विजया जांगळे
विखारी प्रचार करणारी गाणी, कवनं लोकांपर्यंत पोहोचवून ज्यांना प्रसिद्धी आणि पैसाही मिळतो आहे, अशा नवभारतीय ‘पॉप-स्टार्स’ची साद्यंत ओळख करून देणारं हे पुस्तक..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिरवणूक सुरू होती. तिचं रूपांतर झुंडीत कसं झालं? रामनवमीची मिरवणूक दरवर्षीच मशिदीसमोरून जाते. मग नेमकं त्याच वर्षी पोलिसांना का मध्ये पडावं लागलं? त्यानंतर काही तासांत एका मुस्लीम तरुणाला हिंदूंनी बेदम मारहाण केली. एवढी की त्याचा मृत्यू झाला. हे सगळं एका गाण्यामुळे घडलं? एखादं गाणं कित्येक पिढय़ांची गंगाजमनी तहजीब धुळीला मिळवू शकतं?

पत्रकाराला बातमी कधी, कुठे दिसेल, किती प्रश्न निर्माण करेल, किती काळ झपाटून सोडेल सांगता येत नाही.. पत्रकार कुणाल पुरोहित झारखंडमधल्या गुमला नावाच्या लहानशा गावात कामानिमित्त गेले होते. चहाच्या टपरीवर गावकऱ्यांशी गप्पा मारताना तिथे झालेल्या मॉब लिंचिंगचा विषय निघाला. त्यातून कळलं की देशभर चर्चा झालेल्या त्या घटनेला निमित्त ठरलं होतं डीजेच्या दणदणाटात वाजवलेलं एक गाणं. आता त्या घटनेला दोन वर्ष लोटली होती; पण शिळी बातमी म्हणून सोडून न देता त्यांनी पुढे चार वर्ष पाठपुरावा केला. गाणं एखाद्याचं आयुष्य संपवू शकतं का, या प्रश्नाचं उत्तर शोधत हिंदी भाषक पट्टय़ातली गावखेडी पालथी घातली. या प्रवासात एक एकारलेलं जग उलगडत गेलं. ‘एच- पॉप : द सीक्रेटिव्ह वल्र्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ हा या चार वर्षांच्या अभ्यासाचा दस्तावेज आहे. 

अगदीच सूक्ष्म विषय मांडणारं हे पुस्तक केस-स्टडीच्या रूपात उलगडत जातं. कमीत कमी भाष्य आणि अधिकाधिक तथ्य- लेखकाने बातमीदाराचा बाणा अखेपर्यंत सोडलेला नाही. पुस्तकात कुठेही पूर्वग्रह लादण्यात आलेले नाहीत. लेखकादेखत घडलेल्या घटना, संबंधित कलाकारानं कथन केलेले त्याच्या पूर्वायुष्यातले प्रसंग, संवाद, गाणी-कवितांच्या ओळी एवढंच मांडण्यात आलं आहे. त्यावर विचार करण्याची, त्याच्या विश्लेषणाची, निष्कर्षांची जबाबदारी वाचकावर सोडून दिली आहे.

हिंदुत्ववादी विचारांच्या तीन व्यक्ती- एक गायिका- कवी सिंग, दुसरा कवी- कमल आग्नेय आणि तिसरे लेखक आणि समाजमाध्यमी इन्फ्लुएन्सर संदीप देव..  हिंदुत्वाचे प्रातिनिधिक पॉप स्टार म्हणून या तिघांच्या प्रेरणा, संघर्ष आणि आकांक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न पुरोहित यांनी केला. त्यासाठी ते त्यांच्याबरोबर बराच काळ राहिले. गाणी लिहिली जाताना, चाली लावताना, गाण्यांचं चित्रीकरण होताना, गावोगावी गाण्यांच्या कार्यक्रमांसाठी हिंडताना, कवी संमेलनांत.. त्यांनी या तरुणांचं आयुष्य अनुभवलं. त्यांच्या मित्र-परिवारात, कुटुंबात मिसळले. त्यांची जडणघडण समजून घेतली. त्यामुळे पुस्तकातले प्रसंग वाचताना कलाकाराच्या धारणा कशा घडत गेल्या असाव्यात याचा अंदाज येतो.

कवी सिंगच्या एका गाण्याचे बोल-

कुछ लोगों की तो साजिश हैं

हम बच्चे खूब बनाएंगे,

जब संख्या हुई हम से ज्यादा

फिर अपनी बात मनाएंगे..

किंवा कमल आग्नेयच्या या ओळी-

अगर गोडसे की गोली

उतरी ना होती सीने में

तो हर हिंदू पढता नमाज

मक्का और मदीने में..

