– डॉ. विनायक गोविलकर 

प्राचार्य डॉक्टर मो.स. गोसावी यांच्या कृतार्थ जीवनाची सांगता त्यांच्या ८९ व्या वर्षी काल झाली. त्यांचे जीवन कृतार्थ होते असं म्हणताना तीन मितींचा विचार आपल्या मनात येतो. त्या तीन मिती म्हणजे जीवनाची लांबी, जीवनाची रुंदी आणि जीवनाची खोली. दीर्घ आयुष्य ही त्यांच्या जीवनाची लांबी झाली. उत्तम शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्यासह अखेरपर्यंत कार्यरत असणं ही त्यांच्या जीवनाची रुंदी झाली.

लांबी आणि रुंदी या दोन बाबी तुलनेने मोजायला सोप्या. पण जीवनाची खोली कशी मोजणार? त्यासाठी तीन गोष्टी पाहायला हव्यात. – जीवनदृष्टी, जीवन ध्येय आणि जीवनशैली. सोप्या भाषेत जीवनात काय साधायचं, कसं साधायचं आणि त्यासाठी कसं राहायचं या गोष्टी जीवनाची खोली ठरवतात. सरांचे जीवन म्हणजे या तीनही बाबींचा एक आदर्श वस्तुपाठ आहे. निकोप सात्विक अशी जीवनदृष्टी, शिक्षणातून व्यक्ती निर्माण आणि समाज परिवर्तन यावर अढळ विश्वास, सातत्याने कार्यप्रवणता. जीवन ध्येय काय तर परवडणाऱ्या खर्चात, दर्जेदार, उत्तम वातावरणात, सर्व विद्याशाखांचे शिक्षण उपलब्ध करून देणे. शिक्षण ही सरस्वतीची उपासना आहे, व्यवसाय नाही, हे अधिष्ठान. तशा प्रकारे आपली संस्था चालली पाहिजे आणि इतर संस्थांना तसं मार्गदर्शन केलं पाहिजे, प्रेरणा दिली पाहिजे हे जीवन ध्येय. आणि जीवनशैली ? मला वाटतं ती तर अत्यंत अनुकरणीय. स्वतःच जीवन असं की जे इतरांना अनुकरण करावं असं वाटेल. सरांना हे नक्की माहिती होतं की,

‘यद्यदाचरति श्रेष्ठ: तत्तदेवेतरो जनः । स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ।। ३. २१।।’

श्रेष्ठ लोक जसे वागतात त्याचे इतर लोक अनुकरण करतात. ती माणसे जी वाट घालून देतात त्या वाटेवरूनच लोक चालतात. म्हणून त्यांनी आपले व्यक्तिगत स्तरावरील जीवन आणि संस्था स्तरावरील जीवन अत्यंत आदर्शवत ठेवण्याचा प्रयत्न केला.

Dr Gosavi educationist
तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह डॉ. मो. स. गोसावी

संस्था आणि समाजासाठी काम करताना अनेकांचे स्वविकासाकडे दुर्लक्ष होते. तर काही जण स्वविकासात इतके गुंग होतात की त्यांना इतरांशी काही सोयरे सुतक राहत नाही. पण सर या दोन्ही प्रकारांना अपवाद राहिले. एम कॉम, एलएलबी, पीएचडी, साहित्याचार्य अशा पदव्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण करून ‘आयएएस’ परीक्षेमध्येही त्यांनी चमक दाखविली. शिक्षण हेच आपले जीवन कर्तव्य ठरवून ६६ वर्षे त्याचा पाठपुरावा केला. शिक्षण, व्यवस्थापन आणि संशोधन यात कायम एक पाऊल पुढे राहिलेल्या सरांना देशात आणि विदेशात अनेकविध मानाचे पुरस्कारही मिळाले. ज्ञान हिरा, जीवन गौरव, भारत पुत्ररत्न, ज्ञान सरस्वती, म. गांधी शांतता पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांचाकडे चालून आले. उत्तम शिक्षक, प्रभावशाली वक्ता, दूरगामी चिंतक, विज्ञान, तंत्रज्ञान व व्यवस्थापन शास्त्र आणि भारतीय तत्वज्ञान यांचा समन्वयक असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिगत जीवनाची उंची दाखवितात. स्वतःची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्थिती अखेरपर्यंत शाबूत ठेवण्याची किमया त्यांच्या मोठेपणाची साक्ष देते.

हेही वाचा – ‘सांगीतिक गारुडा’ची संध्याकाळ.., गुण रे गाऊंगा..

संस्था स्तरावर सरांचे कार्य अतुलनीय म्हणावे लागेल. ‘यंगेस्ट प्रिन्सिपॉल विथ लाँगेस्ट ड्यूरेशन’ हा सरांचा लौकिक. १९५९ मध्ये नाशिक सारख्या एकदम छोट्या गावात केवळ वाणिज्य शाखा असलेल्या आणि नव्याने सुरू झालेल्या बीवायके महाविद्यालयात प्राचार्यपदी नियुक्ती झालेल्या सरांनी त्या महाविद्यालयाला आपल्या बुद्धीने, कर्तृत्वाने, जनसंपर्काने आणि व्यवस्थापन कौशल्याने हिमालयाच्या उंचीवर नेऊन ठेवले. १९७३ साली गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आली आणि तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे ५० वर्षे इतका दीर्घकाळ त्यांनी हे दायित्व समर्थपणे पेलले. तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी, संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण, राज्यपाल अलेक्झांडर अशा दिग्गज मंडळीना इथे यावेसे वाटले.

