अमृतांशु नेरुरकर

डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे व डिजिटल परिवर्तनाच्या भविष्यातील रूपरेखेला आकार देण्याचे कार्य करणाऱ्या अनुभवजन्य सिद्धांताविषयी..

success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Canada has ended fast track visas for foreign students
कॅनडात शिक्षणासाठी जाणे कठीण, फास्ट ट्रॅक व्हिसावर घातली बंदी; याचा भारतीय विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?
Consistent and self believe key to success best example boy win table tennis match video viral on social media
“हरलेला डावही जिंकता येतो” स्पर्धेत शेवटच्या संधीचं चिमुकल्यानं कसं सोनं केलं? VIDEO एकदा पाहाच
Viral video of a man carries a snake to the hospital after it bites him
सापाने दंश केला तरी जगण्याची इच्छा सोडली नाही, रुग्णालयात सापाला घेऊन आला अन्…, VIDEO पाहून माणसाच्या हिमतीला कराल सलाम
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

डिजिटल तंत्रज्ञानामधील प्रगतीची दिशा आणि वेगाचे गेली सहा दशके अचूकतेने भाकीत करणाऱ्या मूरच्या सिद्धांताने (‘मूर्स लॉ’) नुकतीच ५८ वर्षे पूर्ण केली. त्याआधी २४ मार्च २०२३ रोजी मूर्स लॉचे जनक, इंटेलचे सहसंस्थापक व संगणक, मोबाइल किंवा इतर कोणत्याही डिजिटल उपकरणाचा मूलभूत घटक असणाऱ्या ‘सेमीकंडक्टर चिप’ उत्पादन क्षेत्राचे भीष्म पितामह, गॉर्डन मूर वयाच्या ९४व्या वर्षी निवर्तले. डिजिटल क्षेत्राचा खऱ्या अर्थाने पाया रचणाऱ्या संशोधक व तंत्रज्ञांच्या मांदियाळीतील अखेरचा तारा निखळला.

सेमीकंडक्टर चिप ज्या कोटय़वधी ‘ट्रान्सिस्टर्स’पासून तयार झालेली असते, तिचा प्रवर्तक विल्यम शॉकली, अनेक ट्रान्सिस्टर्सना एकत्र करून त्यांचे एकात्मिक ‘इंटिग्रेटेड सर्किट’ तयार करणारा जॅक किल्बी, याच इंटिग्रेटेड सर्किट किंवा ‘आयसी’ला प्रयोगशाळेतून बाहेर काढून त्याला व्यावसायिक वापराच्या क्षमतेचे बनवणारा रॉबर्ट नॉईस, मायक्रोप्रोसेसर चिपचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर करून त्यात एक व्यावसायिक शिस्त आणणारा अँडी ग्रोव्ह, अशी ही यादी न संपणारी आहे.

आता विसाव्या शतकात सॉफ्टवेअर किंवा डिजिटल क्षेत्रात सुप्रसिद्ध असलेली बिल गेट्स, स्टिव्ह जॉब्स किंवा एकविसाव्या शतकातील मार्क झकरबर्ग, इलॉन मस्क, सत्या नाडेला, सुंदर पिचाई यांच्याएवढी वर उल्लेखलेली नावे काही लोकप्रिय नाहीत. तरीही यासर्वात गॉर्डन मूर भाग्यवान कारण त्यांच्याच नावाने प्रचलित असलेल्या सिद्धांतासाठी (‘मूर्स लॉ’) ते सुपरिचित आहेत. १९६५ साली केलेल्या या भाकिताची दखल अगदी आजही संगणक, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील प्रत्येकाला घ्यावीच लागते.  १९६५ साली अमेरिकेतील त्या काळच्या ख्यातनाम ‘इलेक्ट्रॉनिक्स’ मासिकाला ३५ वर्षे पूर्ण झाली होती व त्याप्रीत्यर्थ मासिकाने गॉर्डन मूरना सेमीकंडक्टर उद्योगाचे पुढील १० वर्षांचे भविष्य रेखाटायला सांगितले. तेव्हा मूर हे ‘फेअरचाइल्ड सेमीकंडक्टर’ या कंपनीत संशोधन विभागाचे प्रमुख होते व ‘इंटेल’चा जन्म व्हायला अजून तीन वर्षे बाकी होती.

