शहाजी उमा बाजीराव मोरे
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकल्यापासूनच अमेरिकेतील शास्त्रज्ञ, संशोधक विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा पहिला कार्यकाल (२०१७ – २०२१) अमेरिकन वैज्ञानिकांना, संशोधक विद्यार्थ्यांना व पर्यावरणाशी संबंधित संस्थातील वैज्ञानिकांना फार त्रासदायक होता. त्यामुळे २०१७ मध्ये अमेरिकेत बहुतेक सर्व मोठ्या शहरात जोरदार निदर्शने (मार्च फॉर सायन्स) करण्यात आली होती. त्यामुळेच ट्रम्प सत्तेवर येणार हे निश्चित झाल्यावर हे सर्व चिंताग्रस्त झाले होते.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पदग्रहण करताच अनेक विशेषाधिकार वापरून अमेरिकेतील अनेक वैज्ञानिक संशोधन केंद्रे व विद्यापीठांचे अनुदान थांबविले, त्यांचे पुनर्विलोकन करून नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार पुढील दिशा निश्चित होणार आहे. नुकतेच हॉर्वर्ड विद्यापीठाचा २.२ अब्ज डॉलर्सचा निधी थांबविला आहे. अनेक वैज्ञानिक संशोधन संस्था, विद्यापीठे यांमधील अनेक पदे अतिरिक्त ठरवून त्यांच्या सेवा खंडित केल्या. त्यातील काहींना परत घेतले असले तरी अनेकांवर घाव घातले गेलेच!
अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्था किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (एन. आय. एच.) मधील तब्बल दहा हजार पदे रिक्त करून टाकली. एन. आय. एच. मध्ये अमेरिकेत सुमारे तीन लक्ष शास्त्रज्ञ, डॉक्टर्स व इतर विविध पदावर काम करीत आहेत. या राष्ट्रव्यापी संस्थेचे अब्जावधी डॉलर्सचे अनुदान कमी करण्यात आले आहे. विशिष्ट प्रकारचे – पर्यावरण विज्ञान, वातावरण विज्ञान (कलायमेट सायन्स) व पारलिंगींचे आरोग्य इ. विषयीचे संशोधन थांबविण्यात आल्याचे व्हाईट हाऊसने जाहीर केले आहे.
गेले जवळजवळ शतकभर अमेरिका विज्ञान-तंत्रज्ञान व संशोधन यामध्ये निर्विवादपणे जगाचे नेतृत्व करीत झाली आहे. सध्या चीन अमेरिकेच्या स्थानाला काही बाबतीत आव्हान देत असला तरी अजून तरी अमेरिका याबाबतीत शिखरावरच आहे असे म्हणता येते. परंतु ट्रम्प महादेयांनी सत्ताग्रहण केल्यापासून विज्ञान-तंत्रज्ञान व संशोधन यामध्ये अमेरिकेस खाली ढकलणारा चीन असेल किंवा नसेल परंतु ट्रम्प आणि इलॉन मस्क हे व त्यांची विज्ञानविरोधी धोरणे निश्चित असतील.
१९४० पूर्वी अमेरिकेची विज्ञान – तंत्रज्ञानात फारशी प्रगती नव्हती. फ्रॅंकलीन रूझवेल्ट या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिका विज्ञान तंत्रज्ञानात महासत्ता होण्यासाठी दूरदृष्टीने प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी विज्ञान संशोधन व विकास कार्यालय उभारले व एम.आय.टी. चे माजी डीन व्हन्नेवार बुश यांना त्याचे प्रमुख म्हणून नेमले. काही वर्षात या संस्थेकडून मलेरिया विरोधी औषध, फ्लू विरोधी लस, पेनिसिलीन निर्माण मोठ्या प्रमाणात निर्माण करण्याची तंत्रे विकसित करण्यात आली. सर्वात महत्वाचे म्हणजे या बुश यांनीच जर्मनीपासून संभाव्य अणुबॉम्ब बनविण्याचा धोका ओळखून फ्रॅंकलीन रूझवेल्ट यांना सूचित केले होते. त्यातूनच मॅनहटन प्रकल्प उभा राहीला व अणुबॉंबची निर्मिती झाली. या काळात व नंतरही जगभरातले अनेक प्रज्ञावान अमेरिकेने आपलेसे केले व या प्रज्ञावंतानीही अमेरिकेस शिखरस्थानी पोहोचविले. बुश यांच्या पुढाकाराने पुढे नॅशनल सायन्स फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. बुश यांनी, ‘वैज्ञानिक प्रगतीशिवाय इतर क्षेत्रात कितीही प्रगती झाली तरी आरोग्य, समृध्दी व सुरक्षितता यांची हमी देता येत नाही’ असे त्यांनी लिहून ठेवले आहे.
बुश यांच्या दृष्टिकोनामुळेच अमेरिका जवळजवळ शतकभर वैज्ञानिक संशोधनात शिर्षस्थांनी राहू शकली. मध्यवर्ती सरकारने अनुदानित केलेले संशोधनच देशाची चौफेर प्रगती साधू शकते हे दाखवून दिले. त्यामुळेच अमेरिकने आतापर्यंत प्रत्येक क्षेत्रात प्रचंड झेप घेतली आहे. इंटरनेट, क्रिस्पर तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दीमत्ता, एम. आर. एन. ए. लसी, ही अगदी अलिकडची काही वानगीदाखल उदाहरणे. गेल्या सुमारे १०० वर्षात अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ द्वारा किती औषधांविषयी संशोधन झाले व किती प्रत्यक्षात आली याला गणतीच नाही.
