अमेरिकेत झालेल्या साठव्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले. या विजयामुळे ट्रम्प हे पहिले रिपब्लिकन आणि अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या इतिहासातील दुसरे असे अध्यक्ष ठरले ज्यांनी अध्यक्षीय पदाच्या आपल्या दुसऱ्या कार्यकाळासाठी निवडणूक लढवून पराभव पत्करला आणि सलग तिसऱ्यांदा अध्यक्षीय नामांकन प्राप्त करून अध्यक्षीय निवडणुकीत विजय प्राप्त केला. यापूर्वी १८९२ च्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवणारे डेमोक्रॅटिक ग्रोव्हर क्लीव्हलँड हे असे पहिले अध्यक्ष झाले होते. १८८४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत ते पहिल्यांदा विजयी झाले. त्यांनी अध्यक्षीय पदाच्या आपल्या दुसऱ्या कार्यकाळासाठी १८८८ ची निवडणूक लढवली होती. परंतु या निवडणुकीत रिपब्लिकन बेंजामिन हॅरिसन यांनी त्यांचा पराभव केला होता. पुढे १८९२ च्या निवडणुकीमध्ये सलग तिसऱ्यांदा अध्यक्षीय नामांकन प्राप्त करून ते विजयी झाले होते.
ग्रोव्हर क्लीव्हलँड आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातले साम्य फक्त इथेच संपत नाही. क्लीव्हलँड यांनी मारिया हॅल्पिन या महिलेवर बलात्कार केला, तिला दिलेले लग्नाचे आश्वासन पाळले नाही आणि या संबंधातून झालेल्या मुलाला जबरदस्तीने आधी अनाथालयात आणि मग मनोरुग्ण ठरवून त्या वेळच्या पागलखान्यात ठेवले होते. इतकेच नव्हे तर १८८४ च्या निवडणुकीत हे प्रकरण बाहेर आले तेव्हा ‘होय, मला अनौरस संतती आहे’ अशी कबुली त्यांना द्यावी लागली. पण त्या वेळी अर्धसत्य सांगून, स्वत:ला जणू धीरोदात्तपणे सत्य स्वीकारणारे आणि पीडित महिलेला दोष देऊन, मुलाला मनोरुग्ण ठरवून त्यांनी वेळ मारून नेली. ट्रम्प यांच्यावरही महिलांबाबतचे आरोप झालेले आहेत. न्यूयॉर्क न्यायालयाने ‘हश मनी प्रकरणा’सह त्यांच्यावरील एकूण ३४ आरोपांबाबत दोष सिद्धीचा निर्णय दिला होता. त्यांना तीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. विशेष हे की, या ‘हश मनी प्रकरण’ अर्थात तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे देण्याच्या या प्रकरणात ट्रम्प यांनी स्टॉर्मी डेनियल्स यांना दिलेली एक लक्ष ३० हजार डॉलर्सची रक्कम निवडणूक निधीतून दिली होती. असे असले तरी आता अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून शपथ घेण्याचा ट्रम्प यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील निवडणुकीच्या वेळी मतमोजणीच्या दिवशी ट्रम्प समर्थकांनी काँग्रेसमध्ये धुडगूस घालून घडवून आणलेल्या हिंसाचारामुळे अमेरिकन लोकशाही समोर निर्माण झालेला प्रश्न होता, हे तर आता सारेचजण जणू विसरून गेले आहेत.
आणखी वाचा-.मासे परवडत नाहीत, मत्स्याहारींनी करायचे तरी काय?
‘तरीही ट्रम्प जिंकले’ यासाठी दोन बाबी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. पहिली, निवडणुकीतील धोरणात्मक मुद्दे व प्रचार कार्यात घेतलेली आघाडी आणि दुसरी, स्विंग स्टेट्स मधील निर्णायक बहुमत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मांडला गेलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा अर्थव्यवस्थेचा होता. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील घसरणीसाठी बायडेन यांचे प्रशासन जबाबदार असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे होते. याच काळात कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपाध्यक्ष असल्याने ट्रम्प यांनी अर्थव्यवस्थेतील घसरणीचे खापर त्यांच्यावरही फोडले गेले. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून अमेरिकेकडे पाहिले जात असले तरी तिच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात पाहिजे तेवढी वाढ झालेली नाही. २०२० मध्ये ही वाढ ४.५ टक्के होती. त्यानंतर आता २०२४ पर्यंत ही वाढ २.७ टक्क्यांच्या पुढे गेलेली नाही. तसेच त्यांच्या पहिल्या कार्यकाळात , २०१६ मध्ये केलेल्या कर कपातीमध्ये अधिक वाढ व विस्तार करण्याचे ट्रम्प यांनी दिलेले वचन मतदारांना अधिक रुचलेले दिसते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा ठरला तो स्थलांतरितांचा. अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या स्थलांतरितांना मोठ्या प्रमाणात हद्दपार करण्याचे ट्रम्प यांचे आश्वासन अमेरिकन लोकांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाचे ठरले. तिसरा, प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध बदला घेण्याचा मागे पडलेला मुद्दा ट्रम्प यांनी पुन्हा पुढे केला होता. शिवाय पारंपारिक इंधन सहकार्यात वाढ करण्यासह पर्यावरण बदलाचा मुद्दाही त्यांनी प्रचारात मांडला होता. खोटे व रेटून बोलून ट्रम्प यांनी प्रचार कार्यात चांगलीच आघाडी घेतली होती.
