प्रश्नः दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनामध्ये तुम्ही तमाशा आणि वारी या विषयांवर तुमच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले, त्यामागील कारण काय?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
संदेश भंडारेः तमाशा आणि वारीबद्दल मध्यमवर्ग सांगीव माहितीवर बोलतो, त्यांच्या मनातील तमाशा ३०-४० वर्षांपूर्वीचा आहे. लावणी म्हणजे तमाशा असा समज आहे. बाजारू नृत्य म्हणजे तमाशा असे लोकांना वाटते. महाराष्ट्राचा तमाशा अभिमानास्पद आहे, तो बाजारू नाही, तो नेमका काय आहे, हे मी माझ्या छायाचित्रांमधून दाखवण्याचा प्रयत्न करतो. दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रदर्शन भरवण्यामागे मुख्य हेतू हाच होता. छायाचित्रांचा प्रभाव लोकांवर पडतो. त्यानिमित्ताने तमाशा आणि वारीवरील पुस्तकेही लोक वाचतात.
प्रश्नः संमेलनाला भेट देणाऱ्या मराठी-अमराठी भाषकांकडून कसा प्रतिसाद मिळाला?
संदेश भंडारेः इथे भेट देणाऱ्या दिल्लीतील मराठी माणसांमध्ये बहुतांश जवाहरलाल नेहरू विद्यापीठ व दिल्ली विद्यापीठातील होते. ‘जेएनयू’तील मराठी विद्यार्थी अमराठी विद्यार्थ्यांना हिंदीतून तमाशा आणि वारी म्हणजे काय हे समजावून सांगताना दिसले. सिनेमामधून लोकांनी तमाशा पाहिलेला असतो. त्यामुळे तमाशा म्हणजे काय याबद्दल त्यांच्या डोक्यात वेगळ्या कल्पना असतात. हा प्रश्न महाराष्ट्रात जसा आहे, तसाच महाराष्ट्राबाहेरही. इथे आलेल्या लोकांमध्ये हे प्रदर्शन बघून तमाशा-वारीबद्दल उत्सुकता वाढली. मी तीन दिवस दुपारचे जेवण साडेतीन-चार वाजता घेत होतो. लोक माझ्याशी उत्साहाने भरभरून बोलले. दिल्लीत अनेक वर्षे राहिलेल्या मराठी माणसांना आपल्या परंपरेशी जोडल्यासारखे वाटले.
प्रश्नः तरुण-तरुणींनी मोबाइलवर शूटिंग केले, काहींनी तुमच्याबरोबर संवाद साधला. हा सगळा अनुभव कसा होता?
संदेश भंडारेः तमाशा ही अभिमानाने सांगावी अशी महाराष्ट्रातील लोककला आहे, त्याबद्दल मला जशी २० वर्षांपूर्वी उत्सुकता होती तशीच आजच्या तरुण पिढीला आहे असे दिसले. म्हणून मी त्यांच्याशी आस्थेने बोललो. लेखक बालाजी सुतार यांच्याबरोबर एक व्यक्ती आली होती. ती म्हणाली की, ‘काल मी इथे आलो होतो आणि बाहेरूनच बघून गेलो. पण, आता ही छायाचित्रे बघितल्यावर हे सगळे खूप प्रभावित करणारे आहे असे जाणवले!’ काही लोक तमाशा-वारीकडे योग्य नजरेने बघत नाहीत. हे प्रदर्शन बघितल्यावर त्यांचा दृष्टिकोन बदलत असेल तर चांगलेच.
प्रश्नः एकाने तर शूटिंग करताना, तुम्हालाही बाजूला व्हा, असे सांगितले…
संदेश भंडारेः मी शूटिंग करणाऱ्यांना वा छायाछित्रे काढणाऱ्यांना अडवत नाही, त्यांनी ती छायाचित्रे वापरली तरी चालतील. त्यानिमित्ताने प्रचार-प्रसार होतो असे मी मानतो. आपण गप्पा मारत असताना एक तरुण प्रदर्शनाचे शूटिंग करत होता, तो त्यात गुंतलेला होता, प्रदर्शन त्याला महत्त्वाचे वाटत होते, आपल्या आवाजाचा त्याला त्रास होत होता. म्हणून त्याने आपल्याला, तुम्ही जरा बाजूला होता का, असे विचारले. असे प्रसंग उत्साह वाढवणारे असतात. भारती विद्यापीठातील विद्यार्थी आले होते. इथे अशोक विद्यापीठात शिकणारे यवतमाळमधील विद्यार्थीही आले. काही पंजाबी, एक केरळी व्यक्तीही मला भेटून गेली.
प्रश्नः इथे घडलेला एक प्रसंग तुम्ही अत्यंत परिपक्वपणे हाताळला पाहिला. नेमके काय झाले होते?
