विदर्भ संशोधन मंडळाच्या ‘वज्रसूची-टंक’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले भाषण आत्मपरीक्षणाला चालना देणारे आणि व्यापक समरसतेसाठी पायाभूत मुद्दे मांडणारे होते. या कार्यक्रमाची बातमी ‘लोकसत्ता’ ने दिली, तेव्हा काहींनी मथळय़ाबद्दलच प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्या मथळय़ाच्या, त्या बातमीच्या पलीकडे असणारा सरसंघचालकांच्या त्या भाषणाचा गाभा वाचकांनी समजून घ्यावा, यासाठी त्या भाषणाचा हा गोषवारा. सोबत, जातिनिर्मूलनाचा मुद्दा संघविचारात गेल्या शतकापासूनच आहे- तो आजच आलेला नाही- याची साधार आठवण देणारे टिपण..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘वज्रसूची-टंक’ या पुस्तकात अश्वघोष आणि सुबाजी बापू या दोघांनी केलेली मांडणी तर्कशुद्ध आणि विद्वत्तापूर्ण आहे. या पुस्तकात त्यांनी आपले म्हणणे पूर्ण उत्कटतेने मांडलेले आहे. प्रतिपक्षाला नामोहरम करण्याकरिता, खोडून काढण्यासाठी आघात करायचे असतील तर तेही केले आहेत. पण कुठेही आपली पातळी सोडलेली नाही. ते त्या विषयाचे पुरस्कर्ते असूनही एका अर्थाने निर्विकार होऊन, शास्त्रज्ञ किंवा चिकित्सकाच्या  कसोटीवर तपासून, विश्लेषण करून त्यांनी आपले म्हणणे मांडले आहे. शास्त्रार्थाची अशी परंपरा आपल्याकडे आहे. पण, एक मोठा फरक असा आहे की शास्त्रार्थ समोरासमोर होत असतो. अश्वघोषांनी त्या काळात वज्रसूची मांडली. त्याला प्रतिउत्तर म्हणून त्या काळात कोणी काही बोलले का मला माहीत नाही.  त्यानंतर बराच काळ लोटला. तथागत बुद्धाचा धम्म प्रचलित झाला. मग नावापुरताच उरला, पुन्हा आला.

सुबाजी बापूंनी हे का लिहिले आहे ते कुठे सांगितले आहे, असे नाही. पण त्यांनी आग्रह धरला की तुम्ही जोपर्यंत हे दोन्ही प्रकाशित करणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला मदत करणार नाही. याचा विचार आपण केला पाहिजे. हे तर खरं आहे की आपल्या शास्त्रांना जातिंतर्गत विषमता मुळीच मान्य नाही. शास्त्र पाहिल्यावरही तुम्हाला कळेल. सर्व पंथांच्या आचार्यानी उडुपीला १९७२ मध्ये तसे घोषित केले आहे. आमच्या शास्त्रांमध्ये विषमतेला, उच्चनीचतेला, अस्पृश्यतेला बिलकूल आधार नाही, हे सर्व पंथीय आचार्य म्हणतात.  वज्रसूची पाहा, सनातन म्हणजे, हिंदू वैदिक प्रमाण मानणाऱ्या ग्रंथातही हे म्हटले आहे.

धर्मराजाला महाभारतात तीनदा प्रश्न विचारला गेला की ब्राह्मण कशामुळे होतो, जन्मामुळे की कर्मामुळे? धर्माने तीनही वेळेला नि:संदिग्ध उत्तर दिलं आहे, की ब्राह्मण हा त्याच्या गुणांमुळे, कर्मामुळे होतो. उत्तम कर्म असणारा शूद्रसुद्धा पूज्य आहे आणि नीच कर्म असणारा ब्राह्मणसुद्धा हे  आहे. हे कसं काय आलं? त्याचा इतिहास आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेचं वर्णन करताना म्हटलं आहे की, ही जातीव्यवस्था म्हणजे मजले आहेत, पण शिडी नाही. जो ज्या मजल्यावर आहे त्याला जन्मभर त्या मजल्यावरच राहावे लागेल. पण असं नव्हतं. वज्रसूचीत त्याचे दाखले आहेत की तपस्येने झाले ब्राह्मण.  याबाबत केव्हा तरी मुभा असली पाहिजे. परंतु हळूहळू ते भेद पक्के झाले. जनुकशास्त्र  सांगतं की, ८०-९० पिढय़ांपूर्वी भारतातल्या सगळय़ा प्रकारच्या लोकांमध्ये, जातीजमातींमध्ये, आंतरजातीय विवाह ही सामान्य गोष्ट होती. त्या ८०-९० पिढय़ांपूर्वीच्या काळात हळूहळू कर्मठपणा यायला लागला. मग त्या चौकटी बनल्या, भिंती बनल्या आणि  हे मिसळणं पूर्णत: बंद झालं. तो काळ गुप्त साम्राज्याचा होता. त्या काळात ही चौकट अनुल्लंघनीय झाली. 

