मिथिला राऊत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येनंतर बऱ्याच जणांच्या तोंडून वेगवेगळी विधाने ऐकली. काही जण म्हणत होते मुस्लीम असेच निर्दयी असतात, ते विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नसतात. तर काही जण म्हणत होते, श्रद्धाची चूक आहे. तिने लिव्ह इनमध्ये राहायचंच कशाला? महाराष्ट्र सरकार तर असे प्रकार घडू नयेत यासाठी नवीन कायदा आणण्याच्या विचारात आहे. पण खरंच एखादी व्यक्ती एखाद्या धार्मिक समुदायाची असल्यामुळे किंवा लिव्ह इन रिलेशनमध्ये रहात असल्यामुळे एवढी क्रूर असते, असं म्हणणं बरोबर आहे का?

मागच्या काही महिन्यांमध्ये वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या काही हत्येच्या बातम्यांचा आढावा घेऊ.

नोव्हेंबर २०२२ मध्ये कोलकातामधील उज्ज्वल चक्रवर्ती (माजी नौदलाचे कर्मचारी) यांची हत्या त्यांचीच पत्नी आणि मुलाने केली. त्यांनी उज्ज्वल यांच्या मृतदेहाचे सहा तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.

नोव्हेंबर २०२२ मध्ये बदनामीच्या भीतीने वडील आणि चुलत्यानेच १७ वर्षाच्या मुलीला आधी गळफास दिला आणि नंतर जाळून टाकले. ही संतापजनक घटना चंदनझीरा पोलीस ठाणे अंतर्गत जालना तालुक्यातील पीर पिंपळगाव शिवारात घडली.

उत्तर प्रदेशमध्ये एका २२ वर्षीय मुस्लीम तरुणाने आपल्या अल्पवयीन बहिणीचे गैर-मुस्लीम मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून तिची हत्या केली.

या घटनांवरून आपल्या हे लक्षात येते की, एखाद्या विशिष्ट नात्यातील व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा खून करते असं नाही. त्यामुळे लिव्ह इनसारख्या नात्यामध्येच माणूस क्रूरतेने वागतो आणि लग्नासारख्या सात जन्मासाठी बांधलेल्या नात्यामध्ये हत्या होऊ शकत नाही असे नाही.

आता कौटुंबिक हिंसाचारामध्ये महिलांना जीव गमवावा लागला अशा काही बातम्यांचा आढावा घेऊ.

मे २०२२ मध्ये उत्तर प्रदेशमधील पिलिभीत जिल्ह्यातील जहाँबाद पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या अडवली गावातील ३० वर्षीय महिलेची तिच्याच पतीने हुंड्यासाठी हत्या केली. तर मे २०२२ मध्ये महाराष्ट्रातील जालनामधील गणेश सातारेने, कौटुंबिक वादावरून पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीची तिच्या लेकीसह निर्घृण हत्या केली.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने १९९५ मध्ये गाजलेल्या तंदूर प्रकरणाची आठवण झाली. नैना सहानी या महिलेची तिच्याच लिव्ह इन जोडीदाराने हत्या केली होती आणि आरोपी सुशील शर्मा याने तिच्या मृतदेहाचे तुकडे करून तंदूर भट्टीचा ओव्हनसारखा वापर केला होता.

वरील घटनांवरून कोणत्याही धार्मिक समुदायातील पुरुषाकडून हिंसा होऊ शकते हे दिसून येते. व्यक्तीकडून होणारी हिंसा ही व्यक्तिगत असते. त्यामुळे एखाद्या विशिष्ट धार्मिक समुदायातील व्यक्तीच निर्दयी असतात असं म्हणणं चुकीचं ठरेल. वास्तविक श्रद्धा वालकरचे खून प्रकरण कौटुंबिक हिंसाचाराचा प्रकार आहे, परंतु त्याला ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

श्रद्धाबाबत घडलं ते वाईटच आहे, कोणत्याच स्त्रीबाबत किंबहुना व्यक्तीबाबत असं घडू नये, पण ज्या स्त्रियांना त्यांच्या घरात रोज मारहाण होते, त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल?

नॅशनल हेल्थ फॅमिली सर्व्हेची आकडेवारी पाहता हे लक्षात येतं की बऱ्याच महिला या त्रासास सामोऱ्या जात असतात.

राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य पाहणी (एनएफएचएस – ५) २०१९-२०२१ च्या अहवालानुसार १८-४९ वयोगटातील २९ टक्के महिलांनी वयाच्या १५ व्या वर्षांपासूनच शारीरिक हिंसा अनुभवली आहे. सहा टक्के महिलांनी आयुष्यात कधी तरी लैंगिक हिंसाचाराचा अनुभव घेतला आहे, तर तीन टक्के महिलांनी गर्भवती असताना शारीरिक हिंसा अनुभवली आहे. हा अत्याचार हिंदू किंवा मुस्लीम धर्मसमुदायातच दिसून येतो असे नाही. तो हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध – नव बौद्ध, जैन व इतर अशा सर्वच धर्मसमुदायांमध्ये दिसून येतो.

सर्वेक्षणाच्या आधीच्या १२ महिन्यांत शारीरिक हिंसा अनुभवलेल्या हिंदू महिलांची टक्केवारी २९.७, मुस्लीम २६.१, ख्रिश्चन २२.६, शीख ११.७, बौद्ध – नवबौद्ध २९.५ , जैन १८.२, तर इतर ३०.७ इतकी आहे. तर पती/ जोडीदाराकडून भावनिक, शारीरिक किंवा लैंगिक हिंसाचाराचा अनुभव आलेल्या १८-४९ वयोगटातील विवाहित महिलांची टक्केवारी हिंदू २७.५, मुस्लीम २५.१, ख्रिश्चन २१.८, शीख १०.०, बौद्ध – नव बौद्ध २८.४, जैन ३.८, तर इतर २१.५ अशी आहे.

एखाद्या आंतरधर्मीय कौटुंबिक हिंसेकडे लोकांचे लक्ष वेधून २९ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदू स्त्रियांना त्रास सहन करावा लागतो त्याकडे दुर्लक्ष करायचं का? इतर कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणं सामान्य आहेत, त्या छळास बळी पडणं स्त्रीसाठी साहजिकच आहे असं म्हणून चालेल काय? फक्त परधर्मीय पुरुषाने मुलीवर अन्याय करायचा नाही, आणि स्वधर्मातील पुरुषाने केला तरी चालेल, असं आहे काय?

वरील माहिती पाहता हे लक्षात येते की कोणत्याही धार्मिक समुदायातील पुरुषांकडून महिलांवर अत्याचार होऊ शकतो. त्यामुळेच लग्न करताना तो मुलगा कोणत्या धार्मिक किंवा जातीच्या समुदायातला आहे यापेक्षा त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची मानसिकता कशी आहे, स्त्री – पुरुष समानतेविषयी त्याची काय धारणा आहे, इत्यादी गोष्टी विचारात घेणे जास्त महत्त्वाचे आहे.

लेखिका सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासक आहेत.

mithilaraut1@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Domestic violence women and religion asj