ऑल इंडिया कॉमर्स कॉन्फरन्स, ऑल इंडिया मॅनेजमेंट कॉन्फरन्स, मराठी अर्थशास्त्र परिषद अधिवेशन अशा परिषदा संस्थेच्या प्रांगणात त्यांनी यशस्वी केल्या. हे सगळे करत असताना सरांनी दोन गोष्टींचे भान ठेवले. ते म्हणजे संस्था पक्षीय राजकारण आणि अंतर्गत राजकारण या दोन्हीपासून दूर ठेवली. संस्थेला एक धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान दिले. शंकराचार्य, चिन्मयानंद, शंकर अभ्यंकर फुलगावचे स्वामी असे अनेक महात्मे या परिसरात वारंवार येऊन गेले. संस्कृत ही ज्ञानाची भाषा आहे आणि तिची जोपासना झाली पाहिजे म्हणून आपल्या संस्थेमध्ये संस्कृत विभाग आजही कार्यरत राहील याची त्यांनी काळजी घेतली. अनेक संस्था आणि समाजघटक सरांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित करत. सर्व व्यासपीठांवरून सरांनी संस्कार, संस्कृती, शिक्षण, कौशल्य, समाजभान यांचा पुरस्कार केला.

Dr Gosavi educationist
तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांच्यासह डॉ. मो. स. गोसावी

सामान्यतः माणूस तीन गोष्टींच्या अपेक्षांनी काम करतो. – reward, growth and satisfaction. आपल्याला कामाच्या प्रमाणात रिवॉर्ड मिळतं, कामातील तज्ञतेच्या प्रमाणात, सुधारणांच्या प्रमाणात ‘ग्रोथ’ साध्य करता येते आणि कामाच्या उद्दिष्टपूर्तीतून समाधान मिळतं. या तीनही बाबी साध्य झाल्या तर जीवनाला कृतार्थता प्राप्त होते. शिक्षणातून व्यक्ती निर्माण आणि समाज परिवर्तन या उद्दिष्टाची पूर्ती सरांना त्यांच्या आयुष्यात साधता आली आणि म्हणून एक समाधानी जीवन ते जगले. त्यांच्यात क्षमता (ॲबिलिटी) तर होतीच, त्याच जोडीला कार्यक्षमताही (एफिशियन्सी) होती. पण कृतार्थतेच्या अनुभूतीसाठी केवळ योग्यता आणि कार्यक्षमता पुरत नाही, त्याबरोबर कन्व्हिक्शन आणि कमिटमेंटपण असावी लागते. आपण जे करतोय त्यावर पूर्ण विश्वास आणि आपण हाती घेतलेल्या कार्याशी पूर्ण बांधिलकी असायला हवी. सरांच्या जीवनात या चारही गोष्टी एकमेकांशी इतक्या घट्ट विणलेल्या होत्या की त्यामुळे त्यांची उद्दिष्टपूर्ती झाली आणि त्यातून समाधान मिळू शकले.

सरांनी शिक्षणाचे कार्य तर केलेच पण त्याच्या जोडीला व्यवस्थापनाचा एक आदर्श त्यांनी समोर ठेवला. एखाद्या संस्थेचे व्यवस्थापन कसे असावे हेही त्यांनी समाजाला दाखवून दिले. शिक्षणात नवीन नवीन प्रयोग केले. या प्रयोगांमध्ये एमबीएचे शिक्षण सुरू करणे, कोणतीही वेगळी फी न आकारता कॉम्प्युटरचे शिक्षण सुरू करणे, पुनर्रचित अभ्यासक्रम सुरू करणे आणि तो ४० वर्षांपर्यंत चालविणे, संशोधनाचा विभाग सुरू करणे या सगळ्या गोष्टींमध्ये ते ‘पायोनियर’ ठरले.

हेही वाचा – द्विपक्षीय राजकारणाकडे..

समाज प्रबोधनाचे काम करताना समाजातल्या चांगुलपणाचा गौरव त्यांनी सातत्याने केला. आदर्शवत असणाऱ्या माणसांना समाजासमोर आणणे आणि त्यांच्याकरवी इतरांना प्रेरणा देणे हेही काम सरांनी मोठ्या प्रमाणावर केले. ‘शिव पार्वती प्रतिष्ठान’ सुरू करून त्यांनी आपल्या आई-वडिलांप्रती कृतज्ञता तर व्यक्त केलीच, पण तो सोहळा कौटुंबिक न ठेवता समाज प्रबोधन आणि समाजातील चांगुलपणाचा गौरव यासाठी सातत्याने दोन अडीच दशके चालू ठेवला.

सरांनी आपल्या क्षमता ओळखल्या, त्या जपल्या, वृद्धिंगत केल्या, त्या सतत आणि सर्व स्तरावर सिद्ध केल्या, त्या संक्रमित करण्याचा आपल्या वागण्या बोलण्यातून, साहचर्यातून सतत प्रयत्न केला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या विकसित क्षमता शिक्षण या पवित्र कामासाठी समर्पित केल्या. त्यांना आपल्या कर्तव्यांची पूर्ण जाण होती. ती कर्तव्ये पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपली सर्व शक्ती, बुद्धी, जनसंपर्क वापरला. कर्तृत्व गाजवून आपल्या कर्तव्यांची पूर्ती करून सर कृतार्थ झाले असतील. अशा या कृतार्थ जीवन जगणाऱ्या आणि अनेक अनेक लोकांवर संस्कार करणाऱ्या माझ्या सरांना विनम्र आदरांजली.

लेखक सनदी लेखापाल (सीए) आहेत.

(vgovilkar@rediffmail.com)

Story img Loader