एखादा समूह, एखादी जात, एखादा पंथ, एखादी पार्टी फार काळ सत्तेत राहिली तर समाजात त्याचे शत्रू किंवा विरोधक (अँटी इनक्मब्न्सी) आपोआप तयार होतात. असे आपोआप निर्माण होणारे विरोधक तितके जहाल नसतात. पण आपण सत्तेत असण्याचा फायदा घेऊन सत्ताधाऱ्यांनी काही केलं असेल, तर मात्र त्यांच्या विरोधातील प्रतिक्रिया  रागाची,  क्रोधाची असते. मानवता मान खाली घालेल असं आपण आपल्याच लोकांना वागवलं, हा इतिहास आहे. आणि हे आपण उगीच नाकारण्यात अर्थ नाही.

 त्याच्या परिणामी समाजात दरी निर्माण झाली. त्यानंतर इंग्रज आले. असं असूनसुद्धा आपल्याला बांधून ठेवणारं काहीतरी होतं. देशभक्ती होती, स्वातंत्र्याची आस होती. चाणक्याचा एक मंत्र आहे, की या देशातील सुसंस्कृत लोक कधीही गुलाम होऊ शकत नाही. परकीय आक्रमणे झाली तेव्हा काम करणारी समाजाची तंत्रं होती. त्यांनी प्रतिकार केला, करवून आणला. त्यानंतर असं दिसतं की, कुठल्याही विदेशी आक्रमकांनी आपल्या भूमीत पाऊल ठेवलं की ताबडतोब त्यांना विरोध सुरू झाला. तो परकीय आक्रमक विजयी झाला की हरला, परत गेला की इथेच राहिला, त्याचे राज्य ५०० वर्षांचे राहिले की १५० वर्षे राहिले, यातले काहीही असले तरी या देशात असेपर्यंत त्याला सुखाची झोप घेता आली नाही.

आधुनिक इतिहासात सगळय़ा गोष्टी सांगितलेल्या नाहीत. पण आता  स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने तेव्हा कोण कोण होते असं शोधायला सुरुवात केली, तर एकेका जिल्ह्यात दोन दोन वर्षे शिकवावे लागेल,  इतकी नावं आहेत. हा पराकोटीचा संघर्ष आपण एक होऊन केला. १८५७ मध्ये इंग्रजांना याची चुणूक मिळाली. मग त्यांनी आपल्या समाजात आधीपासून असलेल्या भेदांचा फायदा घेऊन लोकांना एकमेकांविरुद्ध भडकवण्यास सुरुवात केली. त्यांना आपल्या आत्मतेजाचं  खच्चीकरण करायचं होतं. ते करताना त्यांनी सगळा दोष आपल्या शास्त्रांवर टाकला. आपल्या पूर्वजांवर टाकला, आपल्या परंपरांवर टाकला. आता याचा विरोध कसा करायचा? तेव्हा भांडणं  होती. समजा दोन कुटुंबाचं भांडण आहे. भांडणारी मुलं आहेत. आपल्या मुलाचा दोष आहे, त्याच्यामुळे भांडण लागलं, हे दिसतं आहे. पण, आपण भांडणच करणार. जोपर्यंत भांडण सुरू आहे, तोपर्यंत आपल्या मुलाचे दोष नाही हेच सांगणार. ही आपली स्वाभाविक प्रतिक्रिया असते. पण हे चुकीचे आहे. दोष आपल्या मुलाचा आहे तर तो मान्य केला पाहिजे. पण तेव्हा तसं नाही झालं. कारण, या निमित्ताने तुमचे पूर्वज गाढव होते. तुमची शास्त्रं बेकार आहेत. तुमची दृष्टीच चुकीची आहे, असं आपल्याला सतत सांगितलं गेलं. त्याची प्रतिक्रिया म्हणून आपणही  ‘आमचं सगळं बरोबरच होतं, अस्पृश्यता बरोबरच  आहे. वर्णभेद.. नाही.. नाही.. तो अगदी बरोबर आहे असे म्हणत आणि शास्त्रांचा आधार देत राहिलो. शास्त्रांत सगळय़ांना आधार मिळतो. महाभारतात धर्माने दिलेलं उत्तर आहे. आणि सुतपुत्र आहे म्हणून त्याच्याशी विवाह करणार नाही, हे द्रौपदीचंही उत्तर आहे. तुम्ही कोणता आधार, कशात, केव्हा घेता, हा प्रश्न वेगळा आहे. या कारणामुळे असेल कदाचित. पण, आपला विरोध बचावात्मक राहिला. खरं तर सर्वाचे पूर्वज निर्दोष होते काय? पूर्वजांच्या चुका सर्व समाजाच्या असतात? एकेकाळी युरोपात पृथ्वी केंद्र मानून विश्वाचा विचार होत असे. नंतर विज्ञानाचा शोध लागल्यावर ते बदललं. पण त्या आधी तसं म्हणणाऱ्या लोकांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. पण नंतर सत्य स्थापित झालं. असं कुठे होत नाही? आपल्याही देशात झालं. त्यामुळे चुका कबूल करायला काही हरकत नाही. चुका केल्यामुळे आमचे पूर्वज निकृष्ट होते, असं होत नाही. कारण सगळय़ांचे पूर्वज चुका करतात.