द्वेषाने ठासून भरलेल्या या स्फोटक साहित्याची ही केवळ दोन उदाहरणं. अशी कित्येक उदाहरणं या पुस्तकात पानोपानी आहेत. या सर्वाच्या कविता, चर्चा, गीतांचे विषय ठरलेले आहेत- हिंदूंचा समृद्ध भूतकाळ, हिंदू धर्मच सर्वश्रेष्ठ आहे, गांधी-नेहरूंनी हिंदूंचं प्रचंड नुकसान केलं, नथुराम गोडसे किती महान, आज हिंदुत्व संकटात आहे, तुकडे तुकडे गँग, घुसखोर पुलवामा, अनुच्छेद ३७०, राम मंदिर इत्यादी. पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांची भरभरून स्तुतीही आहे.

पुस्तक वाचताना अनेक प्रश्न पडतात. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद थोर होतेच, त्यात शंकाच नाही, पण त्यांची थोरवी गाण्यासाठी गांधी-नेहरूंना खलनायकाच्या रूपात मांडणं गरजेचंच आहे का? आपल्या धर्माचं गुणगान करण्यात काहीच चूक नाही, पण त्यासाठी अन्य धर्माना तुच्छ लेखणं योग्य ठरतं? हे सर्व जण कलाकार जर धर्माचे पुरस्कर्ते आहेत, तर त्यांच्या गाण्यांत, कवितांत, चर्चात इतकं पक्षीय, एखाद-दोन नेत्यांभोवतीच फिरणारं राजकारण कसं?

असाही प्रश्न पडतो की या ओळी रचणारी, अशी गाणी गाणारी माणसं मुळातच मुस्लीमद्वेष्टी होती का? हिंदुत्वाचा दुराभिमान त्यांना बालपणापासून होता? त्यांच्या कुटुंबीयांचीही विचारसरणी अशीच वर्चस्ववादी आहे का? त्यांनीच सांगितलेल्या त्यांच्या बालपणीच्या आठवणी पाहता या प्रश्नांची नकारार्थी उत्तरं मिळतात! पुढे जे घडलं ते जडणघडणीच्या टप्प्यावर कुठेतरी ऐकलेलं, कोणीतरी सांगितलेलं, बिंबवलेलं आहे. त्या वयात त्याचा परिणाम शून्य होता. वाढत्या वयाबरोबर, बदलत्या भोवतालाबरोबर तो गडद होत गेल्याचं दिसतं.

कमल आज कट्टर हिंदुत्ववादी असला, तरीही त्याने त्याच्या आयुष्यातलं पहिलं मत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला दिलं होतं. भारतात धर्माधारित राजकारण योग्य नाही, असं तेव्हा कमलचं ठाम मत होतं. २०१२च्या निवडणुकीवेळी  परदेशातून शिक्षण घेऊन आलेले, नोकरीची हमी देणारे, तंत्रज्ञानातील प्रगतीसाठी आग्रही असलेले तरुण अखिलेश कमलला भावले होते. ते मुख्यमंत्री झाले आणि २०१४मध्ये देशात मोदी लाट आली. उत्तर प्रदेशातल्या ८० पैकी ७१ जागा भाजपने जिंकल्या. दरम्यानच्या काळात कमलचे फार पूर्वीपासूनचे कौटुंबिक स्नेही असलेल्या मुस्लीम व्यक्तीने त्याच्या वडिलांची आर्थिक फसवणूक केली. मग २०१३ साली मुझफ्फरनगर शहरात दंगली भडकल्या. त्या काळात अखिलेश यांनी मुस्लिमांना मोकाट सोडलं, अशी कमलची धारणा झाली. परिणामी तो हिंदुत्ववादी विचारसरणीकडे आणि पर्यायाने भाजपकडे आकर्षित झाला. त्यापुढे उत्तर प्रदेशात झालेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकांत त्याने योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभांत कविता सादर करून जनमत भाजपच्या दिशेने वळवण्यास हातभार लावला. राजकीय सरशी मिळवणाऱ्याच नेत्यांकडे कमलचा कल राहिला, असाही निष्कर्ष यातून निघू शकतो, पण लेखकानं तो काढलेला नाही.

कवी सिंगची बालमैत्रीण मुस्लीम होती. पण ‘‘ते’ मांस खातात, अभक्ष्य भक्षण करतात. त्यामुळे ती चांगली माणसं नाहीत,’ हे पुढे तिच्या मनावर बिंबवलं गेलं. ‘मुस्लिमांची संख्या वाढत आहे,’ असं ती म्हणते आणि त्याचा पुरावा म्हणून ‘बाजारात किती तरी मुस्लीम दिसू लागले आहेत,’ असं उत्तर देते.