त्या काळात संगणक व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र बाल्यावस्थेत होते. विविध विषयांवरचे संशोधन मोठय़ा प्रमाणात होत असले तरीही एकंदर या क्षेत्रातील अनिश्चिततेमुळे कोणत्याही प्रकारचे भविष्य वर्तवणे हे कर्मकठीण काम होते. आज आकडेवारी गोळा करण्यासाठी किंवा आलेख काढून अंदाज वर्तवण्यासाठी दिमतीला असलेल्या डिजिटल साधनांचाही पूर्णत: अभाव होता. अशा परिस्थितीतही मूर यांनी आपले भविष्यकथन केवळ ढोबळमानाने केलेल्या अंदाजावर आधारभूत नसावे यासाठी मागील आठ-दहा वर्षांतील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील प्रगतीचा सखोल अभ्यास केला. त्यांना असे आढळले की १९५९ साली केवळ एका ट्रान्झिस्टरने बनलेल्या ‘इंटिग्रेटेड सर्किट’मध्ये १९६५ साल येता येता ६४ ट्रान्झिस्टर्सचा अंतर्भाव झाला होता. थोडक्यात, आयसीमधल्या ट्रान्झिस्टर्सच्या संख्येत दरवर्षी दुपटीने वाढ होत होती. या क्षेत्रातील आपल्या अनुभवाला या निरीक्षणाची साथ देत मूर यांनी हे भाकीत केले की ‘पुढील दहा वर्षांत आयसीमधल्या ट्रान्झिस्टर्सची संख्या प्रत्येक वर्षी अशीच दुप्पट होत जाईल.’ 

मूर यांचे निरीक्षण व त्यावर आधारित भाकीत अचूक ठरले. आयसीमधल्या ट्रान्झिस्टर्सची संख्या दरवर्षी दुपटीने वाढत गेली. पुढे १९७५ साली मूर यांनी आपल्या भाकितात थोडी सुधारणा केली. त्यानुसार आता ट्रान्झिस्टर्सची संख्या दरवर्षांऐवजी दर दोन वर्षांनी दुपटीने वाढणार होती, तसेच मायक्रोप्रोसेसर चकतीचा आकार व त्याचबरोबर त्यांची किंमत वर्षांगणिक कमी होत जाणार होती. आश्चर्य म्हणजे मूरचे हे भविष्यही सत्यात उतरले. डिजिटल क्षेत्रात जिथे दर महिन्यागणिक गोष्टी झपाटय़ाने बदलत असतात अशा क्षेत्राबद्दलचे भाकीत ५०- ६० वर्षे टिकून राहते, ही बाबच अचंबित करणारी आहे.  ‘मूर्स लॉ’ आजच्या डिजिटल परिवर्तनाच्या कालखंडातही अस्तित्व टिकवून आहे. किंबहुना या क्षेत्रात झपाटय़ाने होत असलेल्या प्रगतीमागची तांत्रिक व तात्त्विक बैठक ‘मूर्स लॉ’ने घालून दिली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मूर्स लॉ हा न्यूटन, आईन्स्टाइन यांसारख्यांनी निर्मिलेल्या सिद्धांताप्रमाणे काही वैज्ञानिक सिद्धांत किंवा निसर्ग नियम नाही. मूर्स लॉ म्हणजे उपलब्ध माहितीचा कल्पकतेने वापर करून व त्याला अनुभवाची जोड देऊन निर्माण केलेले एक सूत्र आहे.

या सिद्धांताचे डिजिटल परिप्रेक्ष्यात असलेले महत्त्व समजून घेण्यासाठी त्याच्या अंतरंगात शिरावे लागेल. मायक्रोप्रोसेसर चकतीवर ट्रान्सिस्टर्सची संख्या जेवढी वाढेल तेवढीच तिची गणनक्षमता वाढत जाते. ‘मूर्स लॉ’ ट्रान्सिस्टर्सची संख्या भूमितीश्रेणीने वाढण्याचे भाकीत करतो. त्यामुळेच जिथे १९६५ सालच्या सर्वात प्रगत चकतीवर केवळ ६४ ट्रान्सिस्टर्स होते तिथे आजच्या सव्‍‌र्हर किंवा सुपरकॉम्प्युटर चालवणाऱ्या चकतींवर चक्क १० हजार कोटींपर्यंत ट्रान्सिस्टर्स असतात. मूर्स लॉचा आधार घेऊन डिजिटल साधनांच्या गणनक्षमतेत उत्तरोत्तर कशा प्रकारे वाढ होत जाईल याचा अंदाज वर्तवणे म्हणूनच शक्य होते.  याच्याच जोडीला या चकतींचा गणनक्षमतेच्या व्यस्त प्रमाणात छोटा होत गेलेला आकार व कमी होत गेलेली किंमत, यामुळे अगदी लहानातल्या लहान आकाराच्या उपकरणाला ‘डिजिटल’ बनवणे शक्य होते. म्हणूनच आज आपल्या तळहातावर मावणाऱ्या स्मार्टफोनची गणनक्षमता पूर्ण खोलीला व्यापणाऱ्या आयबीएम मेनफ्रेमपेक्षा कैक पटींनी जास्त आहे. आज सर्वज्ञात असलेली ‘इंटरनेट ऑफ िथग्ज’ किंवा वस्तुजाल ही संकल्पना प्रत्यक्ष अस्तित्वात येण्यामागे भूमितीश्रेणीने वृिद्धगत झालेल्या गणनक्षमतेचा महत्त्वाचा वाटा आहे व ही वाढ मूर्स लॉने आखून दिलेल्या नियमाबरहुकूम झाली आहे.

