जयदेव रानडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्थव्यवस्था वाढतेच आहेवगैरे दावे केले, अफवांना वा फेक न्यूजला लगाम घालण्यासाठी यंत्रणा आणल्या… एवढ्याने राज्यकर्त्यांविरुद्ध लोकांचा असंतोष झाकता येत नाही, हेच चीनमध्ये दिसते आहे…

एकाधिकारशाही समाजात अफवांना थारा नसतो- त्या सहसा पसरतच नसतात कारण खरे तर पसरण्यापूर्वीच त्यांचा सक्रिय बंदोबस्त केला जात असतो. चीनमध्ये अधिकाऱ्यांनी इंटरनेटवर कडक नियंत्रणे लादलेली आहेत आणि इंटरनेट वापरकर्त्यांवर आणि ‘अफवा पसरवणाऱ्यांवर’ लक्ष ठेवण्यासाठी जनतेच्या सदस्यांची निवड केली आहे. असे असूनही, चीनची राजकीय राजधानी बीजिंग आणि आर्थिक राजधानी शांघाय गेल्या काही महिन्यांपासून चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याबद्दलच्या अफवांनी धुमसत आहेत.

परदेशांत राहणाऱ्या चिनी लोकांनी समाजमाध्यमांवर केलेल्या नोंदींनुसार, गेल्या महिन्यात बीजिंगमधील एका नर्सने बातमी ‘फोडली’ ती अशी की, क्षी जिनपिंग यांची बीजिंगच्या ३०१ मिलिटरी हॉस्पिटलमध्ये विशिष्ट वैद्याकीय चाचणी घेण्यात आली होती. हे लष्करी रुग्णालय क्र. ३०१ चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीसीपी) वरिष्ठ नेत्यांवरच उपचार करते. क्षी जिनपिंग यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे चाचण्यांमधून समोर आले आहे. त्यानंतर या विषयाबद्दल कुणीही काहीही ऐकलेले नाही. तथापि, क्षी जिनपिंग यांचे वजन कमी झाल्याच्या बातम्या आणि चित्रे वगळता, अद्याप त्यांना दीर्घ आजाराने ग्रासले असल्याची कोणतीही चिन्हे नाहीत. हे खरे असले तर, किंवा अफवा पुन्हा उफाळून आल्यास, ही बातमी चीनच्या राजकारणावर गंभीर परिणाम करेल आणि जर याची पुष्टी झाली तर, संभाव्य उत्तराधिकाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू होण्याचीही शक्यता या बातमीत आहे.

हेही वाचा >>> डॉक्टरांच्या अत्यावश्यक सेवेचे महत्त्व नाकारण्याऐवजी हे करा…

पुन्हा गेल्याच आठवड्यात क्षी जिनपिंग यांच्याशी संबंधित आणखी एक अफवा समोर आली. यात दावा करण्यात आला आहे की क्षी जिनपिंग यांच्या पत्नी आणि पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) मधील माजी मेजर जनरल पेंग लियुआन यांना चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोमध्ये बढती दिली जाईल. हीच अफवा दुसऱ्यांदा समोर आली असून ती सर्वत्र पसरली आहे. पेंग लियुआन या चीनमधल्या चांग्शा शहरातील क्षयरोग प्रतिबंध आणि नियंत्रण कार्याच्या तपासणी दौऱ्यासाठी एकट्याच गेल्या होत्या आणि राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर या भेटीबाबत, ‘पेंग लियुआन हुनान प्रांतातील चांग्शा येथे तळागाळातील क्षयरोग प्रतिबंध आणि नियंत्रण कार्याची तपासणी करत आहेत’ या शीर्षकासह एक सचित्र मजकूर आणि दृकश्राव्य अहवाल प्रसृत केला- एवढे कारण पेंग यांच्या ‘बढती’ची अफवा पसरण्यास पुरेसे ठरले असावे. ही घडामोड ज्या दिवशी घडली, तो २४ मार्च हा योगायोगाने जागतिक क्षयरोग प्रतिबंध व नियंत्रण दिन होता.

