सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून दिल्लीत उभारण्यात आलेल्या संघाच्या नव्या, सुसज्ज वास्तूची सध्या चर्चा सुरू आहे. एकेकाळी मालमत्ता निर्माण करायला विरोध करणाऱ्या संघापासून ते आज मालमत्तादार होण्यापर्यंतच्या संघाच्या वळणदार प्रवासाचा यानिमित्ताने आढावा ही घटना तशी जुनी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी असतानाची. तेव्हा संघाचा कार्यविस्तार संथगतीने का होईना पण अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने होत होता. कार्याचा व्याप जसा वाढायला लागला तशी आणखी जागा हवी, इमारती हव्यात अशी मागणी स्वयंसेवकांकडून समोर यायला लागली. हळूहळू या मागणीने व्यापक स्वरूप धारण केले. शेवटी काहींनी धाडस करून गुरुजींसमोर हा विषय छेडला. ते काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते. त्यांनीही फार वेळ लावला नाही व सर्वांना सांगून टाकले. ‘संघाला स्थावर संपत्ती निर्माण करण्यात रस नाही. जमिनी, त्यावर इमारती बांधण्यापेक्षा कार्यकर्त्यांची, म्हणजेच स्वयंसेवकांची बांधणी अधिक जोमाने करा, त्यातच संघाचे भवितव्य दडले आहे. संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाने स्वत: राष्ट्राला अर्पण केलेले असते. राष्ट्र हीच आपली संपत्ती मग इतर गोष्टींचा मोह कशाला? संघाला जी काही गुरुदक्षिणा मिळते त्यात साऱ्यांनी भागवायचे, उगीच संपत्ती निर्मितीचा ध्यास नको’. हे उत्तर ऐकून सारेच गप्प झाले.

गोळवलकर ३३ वर्षे या पदावर होते. त्या काळात मालमत्ता हा विषय जणू वर्ज्य राहिला. याच्या आधीची एक घटना. संघाचे पहिले सरसंघचालक हेडगेवारांच्या कार्यकाळातली. आता संघाचे मुख्यालय ज्या रेशीमबागेत आहे ती जागा खासगी मालकीची होती. संघाची ती विकत घेण्याची ऐपत तेव्हा नव्हती. मग एके दिवशी हेडगेवार संबंधित मालकाच्या घरी गेले. एक हजार रुपये त्याच्या हातात ठेवले. ‘ही जागा आम्हालाच विका असा आग्रह नाही, पण जेव्हा केव्हा विकण्याचा विषय तुमच्या डोक्यात येईल त्या दिवशी आमचा विचार जरूर करा. आम्ही खरेदीखत वगैरे काही करणार नाही. तुमचा विचार पक्का झाला की भगव्या ध्वजासमोर येऊन दान दिली एवढे जाहीर करा, बस झाले’. काही काळानंतर नेमके तसेच घडले व रेशीमबागेची जमीन संघाच्या ताब्यात आली. हेडगेवारांच्या काळात संघाच्या मालकीची पण सार्वजनिक संपत्ती निर्माण करण्याला विरोध नव्हता पण फारसे प्रोत्साहनही नव्हते. ज्याला कुणाला जे काही दान करायचे असेल ते त्याने गुरुदक्षिणा म्हणून द्यावे हीच पद्धत तेव्हा होती. तात्पर्य हेच की संघाजवळ स्वत:ची मालमत्ता हवी की नको, हवी असेल तर ती किती प्रमाणात हवी यावरून हेडगेवार व गोळवलकर यांची भूमिका भिन्न होती.

गोळवलकर गेले व देवरस आले. त्यांच्या कार्यकाळात संघाचे मुख्यालय उभे राहिले होते. त्यातील सरसंघचालकांची खोली वातानुकूलित असावी असा आग्रह काही स्वयंसेवकांनी धरला. अर्थात देवरसांनी त्याला विरोध केला. काही काळ यावरून चर्चेचे भिजत घोंगडे सुरू राहिले व नंतर ही खोली वातानुकूलित झाली ती कायमची. ही तीन उदाहरणे आता उद्धृृत करण्याचे कारण दिल्लीत उभारण्यात आलेली संघाची नवी व सुसज्ज वास्तू. सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या वास्तूची सध्या माध्यमांत जोरदार चर्चा सुरू आहे. देशात भाजपची सर्वंकष सत्ता स्थापन करण्यात मोठा हातभार लावणारा संघ केवळ देशच नाही तर जगभरातील प्रभावशाली संघटना म्हणून सध्या ओळखला जातो. संघाच्या कार्याविषयी अनेक वादप्रवाद असले व तो कायम विरोधकांच्या निशाण्यावर राहात असला तरी संघाने समाजात एक अढळ स्थान निर्माण केले हे निर्विवाद सत्य. ते एकदा समजून घेतले की संघाच्या मालमत्ताविषयक प्रगतीकडे डोळसपणे बघता येते.

