शैलेश परुळेकर
सिद्धार्थ सूर्यवंशी या अभिनेत्याचा वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी व्यायाम करताना मृत्यू झाला आणि योग्य पद्धतीने व्यायाम न केल्यामुळे किंवा झटपट शरीर कमावण्यासाठी औषधे वा इंजेक्शन्स घेतल्यामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. सिद्धार्थ सेलिब्रिटी होता म्हणून त्याच्या अशा आकस्मिक मृत्यूची चर्चा तरी झाली, मात्र आकर्षक दिसण्याच्या वेडापोटी शरीरावर अशास्त्रीय प्रयोग करून आजार किंवा मृत्यू ओढवून घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे.
गेल्या काही वर्षांत जिममध्ये व्यायाम करताना तरुण वयात ‘हार्ट अटॅक’ किंवा ‘कार्डिॲक अरेस्ट’मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. सिद्धार्थने मृत्यूपूर्वी इन्स्टाग्रामवर केलेली शेवटची पोस्ट ही एका सप्लिमेन्टची जाहिरात करणारी होती. त्या पार्श्वभूमीवर ‘एफडीए’ने आपला मोर्चा जिमकडे वळवला. एका जिमवर छापा टाकून तिथे विनापरवाना विक्रीसाठी ठेवलेली औषधे व इंजेक्शन्स जप्त केली. त्या जिमची, जिमच्या मालकाची चौकशी होईल, त्यावर योग्य ती कारवाईही होईल. मग आपण नेहमीप्रमाणे आपल्या रोजच्या धावपळीत ही घटना विसरून जाऊ. म्हणजे समस्येच्या वरवर दिसणाऱ्या लक्षणांवर इलाज होईल. पण मूळ समस्येकडे दुर्लक्ष होईल.
नवीन वर्ष तोंडावर आले आहे. बरेच जण व्यायाम सुरू करण्याचा, त्यासाठी ‘जिम जॉइन’ करण्याचा संकल्प करतात. या पार्श्वभूमीवर व्यायाम सुरू करतान किंवा जिममध्ये जाण्याचा निर्णय घेताना काय काळजी घेतली तर नंतर काळजी करावी लागणार नाही ते पाहूया…
व्यायाम सुरू करण्यापूर्वी खालील प्रश्नांची स्वत:लाच प्रामाणिक उत्तरे द्या.
१. तुमची जीवनशैली बैठी कामे करण्याची आहे का?
२. तुम्हाला जिने चढताना धाप लागते का?
३. तुमच्या जेवणाच्या वेळा अनियमित आहेत का?
४. आहारात मैदा किंवा जंक फूडचे प्रमाण जास्त आहे का?
५. तुम्हाला रोज किमान सात ते आठ तास झोप मिळते का?
६. तुम्ही धूम्रपान करता का?
७. तुम्ही मद्यपान करता का आणि किती?
८. तुम्ही लठ्ठ आहात का?
९. तुम्हाला ऑसिडिटी, बद्धकोष्ठ किंवा पचनसंस्थेशी निगडित काही समस्या आहेत का?
१०. तुम्हाला मधुमेहाचा त्रास आहे का?
११. तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे का?
१२. तुमच्या रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढती आहे का?
१३. तुमच्या कुटुंबात कोणाला गंभीर (आनुवंशिक) आजार आहेत का?
१४. तुम्ही नेहमी मानसिक तणावाखाली असता का?
१५. आणि सर्वात महत्त्वाचे, तुम्हाला कमीतकमी वेळेत पीळदार शरीर कमवायचे आहे का? तुम्ही ‘पी हळद आणि हो गोरी’ यावर विश्वास ठेवता का?
