अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा होत आहे. त्यासाठी दोन दिवस आधीपासूनच म्हणजेच २० आणि २१ जानेवारी रोजी कोणत्याही भाविकांना श्रीरामाचे दर्शन घेता येणार नाही. प्राणप्रतिष्ठा सोहळयासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांना २२ जानेवारी रोजी श्रीरामाचे दर्शन घेण्याची संधी मिळणार असून सर्वसामान्य भाविकांसाठी २३ जानेवारीपासून राम मंदिर खुले होणार आहे. यामुळेच २३ जानेवारीपासून मोठया प्रमाणात भाविक श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत दाखल होणार असल्यामुळे हॉटेलचे आगाऊ आरक्षण झाले आहे. त्यामुळे पर्यटन कंपन्यांनी २६ जानेवारीपर्यंत अयोध्या टूर थांबवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाविकांनी मोठया संख्येने श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत जाण्याची तयारी सुरू केली आहे. पर्यटक आणि भाविकांना अयोध्येत फक्त राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी अनेक पर्यटन कंपन्यांनी ३० ते ४० टक्के सूट देऊन विशेष टूर आयोजित केल्या आहेत. यामध्ये २ दिवस आणि ३ रात्री अशा प्रकारे या टूर ठरवण्यात आली आहे, परंतु येत्या २६ तारखेपर्यंत अयोध्यातील सर्व हॉटेल आगाऊ आरक्षित असल्याकारणामुळे पर्यटन कंपन्यांना २६ जानेवारीपर्यंत अयोध्यात टूर थांबविण्यात आल्या असल्या तरी, २६ जानेवारीपासून मे महिन्यापर्यंत मोठया प्रमाणात आगाऊ आरक्षण सुरू झाले आहे.

हेही वाचा >>> समोरच्या बाकावरून : तुम्ही राहता त्यांच्या ‘समृद्ध भारता’त?

अयोध्येतील प्रतिष्ठापना सोहळयामुळे मोठया प्रमाणात पर्यटन व्यवसायाला चालना मिळत आहे. तसेच, येथील वाढती वाहतूक, हॉटेल यामुळे स्थायिक नागरिकांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. खासगी वाहन चालक, टूर गाइड, हॉटेल कर्मकारी यांसारख्या नोकऱ्या येथील तरुणांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. अयोध्यात मागील २ वर्षांमध्ये ३००० हजारपेक्षा अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

भाविकांना खरेदीसाठी.. 

राम मंदिराची प्रतिकृती, सागाची राम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांची मूर्ती, हवन सामग्री, विशेष पूजा सामग्री, भगवत गीता, श्रीरामांचे नाव लिहिलेले तरंगणारे दगड, चंदन, रामाचे फोटो, टी-शर्ट, मंदिरांची चित्रे असलेली कीचेन, गळयातील माळ, ब्रेसलेट, घडयाळ, टोप्या, झेंडे, पुस्तके रामाचे चित्र असलेल्या साडया, शेला, भगवा फेटा, बाल रामाची मूर्ती, पोस्टर, रुद्राक्ष, तांब्या पितळेची भांडी आदी सामग्रीने अयोध्याचा बाजार सजला आहे.

बदलती अयोध्या

शहरात १७५ छोटी-मोठी हॉटेल्स आहेत. त्याचबरोबर पाच खोल्या असलेल्या ५०० नवीन गेस्ट हाऊसना राज्य सरकारने मान्यता दिली आहे. अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हॉटेल, रेस्टॉरंट आणि मनोरंजनासाठी नवीन पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. याशिवाय अयोध्यातील राम मंदिराजवळील दुकानाची डागडुजी करण्यात आली आहेत. तसेच अयोध्या धाम रेल्वे स्थानकावर शौचालय, पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थाची सोय करण्यात आली आहे. महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले असून ३० डिसेंबरपासून त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. तसेच अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांसाठी अवध हे नवीन शॉपिंग मॉल आणि मोठे मार्ट उभारण्यात आले आहेत.

अयोध्यामध्ये मोठया प्रमाणात बदल झाला आहे. त्याचा भविष्यात हॉटेल व्यवस्था, पर्यटन व्यवस्थेला फायदा होणार आहे. यामुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेतदेखील हातभार लागणार आहे. आपल्या संस्कृतीचे जगाला दर्शन झाले पाहिजे. पर्यटनाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. जर पायाभूत सुविधा व्यवस्थित असेल तरच तेथे नवीन व्यवसायाला गती मिळते.

हेही वाचा >>> चाहूल : लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी सिद्ध केलेले संविधान!

झेलम चौबळ (केसरी टूर्स)

लवकरच अयोध्येतील राम मंदिराचेदेखील लोकार्पण होणार आहे. यानिमित्ताने देशभरातून अनेक भाविक या ऑक्टोबर महिन्यापासूनच पर्यटनासाठी अयोध्येत येत आहेत.  मागील १० वर्षांपेक्षा या २ वर्षांमध्ये संपूर्ण भारतातून भाविक मोठया प्रमाणात अयोध्या, वाराणसी, प्रयागराज अशा धार्मिक ठिकाणी पर्यटनासाठी येत आहेत. त्यातही गेल्या दोन वर्षांमध्ये अयोध्येला येणाऱ्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. भाविकांच्या या गर्दीमुळे येथील स्थानिक लोकांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. हीच परिस्थिती यापुढेही कायम राहणार ही आनंदाची गोष्ट आहे.

विकी तिवारी (लोकल टूर गाइड)

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. लखनऊ, प्रयागराज, वाराणसी आणि अलाहाबाद यांसारख्या जवळपासच्या गंतव्यस्थानांवर मोठा परिणाम झाला आहे. लखनऊ आणि प्रयागराजमध्ये पर्यटकांसाठी हॉटेल्स, तंबू आदी सोयी उपलब्ध झाल्या आहेत. मंदिराचे दर्शन आणि पूजा याव्यतिरिक्त येथे येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक संस्कृती, पाककृती आणि हस्तकलांचादेखील अनुभव घेता येईल. 

राजीव काळे ( थॉमस कुक लिमिटेड)

राम मंदिराच्या उद्घाटनामुळे धार्मिक पर्यटनात २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये ४० टक्के वाढ झालेली आहे.  एकेकाळी धार्मिक पर्यटनासाठी ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने येत, परंतु गेल्या दोन वर्षांत महाविद्यालयातील विद्यार्थी, सोलो ट्रिप, हनिमूनसाठी फिरायला जाणारी जोडपी, कुटुंबे यांचे प्रमाण वाढले आहे. पर्यटकांसाठी अतिरिक्त सोयी, हेलिकॉप्टर सेवा आणि दर्शनाच्या सुविधांचा समावेश केल्यामुळे ८० टक्के पर्यटक अयोध्याचा बेत आखत आहेत.

डॅनियल डिसोझा (एसओटीसी ट्रॅव्हल)

अयोध्यातील हॉटेल २० ते २६ जानेवारीदरम्यान आरक्षित झाली आहे. त्यामुळे या काळात तेथे पर्यटकांना घेऊन जाणे शक्य नाही, परंतु दिल्ली, मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमधून आगाऊ आरक्षणासाठी सतत फोन येत आहेत. मे महिन्यातील आरक्षणासाठी सुरुवात झाली आहे. – गौरी सिंग ( मेक माय हॉलिडे )

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devotees rush for hotel reservation in ayodhya zws