गोळवलकरांच्या नंतर संघाचा व त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या विविध संघटनांचा विस्तार जसाजसा वेगाने होत गेला, तशी या संस्थांना मालमत्तांची निकड भासू लागली. त्यातून आकाराला आली ती विश्वस्त ही संकल्पना. आजच्या घडीला या संस्थांच्या देशभरात एक लाखाहून अधिक मालमत्ता आहेत. यात जमीन, इमारती व इतर गोष्टी आल्या. त्यातील प्रत्येकाचा कारभार विश्वस्तांच्या माध्यमातून संचालित केला जातो. यातील प्रत्येकाची नोंदणी वेगळी. त्यावर कार्यरत असलेले लोक स्थानिक पातळीवर सक्रिय असणारे. सुसज्ज सभागृहे, ग्रंथालये, कार्यालयीन कामकाजासाठी जागा असे यातील प्रत्येकाचे स्वरूप. या मालमत्तांचे संचालन करताना पारदर्शीपणा पाळला जाईल याची दक्षता घेतली जाते. त्यावर संघवर्तुळातील अनेकांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे फसवणूक झाली, गैरव्यवहार केला, विश्वस्तांमध्ये आपसात वाद निर्माण झाला अशा बातम्या कधी समोर येत नाहीत. संघ नोंदणीकृत नाही पण संघाची ठिकठिकाणची कार्यालये ज्या इमारतीत आहेत त्या मात्र नोंदणीकृत संस्थांच्या नावे आहेत.

देशात भाजपची सत्ता आल्यावर संघाच्या अनेक मालमत्तांचा कायापालट झाला. नव्या इमारती उभ्या राहिल्या. जुन्यांचे आधुनिकीकरण झाले. या सुबत्तेमुळे संघाचे वैशिष्ट्य असलेला साधेपणा संपुष्टात आला पण वैचारिकता मात्र अजूनही कायम आहे असा दावा संघाचे अभ्यासक दिलीप देवधर करतात. ही सुबत्ता फायद्याची की तोट्याची हा भविष्यात संघाला भेडसावणारा मोठा प्रश्न. त्याचे उत्तर येणाऱ्या काळात मिळेल. मात्र एक बदल सर्वांनाच जाणवू लागला तो म्हणजे मोकळेपणा हरवत चालल्याचा. आधी सरसंघचालकापासून कुणाही वरिष्ठाला सहज भेटणे व संवाद साधणे सामान्य स्वयंसेवकाला शक्य होते. आता सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याने संवादावर मर्यादा आली. आधी संघाचा स्वयंसेवक असो वा प्रचारक. त्यांच्या फिरस्तीतील साधेपणाची चर्चा व्हायची. एक वळकटी, पत्र्याची पेटी व सामान्य वर्गाचा प्रवास करत देशभरात कुठेही जाणारे कार्यकर्ते लक्ष वेधून घ्यायचे. आता यात आमूलाग्र बदल झाला आहे.

वरिष्ठ स्तरावरचे पदाधिकारी विमानाने फिरतात. ते जिथे कुठे जातील तिथे त्यांची व्यवस्था सुसज्जपणे कशी होईल याकडे अगत्याने लक्ष दिले जाते. ते स्थळ एखादे मोठे हॉटेल नसावे याची काळजी तेवढी घेतली जाते एवढीच काय ती दक्षता पाळली जाते. सुबत्तेतून आलेल्या पंचतारांकितपणाच्या या मोहाला संघाचे निष्ठावान सेवक कधीच बळी पडणार नाहीत असा दावा केला जातो. तो दीर्घकाळ टिकेल का? जे संघटित होतात ते काही काळानंतर विस्कळीतसुद्धा होतात हा अनुभव अनेक संघटनांना आलेला. संघाच्या बाबतीत गेल्या १०० वर्षांत तरी असे घडलेले नाही. दात्यांच्या सढळ हातामुळे आलेली सुबत्ता ही अलीकडच्या दहा वर्षांतली. त्याआधीच्या ९० वर्षांतसुद्धा संघ अनेक अडचणींना तोंड देत व विरोधाचे धक्के पचवत अधिकाधिक संघटित होत गेला.

सुबत्तेच्या काळात विस्कळीत होण्याचा धोका मोठा असतो पण त्यावर आतापर्यंत तरी संघाने मात केलेली दिसते. भविष्यकाळातही हे संघटितपण असेच कायम राहील का? या शतकी काळात संघाचे अनेक स्वयंसेवक अनुत्तीर्ण झाले. मात्र ते बाहेर जाऊन. संघाच्या वर्तुळात राहून अनुत्तीर्ण होण्याच्या घटना जवळजवळ नाहीतच. संघात असलेली एकचालकानुवर्ती पद्धत या संघटितपणाला बळ देणारी ठरली असेल का? देवधरांसारख्या अभ्यासकांच्या मते याचे उत्तर होय असे आहे. हिंदू धर्माने आखून दिलेले नियम व नीतिमत्ता पाळून प्रत्येकाने त्याचे काम करत जावे. तरच तुम्ही मोहाला बळी पडणार नाही ही गोळवलकरांची शिकवण. त्याचे पालन केल्यामुळेच मोहमाया त्यागत संघाचा वटवृक्ष बहरला. मात्र अलीकडे सुबत्तेमुळे चर्चेत आलेला संघ भविष्यातही याच ध्येयाने वाटचाल करेल की अध:पतनाचे काटेही त्याच्या वाटेवर येऊ लागतील ही शंका आहेच. अर्थात त्याचा ठाम इन्कार परिवाराकडून केला जातो. मात्र संघाचे हे बदललेले स्वरूप व मालमत्ताहीन ते मालमत्तादार असा वळणदार प्रवास बरेच काही सांगून जाणारा आहे. वैचारिक पातळीवर काम करणाऱ्या संघटना काळाच्या ओघात बदलल्या तरच त्या टिकतात, अन्यथा पोथीनिष्ठ डाव्यांसारखी त्यांची अवस्था होते. संघाने हे जाणवल्यामुळेच बदलाची कात टाकली असावी.

devendra.gawande@expressindia.com

Story img Loader