वरीलपैकी काय शरीरासाठी उत्तम आहे, काय धोकादायक आहे, कोणती काळजी घ्यायला हवी, हे प्रत्येकालाच माहीत असते, पण त्याची गांभीर्याने अंमलबजावणी करणारे थोडकेच. व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने २डी इको, ईसीजी आणि लिपिड प्रोफाइल या चाचण्या करून घ्या. ‘जिममधील सप्लिमेंट्सचा वाढता वापर आणि त्याचे परिणाम’ हा या लेखाचा विषय असल्यामुळे त्यावर चर्चा करूया…
भारतीय बाजारपेठेत १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात सप्लिमेंट्सचा शिरकाव झाला. प्रोटिन पावडर, प्रोटिन बार, प्री-वर्कआऊट ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, वजन कमी करण्याच्या गोळ्या, वजन वाढवण्यासाठी मास गेनर्स क्रिएटिन, ग्लुटामाइन, बीसीएए ही जास्त मागणी असलेली सप्लिमेंट्स आहेत. सप्लिमेंट्स आणि अपिअरन्स अँड परफॉर्मन्स एन्हान्सिंग ड्रग्ज (एपीईडीज) यात फरक असतो. तरीही ती अनेकदा एकत्र घेतली जातात. काही सप्लिमेंट्समध्ये प्रतिबंधित पदार्थ मिसळलेले असतात. त्यामुळे तुम्हाला कमी वेळेत आश्चर्यकारक परिणाम दिसू लागतात.
ॲनाबोलिक अँड्रोजेनिक स्टिरॉइड्स, टेस्टोस्टेरॉन, ह्युमन ग्रोथ हॉर्मोन्स (एचजीएच), ईपीओ (लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी), स्टिम्युलन्ट्स, डायरेक्टिक्स ही सर्व अपिअरन्स अँड परफॉर्मन्स एन्हान्सिंग ड्रग्ज या सदरात मोडतात. यांचा अल्पकालीन किंवा दीर्घकालीन वापर शरीरासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे ती जवळ बाळगणे, त्यांची विक्री करणे आणि त्यांचा वापर करणे हा गुन्हा आहे. त्यामुळेच उत्तेजक द्रव्य चाचणीमध्ये खेळाडू दोषी आढळल्यास त्याला स्पर्धेतून बाद करण्यात येते आणि किमान चार वर्षांची बंदी घातली जाते. पूर्वी फक्त व्यावसायिक खेळाडूच सप्लिमेंट्स किंवा एपीईडीजचा वापर करत. आता मात्र हौशी खेळाडू, शाळा- महाविद्यालयांतील खेळाडू, सर्वसामान्य तरुण-तरुणीदेखील फक्त सुंदर दिसण्यासाठी यांचा सर्रास दुरुपयोग करतात.
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे चित्रपट, टीव्ही आणि समाजमाध्यमांचा वाढता प्रभाव. चित्रपटांत दिसणारे तारे- तारका, जाहिरातीत दिसणारे मॉडेल्स, आंतरराष्ट्रीय खेळाडू यांना बघून सर्वसामान्य तरुण-तरुणींच्या मनात स्वत:बद्दल, स्वत:च्या शरीराबद्दल अवास्तव अपेक्षा निर्माण होतात. मग तसे दिसण्यासाठी वेगळाच आटापिटा सुरू होतो. अनेकदा तसे शरीर प्राप्त करण्यासाठी त्या कलाकारांनी आणि खेळाडूंनी वर्षानुवर्षे केलेली मेहनत घेण्याची तयारी नसते. आजच्या अतिशय वेगवान युगात सर्वांना सारे काही झटपट हवे असते. फिटनेस कमावण्यापेक्षा विकत घेण्याकडे कल वाढतो. मग ३० दिवसांत ‘बॉडी ट्रान्सफॉर्मेशन’सारखे प्रयोग सुरू होतात. संतुलित आहाराऐवजी सप्लिमेंट्सचा वापर सुरू होतो. शास्त्रशुद्ध व्यायाम, पुरेशी विश्रांती याऐवजी घातक स्टेरॉइड्स, एनर्जी ड्रिंक्स, रिकव्हरी ड्रिंक्सचा अनियंत्रित वापर सुरू होतो.
