ब्रिटिश वासाहतिक सत्ता भारतात स्थिरावल्यानंतर शिक्षण हळूहळू सार्वत्रिक होऊ लागले. त्यामुळे मध्ययुगीन जातिव्यवस्था आणि बुद्ध, चार्वाक काळानंतर थांबलेल्या धर्म चिकित्सेला या नवशिक्षित मंडळींकडून येथे प्रारंभ झाला. हिंदुधर्मशास्त्रातील ईश्वरवाद, अवतारवाद, अध्यात्मवाद, ग्रंथप्रामाण्य आणि पुरोहितवर्चस्व यांच्या चिकीत्सेची सुरुवात झाली. त्या अनुषंगाने ‘निरीश्वरवादी धर्म’ ही संकल्पना बाबासाहेब पुढे आणतात. निरीश्वरवादी धर्म असू शकतो हे ठसविणे हा बाबासाहेबांचा ‘धर्म’ व ‘धम्म’ या दोन्ही संकल्पनांत फरक करण्यामागील प्रमुख हेतू होता. बहुतेक युरोपियन ईश्वरशास्त्रज्ञ हे ईश्वरवादी धर्मालाच धर्म मानायला तयार होते आणि निरीश्वरवादी पंथ हा त्यांच्या दृष्टीने धर्म ठरत नव्हता, परंतु यावर ‘निरीश्वरवादी धर्म असू शकतो’ हे ठासून सांगणे हेही एक उत्तर असू शकते. ईश्वरवादी धर्मात माणूस आणि ईश्वर यांचा संबंध हा केंद्रस्थानी असतो, तर माणूस आणि माणूस यांचा संबंध दुय्यम किंवा अनुषंगिक असतो. धम्मात माणूस आणि माणूस यांच्यातला याच जगातला सदाचाराचा, मैत्रीचा, प्रेमाचा संबंध केंद्रस्थानी असतो, आणि ईश्वर, ब्रह्म, परलोक यासारख्या गोष्टींना त्यात एकतर दुय्यम स्थान असते किंवा नसतेच.
युरोपीय वर्गसमाजातील ईश्वर-संकल्पनेने धर्मव्यवस्थेत बजावलेली भूमिका आणि भारतीय वर्णजाती समाजात ईश्वरसंकल्पनेने बजावलेली भूमिका यात गुणात्मक फरक आहे. युरोपतील ‘ईश्वर’ वर्गसमाजातील शास्त्रवर्गाच्या हितरक्षणासाठी प्रेषिताच्या रूपातून अवतार घेतो, परंतु त्याच्यापुढे जन्मसिद्ध जातींच्या रक्षणाची जबाबदारी नसल्यामुळे कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्मसिद्धांत यांना गती देणारी चालक शक्ती म्हणून भूमिका बजावण्याची आपत्ती त्याच्यापुढे येत नाही. भारतातील ‘ईश्वर’ हा वर्ण व जाती या जन्माधिष्ठित संस्थांच्या रक्षणासाठी अवतार घेतो. तो जन्मसिद्ध वर्णजातिव्यवस्था उचलून धरण्यासाठी शास्त्रे, वर्ण वा जाती तसेच कर्मसिद्धांत व पुनर्जन्म सिद्धांत जनमानसाच्या मनावर ठसवतो. भारताच्या धार्मिक, सामाजिक परिस्थितीतील ही वैशिष्ट्यपूर्णता लक्षात घेतल्यामुळे बाबासाहेबांना निरीश्वरवादी धर्माची प्रस्थापना करणे आवश्यक ठरो. म्हणून त्यांच्या २२ प्रतिज्ञांतील एक महत्त्वाची प्रतिज्ञा आहे की, ‘मी हिंदू धर्माचे राम, कृष्ण, विष्णू असे देव मानणार नाही.’