संदेश भंडारेः जातीभेदाचे वास्तव आणि गावकुसाबाहेर ठेवलेल्या लोकांना दिलेली अपमानास्पद वागणूक, अस्पृश्यता याबाबत छायाचित्रांमधून झालेला उल्लेख जेव्हा सनातनी विचारांच्या लोकांना इथे दिसतो, तेव्हा त्यांना राग येतो. हाच राग प्रदर्शन पाहायला आलेल्या त्या व्यक्तीच्या मनात होता. छायाचित्रांची माहिती देण्यासाठी अनुवादित माहितीपत्रके लावण्यात आली आहेत. त्यातील भाषांतरावर त्याने आक्षेप घेतला होता. पण, प्रत्यक्ष त्याचा राग सनातनी विचारांविरोधात केलेली मांडणी हाच होता. या सनातनी विचारांच्या लोकांचा राग नेहमी उफाळून येत असतो. प्रत्येकाचे राजकारण असते. त्याचेही होते. त्याला वाटत होते की, मी चुकीच्या समाजवास्तवाची मांडणी करत आहे. पण, कलेच्या प्रदर्शनातून माझेही राजकारण आहे. समाजातील दबलेल्या लोकांना तुम्ही किंमत दिलेली नाही. तमाशा कलाकारांनाही तुम्ही वाईट वागवले आहे, ते मात्र समाजाच्या भल्याचा विचार करत आहेत. हा विचार मी प्रदर्शनातून सांगतो. मला सांगायचे ते मी सांगणारच. ते सांगत असताना माझी भाषा सौम्य ठेवली पाहिजे याची दक्षता घेतो. लोकांना बदलायचे आहे, त्यांना पटवून दिले पाहिजे. वारीमध्ये भेदाभेद मिटतो, हे लोकांना समजावून सांगितले पाहिजे.
प्रश्नः तुम्ही हे प्रदर्शन २० वर्षे सातत्याने का भरवत आहात?
संदेश भंडारेः मी २००६-०७ मध्ये तमाशा आणि वारीवरील ही छायाचित्रे काढली होती, पुस्तके प्रकाशित केली होती. मग, आज २० वर्षांनंतरही या छायाचित्रांचे प्रदर्शन मी भरवत आहे. मला वाटते की, आज त्याची अधिक गरज निर्माण झालेली आहे. लखनऊमध्ये अटल नावाच्या सभागृहात भोजपुरी गायिकेचा सत्कार झाला. तिथे तिने ईश्वर अल्ला तेरो नाम… असे गायल्यावर तिला लोकांनी जाहीर माफी मागायला लावली. आपल्यातील सहिष्णुता संपली का, असा प्रश्न विचारावा असा हा प्रसंग होता. तिला माफी मागायची इच्छा नव्हती पण, चांगला कार्यक्रम उधळला जाऊ नये म्हणून तिने माफी मागितली. अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. दाभोळकर, पानसरे यांची हत्या का झाली? साहित्यिकांना संरक्षणात जगावे लागते ही चांगली गोष्ट आहे का?… सनातनी विचारांच्या लोकांना सामोरे गेले पाहिजे, मी मैदान सोडणार नाही. मैदानात उभे राहू असे म्हणताना मला कुस्ती अपेक्षित नाही, मला संवाद साधायचा आहे. हा संवाद आत्ता हरवलेला आहे.
प्रश्नः ‘दक्षिणायन’मध्ये तुम्ही गणेश देवींबरोबर काम केले, तेव्हा सनातनी विचारांच्या लोकांना सामोरे कसे जायचे हे शिकलो असे तुम्ही म्हणालात…
संदेश भंडारेः लोकांच्या सद्सद्विचारांना हात घातला पाहिजे या विचारातून ‘दक्षिणायन चळवळ’ सुरू केली होती. मतदानातून लोकांचा विचार बदलेल असे नव्हे. काही जुन्या समाजवादी विचारांच्या लोकांनी मला सांगितले की, तमाशा आणि वारीच्या छायाचित्रांमधून तुम्ही जे समाजसुधाराचे काम केले, ते आम्हालाही करता आले नाही. माझ्या या दोन्ही विषयांवरील पुस्तकामध्ये विठ्ठलाचे छायाचित्र नाही. तमाशा आणि वारीमधील सामान्य लोकांचे जगणे त्यामध्ये आलेले आहे. आपल्या विचारांना विरोध करणाऱ्या लोकांशी संवाद साधूनच पुढे जावे लागेल. हे गणेश देवींकडून शिकलो. २०१४ नंतर अनेक बदल झाले आहेत, त्यामुळे आपल्याला जमिनीवर उतरून काम करावे लागेल.
प्रश्नः २०१४ नंतर काय बदलले?
संदेश भंडारेः ‘एफटीआयआय’ असो वा अन्य संस्था असोत. तिथे सादर होणाऱ्या कलांना कसा विरोध केला जातो, हे आपण पाहिलेले आहे. मी त्यावर लेख लिहिलेला होता, त्याचे शीर्षक होते ‘आज ते आहेत, उद्या तुम्ही असाल!’. माणसे शिकली की प्रश्न विचारतात म्हणून ‘त्यांना’ ‘जेएनयू’ नको, त्यांना ‘एफटीआयआय’ नको. या विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती ‘त्यांच्या’ मुळावर घाव घालते. ही गोष्ट ‘त्यांना’ दोन हजार वर्षांपूर्वीपासून माहीत आहे. त्यामुळे ते संस्था मोडून काढत आहेत.
