बापू राऊत
देशात होत असलेल्या पोटनिवडणुकीचे निकाल ही काही नेहमीच आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांची संभाव्य झुळूक असते असे म्हणता येत नाही. कारण या अगोदर झालेल्या पोटनिवडणुका व त्या नंतरच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांचे निकाल उलट आले हे अनेकदा सिद्ध झाले आहे. असे असले तरी जनमताचा कौल हा वेगळाच असतो. तो कोणाला कधी सत्तेतून घालवेल याचा नेम नसतो. कारण मतदार त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या मुद्द्याबरोबरच तो धार्मिक व सामाजिक मुद्द्याचाही विचार करू लागला आहे. परंतु पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयातून सत्तेमध्ये नसलेल्या विरोधी पक्षांना हर्ष वाटणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. यातून विरोधी पक्षांमध्ये अधिक जोर लावून पुढील निवडणुका लढण्याचा हुरूप येत असतो.
नुकतेच ८ सप्टेंबरला घोषित झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल संमिश्र आले असले तरी पुढील विधानसभा व लोकसभांची दिशा ठरविणारे आहेत. या निकालांतून सध्या तरी भाजपेतर विरोधी पक्षांची एकजूट झालेली दिसते, त्या दृष्टिकोनातून ‘इंडिया’ आघाडीच्या भविष्यासंदर्भात चर्चा होणे आवश्यक आहे. सात विधानसभा मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडदणुकामध्ये ‘इंडिया’च्या घटक पक्षांना एकूण चार, तर भाजपला तीन जागांवर विजय मिळाला. या पोटनिवडणुकामध्ये भाजपचा पराभव झाल्याचे दिसत नसून त्यांनी जागांची संख्या कायम ठेवली आहे. भाजपला पश्चिम बंगाल मधील धूपगुडी मतदार संघात तृणमूल कॉंग्रेसकडून हार पत्करावी लागली असली तरी, त्रिपुरातील बॉक्सनगर मतदार संघात भाजपने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पराभव केला. तर उत्तराखंडमधील बागेश्वर व त्रिपुरातील धानपूर मतदारसंघ कायम राखला. काँग्रेसने केरळातील पुथुपल्ली व झारखंड मुक्ती मोर्चाने दुमरी हे मतदारसंघ आपल्याकडे कायम राखले आहेत. त्यामुळे हे निकाल सर्वासाठी समसमान असून केवळ मताच्या टक्केवारीमध्ये कमी अधिकपणा आलेला आहे. आणि हीच टक्केवारी पुढे होणाऱ्या निवडणुकातील सूत्र ठरण्यास कारणीभूत ठरणार आहे. पण ‘जागा ज्या पक्षाकडे होती त्याच पक्षाकडे कायम राहिली’ हे सरळसाधे विधान, उत्तर प्रदेशातील घोसी मतदारसंघात मात्र वाटते तितके साधे राहिले नाही, ते कसे?
आणखी वाचा-वेगळे मंत्रालय दिले, पण फरक काय पडला?
जागा राखली की भाजपकडून खेचली?
उत्तर प्रदेशातील घोसी मतदार संघातून आलेला निकाल हा भारतीय जनता पक्षासाठी धक्कादायक तर ‘इंडिया’ आघाडीसाठी सुखकारक आहे. कारण घोसी मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने मूळचे समाजवादी पक्षाचेच, पण भाजपमध्ये गेलेले दारासिंह चौहान यांचा ४२,७५९ इतक्या मताधिक्यांनी पराभव केला. हे दारासिंह चौहान या मतदारसंघातील मजबूत उमेदवार मानले जात. त्यांची सामाजिक व राजकीय सुरुवात ही बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्यासोबत झाली होती. बहुजन समाज पक्षाचा नेता व आमदार म्हणून ते परिचित होते. परंतु राजकीय महत्वाकांक्षेमुळे त्यांनी बसपमधून समाजवादी पक्षात आणि तिथून मग भाजपमध्ये असा पक्षबदल केला. याच घोसीमधून पावणेदोन वर्षांपूर्वी भाजपचे ओमप्रकाश राजभर यांच्यापेक्षा २२,२०० हून अधिक मते या दारासिंह चौहान यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर मिळवली होती. मात्र त्यांनी समाजवादी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. पोटनिवडणुकीमध्ये दारासिंह चौहान यांना निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विशेष म्हणजे बोलघेवडेपणाबद्दल प्रसिद्ध असलेल्या ओ.पी.राजभर आणि संजय निषाद यांनी आपली प्रतिष्ठा पणास लावली होती. घोसीमध्ये भाजप उमेदवाराच्या पराभवामुळे ओ. पी.राजभर, दारासिंह चौहान, संजय निषाद यांच्यासारख्या निष्ठाबदलू नेत्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला चाप तर बसलाच परंतु ‘दंगलखोरांना धडा शिकवा’ असे आवाहन या निवडणुकीच्या प्रचारसभेत करणारे मुख्यमंत्री आदित्यनाथ व भाजप यांचे उणेपणही स्पष्ट झाले.