वर्णजातिव्यवस्था तिच्या जन्मसिद्धतेमुळे बंदिस्त असते, त्यातून राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील बंदिस्त एकाधिकारशाहीचा पाया तयार होतो. या एकाधिकारशाहीत बदलत्या पिढ्यांबरोबर सातत्य राखले जायचे असेल, एकाधिकारशाहीच्या विरोधात ज्यांचे हितसंबंध आहेत अशा शूद्रातिशूद्र वर्णजातींना अशा ईश्वराच्या सतत अंकित ठेवणे की जो त्यांचे दास्य, त्यांची अंकितता यांचे धार्मिक समर्थन त्यांना देईल, त्यांच्यावर लादल्या गेलेल्या दडपणुकीला आणि शोषणाला ‘ईश्वरेच्छा’ मानेल, आपल्या शोषण-शासनाची कारणमीमांसा ब्राम्हणी वर्णजातींच्या भौतिक स्वार्थात, हितसंबंधात शोधणार नाही. म्हणून पुनर्जन्मवाद, अवतारवाद, कर्मवाद यांचे सिद्धांत रचले गेले.
मानवकेंद्री धर्म
जातीसमाजात ईश्वरकेंद्री धर्म या प्रकारे शासन आणि शोषणाचे वैचारिक साधन म्हणून अधिकारवाणीने नियंत्रक म्हणून महत्त्वाची भूमिका वठवितो, म्हणून बाबासाहेब मानवकेंद्री धर्माचा पुरस्कार करतात. ईश्वरकेंद्री धर्मात श्रद्धावादाला वाव असतो. जातिव्यवस्थेवर उभ्या असलेल्या ईश्वरकेंद्री धर्मात श्रद्धावादाशी संबंधित अंध धर्मश्रद्धांची एक व्यापक व्यवस्थाच उभी करण्यात येते. शिकारी उत्पादन साधनावर जगणाऱ्या जाती, शेतीशी संबंधित कारागिरीवर जगणाऱ्या बलुतेदार जाती आणि कृषीकार्यावर उपजीविका करणाऱ्या शेतकरी जाती अशी जातींच्या सामाजिक सोपानांची रचना जातीसमाजात असते. पशुपूजा, निसर्गपूजा, पिशाच्च वशीकरण विद्या, अशा जादूटोण्याशी संबंधित जातविशिष्ट अंधश्रद्धांना बळकटी देण्याचे, या जातविशिष्ट श्रद्धांना अवतारवाद, पुनर्जन्मवाद वा आत्मवाद यांच्या श्रद्धाव्यवस्थेत उपांग म्हणून सामावले जाण्यास भरपूर वाव असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणूनच हिंदुधर्माच्या श्रद्धावादावर कडाडून हल्ला करतात.
धर्मांतरासंदर्भात बाबासाहेबांनी ज्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत, त्यातून जातीसमाजातील ईश्वरकेंद्रित धर्म श्रद्धावादाच्या व्यापक सबगोलंकार छत्रीखाली व्यापक अंधश्रद्धांना पावित्र्य प्रदान करणारी विचारव्यवस्था उभी करतो, याची आपल्याला सूचना मिळते. १९५६ साली धर्मांतर करताना बाबासाहेब म्हणाले होते, ‘मी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचे ठरविले आहे. कारण बौद्ध धम्म हा हिंदू धर्माहून फार वेगळा आहे. हिंदू धर्माचा परमेश्वरावर भरवसा आहे. बौद्ध धम्मात परमेश्वर नाही. हिंदू धर्माचा आत्म्यावर विश्वास आहे. बौद्ध धम्म आत्मा मानीत नाही. हिंदुधर्म चातुर्वर्ण्य व जातिव्यवस्था मानतो. बौद्ध धम्मात चातुर्वर्ण्य नि जातिव्यवस्था यांना थारा नाही.’ थोडक्यात काय तर, बौद्ध धम्म नीतीवर अधिष्ठित आहे. बुद्ध हा मार्गदाता आहे- ‘देव’ नाही, देवाचा पुत्र अथवा देवाचा प्रेषितही नाही. बुद्धाखेरीज सर्व धर्मसंस्थापकांनी आपण मोक्षदाते आहोत ही भूमिका घेतली. याउलट बुद्धाने आपल्याकडे मार्गदर्शनाची भूमिका घेतली आणि बाबासाहेबांच्या नवयान बुद्ध धम्मात देवाची जागा नीतीने घेतली. धर्म या शब्दाचा क्रांतिकारक अर्थ बुद्धाने विचारासाठी मांडला आणि तो बाबासाहेबांनी धम्माच्या रूपात अंमलात आणला.
डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेली हिंदुधर्मातील अवतारवाद आणि जातिव्यवस्था यांच्या परस्परसंबंधाच्या अभ्यासाची दिशा आपणास बुवाबाजीच्या प्राबल्याचे विश्लेषण देणाऱ्या समाजशास्त्राच्या मांडणीपर्यंत घेऊन जाते. बुवाबाजी विरोधी प्रबोधनासाठी उपयुक्त वैचारिक हत्यार आंबेडकरवाद उपलब्ध करून देतो. बुवाबाजीच्या उदयाचे हे समाजशास्त्रीय विश्लेषण आणि ब्राह्मण-वर्चस्वाखालील जातिव्यवस्थेचे समाजशास्त्र यांची सांधेजोड केल्यास बुवाबाजीचे वास्तव पुढे येते. भारतीय समाजातील विविध जाती-जमातींना सामाजिक-राजकीय दृष्ट्या हीन स्तरावर ठेवणे उच्च वर्णांच्या हिताचे होते. ब्राह्मण वर्ण जातींची धार्मिक पवित्रता आणि तिची इतरांपासूनची श्रेष्ठता संरक्षित करण्यासाठी जाती विभाजित आणि सामाजिक-सांस्कृतिक दृष्ट्या परस्परांपासून पृथकता वा संघर्षप्रवण ठेवणे आवश्यक होते. त्यामुळे केंद्रीभूत धर्मसंस्था वा प्रेषित या संस्थांच्या निर्मितीस पुरोहितशाहीने नकार दिला. अवतारी बुवा आणि गुरूंची जिवंत भूमिका स्ववर्णजातीने वठवायचा मार्ग मोकळा ठेवला. याचा परिणाम काय तर, हिंदुधर्मात आलेला बुवाबाजीचा महापूर! या महापुरात आजही मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज वाहून जात आहे आणि बाबासाहेबांची शिकवण विसरली जात आहे, हे मात्र खेदजनक आहे.
भारतीय पुरोहित वर्गाचे वैशिष्ट्य हे की, तो वर्गव्यवस्थेऐवजी जातिव्यवस्थेच्या पायावर उभा आहे. त्याचा अर्थ असा की, हा वर्ग जातीबद्ध आहे आणि जातीय हितसंबंधाने प्रेरित आहे. भारतीय पुरोहित गटाची जातीबद्धता त्याच्या विचार-क्षेत्रातील कार्यावर दोन प्रकारे परिणाम करते. हा पुरोहित वर्ग आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या धार्मिक, वैचारिक वा विद्याशाखीय ज्ञानसंपदांना छेद करण्यास नकार देतो. पूर्वजांद्वारे निर्मित ज्ञान परंपरेला आवश्यक तेथे आव्हान देण्याऐवजी तो त्याबद्दल पावित्र्याचा दृष्टिकोनच स्वीकारतो. पूर्वजांनी निर्माण केलेली धर्मशास्त्र, पुराणे, महाकाव्ये, इतिहासकथा वा पुराणकथा यांच्या चिकित्सक विश्लेषणाऐवजी त्याबद्दल ग्रंथप्रामाण्यवादी दृष्टिकोन वाढविण्यासाठी तो आपले बौद्धिक कसब वापरतो.