चार राज्ये फिरली…
दुसऱ्या बाजूने हॅरिस यांनी कायद्याचे राज्य आणि लोकशाही मूल्यांच्या प्रती कटिबद्धता, महिलांना गर्भपाताचा अधिकार मिळवून देणे, मध्यमवर्ग कर कपात, संपत्ती व निगम करात वाढ आणि पर्यावरण कृती व बदल यासारख्या मुद्द्यांवर भर देऊन प्रचार कार्यात रंगत आणली असली तरी त्यांना अमेरिकन मतदारांनी तेवढे पसंत केले नाही. तसेच त्यांना ट्रम्प यांच्या तुलनेत प्रचारासाठी कमी वेळ मिळाला होता. ट्रम्प यांच्या विजयासाठी सर्वात महत्त्वाची ठरलेली दुसरी बाब ही स्विंग स्टेट्स मध्ये मिळालेल्या निर्णायक बहुमताची आहे. अमेरिकेत पेनसिल्वेनिया, जॉर्जिया, विस्कॉन्सिन, मिशिगन, ॲरिझोना, नेवाडा आणि नॉर्थ कॅरोलिना अशी एकूण सात स्विंग स्टेट्स आहेत.या सातही राज्यात ट्रम्प यांना बहुमत मिळाले आहे. मागील निवडणुकीत ट्रम्प यांना वरील सात पैकी फक्त नॉर्थ कॅरोलिना या एकाच राज्यात बहुमत मिळाले होते. या सात पैकी पेनसिल्वेनिया, विस्कॉन्सिन, जॉर्जिया आणि ॲरिझोना यांचा विशेषत्वाने उल्लेख केला पाहिजे. मागील निवडणुकीत पेनसिल्वेनिया या राज्याच्या निकालाने जो बायडेन यांना अध्यक्षीय मतदारांचा आवश्यक २७० मतांचा आकडा पार करता आला होता. आताच्या निवडणुकीत विस्कॉन्सिन राज्याच्या निकालाने ट्रम्प यांना वरील जादुई आकडा पार करता आला.आणखी विशेष हे की, विस्कॉन्सिन राज्यात ग्रीन पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवार जिल स्टीन आणि अपक्ष उमेदवार रॉबर्ट केनेडी या दोघांना मिळून २९ हजार ९४२मते मिळाली. हॅरिस यांना मिळालेल्या मतांमध्ये वरील दोहोंची मते एकत्रित केली तर, ती मते ट्रम्प यांना मिळालेल्या मतांहून (३०८ मते) अधिक असल्याचे लक्षात येते. अर्थातच या राज्यात झालेल्या मतविभाजनामुळे हॅरिस यांना नुकसान आणि ट्रम्प यांना फायदा झाल्याचे दिसते.
आणखी वाचा-लेख : जात खरंच जात नाही का?
तसेच मागील २०२० च्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाला १९९२ पासून जॉर्जिया आणि १९९६ पासून ॲरिझोना राज्यात पहिल्यांदा बहुमत मिळाले होते. आताच्या निवडणुकीत ही दोन राज्ये आपल्याकडे टिकून ठेवण्यामध्ये डेमोक्रॅटिक हॅरिस यांना यश मिळू शकले नाही. वरील सातही राज्यांमध्ये एकूण ८३ अध्यक्षीय मते आहेत. त्यापैकी २०२० च्या निवडणुकीत बायडेन यांना ६८ आणि ट्रम्प यांना फक्त १५ मते मिळाली होती. वरील सात पैकी विशेषत्वाने उल्लेखिलेल्या पेनसिल्वेनिया, विस्कॉन्सिन, जॉर्जिया आणि ॲरिझोना ही चार राज्ये जरी डेमोक्रॅटिक हॅरिस यांना टिकून ठेवता आली असती तरी या निवडणुकीचा निकाल काही निराळा राहिला असता. या चार राज्यातील अध्यक्षीय मतांची संख्या ५७ इतकी आहे. अर्थातच या निवडणुकीत ट्रम्प यांचे ऐवजी हॅरिस यांचा विजय झाला असता. या दृष्टीने ट्रम्प यांच्या विजयासाठी स्विंग स्टेट्स मधील निर्णायक बहुमत सर्वात प्रभावी सिद्ध झाले.
क्लीव्हलँड यांना एकोणिसाव्या शतकात, ‘विवाहबाह्य संबंधांबद्दल धीरोदात्तपणे सत्य सांगणारे’ म्हणून अधिकच मान मिळाला होता. ट्रम्प हेदेखील सध्या, ‘प्रतिकूलतेशी झगडून, फक्त अमेरिकेच्या भल्याच्या विचारामुळे’ पुन्हा अध्यक्ष झाल्याचे त्यांचे समर्थक मानत आहेत. प्रत्यक्षात ग्रोव्हर क्लीव्हलँड कसे होते, हे २०११ साली, चरित्रकार चार्ल्स लॅचमॅन यांनी लिहिलेल्या ‘अ सीक्रेट लाइफ’ या पुस्तकामुळे उघड झाले. ट्रम्प यांच्याबाबत फरकाचा मुद्दा असा की, त्यांचे खासगी आयुष्य आणि त्यांचे प्रशासकीय निर्णय हे दोन्ही ‘सीक्रेट’ राहिलेले नसूनसुद्धा त्यांना दुसऱ्यांदा निवडून येता आले.
लेखक अकोट येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक व राज्यशास्त्र विभाग प्रमुख आहेत.
skayande09@gmail.com