : ‘नकोशीं’ना नवजीवन
आणि तरीही हे सारं ‘विषमतामूलक’? (असो बापडं! आमचं भांडण नाही: अगदी ‘अद्वेष्टा’चा अर्थ ‘द्वेषपूर्ण’ असाही कोणी केला तरीही! कारण भांडण आलं की एकत्व संपलं, धर्म संपला. (आणि वरील श्लोक हे प्रेम-समतेचे केवळ फसवे शब्द-बुडबुडे असतील तर निदान तीनएक हजार वर्षांपूर्वी तरी ते ‘कोणत्या मतदारसंघा’ला खूश करण्यासाठी गीता-उपनिषदकारांनी ते लिहिले असावेत बरं? असो.) खरं तर उलट जीवनाच्या सर्वागांतील समतेसाठी, केवळ भावूक नसलेला व अजून तरी विज्ञानविरोधी सिद्ध न झालेला असा, वरील अविनाशी चैतन्य तत्त्वापेक्षा अधिक भक्कम व चिरंतन असा आधार कोणी व कोणता बरं दिला आहे? विज्ञान उद्या अमूकतमूक प्रश्न सोडवणं शक्यच नाही असा दावा आम्ही विज्ञान-निरक्षर सामान्य धार्मिक करीत नाही पण त्याचबरोबर ‘विज्ञान प्रगती म्हणजे काय? तर एका अगम्यातून दुसरे अगम्य बाहेर काढणे!’ हे आईनस्टाईन यांचे तरी शब्द लक्षात ठेवणं शहाणपणाचं!
असो, ‘पण व्यवहारा’चं काय? प्रश्न १०० टक्के मान्य आणि त्यात दडलेलं उत्तरही! पण जगाच्या इतिहासाकडे नजर टाका. दोन हजार वर्षांत प्रभू येशूंचे लाखो अनुयायी अख्ख्या पृथ्वीतलावर पसरले व उभी आयुष्यं त्यांनी धर्मासाठी वेचली: मानवात किती क्षमाशीलता रुजली? मध्ययुगात तर ख्रिस्ती धर्मन्यायपीठ ही व्यवस्थाच बनून केवळ चर्चपेक्षा वेगळय़ा मतामुळे किती प्राण गेले? अगदी विसाव्या शतकातही मानवी इतिहासातील दोन्ही महायुद्धे ‘मला खिळे ठोकणाऱ्यांना क्षमा करा’ म्हणणाऱ्या महात्म्याच्या (व तेही सर्वात ‘प्रगत’ राष्ट्रांतील) अनुयायांतच झाली ना? गोऱ्या पश्चिमेत काळय़ा गुलामांच्या नशिबी कोणतं जीवन होतं? तसंच माणसांत बुद्धदेवांची करुणा किती रुजली? किती इस्लामपूर्व जुनाट अरबी रुढींना धर्म म्हणून मुस्लीम आजही कवटाळून आहेत? जगात प्रेषितांचा मुस्लीम-बंधुभाव (पॅलेस्टाईनला वाऱ्यावर सोडणं, दहा वर्षांचं इराण-इराक युद्ध), बुद्धदेवांची करुणा, महावीरांची अहिंसा किती रुजली आहे ? (प्रत्येक समूह अनंतांगी जीवनाच्या एकेका अंगात प्रचंड काम करतो व इतर अंगं मागास राहतात; उदा. इस्लाम- सामाजिक समता; ख्रिश्चनिटी- सेवा; भारतीय धर्म: अस्तित्वाच्या अर्थाचा ज्ञानमय मूलगामी शोध: ‘जीवनम् सत्य शोधनम्’ : विनोबा! ). ते सोडा; अगदी ताज्या साम्यवादी/समाजवादी व्यवस्था केवळ पाऊणशे वर्षांत का कोसळल्या? ‘..तेन त्यक्तेन भुंजिथा: मा गृध: कस्यस्विद् धनम्’ ( ईश उप. : भोग अटळ पण तो अनासक्त अंत:करणातून घ्या ! ) झाल्याशिवाय संचयाचा मोह कसा सुटणार? ‘स्टेटलेस’ सोसायटीचं स्वप्न ‘निथग बट स्टेट’ सोसायटीत परिवर्तित का झालं ? अगदी युगप्रवर्तक म्हणता येणाऱ्या गांधींच्या स्वप्नांतील ‘हिंद स्वराज’ जीवनशैली व्यक्तींत वा नैतिकता समाज-जीवनात कुठं किती दिसते? (तेही केवळ पन्नास पाऊणशे वर्षांच्या आतच! धर्माची आयुष्ये तर शेकडो वर्षांची झाली. या प्रदीर्घ काळात मानवी स्खलनशीलता आपलं काम न करते तरच नवल!) काय शिकतो आपण या इतिहासापासून? मानवी मन बदलण्याइतकी दुसरी कोणतीही गोष्ट अशक्यप्राय नाही. तसंच दुसऱ्या कोणाचा/कशाचाही द्वेष हा सुखी समाधानी समाज/राष्ट्र बांधण्याचा चिरस्थायी आधार होऊ शकत नाही. द्वेष, श्रेष्ठ-कनिष्ठ भाव आपलं अध:पतन सहजपणं करतात, धर्म हवा तो अत्यंत कष्टप्रद उन्नयनासाठी.
