यशवंत मनोहर

आज डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा तात्त्विक अभ्यास जगात होत आहे.. मात्र त्यांच्या तत्त्वज्ञानाकडे भारतीय समाज दुर्लक्ष करीत आला आहे. हे केवळ  त्यांच्याच ज्ञानमीमांसेचे नव्हे, तर भारतीय समाजाचेही नुकसान आहे..

Satish Wagh Murder Case
Satish Wagh Murder Case : पूर्वीच्या भाडेकरूनेच दिली ५ लाखांची सुपारी; सतीश वाघ हत्या प्रकरणात पोलिसांकडून मोठा खुलासा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
Nagpur Guardian Minister, Devendra Fadnavis,
नागपूरच्या पालकमंत्रीपदावरून तर्कवितर्क
भूगोलाचा इतिहास : प्रतिभेचा कालजयी आविष्कार – आर्यभटीय
Ner Taluka, groom marriage, groom Ner bullock cart ,
यवतमाळ : शेतकरी नवरदेवाने घोड्यावरून नव्हे तर बैलबंडीवरून काढली लग्नाची वरात, स्वत: धुरकरी बनलेल्या युवकाचे पंचक्रोशीत कौतुक
Rise and Spread of Naxalite Movement in telangana
विश्लेषण : तेलंगणात नक्षलवादी पुन्हा सक्रिय का झाले?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तात्त्वज्ञानिक जीवनाची घडण जागतिक परिप्रेक्ष्यातच झाली. शिवाय श्रमणसभ्यता, लोकायत आणि बुद्ध ही भारतीय ज्ञानपरंपरासुद्धा विश्वसमांतर अशी सर्वानुकंपाय ज्ञानपरंपराच आहे. ही इहवादाची, साम्यवादाची विज्ञाननिष्ठ परंपराच आहे. बाबासाहेबांच्या बौद्धिक घडणीत याही परंपरेचा मोलाचा वाटा आहे आणि ही परंपरा पश्चिमी आधुनिकतेला पूर्णत: अविरोधी आहे. या दोन्ही तत्त्वज्ञान परंपरा हेतूच्या दृष्टीने सहोदर आहेत, असेच म्हटले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्वतत्त्वज्ञ या नात्याने सर्वव्यापीच आहेत. सर्वानुकंपाय वैश्विक समाजाची निर्मिती कशी करता येईल, या प्रश्नाची अत्यंत विधायक मांडणी त्यांच्या तत्त्वज्ञानात दिसते. या अनुषंगाने त्यांच्यातील विश्वव्यापी ज्ञानवंतच आपल्यापुढे उभा राहतो.

अमेरिका, इंग्लंड, जपान, व्हिएतनाम, हंगेरी अशा अनेक देशांमध्ये बाबासाहेबांच्या पुतळय़ांच्या निमित्ताने त्यांची महत्ता व्यक्त होत आहे. त्यांच्या नावाने जगात अनेक ठिकाणी चळवळी आणि शैक्षणिक संस्था उभ्या राहत आहेत, हा बाबासाहेबांच्या वैश्विक व्यक्तिमत्त्वाचाच गौरव आहे. दुसरे असे, की वैश्विक चर्चाविश्वात आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाला मध्यवर्ती स्थान प्राप्त होत आहे. कोसीमो झेने या विचारवंताने संपादित केलेल्या ‘पोलिटिकल फिलॉसॉफीज ऑफ अंतानिओ ग्रामची अँड बी. आर. आंबेडकर’ या पुस्तकावरून ही बाब आपल्या लक्षात येते. असे अनेक ग्रंथ आता पुढे येत आहेत. जागतिक विचारविश्व ‘तत्त्वज्ञानातील एक महानायक’ ही बाबासाहेबांची प्रतिमा मान्य करू लागले आहे. आजच्या जगापुढे असलेली ज्वलंत आव्हाने जगाला अनिवार्यपणे बाबासाहेबांकडे नेत आहेत. अशा आव्हानांवर मात करण्याचे शास्त्र आणि विधायक आश्वासनही लोकांना बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानात दिसू लागले आहे. या तत्त्वज्ञानाची क्षमता वैश्विकच आहे.

