लहान मुलांना योग्य वेळी योग्य ते शिक्षण दिले तर देशाचे भवितव्य घडू शकेल यावर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या कामाचा पसारा उभा केला आहे. माधव साठे या माणसाबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे कारण आपल्या देशाला त्याच्यासारख्या स्त्रीपुरुषांची जास्त गरज आहे. माधव एक डॉक्टर आहेत, भूलतज्ज्ञ आहेत. गरजू लोकांच्या व्यथांमुळे ते अस्वस्थ होतात आणि त्यांच्यासाठी काहीतरी करू बघतात. या एका पैलूमुळेच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात.
ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांमध्ये त्यांना सध्या रस आहे. महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगरमध्ये दुर्गम भागात असलेल्या ९० खेड्यांमधील मुख्यत: आदिवासी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांचे जीवन माधव साठे यांनी एकहाती बदलून टाकले आहे. त्यांच्या एकट्याच्या अथक परिश्रमाचा फायदा राजगुरुनगर आणि आसपासच्या जिल्हा परिषदेच्या ४९ आदिवासी शाळा, ७३ हायस्कूल आणि ४६८ प्राथमिक शाळांमधील ४३ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि १२०० शिक्षकांना झाला आहे.
माधव साठे त्यांच्या डॉक्टर पत्नी आणि मुलीसह मुंबईत राहतात. आठवड्यातून पाच दिवस ते त्यांच्या शस्त्रक्रियांमध्ये व्यग्र असतात. आठवड्याच्या शेवटी ते राजगुरुनगरला जातात. ते कारने मुंबईहून तीन तासांच्या अंतरावर आहे. तिथे ते जे काम करतात, त्यामुळे ध्येयवेडा माणूस अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. गावकरी, मुले आणि अर्थातच साठे यांच्या या निस्वार्थ सेवेत झोकून देणारे शिक्षक माधव साठे यांची आतुरतेने वाट पाहत असतात.
हेही वाचा : वित्तीय तुटीवर नियंत्रण चांगले, पण विकासदराचा समतोल गरजेचा!
त्यांनी राजगुरुनगरमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा मी आणि माझी पत्नी राजगुरुनगरला वर्षातून दोनदा तरी भेट द्यायचोच. गेली २५ वर्षे मी बॉम्बे मदर्स अँड चिल्ड्रन वेलफेअर सोसायटीचा अध्यक्ष आहे. माधव साठे तर वैद्यकीय महाविद्यालयातून पदवीधर झाल्यापासून म्हणजे ४० किंवा त्याहून अधिक काळ या संस्थेचे सचिव आहेत. मी सरकारी नोकरीतील निवृत्तीनंतर मुंबईत स्थायिक झालो, तेव्हा भारतीय पोलीस सेवेतील माझ्या एका तरुण सहकाऱ्यासह माधव साठे मला भेटायला आले आणि त्यांनी मला सोसायटीचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. त्यानुसार मी ते स्वीकारले.
त्यावेळी बॉम्बे मदर्स ॲण्ड चिल्ड्रन्स वेल्फेअर सोसायटी मुंबई शहरात गरजवंतांसाठी दोन रुग्णालये आणि नोकरी करणाऱ्या मातांच्या मुलांसाठी तीन पाळणाघरे चालवत होती. माधव यांनी त्यांच्या या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवली. मुंबईबाहेरचे दोन उपक्रम राजगुरुनगर आणि भिलवडी येथे होते तिथे सोसायटीने छोटी ग्रामीण रुग्णालये उभारली होती. बॉम्बे मदर्स ॲण्ड चिल्ड्रन्स वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक डॉ. टिळक आणि म्हसकर यांचे अनेक वर्षांपूर्वी निधन झाले होते. माधव या संस्थेचे व्यवहार एकहाती आणि अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे करत होते. त्यांना संस्थेला स्वावलंबी करायचे होते. त्यांना अधूनमधून सरकार आणि महापालिका अधिकाऱ्यांकडून काही मदत हवी असायची. अध्यक्ष या नात्याने मी ती मिळवून द्यायचो.
राजगुरुनगर येथील रुग्णालयाने माधव यांना दुर्बल आणि गरजूंच्या सेवेसाठी स्प्रिंग बोर्ड उपलब्ध करून दिला. सार्वजनिक सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील डॉ. बानू कोयाजी यांनी माधव यांना राजगुरुनगरमधील आरोग्य प्रकल्पावर काम करण्यासाठी भरीव रक्कम देऊ केली. त्यांनी दिलेले पैसे संपल्यावर माधव यांनी निधीसाठी त्यांच्या डॉक्टर मित्रांशी संपर्क साधला. माधव यांच्या सामाजिक कार्यासाठीच्या तळमळीबद्दल माहिती असलेल्या त्यांच्या मित्रांनी कोणताही किंतु न ठेवता तो दिला.
हेही वाचा : श्वेतपत्रिकेत ‘हे’ पण सांगाल?