 दोन हजार वर्षांनंतर हा टंक सुबाजी बापूंनी का लिहिला?  बापू आमच्या चंद्रपूरचे होते.  त्यांच्या विद्वत्तेचा मला गौरव वाटतो. विद्वान माणूस त्याच्या विद्वत्तेच्या जोरावर कशाचेही समर्थन नीट करू शकतो. बापूंनीही ते केले आहे. परंतु, जातीच्या आधारावर जो भेदभाव होत होता, तो बरोबर आहे, असं म्हणणं चुकीचं आहे.

वर्ण, जाती यांची काय उपयुक्तता होती आणि आधी विषमता नव्हती वगैरे सर्व तेव्हा म्हटले हे ठीक आहे. पण आज  कोणी वर्ण आणि जातीबद्दल विचारलं तर समाजाच्या हिताचा विचार करणाऱ्या प्रत्येकाला हेच उत्तर द्यावे लागेल की आधीचा भूतकाळ विसरून जा. (एव्हरी थिंग दॅट कॉजेस डिसक्रिमिनेशन शुड गो आऊ ट लॉक, स्टॉक अ‍ॅण्ड बॅरल.) भेदभाव निर्माण करणारी प्रत्येक गोष्ट नाहीशी झाली पाहिजे. आपण विषमता वेळीच संपवायला हवी होती. पण तसं न करता  आपण तिचं समर्थन केलं, तसे पुरावे दिले, तिला शास्त्र म्हटलं. बापू विद्वान आणि नि:स्पृह होते. त्यामुळे त्यांनीही त्यांच्या दृष्टीने तर्क मांडले. पण आज आपल्याला वंशशास्त्र, जीवशास्त्र, समाजविज्ञान या सगळय़ाविषयी जे ज्ञान आहे, ते त्याकाळी नव्हतं. त्याकाळची  प्रमाणं त्यांनी दिली आहेत. वज्रसूची पाहिली तर ती सगळी प्रमाणं  हिंदू सनातन वैदिक धर्माची प्रमाणं आहेत. सगळे ग्रंथ धुंडाळून ती दिली आहेत. ही प्रमाणं म्हणजे, वेदांच्या विरुद्ध बोलणारे आपण सगळे  ज्यांची चरित्रं आदर्श मानतो असे लोक आहेत.