प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ ए. ए. गोल्डनवाईजर हे कोलंबिया विद्यापीठात त्यांचे प्राध्यापक होते. प्रा. सेलिग्मन हे कोलंबिया विद्यापीठात त्यांचे मार्गदर्शक होते. याच विद्यापीठात प्रा. जॉन डय़ुई हे जागतिक कीर्तीचे व्यवहारवादी तत्त्वज्ञ त्यांचे सर्वात आवडते प्राध्यापक होते. पुढे बाबासाहेबांनी जॉन डय़ुईंच्या तत्त्वज्ञानाला वेगवेगळय़ा संदर्भात नवनवे आयाम दिले. ‘रिस्पॉन्सिबिलिटिज ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट इन इंडिया’ हा निबंध त्यांनी विद्यार्थी असतानाच लंडन विद्यापीठात वाचला. प्रसिद्ध राजकीय तत्त्वज्ञ हेरॉल्ड लास्की यांनी या निबंधाला राज्यक्रांतिकारक म्हटले. अशा विचाराची चर्चा विद्यापीठात होणे योग्य नाही, असेही लास्की म्हणाले. जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ प्रा. एडविन कॅनन यांचे ‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ या त्यांच्या डी.एससी.च्या प्रबंधाला मार्गदर्शन लाभले आणि प्रस्तावनाही! (१९२३)

बाबासाहेबांनी १९१८ मध्ये महान तत्त्वज्ञ बट्र्राड रसेल यांच्या ‘द प्रिन्सिपल्स ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन’ या ग्रंथाची परखड समीक्षा केली. या समीक्षेत त्यांनी रसेलच्या विचारांशी मतभेद व्यक्त केले आहेत. त्या वेळी ते २७ वर्षांचे होते. जातींच्या संदर्भातील सर डेन्झिल आयबेस्टन, नेसफिल्ड, सेनार्ट आणि सर एच. रिसले या विद्वानांनी मांडलेल्या उपपत्तींमधील उथळपणा त्यांनी १९१६ साली विद्यार्थी असताना मांडला. या वेळी त्यांचे वय २५ वर्षे होते. त्यांनी प्रा. जॉन मेनार्ड केन्स या विश्वविख्यात अर्थतज्ज्ञाशीही बौद्धिक सामना केला. डॉ. आंबेडकर जागतिक ज्ञानविश्वातील महायोद्धा ठरले, असे आज मागे वळून पाहाताना लक्षात येते. ज्या डॉ. आंबेडकरांना ‘ज्ञान बाटेल’ म्हणून विषमतेच्या हजारो वर्षे वयाच्या आगीत जाळले गेले, त्यांना आता दुनिया ज्ञानाचे सर्वश्रेष्ठ प्रतीक मानते.

१९३८ साली ‘मी आदिअंती केवळ भारतीयच आहे. भारतीयशिवाय काहीही नाही,’ असे बाबासाहेब म्हणाले. इथेही जात, धर्म, भाषा, प्रदेश यांच्या सीमांचे उल्लंघन करणारी सलोखा मांडणी बाबासाहेब करतात. पाकिस्तानवरील ग्रंथात ‘कॅनडा, आफ्रिका, फ्रान्स, इंग्लंड, इटली या देशांचे नागरिक सांप्रदायिक विरोधाच्या पलीकडे जाऊन राजकीय एकोप्याने राहतात,’  असे ते सांगतात. त्यांना जशी भारत-पाकिस्तान फाळणी नको होती, तशी त्यांना जगाचीही फाळणी नको होती. एकाच संविधानाच्या नियंत्रणाखाली जगातील सर्व राष्ट्रे एकत्र राहू शकतील, असे ते म्हणतात. ही विश्वकुटुंबाची विश्वराष्ट्राची मांडणी आहे. यातून आपल्याला त्यांच्यातील वैश्विक तत्त्ववेत्त्याचेच प्रत्यंतर येते. बाबासाहेब विषमताविहीन, एकहृदय आणि एकचित्त जगाचे स्वप्न बघत होते. हा त्यांचा वैश्विक सेक्युलॅरिझमच होता. भारतासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता त्यांनी मांडून ठेवली आणि पाकिस्तानवरील ग्रंथात तर त्यांनी विश्वाच्याही समान नागरी कायद्याचे प्रारूप मांडून ठेवले.

‘स्टेट अँड मायनॉरिटिज’मध्ये त्यांनी मांडलेला समाजवाद हुकूमशाहीला आणि हिंसेला थारा देत नाही. तो मार्क्‍सच्या आणि फेबियन समाजवाद्यांपुढला अधिक विधायक समाजवाद आहे. १९५० साली मुल्कराज आनंद यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘सेक्युलर आणि समाजवादी लोकशाही’ हा आदर्श आपण आपल्या संविधानात मांडून ठेवला आहे, हे स्पष्टपणे सांगितले आहे. सद्विवेकवाद, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद ही पूर्ण विश्वाच्याच व्यवस्थापनाची महामूल्ये आहेत आणि दुनिया आता हे समजावून घेऊ लागली आहे.

