‘हरित क्रांतीचा जनक’ ही डॉ. एम एस स्वामिनाथन यांची सर्वदूर पोहोचलेली ओळख आहे. कृषीशास्त्रज्ञ म्हणून काम करताना त्यांनी गेल्या शतकाच्या साठी आणि सत्तरीच्या दशकामध्ये देशभरात शेतीची पद्धत बदलण्यात मोलाची भूमिका बजावली. मोनकोंबू शिवसांबन स्वामिनाथन यांचे गेल्या वर्षी २८ सप्टेंबरला वर्षी निधन झाले. त्यांना ९८ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. अगदी शेवटचा काही काळ सोडला तर ते सतत कार्यमग्न राहणारा तपस्वी म्हणून त्यांची स्मृती कायम कोरली गेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्यानंतर अन्नधान्याचा तुटवडा ही भारतासमोरील सर्वात महत्त्वाच्या समस्यांपैकी एक होती. ब्रिटिशांच्या दीर्घकालीन राजवटीत भारताच्या कृषी क्षेत्राचा विकास ठप्प झाला होता. आधुनिक शेतीसाठी आवश्यक साधनसामग्रींचा अभाव होता. त्यामुळे अन्नधान्यासाठी भारत सुरुवातीच्या काळात अमेरिकेसारख्या देशांवर अवलंबून होता. अशा वेळी डॉ. स्वामिनाथन यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी करण्यासाठी जे कार्य केले ते अतुलनीयच म्हणावे लागेल. हरितक्रांतीमध्ये उच्च उत्पादन देणाऱ्या वाणांवर संशोधन, पुरेशा सिंचन व खताच्या सुविधा यांचा मुख्यत: समावेश होतो. विशेषत: पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग या प्रांतामधील शेतकऱ्यांचे जीवन नाटय़मयरित्या बदलले. १९४७मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा गव्हाचे उत्पादन वर्षांला ६० लाख टन इतके होते. १९६२मध्ये ते वाढून वर्षांला एक कोटी टन इतके वाढले होते. १९६४ ते ६८ या काळात त्यामध्ये झपाटय़ाने वाढ होऊन १७० लाख टन इतके होते.

हेही वाचा >>>शेतकऱ्यांचे तारणहार चौधरी चरणसिंह

स्वामिनाथन यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र, त्यांना शेतीमध्ये जास्त रस असल्यामुळे ते या क्षेत्रात संशोधनाकडे वळले. यासंबंधीचा निर्णय त्यांनी विद्यार्थीदशेत असतानाच घेतला होता. शेतकऱ्यांना चांगले वाण मिळाले तर त्यांना अधिक पीक घेता येईल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल असा विचार करून त्यांनी जनुकशास्त्र आणि उत्पादन यामध्ये संशोधन करण्याचे ठरवले होते. त्यांचे काही नातेवाईक शेती करत असत. त्यामुळे त्यांना शेतीची आवड उपजतच होती.

हेही वाचा >>>यंदाच्या ‘ग्रॅमी’त भारतीय कलाकारांची जागतिक धून…

एम एस स्वामिनाथन यांचे वडील वैद्यकीय व्यवसायात होते, स्वामिनाथ यांनीही डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र, तत्कालीन पारतंत्र्यामधील भारतासमोरील समस्यांमुळे त्यांनी आपला मार्ग बदलला. त्याबद्दल त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ‘‘बंगालच्या दुष्काळामुळे मी कृषी विषयाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. मी माझे क्षेत्र बदलले आणि वैद्यकीय महाविद्यालयात जाण्याऐवजी कोईम्बतूरमधील शेतकी महाविद्यालयात गेलो’’. संशोधनासाठी स्वामिनाथन यांनी युरोप आणि अमेरिकेतील शैक्षणिक संस्थांमध्ये अध्ययन आणि अध्यापनही केले. त्यांनी १९५४मध्ये कटकमधील केंद्रीय तांदूळ संशोधन संस्थेमध्ये कामाला सुरुवात केली. तिथे त्यांनी खतांना प्रतिसाद देण्याच्या पद्धतीत बदल करण्याच्या दृष्टीने तांदळाच्या वाणावर संशोधन केले. हे संशोधन अतिशय महत्त्वाचे मानले जाते. सकस जमीन आणि पाण्याचे चांगले व्यवस्थापन या दोन सुविधा उपलब्ध असल्या तर यामुळे उत्पादनात भरघोस वाढ होईल असे त्यांनी तेव्हा नमूद केले होते.

कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक संस्थांमध्ये त्यांनी काम केले. ‘फूड अँड अ‍ॅग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन कौन्सिल’चे (१९८१-८५) स्वतंत्र अध्यक्ष, ‘इंटरनॅनशल युनियन फॉर द कॉन्झव्‍‌र्हेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस’चे अध्यक्ष (१९८४-९०), ‘वल्र्ड वाईड फंड फॉर नेचर, भारत’चे (१९८९-९६) अध्यक्ष आणि ‘भारतीय कृषी संशोधन परिषदे’चे महासंचालक अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या.  १९८७मध्ये त्यांना जागतिक अन्न पुरस्कार देण्यात आला होता.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr ms swaminathan is the father of green revolution agronomist amy
Show comments