वर्ष २०२०-२१… कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांना सरकारने राजधानीच्या वेशीवरच रोखून होतं. रोज पुढे जाण्याचा प्रयत्न, सरकारशी वाटाघाटींच्या फेऱ्या, कधी अश्रुधूर तर कधी लाठीचार्ज… टिकरी बॉर्डरवर साधारण २५ ते ३० किलोमीटर परिसरात पसरलेल्या शेकडो ट्रॅक्टर्सच्या रांगांमध्ये रोज काहीतरी नवं घडत होतं. वृत्तपत्र आणि वाहिन्या ते जगापुढे मांडत होत्या, पण त्यांच्या दृष्टिकोनातून. कोणी त्यांना खलिस्तानी म्हणत होतं, कोणी नक्षलवादी, दहशतवादी ठरवत होतं. पिझ्झा खाणाऱ्या, जीन्स घालणाऱ्या, इंग्लिश बोलणाऱ्या, श्रीमंत शेतकऱ्यांचं, पेड प्रोटेस्टर्सचं आंदोलन म्हणून हेटाळणी केली जात होती. त्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी स्वतःचा मंच हवा होता. एवढ्या मोठ्या परिसरात जे काही घडतंय ते सर्वांपर्यंत पोहोचावं म्हणून काय करता येईल, याचा विचार काही तरुणांच्या डोक्यात सुरू होता. समाजमाध्यमांवर भरपूर माहिती उपलब्ध होती, पण आंदोलनात सहभागी झालेल्यांत वृद्ध शेतकऱ्याचं प्रमाण मोठं होतं. स्मार्टफोनशी त्यांचं काही जमत नसे. इंग्रजी, हिंदीचं ज्ञानही यथातथाच होतं. मग या तरुणांनी ठरवलं की एक वृत्तपत्र सुरू करायचं.
यात पुढाकार होता अजय पाल नट्ट आणि नवकिरण नट्ट या भावंडांचा. ही दोघं पंजाब फार्मर्स युनियनचे राज्य समिती सदस्य सुखदर्शन सिंग आणि जसबिर कौर नट्ट यांची मुलं. मुकेश कुलारीया, अमान बाली आणि अन्य काही हरहुन्नरी तरुणांची साथ त्यांना लाभली. यातलं कोणी मुक्तपत्रकार आहे, कोणी माहितीपटांसाठी काम करणारे फोटोग्राफर्स, व्हिडीओग्राफर, पटकथा लेखक कोणी फिजिओथेरपिस्ट तर कोणी डेंटिस्ट. त्यांचे व्यवसाय वेगवेगळे असले, तरीही सगळे मूळचे शेतकरीच. त्यामुळे ते हिरीरीने आंदोलनात सहभागी झाले होते. ब्रॉडशीटची चार पानं भरतील एवढा मजकूर गोळा करायचा, असं ठरलं आणि एक पाक्षिक सुरू झालं. नाव दिलं- ट्रॉली टाइम्स. ब्रीदवाक्य होतं- व्हॉइस ऑफ किसान प्रोटेस्ट…
हेही वाचा : लेख : न्यायपालिकेच्या बदनामीचे षड्यंत्र!
ट्रॅक्टर आणि त्याला जोडलेली ट्रॉली ही शेतकऱ्यांना अक्षरशः दहा हातांचं बळ देते. आंदोलनात हे ट्रॅक्टर आणि त्यांच्या ट्रॉली हे असंतोषाचं प्रतीक ठरलं होतं. ट्रॅक्टरमधूनच या नियतकालिकाच्या मजकुराचं संपादन होणारं होतं. छपाईही तिथेच होणार होती. ट्रॉली टाइम्स या नावामागे ही करणं होती.
१८ डिसेंबर २०२० रोजी पहिला अंक निघाला. अंक गुरुमुखी आणि हिंदी अशा दोन भाषांत होता. पंजाबपलीकडच्या शेतकऱ्यांनाही इथे काय चाललं आहे हे कळावं, सरकारपर्यंत हा आवाज पोहोचावा, म्हणून हिंदी मजकुरालही स्थान देण्यात आलं होतं. पहिल्या पानावर, संपादकीय आणि शेतकऱ्यांशी संबंधित लेख, महत्त्वाच्या घडामोडी आणि घोषणा, दुसऱ्या पानावर छायाचित्रं, तिसऱ्या पानावर शेतकरी आंदोलनाला देशाच्या विविध भागांतून आणि जगभरातून मिळणाऱ्या पाठिंब्याची वृत्तं आणि चौथ्या पानावर हलका-फुलका- गमतीदार मजकूर अशी साधारण रचना निश्चित करण्यात आली होती, पण ती अंकागणिक बदलत गेली.