शास्त्रानुसार चाललं पाहिजे, हे बरोबर आहे, पण शास्त्र  उपयोगी नसेल तर लोकांनुसार चाललं पाहिजे. शास्त्रांपेक्षा लोक श्रेष्ठ आहेत. कारण, लोकव्यवहार हा नेहमी अधिक प्रभावी असतो. शास्त्र काहीही असेल, पण लोक त्यांचं जीवन नीट चालावं म्हणून व्यावहारिक तडजोड करून दुसरा मार्ग काढतात. आपले संविधान आहे, कायदे आहेत. ते सगळय़ांना मान्य आहेत. पण कायद्यांचं काटेकोर पालन किती लोक करतात?  सामूहिक प्रवृत्ती सोयीचे करून घेण्याची आहे की, कायद्याने करण्याची आहे? म्हणून शास्त्रापेक्षा लोक श्रेष्ठ आहेत. पण लोक श्रेष्ठ आहेत असं म्हटलं तर त्याचा अर्थ मग कायद्याला काही अर्थ नाही असा होतो. शास्त्र श्रेष्ठ आहे म्हटलं तर मग लोकांची सोय पाहता येणार नाही. याच्यात तडजोड होत नाही तेव्हा  तिसरी गोष्ट येते की या दोघांनाही धर्मानुसार चालावे लागेल. धर्म म्हणजे काय हे पक्कं आहे. धर्म म्हणजे जोडणारं, समाज टिकवणारं, समाज उन्नत करणारं असं काहीतरी. प्रारंभी, मध्यात आणि शेवटीसुद्धा आनंददायक, सुखदायक असणारं. कुठलाही अतिरेक करीत नाही, संतुलित व्यवहार शिकवतो तो धर्म. या धर्मशास्त्राच्या व्याख्या आहेत.

 भागवतामध्ये धर्माचे चार आधार सांगितले आहेत. त्याचा उल्लेख विजयादशमीच्या भाषणात मी केला. त्याच्यातील एक आधार आहे सत्य. सत्य हे आपण आपापल्या नजरेतून पाहतो.  त्यामुळे तुम्ही सत्य काय समजता त्याला महत्त्व नाही, तुम्ही सतत सत्याच्या शोधात राहता की नाही, सत्यनिष्ठ असता की नाही, हे महत्त्वाचे. तुम्हाला जेवढं सत्य माहीत असतं त्याला धरून तुमचं जीवन असतं. पण यामध्ये मी असं सत्य पाहतो, तेच खरं, तुम्ही वेगळं पाहता, ते खरं नाही असा अतिरेक होऊ नये. दुसरी गोष्ट आहे करुणा. तिच्यासाठी मन, बुद्धी, शरीर तिन्हीची पवित्रता पाहिजे. त्यासाठी सुचिता, तपस्या लागते. संयम बाळगावा लागतो. परिश्रम करावे लागतात. 

शिबी राजाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना? एक ससाणा एका कबुतराच्या मागावर होता. त्या कबुतराने शिबी राजाकडे येऊन शरणागती पत्करली. त्या कबुतराची मागणी करत ससाणा शिबी राजाकडे आला. राजा म्हणतो, मी राजा आहे, प्रजेचे रक्षण हा माझा धर्म आहे. तो माझ्याकडे शरण आलेला आहे, तुला मिळणार नाही. पण, ससाणा म्हणतो की प्रकृतीने मला धर्म दिला आहे. मी तुझ्यासारखा पोळी-भाजी खाऊ शकत नाही. मला कबुतर खावेच लागेल. तुला धर्माचं पालन करायचं असेल तर त्याला दे माझ्याकडे. अखेर शिबी राजाने कबुतर वाचवणे हाही धर्म आहे आणि कबुतर खाणे हाही धर्म आहे, हे मान्य केले. पण, मग राजा म्हणतो, ठीक आहे तू मांसाहारी आहेस, तुला मांस पाहिजे. पण ते कबुतराचेच पाहिजे, असं नाही. मग मी कबुतराचा जीव वाचवतो. माझा धर्म पाळतो आणि माझं मांस तुला देतो. मग, तुझाही धर्म राहील आणि माझाही धर्म राहील. असा धर्म असतो. अशा धर्माला सोडून शास्त्र आणि लोक असे दोघेही  जाऊ शकत नाहीत.