व्हॉल्टेअर, डेव्हिड ूम, रसेल, सिग्मंड फ्रॉइड, मार्क्‍स, सार्त् अशा असंख्य जागतिक कीर्तीच्या पाश्चात्त्य प्रज्ञावंतांनी धर्मसंस्थेला विरोध केला. धर्म वर्चस्ववाद्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करतो. श्रद्धा ही विचाराच्या सत्यतेची खात्रीच असते. बाबासाहेबांनी ज्ञानप्रक्रिया वा विचार कुठे थांबत नाहीत, हे स्पष्टपणे सांगितले. त्यांनी कोणत्या एका धर्माला नकार दिला असे नाही. धर्म ही संस्थाच नाकारून त्यांनी ‘धम्म’ मांडला आणि बुद्धाने निरंतर चिकित्सा आणि विचारांचा खुलेपणा सांगितला. धम्मात जीवनाच्या विधायक मागण्यांप्रमाणे सतत भर घाला, असे म्हणणारा बुद्ध श्रद्धेची बाजू घेऊ शकत नाही वा धर्मही स्थापन करू शकत नाही. बुद्ध विज्ञानवादी, बुद्धिप्रामाण्यवादी आणि निरंतर अद्ययावत होणारा पुनर्रचनावादीच आहे. ही बुद्धाची ज्ञानमीमांसा व्यवहारवादी आहे. बुद्ध हा धर्म नव्हे ते सर्वानुकंपाय बुद्धिवादी तत्त्वज्ञान आहे. बाबासाहेबांनी बुद्धाचा साम्यवाद आणि मुक्त तत्त्ववाद मांडला. आपण सर्वानीच काळजीपूर्वक हे लक्षात ठेवायला हवे की बुद्ध धर्मसंस्थापक नव्हे, तो इहवादी तत्त्वज्ञ आहे.

हे बुद्ध तत्त्वज्ञान निरंतर समाजक्रांतीचा जाहीरनामाच आहे. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही हे या तत्त्वज्ञानाचे ध्येय आहे. हे वंचितांच्या समान मानवाधिकाराचे राजकारणच आहे. वर्गातीतता प्रस्थापित करू पाहणारे हे स्वच्छपणे वर्गीय तत्त्वज्ञानच आहे. बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान पायाभूत पातळीवरून संपूर्ण जगाच्याच नवरचनेचेच प्रारूप देत आहे. त्यामुळे डाव्यांनाही आता आमूलाग्र समाजक्रांतीच्या या रचिताकडे वळावे लागलेले आहे आणि पुढल्या काळात तर अधिकच वळावे लागणार आहे. विसाव्या शतकाला आणि पुढल्याही सर्व शतकांना हवा होता तो सर्वागीण क्रांतीचा तत्त्वज्ञानी असेच बाबासाहेबांचे वर्णन आपल्याला करावे लागेल.

या वैश्विक बाबासाहेबांकडे आपली जातमनस्कता अजूनही बघू शकत नाही. शिवाय ते टोकाचे भौतिकवादी आहेत. देव, धर्म, चैतन्यवाद या सर्वच गोष्टी नष्ट करायला सांगणारे त्यांचे तत्त्वज्ञान आहे. धार्मिकांना आणि अप्रगल्भ परिवर्तनवाद्यांनाही ते अडचणीचे वाटते. त्यामुळे बाबासाहेबांकडे विशेषत: भारतीय समाज दुर्लक्ष करीत आला आहे. याचा अर्थ तत्त्वज्ञानाचे ध्येय आणि पद्धतिशास्त्र आपण समजावून घेऊ शकत नाही हेच आहे.

अज्ञानाला ज्ञान कळतच नाही. अज्ञानसंपत्ती ही मूलतत्त्ववादाची विघातक शक्ती असते. त्यामुळे कोणीही करीत नाही इतका ज्ञानाचा राग अज्ञान करते. अज्ञानाला आपले अस्तित्व टिकवायचे असते आणि ज्ञानामुळे ते अस्तित्वच धोक्यात येते. अज्ञान ज्ञानाला नाकारते त्याचे हे कारण आहे. याच कारणामुळे अतत्त्वज्ञान तत्त्वज्ञानालाही नाकारते. पण त्यामुळे ज्ञान वा तत्त्वज्ञान अधिकच तेज:पुंज होत जाते हाच दुनियेचा इतिहास आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान हा त्याचाच पुरावा आहे. आपली माणसे आंबेडकर नावाच्या अनिवार्य ज्ञानमीमांसेचे आणि क्रांतिसंपत्तीचेच नुकसान करीत नाहीत, तर भारतीय समाजाचे आणि मानवतेचेच नुकसान करीत आहेत. आता बाबासाहेब वैश्विक चर्चाविश्वात महानायक म्हणून प्रस्थापित होत आहेत. त्यामुळे आपल्या जीवनाची गरज म्हणूनही बाबासाहेबांच्या सर्वव्यापित्वाकडे, सर्वानुकंपाय आणि विश्वसलोखामय तत्त्वज्ञानाकडे दुर्लक्ष करणे हे आपल्याच अहिताचे ठरेल, असे मला वाटते.

Story img Loader