हेही वाचा : टीकाकारांना हमीदर मागणाऱ्या शेतकऱ्यांइतकी समज कधी येणार?
दरवेळी एवढा मजकूर कुठून आणायचा हा प्रश्न सुरुवातीला होता. मात्र पहिल्या अंकात ईमेल आयडी प्रसिद्ध करून मजकूर पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आणि पहिल्याच दिवशी तब्बल बाराशे मेल आले. एक आव्हान दूर होतं न होतं तोच नवा प्रश्न निर्माण झाला. आंदोलनस्थळी इंटरनेट यथातथाच होतं. एवढे मेल्स तपासायचे कसे? आणखीही काही प्रश्न होते. अंक मोफत वाटला जाणार होता. छापण्यासाठी पैसे कुठून आणायचे? पण जुगाडू वृत्तीच्या या शेतकऱ्यांनी एकमेकांच्या मदतीने सर्व आव्हानांवर मात केली आणि अंक नियमित प्रकाशित होऊ लागले.
हे सर्व अंक ट्रॉली टाइम्सच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या अंकांच प्रथमदर्शनीच जाणवणारं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या पानावरची इलस्ट्रेशन्स. परमिता मुखर्जी, निधीन डोनाल्ड, ठुकराल अँड टागरा या आणि अशाच काही इलस्ट्रेटर्सनी शेतकऱ्यांच्या वेदना, त्यांचं जीवन, त्यांचा संघर्ष, सरकारविरोधातला रोष चित्रांतून जगापुढे मांडला.
५ जानेवारी २०२१ला प्रसिद्ध झालेल्या अंकात टिकरी बॉर्डरवर कुठे कोणत्या सोयीसुविधा मिळतील याचा नकाशा छापण्यात आला होता. त्यात जेवण, लाँड्री, लायब्ररी, औषधोपचार, पोलीस, निवारा, स्टेज, शौचालय, पिण्याचं पाणी कुठे आहे, हे दर्शवण्यात आलं होतं.
१९ जानेवारीच्या अंकात- किसान आत्महत्या से शमशान बने महाराष्ट्र से
उठती संघर्ष की आवाज- हा गिरीश फोंडे यांचा लेख आहे. २६ जानेवारीच्या अंकात पाहिलं पानभर संविधानाची प्रस्तावना छापण्यात आली आहे. हिंदी आणि गुरुमुखी दोन्ही आवृत्तींत ही प्रस्तावना आहे. २६ फेब्रुवारीच्या अंकात दक्षिण अमेरिकेतल्या शेतकऱ्यांच्या लढ्यावर आधारित लेख आहे. एक अंक आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कथा सांगतो.
हेही वाचा : अमली पदार्थांच्या व्यापाराला कुणाचा पाठिंबा?
प्रत्येक अंकात टिकरी बॉर्डरवरच्या घडामोडींची छायाचित्रं आणि वृत्तं आहेत. कविता, व्यंगचित्र, व्यंगचित्र मालिका, भित्तीचित्रांची छायाचित्रं यात आहेत. पंजाबातील आणि जगभरातील शेतकऱ्यांचा इतिहास सांगणारे काही लेखाही या अंकांत आढळतात.
१४ फेब्रुवारीच्या अंकातल्या पहिल्या पानावरच्या लेखात एक प्रश्न करण्यात आला आहे…
एक आदमी रोटी बेलता है
एक आदमी रोटी खाता है
एक तीसरा आदमी भी है
जो न रोटी बेलता है, न रोटी खाता है
वह सिर्फ़ रोटी से खेलता है
मैं पूछता हूँ – ‘यह तीसरा आदमी कौन है?’