 यांच्यापैकी कोणाचीही पार्श्वभूमी मूळची कट्टर हिंदुत्ववादी नव्हती. सर्वजण सामाजिक समता मानणाऱ्या, आपला धर्म आपल्या घरापुरताच मर्यादित ठेवणाऱ्या कुटुंबातले आहेत. त्यांचे कुटुंबीय आजही धर्माच्या राजकारणापासून अंतर राखून आहेत. पण त्यांची तरुण मुलं कट्टरतेकडे झुकली आहेत आणि तिचा प्रसार करण्यातूनच व्यक्तिगत यश-पैसाही मिळवत आहेत.  या यशाची आणि आर्थिक लाभाची पुरेपूर जाणीव तिघांनाही आहे.

या तिघांपैकी कोणीही आपापल्या क्षेत्रात येतानाच राजकीय महत्त्वाकांक्षा घेऊन आलं नव्हतं. कवी सिंग केवळ वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी गायिका झाली. कमलचे वडील काव्यप्रेमी. तो शाळेत असल्यापासून त्यांच्याबरोबर कविसंमेलनांना जाऊ लागला. कविता तोंडपाठ करू लागला. पुढे स्वत: रचना करू लागला. संदीपने सुरुवात पत्रकारितेपासून केली, मग यू-टय़ूब वाहिनी, धार्मिक- आध्यात्मिक वक्ता, लेखक अशा वेगवेळय़ा क्षेत्रांत आपली कौशल्यं अजमावून पाहिली. पण आजचा भोवताल- आजची राजकीय परिस्थिती आपल्या विचारांना अनुकूल आहे, ती तशी घडवण्यात आपलाही हातभार लागला आहे, त्यामुळे आता या अनुकूलतेचा लाभ आपल्यालाही मिळावा, अशी अपेक्षा या कलाकारांत रुजलेली दिसते. हा लाभ आर्थिक तर असावाच पण सत्ताधाऱ्यांशी जवळीकही साधता यावी, त्यांनी आपल्या कलेची जाहीर प्रशंसा करावी, पुरस्कारांची पोचपावती द्यावी. शक्य झाल्यास निवडणूक लढण्याची संधी द्यावी अशा महत्त्वाकांक्षाही दिसतात. प्रत्यक्षात सत्ताधारी मात्र आपल्यापासून चार हात अंतर राखून आहेत. ते पडद्यामागून पािठबा देतात, त्यांचा प्रपोगंडा पुढे रेटण्यासाठी हक्काने कामाला लावतात, हिंदूंनी आपल्याला भगवा पक्ष म्हणून मतं द्यावीत अशी अपेक्षा करतात, मात्र जाहीर भाषणांत सर्वधर्मसमभावाचा जप सुरू राहतो. हिंदुत्वाचे प्रचारक असलेले हे कलाकार अगदीच डोईजड होऊ लागले, तर काही काळासाठी तोंडदेखलं का असेना त्यांना तुरुंगातही टाकण्यास मागेपुढे पाहिलं जात नाही, अशा दुटप्पी व्यवहाराविषयीचा असंतोषही या कलाकारांत दिसतो.

कवी आणि कमल यांनी सत्तेपुढे शहाणपण नसतं, हे स्वीकारलंय आणि आहे त्या परिस्थितीत पुढे जात राहणं मान्य केलं आहे. संदीपनं ‘भाजपपेक्षा हिंदुत्व मोठं आहे आणि मी भाजपचा नव्हे, तर हिंदुत्वाचा शिलेदार आहे,’ असा दावा कायम ठेवला आहे. त्यासाठी आर्थिक नुकसान सहन करण्याची आणि उभारलेला डोलारा स्वत:च्या हातांनी पाडून पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची त्याची तयारी आहे, असंही तो म्हणतो. त्याने स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून त्या आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत.

पण संदीप अपवाद आहे. पुस्तकात या तिघांच्या निमित्ताने भेटणारे बहुतेकजण राजकारणाला शरण गेलेले दिसतात. राजेशाही सरली, लोकशाही आली, पण राजाश्रयाची आकांक्षा आजही कायम आहे. त्यामुळेच, लोकगीतांचा बाज जरी घेतला किंवा इंग्रजीत ‘एच पॉप’ म्हटलं तरी, हे लोककलावंत ठरत नाहीत. 

‘एच- पॉप : द सीक्रेटिव्ह वल्र्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’

लेखक : कुणाल पुरोहित

प्रकाशक : हार्पर कॉलिन्स इंडिया

पृष्ठे : २८३; किंमत : ४९९ रु.