मुळात याच चांग्शा शहरासह हुनान प्रांतातील चांग्डे व अन्य शहरांना चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी स्वत:देखील १८ ते २१ मार्च या कालावधीत भेट दिली होती आणि तेव्हा ते एकटे नव्हते, तर हुनान प्रांतीय पक्ष समितीचे सचिव शेन शिओमिंग आणि गव्हर्नर माओ वेईमिंग हेही त्यांच्यासमवेत होते. चार दिवसांच्या त्या दौऱ्यात पतीसह पेंग लियुआन आल्या असाव्यात, पण त्यांनी एकटीनेच चांग्शामध्ये थांबून क्षयरोग प्रतिबंधक आणि नियंत्रण कार्याची पाहणी केली असावी, अशीही शक्यता आहे. पण चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या संकेतस्थळावर त्यांच्या या अशा भेटीलासुद्धा लगेच दृकश्राव्य प्रसिद्धी दिली जाते, हे चिनी राजकीय संकेतांच्या मानाने विशेषच. याआधीच्या वरिष्ठ चिनी नेत्यांपैकी कुणाच्याही पत्नीस अशा प्रकारची प्रसिद्धी मिळालेली नाही. ती आता मिळाल्याने अफवेला ऊत आलाच पण क्षी जिनपिंग हे स्वत:साठी व कुटुंबीयांसाठी व्यक्तिपूजक पंथ निर्माण करू पाहाताहेत, या टीकेतही यामुळे भर पडू शकते.

क्षी जिनपिंग यांना असलेल्या कथित ‘पक्षांतर्गत विरोधा’बद्दल आणि आता त्यांच्या तब्येतीविषयी अफवांना तोंड फुटण्याच्या कारणांचे मूळ शोधताना २०२३ च्या मध्यापासून झालेल्या अघटित घडामोडींपर्यंत जावे लागते. क्षी जिनपिंग यांचे चेले म्हणवले जाणारे किन गांग यांची परराष्ट्र मंत्रीपदावर नेमणूक झालेली असताना हे गांग २५ जूनपासून अचानक गायब झाले; त्यांचा थांगपत्ता आजतागायत कुणालाही नाही. मग गांग यांच्याआधीचे परराष्ट्र मंत्री आणि सध्याचे पॉलिटब्युरो सदस्य वांग यी यांना याच पदावर परत आणण्यात आले. परंतु किन गांग यांना पदावरून काढून टाकण्यात आल्याची औपचारिक घोषणा होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला. चौदाव्या नॅशनल पीपल्स काँग्रेस (एनपीसी) च्या दुसऱ्या सत्राच्या काही दिवस आधी ‘शिनहुआ’ या अधिकृत चिनी वृत्तसंस्थेने बातमी दिली की, गांग यांनी नॅशनल पीपल्स काँग्रेसमधल्या सहसदस्य पदाचाही ‘राजीनामा’ दिला आहे. त्यांना ‘बडतर्फ’ करण्यात आले असे या वृत्तसंस्थेने म्हटले नाही. शिवाय, या बेपत्ता किन गांग यांना चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीमधून काढून टाकण्यात आलेले आहे की नाही, याबद्दलही अधिकृत वृत्तसंस्थेने काहीही माहिती आजपर्यंत दिलेली नाही. गांग यांना या पक्षसमितीत स्थान मिळाले होते ते जिनपिंग यांच्यामुळेच. किन गांगनंतर काहीच दिवसांत, क्षी जिनपिंग यांचे आणखी एक निकटवर्ती आणि दुसऱ्या पिढीतील कौटुंबिक मित्र संरक्षण मंत्री ली शुफांग हेदेखील अचानक लोकांच्या नजरेतून गायब झाले. त्यांनाही पदावरून काढण्यात आले. हे प्रकार राजकीय अस्थिरतेचे जोरदार संकेत देणारे आहेत.

हेही वाचा >>> आदिवासींमध्ये टाकून दिलं जातं नापास झालेल्या देवांना… आपण सत्ताधाऱ्यांची निदान उलटतपासणी तरी करायला काय हरकत आहे?