बसपसह ‘इंडिया’लाही इशारा
घोसी मतदार संघाचा निकाल बहुजन समाज पक्षालाही इशारा देणारा आहे. बसप प्रमुख मायावती यांनी घोसीमध्ये आपला उमेदवार न देता समर्थकांना ‘नोटा’वर मदतान करण्यास सांगितले. परंतु बसपला मागील २०२२ च्या निवडणुकीत मिळालेल्या २१.१२ टक्के समर्थक मतदारांनी त्याकडे पाठ फिरवून समाजवादी पक्षाच्या उमेदवारास पाठिंबा दिल्याचे विजयी मतसंख्येवरून दिसते. तर नोटास केवळ १७२८ इतके मतदान झाले. याचा अर्थ आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मायावतींच्या ‘एकला चलो रे’ या सूत्राला झटका बसत असून बसपच्या सध्याच्या १० खासदाराच्या संख्येत घट होऊन पक्षाची शून्यावर बोळवण होऊ शकते. मायावतींनी आपल्या परंपरागत व्होटबँकेच्या बदललेल्या मानसिकतेचा व आजच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन, आपल्या डावपेचात बदल करून घेतला पाहिजे इतका इशारा या पोटनिवडणुकीने त्यांनाही दिला.
आणखी वाचा-मुत्सद्दी मोदींनी इतिहासापासून शिकायला हवे…
‘इंडिया’ आघाडीच्या घटक पक्षांनी – मुख्यत: काँग्रेस, आप, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, शिवसेना व डाव्या पक्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ‘एकास एकच’ उमेदवार दिल्यास पुढील लोकसभा निवडणुकात वेगळे चित्र बघायला मिळू शकेल. याची झलक घोसी मतदार संघात भाजपच्या उमेदवारास आताच्या पोटनिवडणुकीत मिळालेल्या ३७.५४ टक्केवारीच्या तुलनेत समाजवादी पक्षास मिळालेल्या ५७.१९ टक्केवारीवरून दिसून येते. असे असले तरी भाजपला २०२२ च्या निवडणुकीत मिळालेली ३३.५७ टक्के मते आणि २०२३ च्या (३७.५४ टक्के) मतांची तुलना केल्यास भाजपच्या मतपेढीत ३.९७ टक्के मतांची वाढ झालेली आहे.
मात्र, उत्तराखंडमधील बागेश्वर या भाजपसाठी सुरक्षित मानला गेलेल्या मतदार संघात काँग्रेसला सन २०२२ (२६.८८ टक्के) च्या तुलनेत २०२३ मध्ये मिळालेल्या (४५.९६ टक्के) मतांमध्ये १९.०८ टक्क्याची भरघोस वाढ झाली असली तरीही काँग्रेसला पराभव पत्करावा लागला- कारण भारतीय जनता पक्षाच्या टक्केवारीमध्ये मागील निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या तुलनेत ६.४ टक्क्याची वाढ झाली आहे. या निवडणूक आकड्यावरून भाजपच्या मतसंख्येत कमतरता न येता ती वाढत असल्याचे लक्षात येते. हा विरोधी पक्षासाठी चिंतेचा विषय असायला हवा.
यावरून विरोधी पक्षांनी युती न करता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीस सामोरे गेल्यास त्यांना पराभवास सामोरे अटळ असून पुन्हा भारतीय जनता पक्ष सत्तेत येईल. त्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे पुढे देशात निवडणुका होण्याची शक्यताच नष्ट होईल की काय! या भीतीचे सावट खरे ठरेल की नाही याचीही स्पष्टता नंतरच्या काळात येईल. परंतु त्यापेक्षा विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकास एक उमेदवार न दिल्यास उत्तराखंड मधील बागेश्वर मतदार संघासारखी परिस्थिती सगळीकडे निर्माण होऊ शकते, याचे भान ‘इंडिया’ आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी लक्षात घ्यावयास हवे. एवढा धडा ‘इंडिया’ने शिकायलाच हवा.
bapumraut@gmail.com