बाबासाहेबांचे ज्ञानबंदी संदर्भात असे म्हणणे होते की, जातिव्यवस्था आणि विषमतावादी धर्म यांना संरक्षण देण्याचे साधन म्हणून ज्ञानबंदी लादली गेली. जातिव्यवस्था श्रमाचे जसे जातीनुसार विभाजन करते त्याचप्रमाणे ती बौद्धिक उत्पादन साधनांचे देखील जातीनुसार विभाजन करते. ब्राम्हण जातींकडे अध्ययन-अध्यापनाची सत्ता येते तर शूद्रजातींना शोषित-अंकित रहावे म्हणून ‘ज्ञानी’ वर्णजातींच्या सेवेची संधी मिळते. युरोपीय वर्गसमाजात पारंपारिक ज्ञानाची चिकित्सा करणाऱ्या विद्रोही विचारवंतांना शिक्षा करणारी दंडयोजना आज कमजोर झाली आहे. याउलट भारतात मात्र जातीसमाजात ज्ञानबंदीचा ‘पवित्र’ आदेश तोडणाऱ्यांना क्रूर व हिंसक अशा दंड योजनांना आजही सामोरे जावे लागल्याची उदाहरणे आहेत. ज्ञानबंदीची कायम यंत्रणा म्हणून जातिव्यवस्थाक मूल्ये व संस्था यांची उभारणी भारतासारख्या जातीसमाजात होते.
परिणामी लक्षावधी भारतीयांमध्ये साक्षात्कार, चमत्कार याविषयीची अंधश्रद्धा वाढत आहेत. पण भारतीय विद्यापीठे, वृत्तपत्रसृष्टी, राजकीय अभिजन वा वैज्ञानिक वर्ग यांच्याकडून संघटित प्रतिकार वा असंतोष व्यक्त होताना दिसत नाही. अभिजन वर्गाची या साक्षात्कार, चमत्कारावर श्रद्धा नाही, कारण तो बुद्धिप्रामाण्यवादाचे शिक्षण घेतलेला आहे. परंतु सर्व पुराणकथांची बुद्धिप्रामाण्यवादी चिकित्सा केल्यास त्याच्या पूर्वज पंडितांच्या महान धर्मश्रद्धांना धक्का बसेल, दुसरे म्हणजे बहुजनांच्या वैचारिक जागृतीच्या वाटा त्यातून खुल्या होतील, त्यामुळे ज्ञानाच्या आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील ब्राह्मणी वर्चस्वाला हादरा बसेल, अशी त्याला भीती आहे. म्हणून हिंदुधर्म आणि संस्कृती, हिंदुराष्ट्र यांच्या जयजयकाराच्या घोषणा देणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बजरंग दल, अशा संघटना जनसामान्यांना अंधश्रद्ध ठेवणाऱ्या या कारस्थानाच्या विरोधात मोर्चे वा निदर्शने करतानादिसत नाहीत. तर धर्माध राजकारणी शक्तींना आपले मतलबी राजकारण साधण्यासाठी कोट्यावधी अंधश्रद्ध मतदार हवे आहेत. म्हणून आजच्या हिंदुत्ववादी वातावरणाने भरलेल्या भारतात अंधश्रद्धा वाढवण्याचे प्रयत्न जोमाने चालू आहेत. त्यातून आजही २१ व्या शतकात करणी, मूठ मारणे, भूत लागणे, भानामती होणे, असे प्रकार वाढीस लागलेले आहेत. चमत्कार करून बदमाश बुवा लबाडीने सामान्य जनतेला उल्लू बनवत आहेत. खरे तर प्रत्येक चमत्कारामागे वैज्ञानिक सत्य दडलेले असते. ते सत्य शोधून काढण्याचा कार्यकारणभाव जोपासणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन होय. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना बहुजन समाज वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगणारा निर्माण करायचा होता. पण त्यांना तेवढा वेळ मिळाला नाही. आता निदान त्यांच्या विचारांचे परिशीलन करून आपण सगळ्यांनी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अंधश्रद्धेच्या गर्तेत न अडकता वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगायची सुरवात करायला काय हरकत आहे?
लेखक विज्ञानवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.
jetjagdish@gmail.com