डॉ. अभिजीत अरविंद शिवणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानव सतत विकसित होत आहे. त्याच्या गरजा वाढत आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण यामुळे वस्तूंची उपलब्धता वाढली आहे. रोज लागणाऱ्या दूध, साखर, चहा, अन्नधान्य, टीव्ही, फ्रिज, उद्योगाच्या पातळीवर कच्चा माल, सुटे भाग, यंत्र या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक घटक कार्यरत आहेत. त्यामध्ये दुकानदार, वितरक, कारखानदार, कारखान्यास पुरवठा करणारे पुरवठादार, वाहतूकदार, सरकारी यंत्रणा, गोदाममालक या सर्व संस्था एका साखळीप्रमाणे काम करतात तेव्हा योग्य वस्तू योग्य ग्राहकापर्यंत, योग्य दरात, योग्य स्थितीत पोहोचते. या वस्तू एकाच जागी तयार होत नाहीत त्यामुळे जीवनावश्यक वस्तू, गृहपयोगी वस्तू, कारखान्यात बनणाऱ्या वस्तू या निर्माण करणे, त्यासाठीचा कच्चा माल गोळा करणे व योग्य किमतीमध्ये, योग्य प्रकारे योग्य ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी जे व्यवस्थापन करावे लागते त्याला पुरवठा साखळी व्यवस्थापन असे म्हणतात. ही पुरवठा साखळी वस्तूच्या निर्मिती आधी कच्चा माल पुरविणाऱ्या पुरवठादारापासून ग्राहकापर्यंत विस्तारलेली आहे.

कोणताही उद्योग हा मागणी व पुरवठा या अर्थशास्त्राच्या नियमावर आधारित असतो. मागणीनुसार वस्तूंचा पुरवठा कमीत कमी खर्चात, उत्तम प्रकारे, योग्य ठिकाणी, योग्य वेळेत, काळजीपूर्वक, चांगल्या स्थितीत करणे यासाठी जे व्यवस्थापन लागते त्याला सप्लाय चेन मॅनेजमेंट अथवा पुरवठा साखळी व्यवस्थापन असे म्हणतात. आजकाल या विषयाची खूप चर्चा होते. अनेक कंपन्या एकमेकांचे पुरवठादार बनतात व त्याची एक साखळी पहिल्या संस्थेपासून अथवा पहिल्या कंपनीपासून ग्राहकापर्यंत तयार होते.

आपण एक सोपे उदाहरण घेऊ. आपण रोज साखर वापरतो. ही साखर आपण किराणा दुकानातून घेतो. किराणा दुकानदार ती साखर मोठ्या व्यापाऱ्यांकडून घेतो. तो व्यापारी ती साखर मोठ्या डिस्ट्रीबुटर/ कारखान्यातून घेतो. कारखान्यात उसाचा पुरवठा शेतकरी वर्गाकडून होतो. साखर कारखान्यात उसाच्या रसापासून प्रक्रियेद्वारे साखर तयार होते. उसाचा पुरवठा करणारे शेतकरी उसाची पेरणी करतात. शेतात त्यासाठी पेरणी, खत देणे, फवारणी इत्यादी प्रक्रिया करतात. ऊस तयार झाल्यावर त्याची कापणी करून ट्रॅक्टर ट्रॉली, बैलगाडीने तो ऊस कारखान्यात पोहोचतो. प्रत्येक जागी ग्राहक, मोठा दुकानदार, मोठा वितरक ट्रकद्वारे, टेम्पोद्वारे साखरेची वाहतूक करतात.

प्रत्येकजण पैसे देऊन वस्तू खरेदी करतो. किराणा दुकानदार मोठ्या दुकानदाराला, मोठा दुकानदार वितरकाला, वितरक कारखान्याला, कारखाना शेतकऱ्याला पैसे देतो. अशी साखळी तयार होते. यामध्ये ऊस, साखर या वस्तू, पैसे यांचा प्रवाह सुरू असतो. तसेच फोनद्वारे, प्रत्यक्ष, ईमेलद्वारे माहिती पुरवली जाते. त्याचाही प्रवाह सुरू असतो.

