अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषविण्याचा मनोदय ३० मार्च रोजी जाहीरपणे व्यक्त केला. ७८ वर्षीय ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्याच कार्यकाळाच्या सुरुवातीला तिसऱ्या कारकीर्दीचे वेध लागले आहेत. ट्रम्प यांनी ‘मी विनोद करत नसून अतिशय गांभीर्याने बोलतो आहे’ असेही याविषयी सांगतिले. त्यामुळे ट्रम्प यांच्या विधानाची आता जागतिक माध्यमांनी सुध्दा गांभीर्याने दखल घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्यांदा पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात का, याबाबतच्या अनेक शक्यता आता चर्चेत आहेत. ‘मी तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष व्हावे अशी अनेकांची इच्छा’ असल्याचे कारण पुढे करत ट्रम्प यांनी स्वत:ची राजकीय महत्वाकांक्षा बोलून दाखवली. ट्रम्प यांनी आपल्या मुलाखतीत त्यांच्याकडे यातून मार्ग काढता येईल असा पर्याय असल्याचे सांगताना नक्की कुठल्या प्रकारे ते आपली महत्त्वाकांक्षा पूर्णत्वास नेतील हे सांगण्याचे मात्र सोयीस्करपणे टाळले आहे. अमेरिकी राज्यघटनेत ‘कुठल्याही व्यक्तीस दोनपेक्षा अधिक वेळा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होता येणार नाही’ अशी स्पष्ट तरतूद १९५१ साली अमेरिकेत झालेल्या २२व्या घटनादुरुस्तीमुळे अस्तित्वात आली. ‘कुठलीही व्यक्ती दोन वेळा राष्ट्राध्यक्षपद भूषविल्यानंतर राष्ट्राध्यक्षपदी निवडली जाणार नाही. राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळ पूर्ण होण्यागोदर (जर पदाचा राजीनामा अथवा निधनाच्या कारणास्तव रिक्त झाल्यास) रिक्त पदावर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या राष्ट्राध्यक्षांचा दोन वर्षाहून अधिक कार्यकाळ भूषवल्यास ती व्यक्ती एकापेक्षा अधिक वेळा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होऊ शकणार नाही’ इतक्या स्पष्ट तरतुदी घटनेत आहेत.
अमेरिकेचा इतिहास काय सांगतो?
जॉन केनेडी यांची १९६३ साली हत्या झाल्यावर लिंडन जाॅनसन यांनी केनडींचा १४ महिन्यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण केला आणि पुढे १९६५ ते १९६९ जाॅनसन अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून विराजमान होते. फ्रँकलिन रूझवेल्ट १९३३ ते १९४५ सलग चारदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर अमेरिकेच्या संविधानात ही दुरुस्ती करण्यात आली. ही २२ वी घटनादुरुस्ती अस्तित्वात येण्यागोदर अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज वाॅशिंग्टन आणि तिसरे राष्ट्राध्यक्ष थाॅमस जेफरसन यांनी मात्र अनुक्रमे १७९७ व १८०९ साली तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याचे स्वत:हून नाकारले होते. जाॅर्ज वाॅशिंगटन आणि थाॅमस जेफरसन यांची आदर्श मूल्ये सांवैधानिक तरतुदीत परिवर्तित होण्यास जवळजवळ दीड शतकाचा काळ लोटला. डोनाल्ड ट्रम्प मात्र १९५१ साली झालेल्या २२ व्या घटनादुरुस्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षातच तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याची स्वप्ने रंगवत असल्याचे चित्र आहे. १९५१ सालच्या २२ व्या घटनादुरुस्तीने ड्वाईट आईसनहोवर, रिचर्ड निक्सन, रोनाल्ड रिगन, बिल क्लिंटन, जाॅर्ज बुश आणि बराक ओबामा यांना तिसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होता आले नाही. निक्सन विरोधात महाभियोगाचा अपवाद वगळल्यास या सहा माजी राष्ट्राध्यक्षां पैकी कुणी तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली नाही अथवा २२ व्या घटनादुरुस्तीतील पळवाट न शोधता आपला कार्यकाळ संपुष्टात आल्यावर आनंदाने पायउतार झाले. डोनाल्ड ट्रम्प मात्र त्याला अपवाद ठरताहेत.
नवे रिपब्लिकन विधेयक
अमेरिकेत रिपब्लिकन पक्षमध्ये, राष्ट्राध्यक्षांना तिसऱ्यांदा कार्यकाळ मिळावा असा काही प्रमाणात मतप्रवाह आहे. डोनाल्ड ट्रम्प हेही या रिपब्लिकन पक्षाचेच. या वर्षाच्या सुरुवातीला रिपब्लिकन पक्षाचे लोकप्रतिनिधी अँडी ओगलेस यांनी एक विधेयक सादर केले आहे. विधेयकात राष्ट्राध्यक्षांना तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होता यावे या स्वरूपाचे ते विधेयक असून केवळ ‘सलग तीन वेळा राष्ट्राध्यक्ष होता येऊ नये’ अशी त्या विधेयकाची मांडणी आहे. अँडी ओगलेस यांनी मांडलेले विधेयक डोनाल्ड ट्रम्प यांच्या दृष्टीने अनुकूलच म्हणावे लागेल कारण ‘सलग तीन वेळा’ हा विधेयकातील मजकूर ट्रम्प यांना तसाही लागू होणारा नाही.
ट्रम्प यांच्यापुढील पर्याय
ट्रम्प यांनी तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याचा मनोदय व्यक्त केल्यावर अनेक शक्यता समोर येऊ लागल्या आहेत. त्यातील सर्वात पहिली शक्यता ही घटनादुरुस्तीची. पण अमेरिकी घटना स्वत:साठी बदलायची तर, ट्रम्प यांना दोन तृतीयांश बहुमताने ती लोकप्रतिनिधीगृहात आणि सिनेट मध्ये मान्य करून घ्यावी लागेल. सध्या रिपब्लिकन पक्षाचे सिनेट मध्ये १०० पैकी ५३ सदस्य असून लोकप्रतिनिधीगृहात ४३५ पैकी २१८ सदस्यांचे संख्याबळ आहे. घटनादुरुस्तीला आवश्यक संख्याबळ अनुक्रमे ६७ आणि २९० गरजेचे आहे. म्हणजे, घटनादुरुस्तीसाठी आवश्यक संख्याबळ ट्रम्प यांच्याकडे सध्या नाही. शिवाय अमेरिकेतील घटनादुरुस्तीची दुसरी अट अशी की, ५० पैकी ३८ राज्यांची या दुरुस्तीला अनुकूलता गरजेची असते. ट्रम्प यांनी नवा पायंडा घातला तरी राज्यांच्या सत्तेची आकडेवारी ट्रम्प यांना अनुकूल दिसत नाही. मग अमेरिकेच्या राजकारणात फोडाफोडी होऊन घटनादुरुस्ती करता येऊ शकेल का? या शक्यतेवर अद्याप कुणी लक्ष दिलेले नाही. ही शक्यता विचारात घेणे गरजेचे आहे.
याचे कारण असे की, अमेरिकेत पक्षांतर बंदी कायदाच अस्तित्वात नाही. उपलब्ध माहितीनुसार अमेरिकेत पक्षाच्या ध्येयधोरणांच्या विरोधात गेलेल्या केवळ १५ काँग्रेस सदस्यांच्या विरोधात त्यांच्या पक्षांनी कारवाई केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अगोदरच्या कार्यकाळात जेव्हा त्यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला तेव्हा त्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या वरिष्ठ सभागृहातील ७ आणि कनिष्ठ सभागृहातील १० सदस्यांनी ट्रम्प यांच्या महाभियोगाच्या बाजूने मतदान केले. ट्रम्प विरोधात त्यांच्याच पक्षाच्या एक महिला खासदार लिज चेनी यांनी मतदान केल्याने रिपब्लिकन पक्षाने त्यांच्याकडील जबाबदारी काढून घेतली. पक्षीय ध्येय धोरणांच्या विरोधात भूमिका घेतल्यास अमेरिकेच्या घटनेतील अनुच्छेद १ कलम ५ नुसार, संबंधित सदस्याला निलंबित करण्याचा अधिकार राजकीय पक्षांना आहे. पण ‘पक्षांतर बंदी कायदा’ अस्तित्वात नसल्याने घटनात्मक दुरुस्तीसाठी ट्रम्प यांनी असली फोडाफोडी केल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही. पक्षांतर बंदी कायदा असूनही २०२२ साली महाराष्ट्रात घडलेला प्रसंग आणि सध्या तेलंगणा विधानसभेत झालेले पक्षांतर यावर अद्याप न्याय होऊ शकलेला नाही. तिथे अमेरिकेत तर असा कुठला कायदाच नसल्याने घटनादुरुस्तीबाबत फोडाफोडी झाल्यास नवल ते काय?
ट्रम्प यांचे तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होण्यासाठी अभ्यासकांनी एक शक्यता वर्तवली आहे. २०२८ साली ट्रम्प हे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येतील व विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स हे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढतील. त्यानंतर व्हान्स हे राजीनामा देऊन ट्रम्प यांचा तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याचा मार्ग प्रशस्त करतील. म्हणजेच राष्ट्राध्यक्षपद भूषविलेले ट्रम्प उपराष्ट्राध्यक्ष होतील. या पर्यायाला दोन मुख्य अडसर आहेत. पहिला मोठा अडसर हा निवडणुकीत निवडून येण्याचा आहे. ट्रम्प आणि व्हान्स दोघेही निवडून आल्यास ही शक्यता बळावते. दुसरा मुख्य अडथळा अभ्यासकांनी उपस्थित केला आहे तो अमेरिकेच्या १८०४ सालच्या १२ व्या घटनादुरुस्तीचा. १२ वी घटनादुरुस्ती स्पष्ट करते की सांवैधानिक दृष्टीने जी व्यक्ती राष्ट्राध्यक्ष होण्यास अपात्र आहे ती व्यक्ती उपराष्ट्राध्यक्षपदासाठी पात्र ठरणार नाही. दुसरी परिस्थिती उद्भवल्यास अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात निश्चितच आव्हान दिले जाईल.
एकंदर सांवैधानिक तरतुदी आणि इतर शक्यता विचारात घेता ट्रम्प यांनी तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदासाठी प्रयत्न केले तरी सांविधानिक तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालय यातून त्यांना मार्ग काढावा लागणार आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपद मिळवले तर सर्वोच्च न्यायालयातील आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी मात्र तिथल्या सरन्यायधीशांच्या घरी नाताळात ट्रम्प यांना सेंटाक्लाॅजच्या वेशभूषेत जिंगलबेलचा उद्घोष करत नाताळाच्या शुभेच्छा देण्यासाठी जाण्याचीही तयारी ट्रम्प यांना ठेवावी लागेल, असे दिसते! ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्वाचे एकंदर अवलोकन केल्यास ते तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाचा मार्ग सुकर करण्यास ही भूमिका आनंदाने पार पाडतील यात कुठलीही शंका नाही. अभ्यासकांनी उपस्थित केलेल्या या सर्व परिस्थितीचा विचार केल्यास सध्यातरी ट्रम्प यांच्या समक्ष एकच दिसतो : अमेरिकेच्या संविधानात २८ वी घटनादुरुस्ती राज्यांमार्फत घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र पॅटर्न राबवणे! prateekrajurkar@gmail.com