मेरे देश की संसद मौन है।
-धुमिल
पहिल्या अंकाच्या दोन हजार प्रती छापून वाटण्यात आल्या. मिळालेला प्रतिसाद पाहून पुढे पाच आणि नंतर सात हजार प्रती छापल्या जाऊ लागल्या. जेमतेम अक्षरओळख असणारे वृद्ध शेतकरीही जमेल तेवढं वाचून, छायाचित्र पाहून काय काय घडलं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत. ज्यांना अजिबातच अक्षरओळख नव्हती ते इतरांना वाचून दाखवायला सांगत. बॉर्डरवरच्या चहापासून, लंगरपर्यंत, ट्रॉलीतल्या घरांपासून, त्यावर झळकणाऱ्या चित्रमय बॅनर्सपर्यंत आणि आंदोलनस्थळी रंगणाऱ्या कुस्तीच्या सामन्यांपासून रात्री ट्रॉली टॉकीजमध्ये लागणाऱ्या चित्रपटांपर्यंत सारं काही या वृत्तपत्रात प्रतिबिंबित होत असे. ट्रॉली टॉकीज हा सुद्धा ट्रॉली टाइम्सच्या संस्थापकांचाच उपक्रम होता. तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या हॉलमध्ये शेतकऱ्यांच्या आयुष्याशी संबंधित चित्रपट आणि माहितीपट दाखवले जात. द लेजेंड ऑफ भागात सिंग, पीपली लाईव्ह, पंजाब १९८४, चार साहिबजादे असे अनेक चित्रपट या टॉकीजमध्ये दाखवण्यात आले. याच टीमने एका ट्रॉलीमध्ये शहीद भगतसिंग वाचनालय सुद्धा सुरू केलं होतं.
हेही वाचा : ‘आरोग्य सेवा हक्क’ यंदा निवडणुकीचा मुद्दा
हे वृत्तपत्र केवळ टिकरी बोर्डरपुरतंच मर्यादित राहिलं नाही. त्यात सिंघु, गाझिपुर, पतियाळा, बिकानेर अशा विविध ठिकाणी होत असलेल्या आंदोलनातल्या घडामोडीही प्रसिद्ध होऊ लागल्या.
अंकाची पीडीएफ प्रत मिळवण्यासाठी क्यूआर कोड छापील अंकात दिलेला असे आणि बाजूला लिहिलेलं असे- यातील मजकूर कोणताही बदल न करता कोणीही पुनर्प्रकाशित करू शकतं. हे संयुक्त किसान मोर्चाचं अधिकृत वृत्तपत्र किंवा मुखपत्र नाही हे आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं.
ट्रॉली टाइम्सचे २२ अंक प्रसिद्ध झाले. शेवटचा अंक ९ डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध झाला.
आता पुन्हा एकदा आंदोलन सुरू झालं आहे. पण ट्रॉली टाइम्स पुन्हा सुरू झाल्याचं दिसत नाही. त्यांच्या संकेतस्थळावर आणि समाजमाध्यमी खात्यांवर त्याविषयी काहीही पोस्ट केलेलं दिसत नाही. पण २०२०-२१मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाचा हा अतिशय महत्त्वाचा दस्तावेज आहे, हे निश्चित
प्रत्येक लढ्याचं स्वतःचं म्हणून एक साहित्य असतं. मग तो स्वातंत्र्य, जातीनिर्मूलन वा स्त्रीमुक्तीसाठी प्रदीर्घ काळ चाललेला, इतिहासात नोंदवला गेलेला लढा असो वा शेतकरी आंदोलनासारखा तुलनेने कमी काळ केलेला संघर्ष असो. हे साहित्य इतिहासाचा अमूल्य ठेवा असतं. कोणत्याही सोयीसुविधा नसताना, बातमीदारी, संपादन, प्रकाशन, वितरणाचं अगदी नाममात्र ज्ञान असताना केवळ आपलं म्हणणं मांडण्यासाठी अल्पकाळ का असेना, पण प्रसिद्ध झालेलं हे नियतकालिक शेतकऱ्यांच्या संघर्षाचा दस्तावेज आहे. सरकारसारख्या अवाढव्य यांत्रणेपुढेही न झुकलेल्या निर्धाराचं प्रतीक आहे.
हेही वाचा : भारताची गुलजार संकल्पना…
यापैकीच एका अंकात कुठेतरी आतल्या पानांत छापलेली कविता शेतकऱ्यांचा असंतोष शब्दबद्ध करते…
तेरे व्यापार का विज्ञापन नहीं हूँ मैं
तेरे झूठ का दुष्प्रचार नहीं हूँ
तमीज़ से पेश आ, तेरा दरबार नहीं हूँ।
मैं कोलाहल नहीं हूँ, हाहाकार नहीं हूँ
मैं युद्ध की शंखध्वनि हूँ, डर जा
मैं फ़तह का ऐलान हूँ, अख़बार नहीं हूँ।
सुरमीत मावी
vijaya.jangle@expressindia.com