दुर्दैव हे, की अनेकदा ही सप्लिमेंट्स, गोळ्या, इंजेक्शन्स व्यायाम प्रशिक्षकाकडून किंवा मित्रांकडून सुचविली जातात. आपण डेन्टिस्ट, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, डॉक्टर्स, डाएटिशन यांसारखे आरोग्यसेवा पुरवठादार नाही, हे सर्व व्यायाम प्रशिक्षकांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्यांनी व्यायामाव्यतिरिक्त इतर कुठलाही सल्ला देऊ नये आणि व्यायाम करणाऱ्यांनी तो घेऊही नये. एखाद्या जीवनसत्त्वाच्या किंवा क्षाराच्या शरीरातील कमतरतेमुळे जेवढे नुकसान होते त्यापेक्षा अधिक नुकसान ते घटक अधिक प्रमाणात घेतल्यास होते. त्यामुळे सप्लिमेंट्स घ्यायचीच असतील तर डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञाच्या सल्ल्यानेच घ्यावीत. सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी काही गोष्टींची खातरजमा करून घेणे गरजेचे आहे.
१. सप्लिमेंट्सची खरोखरच गरज आहे का?
२. तिचे फायदे काय आहेत?
३. संभाव्य धोके काय आहेत?
४. किती प्रमाणात घ्यावे?
५. किती काळ घ्यावे?
६. कधी थांबवायचे?
एपीईडीच्या वापरामुळे यकृताचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, हृदयरोग, उच्च रक्तदाब, हाडे ठिसूळ होणे, रक्ताच्या गुठळ्या होणे, वंध्यत्व, रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी धोकादायक प्रमाणात वाढणे, पुरुषांच्या स्तनांचा आकार मोठा होणे, म्हणजेच गायनीकोमॉस्टिया, स्त्रियांमध्ये मासिक पाळी अनियमितपणे येणे, चेहऱ्यावर केस येणे यांसारख्या अनेक शारीरिक व्याधी होऊ शकतात. या व्यतिरिक्त नैराश्य, चिंता, भीती, आत्मविश्वासाची आणि आत्मसन्मानाची कमतरता, व्यसनाधीनता, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागणे असे अनेक मानसिक आजारदेखील होतात.
ॲनोरेक्सिया नर्वोसा म्हणजे अतिशय बारीक दिसण्याचा अट्टहास हा मानसिक आजार स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. तर मसल डायस्मॉर्फिया म्हणजे शरीर खूप पीळदार करण्याचा किंवा अगदी बारीक दिसण्याचा अट्टहास हा मानसिक आजार तरुण मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो. वरील सर्व धोक्यांचा विचार केल्यास कुठलाही खरा मित्र किंवा चांगला व्यायाम शिक्षक तुम्हाला एपीईडीज वापरण्याचा सल्ला देणार नाही. गूगल सर्च करून स्वत:वर किंवा इतरांवर कुठलेही प्रयोग करू नयेत.
आपल्या मुलांना अशा प्रकारचे आजार होऊ नयेत, झाले असल्यास ते लवकर निदर्शनास यावेत आणि त्यातून मुलांना लवकर बाहेर काढता यावे, यासाठी पालकदेखील महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मुले या चक्रात अडकत असल्यास काही लक्षणे दिसतात. त्यावर लक्ष ठेवावे लागेल. मुलामध्ये कमी वेळेत आश्चर्यकारक बदल जाणणे, शरीर कमालीचे पीळदार दिसू लागणे, वजन झटपट वाढणे किंवा कमी होणे, अंगावर पुरळ येणे, स्वभाव जास्त आक्रमक होणे, कमी वेळेत खेळात मोठा सकारात्मक बदल दिसणे, दिवसाला काही डझन अंडी आणि काही किलो चिकन फस्त होणे, सप्लिमेंट्सवर प्रमाणाबाहेर पैसे खर्च होऊ लागणे, अशी लक्षणे दिसल्यास आपले मूल सप्लिमेंट्स किंवा एपीईडीजच्या विळख्यात अडकले आहे, हे लक्षात घ्यावे. समुपदेशनासाठी योग्य आणि प्रशिक्षित व्यक्तीकडे न्यावे. शॉर्टकटमुळे फायदे झटपट दिसू लागतात, पण ते क्षणभंगुर असतात. शरीर कमवण्यापेक्षा जीव गमावण्याचा धोका अधिक असतो. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती, मानसिक तणावाचे नियोजन, निरोगी नातेसंबंध या पंचसूत्रीने शारीरिक, बौद्धिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य उत्तम ठेवता येते. त्यासाठी जगातील कुठल्याही सप्लिमेंटची गरज नाही.
(लेखक व्यायाम प्रशिक्षक आहेत.)
abhisheksp92@gmail.com