ह्या सर्वांचे व्यवस्थापन साखर कारखान्यास करावे लागते. सहकारी साखर कारखाने शेतातून ऊस खरेदी करण्यापासून ग्राहकापर्यंत पोहचण्यासाठी शासनाच्या नियमानुसार काम करत असतात. यालाच सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणतात. हे सर्व घटक एकमेकास सॉफ्टवेअरद्वारे, ईआरपीद्वारे जोडले गेले तर याचे व्यवस्थापन अतिशय व्यवस्थित करता येते. ही यंत्रणा वापरून आपण माहिती, वस्तू व पैसे या तीन प्रवाहांचे सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये योग्य व्यवस्थापन करू शकतो. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान हा पुरवठा साखळी व्यवस्थापनाचे अविभाज्य भाग बनला आहे. माहिती तंत्रज्ञानमुळेच पुरवठा साखळी व्यवस्थापन या विषयाला महत्व प्राप्त झाले आहे. आपण आतापर्यंत शेती नंतरची पुरवठा साखळी पहिली. शेतीला बियाणे पुरवणारे, खत पुरवणारे, कीटकनाशक पुरवणारे अनेक दुकानदार, डीलर, डीस्ट्रिबुटर आहेत. त्यांना या गोष्टी पुरवणारे अनेक उद्योजक आहेत. ती मागील साखळी आहे. व शेती नंतरची पुढील साखळी आहे. ही साखळी केवळ संस्थेपुरती मर्यादित नसून अनेक देशही यात जोडलेले आहेत.

खताची निर्मिती पेट्रोलियमपासून होते. पेट्रोलियम पुरवणारेही या साखळीचा भाग बनतात. मधल्या काळात यूक्रेन रशिया युद्ध सुरू झाल्यावर युरोपमध्ये पेट्रोलियमचा पुरवठा खंडित झाला होता. जागतिक पातळीवर होणाऱ्या घडामोडीचा सप्लाय चेनवर परिणाम होतो. त्यामुळे पुरवठा सुरळीत राहण्यासाठी तुमच्याकडे अद्ययावत माहिती असणे गरजेचे असते. त्यानुसार तुम्ही साठवणुकीचे धोरण ठरवू शकता. टोयोटा मोटर कंपनी मागणीनुसार सुटे भाग आयात करते ज्याला जस्ट इन टाईम असे म्हणतात. त्यांच्या बाबतीत पुरवठादारदारासच आवश्यक वस्तूंचा साठा करावा लागतो. याला पुल स्ट्रॅटेजी/धोरण म्हणतात. टोयोटा कमीत कमी म्हणजे फक्त गरजेप्रमाणे सुटे भाग विकत घेते. या उलट हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनी आंघोळीचे साबण बनविते. त्यांचे पुश (स्ट्राटेजी) धोरण आहे. ते जास्तीत जास्त साठा बाजारात आणतात. वस्तूच्या स्वरूपानुसार धोरण स्ट्रॅटेजी ठरविली जाते. कंपनीच्या सर्वसाधारण उद्योग धोरणावर पुरवठा साखळी धोरण अवलंबून असते. जसे की मर्सिडीज कारचे निर्मिती धोरण गुणवत्तेवर आधारित आहे. त्यामुळे त्यांचे पुरवठा साखळी धोरण हे गुणवत्तेवर आधारित आहे.

पुरवठा साखळी या विषयामध्ये दळणवळण फार महत्वाचे आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे आहे. आज आपल्या देशात चांगले रस्ते तयार होत आहेत, आयटी इफ्रास्ट्रक्चर उभे राहिले आहे. चांगली बंदरे, आधुनिक विमानतळे, यांना जोडणारे रस्ते इत्यादी सुविधा उभ्या राहत आहेत. त्यामुळे मालाची ने आण करणे शक्य होत आहे. समृद्धी हायवेसारखे प्रकल्प वस्तूंची जलद वाहतूक करण्यास हातभार लावत आहेत. आपल्याकडे उत्पादित होणाऱ्या शेतमालाची वाहतूक चांगल्या गतीने होत आहे. यातूनच शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळत आहे. नवीन ड्राय पोर्ट जालान्यासारख्या ठिकाणी उभे राहिले आहे. ही संकल्पना सप्लाय चेनचा भाग आहे.

सप्लाय चेन मॅनेजमेंट सुधारत राहणे, त्याचा अभ्यास करणे उद्योग व्यापारासाठी अतिशय आवश्यक आहे. तसेच अमेझॉन, फ्लिपकार्ट या ई कॉमर्स कंपन्या उदयास आल्या आहेत. त्या कंपन्या फॉरवर्ड चेनचा भाग आहेत. त्यांना मालाची साठवणूक, वाहतूक करण्यासाठी चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज भासते. ती आता भारतभर उभी राहत आहे. त्यांचा उद्योग सप्लाय चेन मॅनेजमेंटवरच आधारित आहे. याद्वारे तरुण मुलांना, एमबीए करणाऱ्या मुलांना या क्षेत्रात खूप नोकरीच्या संधी मिळत आहेत.

प्राध्यापक, IMDR पुणे</p>

AbhijeetShivane@imdr.edu