आता मात्र ट्रम्प आणि त्यांचे सहकारी उलट्या दिशेने प्रवास करीत आहेत. ट्रम्प यांचे एक सहकारी इलॉन मस्क यांच्याकडे अतिशय महत्वपूर्ण जबाबदारी दिली असून तेथे त्यांचा अतिरेक चालू आहे. विज्ञान, संशोधन, आरोग्य, पर्यावरण इ. विषयी होणारा खर्च त्यांना व पर्यायाने ट्रम्य यांना अनाठायी वाटतो, उधळपट्टीच वाटते. त्यामुळे त्यांनी या विषयींच्या क्षेत्रातील अनेक प्रकल्पांचे निधी गोठविले आहेत. अनेक अधिकाऱ्यांना,कामगारांना तुमच्या सेवेची आवश्यकता नसल्याचे सांगून दूर केले आहे. भरीस भर म्हणजे आरोग्य विषयाशी कसलाही संबंध नसणाऱ्या रॉबर्ट केनेडी या कोविड लसींविषयी शंका घेणाऱ्या व्यक्तीची केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचे एक एक उपाय पाहून आपल्याकडील भोंदू डॉक्टर बरे वाटावे अशी परिस्थिती आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या अवकृपेच्या तडाख्यातून जगातील प्रमुख अंतरिक्ष संशोधन संस्था ‘नासा’ (नॅशनल एरॉनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन) ही सुटू शकली नाही. ट्रम्प यांच्या आदेशानुसार नासाने तीन कार्यालये बंद करीत असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये नासाच्या प्रमुखांच्या सल्लागाराचे, ऑफीस ऑफ द चिफ सायंटीस्ट, ऑफीस ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिसी अँड स्ट्रॅटेजी व ऑफीस ऑफ डायव्हर्सिटी अँड जनरल अपॉर्चुन्युटीचे काही विभाग आहेत. त्यामुळे प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांसह एकूण २० – २३ जणांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विज्ञान संशोधन विरोधी धोरणांमुळे व कार्यकारी आदेशांमुळे अमेरिकन विज्ञान जगत कमालीच्या ताणाखाली आहे. याचा परिपाक म्हणजे अमेरिकेतील अनेक शहरात व युरोपमधील काही शहरात ७ मार्च रोजी मोर्चे, निदर्शने काढण्यात आली, त्यांना सर्वत्र उत्तम प्रतिसाद न लाभता तरच नवल!
ट्रम्प यांच्या अशैक्षणिक,अवैज्ञानिक धोरणास कडाडून विरोध करण्यासाठी अमेरिकेतील १९०० शास्त्रज्ञ, सर्व राष्ट्रीय विज्ञान अकादमींचे सदस्य, अभियंते, डॉक्टर्स यांनी अमेरिकन नागरिकांना उद्देशून लिहिलेले एक पत्र प्रसिद्धीस दिले आहे.
या पत्रात हे १९०० शास्त्रज्ञ, डॉक्टर्स अभियंते म्हणतात, ‘गेल्या ८० वर्षाहून अधिक काळ अमेरिकन सरकारच्या सूज्ञ गुंतवणूकीमुळे जगाला हेवा वाटावा असे संशोधन उपक्रमांचे साम्राज्य देशात उभे राहू शकले. ट्रम्प प्रशासन या उपक्रमांच्या निधी कपातीने, अनेक लोकांना नोकरीवरून काढून, विज्ञान – संशोधनाची विदा (डेटा) नाहीशी करून व अनेक शास्त्रज्ञांवर त्यांना हवे ते संशोधन करू न देता दबाव आणून वेगळ्या संशोधनासाठी प्रवृत्त करून अस्थिर करीत आहे. अमेरिकेतील विज्ञान – तंत्रज्ञान व त्यातील संशोधन मोडकळीस आणले जात आहे.’ या पत्रावर सह्या करणाऱ्या १९०० शास्त्रज्ञ, अभियंते, डॉक्टर्स यांनी अमेरिकन जनतेने अमेरिकन संसदेकडे (कॉंग्रेस) विज्ञानासाठी मिळणाऱ्या निधीचे संरक्षण करण्यासाठी आवाहन करावे, अशी विनंती केली आहे.
१९०१-२०२४ या सव्वाशे वर्षांच्या कालावधीत विज्ञानातील एकूण ६५३ नोबेल विजेत्यांपैकी तब्बल २८१ (४३ टक्के) नोबेल विजेते शास्त्रज्ञ अमेरिकेन आहेत. २०१९ पर्यंत सर्वाधिक व शोधनिबंध प्रसिध्द करणाऱ्या देशाच्या ( सध्या चीन ) च्या संशोधनास खीळ घातल्यास त्याचे परिणाम संपूर्ण जगावर होणे अटळ आहे. चीनने कितीही प्रगती केली तरी त्याच्या संशोधनाचे फायदे जगाला किती होतात हा एक प्रश्नच आहे.
ट्रम्प व मस्क यांना गुंतवणूकीतून तात्काळ व प्रचंड परतावा हवा आहे. परंतु विज्ञान संशोधनातील गुंतवणूक तात्काळ परतावा कशी देऊ शकेल ? येथे गुंतवणूक किती व परतावा किती असा प्रश्न कोणी कधी करू नये. पूर्वीच्या राष्ट्रप्रमुखांनीही केला नाही. विज्ञान क्षेत्रात गुंतवणूक केली जाते कारण आपण तिच्यापासून ज्ञानरूपी, आरोग्यदायी औषधरुपी, तंत्रज्ञान सुविधारुपी, क्षमतारूपी परतावा मिळावा म्हणून!
परंतु ट्रम्प आणि मस्क यांना कोण सांगणार?
यापूर्वी अनेक राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेस ग्रेट बनविण्याचे कार्य केले आहे तेही ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन!’ असे न म्हणता, परंतु प्रामाणिकपणे !
shahajibmore1964@gmail.com