– के. चंद्रकांत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीत पार पडलेल्या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून डॉ. तारा भवाळकर यांनी केलेले भाषण भरपूर गाजले. त्या भाषणाची ‘अनकट’ ध्वनिचित्रमुद्रणे ‘व्हायरल’ झाली, तर काहींनी संमेलनाध्यक्षांच्या छापील भाषणाची ७० पानी पुस्तिका ‘पीडीएफ’ स्वरूपात एकमेकांना पाठवली. ‘अनेक वर्षांनंतर असे भाषण झाले’ असे भारावलेले उद्गारही बऱ्याच जणांकडून आले… पण डाॅ. भवाळकर यांचे मराठी भाषेविषयीचे म्हणणे आपण नीट ऐकले/ वाचले का? असेल समजा, तरी त्यामुळे आपल्यात काही फरक पडणार आहे का, असा प्रश्न ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करत असताना तरी पडतो, पडायला हवा. हा प्रश्न वाटतो तितका साधा नाही, हे कळण्यासाठी त्या काय म्हणाल्या, याकडे पुन्हा पाहाणे इथे आवश्यक आहे.

त्या म्हणाल्या :

‘मराठी भाषेला अभिजात म्हणून शासन मान्यता मिळाली याचा सर्व मराठी भाषिकांप्रमाणे मलाही आनंद झाला. शासकीय दर्जा मिळाल्याने काही आर्थिक लाभ महाराष्ट्राला, मराठी लेखक, कवी, संशोधक आणि महाराष्ट्रातील साहित्यिक उपक्रम राबवणाऱ्या संस्थांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठी संस्थात्मक पातळीवर, विद्यापीठीय पातळीवर भरीव कार्य करेल आणि करावे अशी अपेक्षा आहेच. त्याची किती पूर्तता होते हे येणारा काळ ठरवील. अर्थात त्यासाठी मराठी जनांची सर्वतोपरी प्रयत्न करण्याची तयारी पाहिजे आणि ती अपेक्षा आहे. ही अपेक्षा बाळगत असताना काही धोक्याचे लाल बावटेही समोर फडकत आहेत. भाषा आणि संस्कृती या सजीव संस्था आहेत. भाषेचे चलन जोपर्यंत समाजात सर्वसामान्य माणसांच्या व्यवहारात, आचरणात ज्याप्रमाणात असेल त्याप्रमाणात भाषा विकासाची शक्यता असते. ”

हे वाचताना थोडे थांबून विचार करू – आपल्या भाषेच्या ‘सजीव संस्थे’चे नेमके काय झालेले आहे? याची जाणीव डॉ. भवाळकर यांना पुरेपूर आहे, असे या पुढल्या परिच्छेदातून लक्षात येईल : “भाषेद्वारा सांस्कृतिक अभिव्यक्ती होत असते, अर्थात मराठी संस्कृतीचे भवितव्यही भाषिक चलनी बांधलेले आहे. आता सामाजिक क्षेत्रात आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रात सजगपणे दीर्घकाळ वावरणारी एक भारतीय व्यक्ती म्हणून मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल मला साधार साशंकता वाटते. जो समाज उच्च शिक्षित, आर्थिकदृष्ट्या काहीसा स्थिरस्थावर झालेला असतो, अशी ज्याची आकांक्षा सर्व स्तरावर जागतिकतेशी स्पर्धा करण्याची असते, तो अभिजनांचा एक महत्त्वाचा स्तर आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, यंत्रयुगोत्तर काळामध्ये आणि विशेषतः आता तंत्र वैज्ञानिक युगाच्या काळामध्ये त्यांची संख्या चढती वाढती आहे. अशा काळात सर्वसामान्यांच्या मराठीचे काय होणार अशी शंका मनाला साधार भेडसावते आहे.”

