अतुल देऊळगावकर
ग्रामीण भागात जिथे सरकारी वैद्यकीय सेवा पोहोचू शकत नाही, तिथंपर्यंत पोहोचून, आरोग्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांना एकूण जगण्याचे भान देण्यात डॉ. शशिकांत अहंकारी यांचे मोठे योगदान आहे. कमालीच्या मृदू, क्षमाशील आणि पारदर्शक अशा या व्यक्तिमत्त्वाने निरामय समाजाचा ध्यास घेतला होता..
अणदूरमधील ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’च्या परिसरात चार-पाच हजार महिलांचा गोतावळा जमणं, ही तशी नेहमीचीच बाब असे. जानेवारीतील मेळावा हा मात्र डॉ. शशिकांत अहंकारी यांच्या भेटीसाठी होता. त्यांना कर्करोग झाला असल्याची बातमी समजल्याने सुमारे १०० गावांतील घराघरांत अस्वस्थता होती. पुढील उपचारासाठी पुण्याला राहावं लागणार, हे लक्षात आल्यावर अहंकारींनीच निरोप पाठवला. त्यांनी जमलेल्या सगळय़ांना, ‘‘काही काळजी करू नका. टाटा रुग्णालयातील उत्तम उपचारांमुळे खूप सुधारणा होत आहे. मी ठणठणीत होऊन परत येणार आहे,’’ असं सांगून सर्वाना दिलासा दिला. मग प्रत्येक बाई त्यांना विचारू लागली, ‘‘तुमाला खायला काय देवं?’’ डॉक्टरही त्यांच्या मोकळय़ा स्वभावानुसार ‘मुगाचा लाडू, गुळांबा व खारुडय़ा’ असं काहीबाही सांगत होते. मग महिलांनीच कधी, कोणी व कोणता पदार्थ पाठवायचा याचं वेळापत्रक केलं आणि त्यानुसार दुसऱ्या दिवशी पदार्थ हजर झाले. डॉ. शुभांगी अहंकारींना, ‘यादीनं द्या बगा. तब्येत घटमूट व्हुईल,’ असं सांगायला अनेक जणी येऊन गेल्या. असंख्य घरांना आणि गावांना निरामय करणाऱ्या ‘अनवाणी डॉक्टरांच्या साथी’ला हा निरोप अखेरचा ठरेल, अशी शंकासुद्धा त्या वेळी कोणाच्याही मनाला शिवली नव्हती.
मेडिकल कॉलेजमध्ये पाय टाकल्यावर अंगात पांढरा अॅप्रन आणि गळय़ात स्टेथोस्कोप येताच ‘डॉक्टर’ घडू लागतो. कित्येक जणांसाठी ‘पेशंट’ ही प्रयोगशाळेतील वस्तू वा ग्राहक होऊन पेशंटविषयी अनास्था, उपेक्षा व तुच्छता चढत्या भाजणीने वाढत जाते. १९८० साली औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारे अहंकारी अशा परिसरात अस्वस्थ होते. बाबा आमटे व अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या विचारांची दिशा बदलली होती. त्यांनी त्यांची ही बेचैनी कागदावर उतरवून काढली. ‘‘तुम्ही तुमच्या आईच्या गर्भाशयात वाढत होता, तेव्हा तुमच्यासाठी व तिच्यासाठी तपासणी केंद्राची सोय नव्हती. तुमची नाळ दगडाने ठेचली की विळय़ाने कापली, तिला टी.टी.ची इंजेक्शने मिळाली का हे तुम्हालाही माहीत नाही. त्याच वेळी कित्येक जण दगावले असतील. मात्र तुम्ही वाचला. अजूनही असं मरण तितकंच स्वस्त आहे. कारण उपचार महाग वाटावेत अशी अवस्था असणारे अधिक आहेत. त्यांना तसंच मरू द्यायचं असेल तर डोळे झाकून जगताय तसंच चालू द्या. हे बदलावं असं वाटत असेल तर उद्या संध्याकाळी हॉलमध्ये भेटा.’’ बेसावध क्षणी पाठीमागून धक्का मारल्यावर डोळय़ांसमोर काजवे चमकावेत अशी स्थिती अनेकांची झाली. ठरलेल्या वेळी हॉल विद्यार्थ्यांनी भरून गेला. बऱ्याच विद्यार्थ्यांचे तर्ककुतर्क ऐकून अहंकारी म्हणाले, ‘‘हे सरकारचं काम आहे, आता आपण केवळ शिकलं पाहिजे, अशी सबब सांगून आपण नामानिराळे होऊ शकतो. तसंच आपलं काम ठरवून, जवळच्या खेडेगावात जाऊन आपण रुग्णांना तपासू शकतो. त्यातून शिकू शकतो. कॉलराचा रोगी गावात जाऊन पाहिल्यावर रोगाची कारणं समजतील. आपलं निदान (डायग्नॉसिस) व सुधार (प्रोग्नॉसिस) समजू शकेल.’’ बऱ्याच मुलामुलींना ‘आरोग्य’ संकल्पनेचा साक्षात्कार झाला आणि यातूनच ‘हेल्थ अँड ऑटो लर्निग ऑर्गनायझेशन’ (हॅलो) संघटनेचा जन्म झाला. वैद्यकीय महाविद्यालयातील दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांचे विद्यार्थी सुटीच्या दिवशी औषधं घेऊन खेडय़ांकडे जाऊ लागले. समाजाची चांगली ओळख असणारा आणि समाजाविषयी संवेदनशीलता असणारा डॉक्टर तयार करणे हे ध्येय घेऊन ‘हॅलो’ची सुरुवात झाली.
‘हