डोनाल्ड ट्रम्प यांनी जगावर झाडलेल्या आयात कराच्या फैरी हे झुंडशाहीचे फलित आहे. विविध देशांवर आपण लादत असलेल्या आयात शुल्कांचा फलक हातात घेऊन ट्रम्प आपल्या समर्थकांना २ एप्रिल हा दिवस अमेरिकेचा मुक्ती दिन कसा आहे हे समजावून सांगत होते आणि त्यांचे समर्थक टाळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत करत होते. अर्थशास्त्रातील एका तांत्रिक विषयाचे ट्रम्प यांनी सवंग राजकारणात रूपांतर केले, कारण ट्रम्प समर्थकांची ती मानसिक गरज होती. ट्रम्प आधीची निवडणूक हरले होते तेव्हा त्यांच्या समर्थकांच्या झुंडीने अमेरिकेच्या राजधानीतील कॅपिटॉल या इमारतीवर थेट हिंसक हल्ला केला. ट्रम्प यांनी निवडून आल्यावर या हल्लेखोरांना सन्मानाने मुक्त केले आणि पुढे ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील या झुंडशाहीने अमेरिकेतील लोकशाही संस्था खिळखिळ्या करण्याचे आपले काम वेगात पुढे चालू ठेवले. आपलेच स्वातंत्र्य धोक्यात आणणाऱ्या झुंडशाहीला समर्थन देणे हा अमेरिकेतील नागरिकांचा आत्मघातकीपणा.
आणि आता दोन दिवसांपूर्वी अमेरिकेत होणाऱ्या आयातीवर मोठे कर लादण्याचा निर्णय हा ट्रम्प यांचा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा दणका. अनेक दशकांच्या प्रयत्नांमुळे प्रगत देशांच्या अरेरावीशी झुंज देत निर्माण झालेल्या आणि धिमेपणाने का होईना न्याय्य जागतिक व्यापाराकडे वाटचाल करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेला ट्रम्प यांच्या दडपशाहीने एका फटक्यात निकाली काढले. हा झाला जागतिक अर्थव्यवस्थेला फटका. पण यामुळे अमेरिकेचे नेमके काय हित साधले जाणार आहे याचे स्पष्टीकरण ट्रम्प प्रशासनाला देता आले नाही. हा अमेरिकेचा आत्मघातकीपणा आहे अशी टीका अमेरिकेतील अनेक अर्थतज्ज्ञ करत आहेत आणि त्या टीकेचा प्रतिवाद होताना दिसत नाही. ट्रम्प आपल्या समर्थकांच्या झुंडीला खूश करण्यासाठी अत्यंत तांत्रिक विषयाचा वापर करत आहेत. या झुंडीला आज जे मुक्तीदायी वाटते, ते या झुंडीत सामील होणाऱ्या लोकांसाठीच भविष्यात अहितकारक ठरणारे असते. पण झुंडीकडे फक्त झिंग असते, विचार नसतात.
जगातील सर्वात बलाढ्य लोकशाही असलेली अमेरिका हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर उभी राहू शकेल असे अगदी २० वर्षांपूर्वी कुणी म्हटले असते तर ते खरे वाटले नसते. जगभरच लोकशाहीला धोका निर्माण करणारी लाट का आली आहे याचे विश्लेषण जगातील सर्व राज्यशास्त्राचे अभ्यासक करत आहेत आणि ते करताना त्यांची दमछाक होत आहे.
पण अमेरिकेत असे होऊ शकते याच अंदाज अवघ्या २५ वर्षांच्या एका फ्रेंच अभ्यासकाला सुमारे २०० वर्षांपूर्वी आला होता. कदाचित त्याची अंतदृष्टी केवळ अमेरिकेच्याच नाही तर भारतातील आजच्या राजकीय परिस्थितीचे आकलन करायला मदतरूप ठरू शकेल. २५ वर्षांच्या तरुण अलेक्स डी टॉकव्हिलने १८३१ साली अमेरिकेत पहिल्यांदा पाय ठेवले आणि तो अमेरिकेत रुजू लागलेल्या लोकशाहीच्या दर्शनाने अक्षरश: स्तिमित झाला. (तेव्हा रेड इंडियन्सना गोऱ्या अमेरिकनांनी पूर्ण निष्प्रभ केले होते आणि काळे लोक तर गुलामच होते. टॉकव्हिलची निरीक्षणे गोऱ्या लोकांबद्दल आहेत हे लक्षात घेऊया.)
अमेरिकी लोकांचे स्वातंत्र्याचे प्रेम आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा बाणा बघून तो थक्कच झाला. अमेरिकी लोकांनी लोकशाही मूल्यांना घट्ट धरून ठेवलं होतं. सगळ्या नागरिकांना समान प्रतिष्ठा आहे म्हणजे सर्व लोक समान आहेत यावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे हे टॉकव्हिलला पदोपदी जाणवत गेले. प्रत्येकाला स्वतंत्र मते आहेत आणि ती निर्भीडपणे मांडली जात आहेत हेदेखील त्याला जाणवले. टॉकव्हिलला त्या समाजात कमालीचा व्यक्तिवाद जाणवला. टॉकव्हिलने पाहिलं, की तिथं लोकांना स्वत:च्या बुद्धीने विचार करायला, अडचणींवर स्वत:च तोडगा काढायला प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे नवनवीन गोष्टी शोधण्याची, व्यावहारिक समस्येवर झटपट तोडगा काढण्याची संस्कृती झपाट्याने फोफावते आहे. टॉकव्हिल अमेरिकेच्या प्रेमात पडत गेला. पण त्याला त्या समतेच्या, व्यक्तिस्वातंत्र्याच्या मूल्याबरोबरच त्याच मूल्यांना धोका उत्पन्न करणारी, लोकशाही धोक्यात आणू शकणारी एक प्रक्रियादेखील जाणवली. हा देश भविष्यात बहुसंख्याकांच्या जुलमी सत्तेचा अंकित होऊ शकतो, (tyranny of majority) हा गंभीर धोका टॉकव्हिलला जाणवला.
व्यक्तिवादी देशाचे बहुसंख्याकांच्या हुकूमशाहीत रूपांतर कसे होऊ शकते? टॉकव्हिलला दिसले ते असे की अमेरिकेतील माणूस व्यक्तिवादी, आपल्या स्वातंत्र्याला जपणारा जसा आहे तसाच तो सार्वजनिक जीवनात हिरिरीने सहभागी होणारादेखील आहे. गावातील म्युन्सिपालिटी, टाऊन हॉल आणि अनेक स्थानिक सार्वजनिक संस्थांत लोकांचा सहभाग मोठा आहे असे त्याला आढळले. आणि या संस्थांची निर्णयप्रक्रिया लोकशाही प्रक्रियेप्रमाणे बहुमताने होत होती. टॉकव्हिलला अमेरिकेचे अनोखेपण दिसले ते व्यक्तिवाद आणि आपल्या मताला मुरड घालून बहुमताच्या निर्णयाला मान्यता देण्याची वृत्ती या दोन एकमेकांना छेद देणाऱ्या प्रवृत्तीच्या संतुलनात. लोकांमध्ये स्वतंत्र बाणा जसा होता तसेच सार्वजनिक जीवनातील सहभागामुळे आपले मत बाजूला ठेवून बहुमताला पाठिंबा देण्याची प्रवृत्त देखील त्याला या लोकांमध्ये आढळली. आणि हे संतुलन ढासळले तर या कल्पनेने तो अस्वस्थ झाला. अगदी स्वतंत्र बाण्याच्या, स्वातंत्र्यप्रिय व्यक्तींनादेखील बहुमताच्या स्वरात स्वर मिसळण्याचा मोह होऊ शकतो. असे केल्याने व्यक्तीला एक प्रकारची मानसिक सुरक्षा लाभते. स्वतंत्र विचाराची व्यक्ती लोकशाहीत बहुमताने चालणाऱ्या संस्थांच्या कारभारात उत्साहाने सहभागी होण्याची प्रेरणा बाळगते आणि त्याच प्रेरणेचा भाग म्हणून स्वत:ची विचारक्षमता बहुसंख्याकांच्या चरणी अर्पण करू शकते. आणि त्यामुळे या निर्णयप्रक्रियेत अल्पसंख्याक ठरलेल्या लोकांचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते ही टॉकव्हिलची मोठी अंतर्दृष्टी. आज अमेरिकेत बहुसंख्याकवादामुळे व्यक्तिस्वातंत्र्यालाच मोठा धोका निर्माण झाला आहे. टॉकव्हिलने व्यक्त केलेली भीती प्रत्यक्षात आली आहे.
पण अमेरिकेत ही प्रक्रिया आजच का घडली, याआधी का नाही घडली या प्रश्नाने आज जगातील लोकशाहीचे अभ्यासक त्रस्त आहेत. एक काहीसे सर्वमान्य कारण आहे. ते म्हणजे गेल्या काही दशकांत अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर वाढलेली आर्थिक विषमता. साठच्या दशकातील ‘अमेरिकन ड्रीम’ ही अमेरिकेची अशी प्रतिमा होती की इथे अत्यंत गरीब माणूसदेखील स्वत:च्या प्रयत्नाने श्रीमंत होऊ शकतो. आणि तशी अनेक उदाहरणे तेव्हा दिसायची. पण विषमता वाढली आणि खालच्या आर्थिक थरातून वर जाण्याचा मार्ग उत्तरोत्तर अरुंद होत गेला. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत अमेरिकेचे उत्पादनक्षेत्र देशाबाहेर गेले, लोकांच्या नोकऱ्या गेल्या. असंतोष वाढत गेला. आणि मग ट्रम्पना आपल्या समर्थकांना हे सांगणे सोपे गेले की ‘जगाने आजवर आपल्याला लुटले आहे. आपले अनेक उद्याोग बेचिराख केले आहेत.’ (ट्रम्प यांचे नेमके शब्द आहेत हे). आणि ‘दोन एप्रिल हा अमेरिकेचा मुक्ती दिन आहे कारण आज आपण आयात काराच्या या भिंती उभारून जगाकडून होणारी ही लूट थांबवत आहोत. अमेरिकेला आता आपण पुन्हा श्रीमंत करणार आहोत’.
ट्रम्प यांच्या अनेक दाव्यांत असत्ये आणि अतिशयोक्ती आहे. अमेरिकेच्या श्रीमंतीचे एक कारण अमेरिकेच्या खुल्या व्यापार धोरणात आहे. अमेरिका मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्रातील संशोधनात आणि म्हणून ज्ञाननिर्मितीत जगात प्रथम स्थानावर असण्याचे, म्हणजेच विश्वगुरू असण्याचे, एक कारण म्हणजे या देशाने जगातील सर्व देशांतील सृजनशील लोकांचे आपल्या देशात स्वागत केले. आज आपल्या संकुचित विचारसरणीने अमेरिकेत रुजू पाहणारा बहुसंख्याकवाद ही समृद्धीची प्रक्रियाच उलटी फिरवत आहे. म्हणून या निर्णयाचा फटका जगाला तर आहेच पण तो अमेरिकेसाठी आत्मघातकीदेखील आहे.
पण आज भारतासकट अनेक पश्चिमी लोकशाही देशांत बहुसंख्याकवाद प्रभाव गाजवते आहे. त्या देशातील बहुसंख्याक लोकांना सदैव अन्यायग्रस्त आणि म्हणून आक्रमक ठेवण्यात त्या त्या ठिकाणच्या जनतेचे सवंग अनुरंजन करणारे (पॉप्युलिस्ट) नेते यशस्वी होताना दिसत आहेत. याचे कारण काय? पश्चिमी देशात वाढती आर्थिक विषमता हे एक कारण समान आहे. पण भारताचे काय? इथे टोकाची विषमता पूर्वीपासूनच आहे. आज समजा टॉकव्हिल असता तर त्याने भारतासंदर्भात या प्रश्नाचे काय उत्तर दिले असते?
तो म्हणाला असता, ‘‘अमेरिकी समाजाचे विश्लेषण तसे सोपे होते. त्या देशाने कधी जमीनदारी अनुभवली नव्हती. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला मला दिसलेल्या अमेरिकी माणसाला सरंजामी मानसिकतेचा स्पर्श न झालेला नव्हता. कुणापुढे तरी आपण वाकावे आणि कुणाला तरी आपल्यापुढे वाकवावे ही वृत्ती मला अमेरिकेत दिसली नव्हती. तुम्हा भारतीयांचे तसे नाही. फार मोठा काळ तुम्ही सरंजामी व्यवस्थेत होता. आणि आजही तुमचा मोठा समाज सरंजामशाहीच्या प्रभावाखाली आहे. त्यात भर तुमच्या जातीय उतरंडीची, सामाजिक विषमतेची. आणि टोकाची आर्थिक विषमता तर तुमच्या पाचवीला पुजलेली. त्यामुळे तुम्ही नेहमी मानसिकदृष्ट्या असुरक्षित असता. सामाजिक संकेतानुसार यशस्वी, श्रीमंत, उच्चपदस्थ अशा व्यक्तीपुढे तुम्ही नेहमी झुकता. त्यांच्याकडून मान्यता मिळवण्याची तुमची आस मोठी तीव्र असते. तुम्ही बहुसंख्याकवादाच्या विळख्यात का अडकला असावात? त्याचे कारण असे तर नाही ना, की जीवनाच्या सर्व पातळीवर मोठी विषमता अनुभवणाऱ्या तुमच्या हातात एकदम इंटरनेट आला. समाजमाध्यमे आली. तुम्हाला कोणत्याही प्रसिद्ध, यशस्वी माणसाच्या फेसबुकच्या पानावर, ट्विटरवर प्रतिक्रिया देता यायला लागली, बॉलीवूडच्या ताऱ्यांचे, तारकांचे पंचतारांकित आयुष्य तुम्हाला खूप जवळून बघता आले. देशातील सर्वात श्रीमंत उद्याोगपतीच्या घरी महिनोंमहिने चालणारा विवाह सोहळा तुम्हाला तुमच्या हातातील मोबाइलमध्ये बघता आला. एका अर्थाने तो उद्याोगपती तुम्हा सर्वसामान्य भारतीयांच्या भावविश्वाचा भाग बनला. आणि तोच उद्याोगपती अगदी सर्वसामान्य गरीब भारतीयांप्रमाणेच प्रयागराजच्या कुंभमेळ्यात स्नान करताना तुम्हाला दिसला. तुम्हाला धार्मिक कर्मकांडात मुक्तिदायी समतेचा भास झाला. जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी असलेल्या कुटुंबाला आणि सर्वसामान्य भारतीयाला समाजमाध्यमाने एकाच पातळीवर आणले. या सगळ्याने तुम्हाला त्या श्रीमंत, यशस्वी लोकांपासूनचे आपले अंतर कमी झाल्याचा भास निर्माण झाला. पण असा भास निर्माण झाला तरी अनेक प्रकारची विषमतेची खाई तुम्हाला अस्वस्थ करत होती. कारण तेच सत्य आहे. या सत्याच्या पार्श्वभूमीवर ही भासमान समता तुम्हाला पेलवेनाशी झाली. शिवाय मला २०० वर्षांपूर्वी दिसलेल्या अमेरिकन माणसामधील स्वतंत्र बाण्याचा तर तुमच्यात मुळातच अभाव आहे. तुमच्यापेक्षा यशस्वी, उच्चवर्गीय, उच्चवर्णीय लोकांकडून मान्यता मिळवण्यासाठी चाललेली तुमची धडपड तुम्हाला बहुसंख्याकवादात मानसिक सुरक्षा देणार हे स्वाभाविक नाही का? तुमच्या सामाजिक, आर्थिक विषमतेकडे डोळेझाक करून तुम्ही तुमच्या देशाच्या अल्पसंख्याक समूहाला आपले लक्ष्य केले. आपल्यातील न्यूनगंडाचा, आपण कमी आहोत या जाणिवेचा त्रास कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे कोणाला तरी कमी लेखणे. त्यात स्वत:चे उन्नयन झाल्याचा भास होतो. ती भावना तुम्ही अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करून मिळवू लागलात. त्यात तुम्हाला तुमच्याच धर्मातील उच्चवर्गीय, उच्चवर्णीय लोकांकडून मान्यता मिळवण्याचा मार्ग सापडला. नाही पटत तुम्हाला? बघा ना तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सदैव द्वेष निर्माण करणारे मेसेजेस कोण टाकतोय ते? त्यात जीवनाच्या संघर्षात आपण मागे पडलो आहोत अशी भावना असणारा भारतीय अग्रेसर नाही दिसत? जातीय उतरंडींचे किंवा आर्थिक परिस्थितीचे शल्य आणि कमीपणा उरी बाळगणारा माणूस द्वेष पसरवण्यात आघाडीवर नाही दिसत? तो माणूस अल्पसंख्याक समाजाबद्दल द्वेष व्यक्त करून उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय लोकांबरोबर भ्रामक समता अनुभवताना तुम्हाला नाही दिसत?’’
२०० वर्षांपूर्वी जगातील सर्वात बलढ्य लोकशाहीपुढील भविष्यातील धोक्याचे मर्मभेदी विश्लेषण करणारा टॉकव्हिल आज जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीपुढील बहुसंख्याकवादाच्या हुकूमशाहीच्या धोक्याबद्दल कदाचित अशा अर्थाचे काही म्हणाला असता.
milind.murugkar@gmail.com