माधव राजगुरुनगरच्या जवळपास ९० गावांच्या उन्नतीमध्ये पूर्णपणे बुडून गेले आहेत. त्यांनी प्रामुख्याने त्या भागातील मुला-मुलींच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे चेअरमन आणि चेअरमनच्या पत्नी माला रामदुराई यांनी संगणक उपलब्ध करून दिले आहेत. त्याचबरोबर १० वर्षांच्या कालावधीसाठी ६०० जिल्हा परिषद शाळांना ई-लर्निंग देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी ते वरदानच आहे. या परिसरात वाय-फाय कनेक्टिव्हिटी नव्हती. विद्युत पुरवठा सतत खंडीत होत असे. पण माधव खचले नाहीत. संगणकाचा वापर करता यावा आणि त्यासाठी वीज उपलब्ध असावी यासाठी त्यांनी आपल्या मित्रांना आवाहन केले. त्यातून ४२५ शाळांमध्ये सौर पॅनेल बसवण्यासाठी पाठिंबा मिळवला.
विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेत यावे असे वाटावे यासाठी त्या आकर्षक दिसायला हव्या होत्या. त्यामुळे मग सौर पॅनल बसवण्याआधी मोडकळीला आलेल्या शाळांची दुरुस्ती, नूतनीकरण आणि रंगरंगोटी केली गेली. त्याचा खर्च काढण्यासाठी माधवने इतर काही मित्रांची मदत घेतली. त्यांना मुलींना शाळेत येण्यासाठी प्रवृत्त करायचे होते. पण शाळेच्या स्वच्छतागृहात पाणी नसल्यामुळे मुली शाळेत यायला उत्सुक नसत. मग गावकऱ्यांनी केलेल्या श्रमदानातून शाळेत बोअरवेल घेतले गेले. माधव साठे यांना मुलांचे जीवन घडवण्यात खरोखरच रस आहे, हे लक्षात आल्यावर शिक्षकांमध्येही काम करण्यासाठी उत्साह निर्माण झाला.
मुलांना संगणकाच्या वापराचे प्रशिक्षण देण्यासाठी, माधव यांनी आधी स्थानिक पातळीवरच्या भिल्ल समाजातल्या एका आदिवासी मुलाला संगणकाचे प्रशिक्षण दिले आणि नंतर त्याला मोबाईल व्हॅनचा (तीही दान म्हणून मिळाली होती) चालकाचे काम दिले. ही व्हॅन गावोगावी फिरली आणि तिने आदिवासी तरुणांना संगणकाच्या वापराचे प्रशिक्षण दिले. या प्रकल्पांत १०२ शाळांमधील एकूण २२८५ मुले आणि मुली होत्या. त्यापैकी १३९३ विद्यार्थी आदिवासी समाजातील होते.
हेही वाचा : लोकसभा निवडणुका हेच लक्ष्य!
बॉम्बे मदर्स ॲण्ड चिल्ड्रन्स वेल्फेअर सोसायटीने १०७७ मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण दिले आहे. आता या मुली या प्रशिक्षणाचा वापर करून पूरक उत्पन्न मिळवू शकतात. ३०८६ महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आणि ३२८ महिलांना ‘दाई’चे प्रशिक्षित देण्यात आले. संस्थेच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये हे दोन सर्वाधिक लोकप्रिय होते.
निधी उपलब्ध होईल त्यानुसार तरुणांसाठी क्रीडांगणे तयार केली जात आहेत. ठरावीक कालावधी दरम्यान वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. शाळेत जाणाऱ्या मुलांना न्याहारी दिली जाते. त्यांच्या उंची आणि वजनाची नियमित नोंद केली जाते. कुपोषण आणि अशक्तपणा या लहान मुलांमध्ये सर्वाधिक आढळलेल्या समस्या आहेत. माधवची मित्रमंडळी १६०० आदिवासी मुलांना न्याहारीसाठी निधी देतात. सरकारकडून माध्यान्ह भोजन दिले जाते.
गरजू लोकांसाठी एखाद्या माणसाने केलेले समर्पण आणि नि:स्वार्थी काम यापासून देशभरातील इतर लोकांनी प्रेरणा घेतली तर खरोखरच आपला देश पूर्णपणे बदलू शकतो. मुंबई शहरात अशा पद्धतीने काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेक व्यक्ती आहेत. महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक डी. शिवानंदन, “रोटी बँक” चालवतात. ती दररोज मुंबई शहराततल्या १२ हजार भुकेल्या लोकांना अन्न पुरवते.
हेही वाचा : सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा मान राखणे गरजेचे!
डॉ. माधव साठे यांच्या प्रयत्नांमुळे ते काम करत असलेल्या गावांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या दृष्टिकोनात लक्षणीय बदल झाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे, शिक्षक शिकवण्याच्या नवीन संकल्पना विकसित करण्यास उत्सुक आहेत आणि पालकांना मुलांच्या शिक्षणाबद्दल नव्याने आस्था वाटायला लागली आहे. या शिक्षणाचा मुलांच्या भवितव्यावर परिणाम झाल्याचे त्यांना पुढे दिसले तर अधिक पालक आणि शिक्षक ग्रामीण तरुणांच्या शिक्षणात सहभागी होतील. यातून ‘सबका विकास’ आणि ‘सबका विश्वास’ नक्कीच होईल, पण त्यासाठी “प्रयास” करणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे.
लेखक निवृत्त पोलीस अधिकारी आहेत.