ली शुफांग यांची हकालपट्टी ‘पीएलए’च्या रॉकेट फोर्समध्ये उघडकीस आलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांमुळे झाली, अशा बातम्या आहेत. या भ्रष्टाचाराच्या आरोपापायी अनेक लष्करी जनरल अथवा अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी सुरूच होती. यामुळे ‘पीएलए’चे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये असंतोष निर्माण झाला असेल. चिनी केंद्रीय लष्करी आयोगाच्या शिस्त तपासणी समितीने ‘पीएलए’मध्ये चाललेल्या भ्रष्टाचाराविरोधात सलग वर्षभर मोहीम राबवली- लष्कराच्या प्रत्येक युनिटमध्ये लेखापरीक्षण पथके पाठवली- तरीसुद्धा हा घोटाळा झाला. यापैकी बहुतांश वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली होती ती क्षी जिनपिंग यांनीच, हे लक्षात घेता, आता राजकीय विश्वासार्हतेवर भर देण्यासाठी आणखी मोठी भ्रष्टाचाविरोधी मोहीम सुरू केली जाईल हे निश्चित. क्षी जिनपिंग हे ‘पीएलए’मधून राजकीय वरिष्ठांना माहिती मिळत राहील याची व्यवस्था अधिक चोख करून राजकीय नियंत्रण प्रणालीवर लक्ष केंद्रित करतील, असे दिसते.

पण जिनपिंग यांच्याबद्दलच्या अफवा अथवा त्यांची अपप्रसिद्धी होण्याचे प्रकार गेल्या दोन-तीन वर्षांत वारंवार घडू लागले आहेत, हे लोकांच्या वाढत्या असंतोषाचे लक्षण ठरते. ‘अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन होत आहे आणि चीनचा विकास दर यावर्षी पाच टक्क्यांवर पोहोचेल’ असा अधिकृत दावा असूनही मंदी काही हटत नाही, हेही यामागचे कारण असेल. कारण आर्थिक वाढीचे हे दावे अमान्य करताना काही चिनी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की वास्तविक वाढ शून्य किंवा त्याहूनही कमी आहे. चीनचा जीडीपी, जो काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या तुलनेत ७७ टक्के होता, तो २०२१ पर्यंत ५० टक्क्यांहून खाली घसरला. शिवाय, चीनची अमेरिकेला होणारी निर्यात यंदा २० टक्क्यांनी घसरली आहे. महागाई आणि वाढती बेरोजगारी यांमुळे लोकांचे जीवनमान खालावले आहे. प्रांतीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात २० ते ३० टक्के कपात आणि बोनस नाहीच, ही चिन्हे हलाखीचीच ठरतात. त्यात भर म्हणून चीनच्या रिअल इस्टेट क्षेत्रानेही अंथरूण धरले असून एव्हरग्रांदे, कंट्री गार्डन आणि व्हँके या तीन सर्वात मोठ्या रिअल कंपन्या दिवाळखोरीत गेल्या आहेत.

खासगी व्यवसाय करणाऱ्यांचाही सरकारवरील विश्वास उडाला आहे; हे चीनमधून होणाऱ्या ‘भांडवलाच्या उड्डाणा’तून दिसून येते. चीनच्या ‘स्टेट अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ फॉरेन एक्स्चेंज’च्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२३ मध्ये जवळपास ५३.९ अब्ज अमेरिकी डॉलर्सचे भांडवल चीनबाहेर गेले. हा आकडा, ‘जानेवारी २०१६ पासून चीनने एकंदर ५५.८ अब्ज डॉलर्सचा बाह्यप्रवाह नोंदवला’ हे लक्षात घेता गंभीरच ठरतो.

‘चीनच्या अर्थकारणाशी अध्यक्षांचा संबंध नसतो- ते क्षेत्र चिनी पंतप्रधानांचे’ या युक्तिवादाचा आधारही आता क्षी जिनपिंग यांना उरलेला नाही. कारण त्यांनीच पंतप्रधानांचा अधिक्षेप करून आर्थिक बाबींत लक्ष घालण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे चिनी अर्थव्यवस्थेला खरोखरची गती येत नाही, तोवर लोकक्षोभही राहणार आणि अफवाही अधूनमधून पसरणार, हे उघड आहे.

राष्ट्रीय संरक्षण सल्लागार मंडळाचे सदस्य आणि सेंटर फॉर चायना अॅनालिसिस अॅण्ड स्ट्रॅटेजीचे अध्यक्ष

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discontent among people against ruling parties leaders in china zws
Show comments