असो. या ‘सनातन’ विचाराकडे दुसऱ्या एका चष्म्यातून पाहू या. हिंदू इतिहासातील प्रचंड सामाजिक विषमतेच्या काळासहित एरवीही अफाट विविधता असलेला भारत, शेकडो वर्षांच्या परकीय परधर्मीय दास्यानंतरही, निदान एक राष्ट्र ( फाळणी झाली हेही न विसरता) तरी का होऊ शकला? धर्म, भाषा, वंश, जाती इत्यादी आधारे समूहासमूहांत जगभरच अनेक कारणांमुळं भांडणं, दुरावे, द्वेष तसंच सहकार्य, प्रेम इ. भावनाही असतातच हे वास्तव आहे. हृदयांत उतरणं सोडाच पण आम्हा सामान्य धार्मिकांना वरील ईश्वर केवळ बुद्धीनं पेलता तरीही आम्ही धर्मी/निधर्मीकडून भरकटवले जाण्याचा धोका कमी झाला असता (पण, अरेरे!)! मात्र समाजातले जाणतेच जर द्वेष-दुराव्याला खतपाणी घालू लागले तर विष-फळांचंच पीक आल्याशिवाय कसं बरं राहणार? समाज-वस्त्राच्या मनामनांतून उद्या किती चिंधडय़ा होतील? ज्या जगापुढे आम्ही रोज ‘एक पृथ्वी, एक कुटुंब’ची भाषा ओठावरून सतत करीत असतो तेच जग आपल्या राष्ट्र-कुटुंबांतर्गत व्यवहाराकडे पाहून काय म्हणत असेल?
पण हे सारे प्रश्न आपल्याला टोचतच नाहीत की, कोणत्या तरी सूड-संतापापोटी, तशी टोचणी लावणाऱ्या हृदयातल्या ईश्वरालाही ‘सध्या तरी धर्म वाचवण्यासाठी दडपणं गरजेचं आहे’ असं आम्हां धार्मिकांना वाटतंय ? पण आपल्याही मनात वरील अनुषंगानं एक प्रश्न जरूर उठत असेल : ज्या देशाचं जवळपास सलगपणं सहासातशें वर्षांचं परकीय परधर्मीय राजवटींतील दास्य संपण्याची कणभरही चिन्हं नव्हती अशाही काळात स्वामी विवेकानंद कोणाही विरुद्ध सूड-संतापाची भाषा न करता सातत्यानं ‘अद्वेष्टा सर्वभूतानां..’ चा गीता-उपदेश करून विश्वधर्माच्या गरजेची भाषा का करतात? भारतात ते भरपूर संताप जरूर व्यक्त करतात पण तो भयाण सामाजिक विषमता व सामान्य जनतेचं तेवढंच भयाण दारिद्रय़ या विरोधात ! गांधींचाही आशय तोच. यातून दोघेही धर्मरक्षण आणि समाजोन्नती यांचा कोणता मार्ग आपल्याला दाखवीत आहेत ? ‘हिंदू धर्माच्या सनातन सत्यानंच त्याला जिवंत ठेवलं आहे. आज तो जर्जर झाला असेल, पण एक दिवस असा उजाडेल की तो आपल्या अंगभूत सामर्थ्यांच्या तेजानं जगाला कधी नव्हे एवढं दिपवून टाकील’ – गांधी. आणि सतत जपावा असा स्वामी विवेकानंदांचा मंत्र : ‘सृष्टीच्या एकत्वाचं सनातन सत्य स्वसमर्थ आहे; मात्र भारत आपला हा धर्म सोडील तर जगातील कोणतीही शक्ती त्याला वाचवू शकणार नाही.’
आणि एवढय़ा महायुद्धाच्या अगदी मोक्याच्या क्षणीही भगवान श्रीकृष्ण काय सांगतात ? अर्जुना, अन्याय आहे तर युद्ध कर पण ‘तस्मात्सर्वेषु.. मामनुस्मर युध्य च’ (८.७ : कसं युद्ध?’ निरंतर माझ्या स्मरणात राहून! ‘ईश्वर-स्मरणात द्वेष-भावाला स्थान कुठून?). एक तर आपण धार्मिकांनी हे सारं ‘सनातन सत्य’ नाकारावं वा त्या ‘सनातना’च्या आरशात स्वत:च्या अंत:करणाला क्षणोक्षणी तपासत राहावं; तिसरा मार्ग नाही!
लेखक निवृत्त प्राध्यापक आणि विवेकानंद साहित्याचे अभ्यासक आहेत.
rajadesai13@yahoo.com