प्रश्नः सनातनी विचारांचे पक्ष, संस्था-संघटना म्हणतात की, आम्ही बहुजनांचा विकास करत आहोत. ही विसंगती कोणाला दिसत नाही का?
संदेश भंडारेः ते बोलतात पण, तसे वागत नाहीत. आता बहुजन समाजातील तरुण-तरुणी ‘एमपीएससी’ची परीक्षा देत आहेत, त्यासाठी वयाची मर्यादा वाढवली आहे. त्यातून त्यांना संधी दिली जात असल्याचे दिसेल पण, त्यांना कायमस्वरुपी विद्यार्थी करून ठेवले जात आहे. ‘सुशिक्षित बेरोजगार’मध्ये त्यांची गणना होत नाही. ते बेरोजगार आहेत हे कळेपर्यंत त्यांचे निम्मे आयुष्य संपलेले असेल. ते बेरोजगार आहेत हे त्यांना कोणी सांगतच नाही. सनातनी विचारांचे लोक खूप चलाख आहेत. २०२४ची लोकसभा निवडणूक संविधान वाचवा या मुद्द्यावर झाली. महाराष्ट्रात त्यांचा पराभव झाला पण, आता आम्हीच संविधान वाचवतो, असे सांगणाऱ्या जाहिराती ते देत आहेत.
प्रश्नः पूर्वी सांस्कृतिक क्षेत्रातील पुरोगामी विचारांच्या दिग्गजांनी बंडखोरी केली होती, त्यांच्या पाठीशी लोक उभे राहिले होते. आज ही पुरोगामी मंडळी गप्प का आहेत?
संदेश भंडारेः खरेतर आज या मंडळींनी लोकांचे नेतृत्व केले पाहिजे. ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाविरोधात आंदोलन झाले तेव्हा विजय तेंडुलकर वगैरे साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज मंडळी खंबीरपणे विरोध झेलत होती. आता पुन्हा रस्त्यावर उतरण्याची गरज असताना पुरोगामी मंडळी शेपूट घालून बसलेली आहेत.
प्रश्नः मराठी माणसे स्वतःला पुरोगामी म्हणवतात पण, असा महाराष्ट्र सनातनी विचारांच्या पक्षांना खूप मोठ्या मतांनी निवडून देतो. असे का घडते?
संदेश भंडारेः पुरोगामी विचारांच्या माणसांनी आपण काय करत आहोत, याचा विचार केला पाहिजे. अहंभावात ते अडकून पडले आहेत का? लोकांशी संवाद साधण्यात काही तरी चुकत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. केवळ फेसबुकवर पोस्ट लिहून काही होणार नाही. आम्ही लिहितो पण, लोक ऐकत नाहीत, त्यांनी माती खाल्ली असे म्हणणे योग्य नाही. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, त्यांना समजून सांगत नाही म्हणून त्यांनी माती खाल्ली असे म्हणता येईल. लोकांचे चुकलेले नाही, तुम्ही कमी पडत आहात. लोकांना दोष देऊन काही उपयोग होणार नाही. संसदेच्या बाहेरही राजकारण होत असते, त्यामध्ये महाराष्ट्र एकेकाळी खूप पुढे होता. पूर्वी सेवादल सशक्त होते, कम्युनिस्ट पक्षाकडे ताकद होती. ही मंडळी लोकांच्या प्रश्नावर थेट भिडत होती. आता कोणी फारसे तसे करताना दिसत नाही.
प्रश्नः तुम्ही जो विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात, त्याचे संस्थात्मक स्वरूप असले पाहिजे असे वाटते का?
संदेश भंडारेः मी तमाशा आणि वारीची छायाचित्रे काढली आहेत. त्यांचे मी प्रदर्शन भरवत असतो. त्याला संस्थात्मक रूप आले पाहिजे. सनातनी विचारांच्या मंडळींच्या हाती कधीही तमाशा, वारी जाणार नाही. तमाशा, वारीतील मंडळींना कोण आपला हे चांगले कळते. त्यांच्या कळण्याचा आपण परिवर्तनासाठी उपयोग करून घेतला पाहिजे. संस्थात्मक काम उभे करायचे आहे कारण मी या सगळ्याकडे चळवळ म्हणून पाहतो. पंढरपूरपासून १६ किमीवर चिंचणी या वारीच्या वाटेवरील गावाने सार्वजनिक मालकीची जमीन संग्रहालयासाठी दिली आहे. तिथे आम्ही ‘आत्मभान कलादालन’ उभे करत आहोत.
(मुलाखतः महेश सरलष्कर)