ज्या तंत्रवैज्ञानिक युगाच्या काळाबद्दल त्या बोलत आहेत, त्या आजच्या काळातही फेसबुकवरून एकमेकांशी मराठीत चांगले वाद झडत असतात, त्यापैकी काही वाद तर मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांबद्दलचेही असतात, हे खरे… पण ही समाजमाध्यमे वापरण्याची आपली एकंदर संस्कृती काय आहे? बहुतेक तरुण आता ‘इन्स्टाग्राम’सारख्या अधिक सोप्या – पण भाषेचा आणि शब्दांचा फारसा संबंधच नसणाऱ्या- समाजमाध्यमाकडे वळले आहेत. ‘रील्स’ पाहाण्यात त्यांना धन्यता वाटते. व्हॉट्सॲपवर कुणीतरी धाडलेले तयार संदेश ‘फॉरवर्ड’ करण्याकडे आबालवृद्धांचा कल दिसतोच आणि व्हॉटसॲपच्या ‘स्टेटस’चा वापर जरी प्रामुख्याने स्वत:च्या छायाचित्रांसाठी – पर्यायाने स्वत: निर्माण केलेल्या ‘कंटेंट’साठी होत असला, तरी हा कंटेंट असतो काय? तर ‘मी कायकाय केले/ कोणते कपडे घातले’ एवढ्याच स्वरूपाचा. फेटे बांधून किंवा नऊवारी/ धोतर यांमधले फोटो ‘स्टेटस’ला ठेवून मराठी भाषा गौरव दिन साजरा करणारेही दिसतीलच. हेच फेसबुकवरही दिसेल. यात मराठी भाषेचा संबंध नाही, पण संस्कृतीचा आहे असा युक्तिवाद केला जाईल, तो वादासाठीसुद्धा मान्य करता येणार नाही, कारण संस्कृती अशी एखाद्या दिवसापुरती, सणावारी दाखवण्याची गोष्ट आहे ही आपली समजूतच मुळात घोर चुकीची आहे. आपण फेसबुक किंवा व्हॉट्सॲप किंवा इन्स्टावर ‘अकाउंट ओपन’ करणं, मग ‘लॉगइन’ करणं, ‘ॲप’वर या गोष्टी वारंवार न करता पटकन ताजे ‘मेसेजेस’ दिसणं, हेही आता इतरांप्रमाणे आपल्या संस्कृतीतलं झालंय. त्यासाठी समजा त्या समाजमाध्यम पुरवठादारानं ‘नवीन खाते उघडा’, ‘नवे संदेश’ वगैरे मराठी शब्द वापरले तरी ते कृत्रिम वाटतात. इंग्रजी नीट येत नसणाऱ्यांनासुद्धा निव्वळ सवयीनं मोबाइल हाताळता येतो. म्हणजे इथंही भाषेचा संबंध येत नाही. मग ‘कुणी लिहिलंय माहीत नाही पण छान लिहिलंय, वाचा जरूर…’ अशा प्रकारचे लांबलचक, गोष्टवजा मराठी संदेश हा व्हॉट्सॲपवर सर्वाधिक वाचला जाणारा भाग असतो. फेसबुकवर खरोखरच मराठीत गांभीर्यानं चर्चा करणारे काहीजण आहेत, पण त्यांची संख्या मर्यादितच राहाते. समाजमाध्यमांच्या आधीही ‘मायबोली’, ‘मिसळपाव’ असे मराठी चर्चा-समूह होते, आजदेखील ‘ऐसी अक्षरे…’ हा समूह सुरू आहेच. पण तिथल्या चर्चा वाचणारे कमी, करणारे त्याहून कमी.

एकंदर, संगणक आणि मोबाइल ही जरी मराठीच्या दैनंदिन वापराची साधनं ठरली असली तरी त्या साधनांमधून होणाऱ्या भाषिक देवाणघेवाणीचा संबंध आमच्या भाषाप्रेमाशी कमी आणि आमच्यावर लादल्या गेलेल्या अल्गोरिदमशी अधिक आहे. या लादलेल्या अल्गोरिदमला आम्ही थोपवणार कसं ? ( आणि हो, ‘लादलं गेलं’ असं मराठीत म्हणण्याऐवजी ‘थोपलं’ असा एक हिंदीमराठी संकरित शब्द हल्ली समानार्थी म्हणून वापरला जातो; पण अजून तरी आम्हा बऱ्याच जणांना ‘थोपवणं, थोपवून धरणं’ याचा मराठी अर्थ रोखणं किंवा प्रतिकार करणं असा होतो, हे माहीत आहे)

एरवीही माणसं आपल्या सोयीच्याच समूहात, कळपात, कंपूत राहातात. हे पूर्वापार सुरू आहेच. फक्त मराठीभाषक नाही तर अन्य भाषासमूहांतलीही माणसं अधिकाधिक आपल्यासारखा कळप शोधत असणारच. मराठी साहित्याबद्दलही आदल्या पिढ्यांनी ‘कंपूशाही’ हा शब्द भरपूर वेळा वापरलेला दिसतो. पण आज आम्ही याहीपुढे गेलो आहोत. जिथं अभिव्यक्तीच्या आणि मुक्त संवादाच्या शक्यता आहेत असं वाटलं होतं, तिथंही अल्गोरिदमच्या कृपेनं (आणि आम्ही केवळ ‘उपभोक्ता’ एवढ्याच भूमिकेत असल्यानं) डबकीच तयार झालेली आहेत. ही डबकी आम्ही जेव्हा सोडू, तेव्हा ‘दहा रुपयांची कोथिंबीर दे’ किंवा ‘स्टेशनला सोडणार का’ यापेक्षा निराळ्या आशयाच्या मराठीला दैनंदिन बहर येत राहील. पण डबकं सोडायचं कसं!