असे असले तरीही एकविसाव्या शतकात घडून येत असलेल्या डिजिटल परिवर्तनाची कारणमीमांसा केवळ मूर्स लॉने होऊ शकेल असे म्हणणे मात्र धाडसाचे ठरेल. डिजिटल परिवर्तनाचे तीन आधारस्तंभ आहेत, ज्यांना ‘थ्री सीज’ असंही म्हटलं जातं. मूर्स लॉ त्यातील एका ‘सी’ची (गणनक्षमता किंवा कॉम्प्यूट) कारणमीमांसा स्पष्ट करून तिच्या वाढीचे भाकीत करतो. पण आज आपण ज्या डिजिटल जगात वावरत आहोत त्याच्या अस्तित्वासाठी केवळ गणनक्षमतेतील वाढ पुरेशी नाही.

डिजिटल परिवर्तनास साहाय्यभूत ठरणारा दुसरा ‘सी’ हा माणसं एकमेकांशी डिजिटल पद्धतीने सहजतेने जोडल्या जाण्याच्या क्षमतेचा, अर्थात ‘कनेक्ट’ आहे. दोन अथवा अधिक संगणकांना एकाच नेटवर्कवर एकमेकांशी जोडण्यासाठी लागणाऱ्या ‘ईथरनेट’ तंत्रज्ञानाचे प्रवर्तक रॉबर्ट मेटकाफ यांचे याबाबतीतील विधान प्रसिद्ध आहे – ‘एखाद्या नेटवर्कचे मूल्य हे त्या नेटवर्कमध्ये असलेल्या वापरकर्त्यांच्या संख्येचा वर्ग इतके असते.’- यालाच ‘मेटकाफ लॉ’ असेही म्हणतात. मेटकाफने हे विधान दूरसंचार क्षेत्रासाठी जरी केले असले तरीही आज ते समाजमाध्यमांना देखील चपखल लागू पडते. कोणत्याही फेसबुक वापरकर्त्यांसाठी फेसबुकचे मूल्य त्यात अधिकाधिक वापरकर्ते जोडले जाण्याने कैक पटींनी वाढते.

आजच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला आकार देणारा तिसरा ‘सी’ हा ‘क्लाउड’चा आहे. गणनक्षमतेप्रमाणेच इंटरनेटच्या वेगात (ज्याला आपण बॅण्डविड्थ असे संबोधतो) भूमितीश्रेणीने होणारी वाढ ही डिजिटल उपकरणे एकमेकांशी कार्यक्षम पद्धतीने जोडण्यासाठी व सर्व प्रकारची विदा स्थानिक पातळीवर न ठेवता क्लाऊडवर ठेवण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. जॉर्ज गिल्डर या अमेरिकी अर्थतज्ज्ञाने इंटरनेटचा वेग कशा प्रकारे वाढत जाईल याचे भाकीत केले. त्याला ‘बॅण्डविड्थ लॉ’ असे म्हटले जाते. त्यानुसार इंटरनेट तसेच डिजिटल पद्धतीने होणाऱ्या दळणवळणाचा वेग दर सहा महिन्यांनी दुपटीने वाढेल. म्हणजेच गणनक्षमता ज्या वेगाने वाढेल त्याच्या जवळपास तीन ते चार पटींनी इंटरनेटची कार्यक्षमता व वेग वाढेल असे भाकीत ‘बॅण्डविड्थ लॉ’ करतो. म्हणूनच मागील केवळ एका दशकात विनावाहक (वायफाय) स्वरूपात उपलब्ध असणाऱ्या इंटरनेटच्या क्षमतेत (व वेगात) जवळपास ५०० पटींनी वाढ झाली. भविष्यात येऊ घातलेले फाइव्ह जी, सिक्सजी सारखे तंत्रज्ञान इंटरनेटच्या वेगाचा आलेख असाच चढा ठेवेल, यात तिळमात्र शंका नाही.     

अचूक निरीक्षण तसेच सखोल विश्लेषणावर आधारित व परस्परावलंबी असे हे तीन अनुभवजन्य सिद्धांत – ‘मूर्स लॉ’, ‘मेटकाफ लॉ’ आणि ‘बॅण्डविड्थ लॉ’ – डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे आणि डिजिटल परिवर्तनाच्या भविष्यातील रूपरेखेला आकार देण्याचे कार्य निर्विवाद करत आहेत, असे खात्रीलायकपणे म्हणता येईल. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या आविष्काराने या नियमांचे अस्तित्व पुढील काही दशके टिकवून ठेवणे हीच गॉर्डन मूर यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

लेखक संगणकतज्ज्ञ व ‘ओपन सोर्स’चे समर्थक आहेत.

amrutaunshu@gmail.com