दुर्दैवाने मधल्या काळामध्ये आपलं हे राष्ट्रीय पाप झालेलं आहे. शास्त्रांनीसुद्धा धर्म सोडला आणि लोकरूढीनेसुद्धा धर्म सोडला. या पापाचे क्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही. पण, या पुस्तकावर ते सगळं आणण्याचं काही कारण नाही. अश्वघोषांनी या सगळय़ा अनिष्ट परंपरा त्या खोडून काढायला वज्रसूची लिहिली आणि बिनतोड तर्क, चालत आलेली प्रमाणं दिली. शास्त्रार्थाची टीका ही कोणाला लागत नसते. कारण, दोघेही खरं काय आहे ते पाहायला निर्विकार मनाने बसलेले असतात. कोणाचाही हेतू एखादी परंपरा किंवा एखादा समूह नष्ट करणे, बदनाम करणे असा नसतो. पण परकीयांनी या गोष्टींचा वापर केला. त्यावरच्या प्रतिक्रियेतून बराच काळ असे होत राहिले. सुबाजी बापूंनी लिहिलेला टंकही तर्कशुद्ध आहे. तो त्यांनी निर्विकारपणे लिहिला आहे. सज्जन लोकांचं रक्षण व्हावं आणि कल्याण व्हावं म्हणून आम्ही हे करतो आहोत, असं दोघांचंही म्हणणं आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी शंका घेण्याचा प्रश्न नाही. काही गोष्टींचे आपण निर्णय केलेले आहेत. संविधानात ते व्यक्तही झाले आहेत. आपल्या मनातीलच गोष्ट होती म्हणून संविधानात आली. कोणालाही भेद नको. त्या भेदाचे समर्थन शक्यच नाही. पण, असे  समर्थन साहित्यात आहे. ते त्यांनी निर्विकार भावनेने केले. संशोधन म्हणून त्याचा उपयोग जरूर आहे. आपण कोणत्या कोणत्या फेजमधून गेलो हे पुढच्या पिढीला कळलं पाहिजे.   

अमेरिकेच्या यादवी युद्धाचा इतिहास गुलामीविरुद्ध लढलेले आणि गुलामीच्या समर्थनार्थ लढलेले अशा दोघांचाही इतिहास असतो. दोघांचं म्हणणं काय होतं, त्यांच्या संसदेत वादविवाद काय झाला, याचा तेथील अभ्यासक आजही अभ्यास करतात. तो अभ्यास कशाचं समर्थन करण्यासाठी नसतो. कारण कशाचं समर्थन करायचं हे ठरलेलं आहे. जे आपल्या संविधानाने सांगितलं आहे, ते आम्ही मनाने स्वीकारलं आहे. त्याचं आचरण करण्याचे प्रयत्न खूप जोरात सुरू आहेत. परंतु आपल्या लोकशाहीमध्ये पुष्कळ गोष्टींची चर्चा करावी लागते. त्याचेही पूर्वपक्ष-  उत्तरपक्ष असतात. ते असे असतात की प्रयोग झाल्याशिवाय ते बरोबर की चूक हे कळत नाही. अशा वेळेलाही निर्विकार मनाने शास्त्राच्या, तर्काच्या आधारावर खंडन-मंडन करण्याची जी परंपरा आहे तीमधून पूर्वपक्ष-  उत्तरपक्ष दोन्हीही समजून घेऊन एक समन्वय साधण्याची परंपरा आहे. यामुळे ज्ञान पुढे जाते. समाज बांधला जातो, तो पुढे जातो. त्या शास्त्रार्थाचे एक उत्कृष्ट उदाहरण या पुस्तकाच्या रूपाने आपल्यासमोर आहे. हे पुस्तक निष्कर्षांकरिता नाही. या पुस्तकात केव्हा काय काय झाले होते ते संशोधक वृत्तीने मांडलेले आहे. संशोधनाच्या दृष्टीने त्याचं महत्त्व आहेच. परंतु सामाजिक संस्था हा आपल्या परंपरेचा विषय होता. तो आपण विसरलो म्हणून या गतीला आलो आहोत. म्हणून वज्रसूची वाचा, सगळी प्रमाणं तिथे आहेत. परकीयांच्या कारस्थानाला बळी पडून आपण चुकीच्या प्रतिक्रियेत गेलो, त्याचे काय परिणाम झाले हे आपण पाहतो आहोत. डोकं थंड ठेवून, सगळा समाज आपलाच आहे, याची जाण ठेवून आपल्याला योग्य ते तर्क, योग्य त्या ठिकाणी देता आले पाहिजे. वाणी विवेक, कृती विवेक हा याच्यातून शिकता येईल. असे हे पुस्तक आहे म्हणून हे पुस्तक सगळय़ांनी वाचावे, अशी माझी प्रार्थना आहे. 

आपल्या मनातीलच गोष्ट होती म्हणून संविधानात आली. कोणालाही भेद नको. त्या भेदाचे समर्थन शक्यच नाही. पण, असे समर्थन साहित्यात आहे. ते त्यांनी निर्विकार भावनेने केले. संशोधन म्हणून त्याचा उपयोग जरूर आहे. कोणत्या कोणत्या फेजमधून गेलो हे पुढच्या पिढीला कळलं पाहिजे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discrimination society vajrasuchi tank book rashtriya swayamsevak sangh sarsangchalak mohan bhagwat ysh
Show comments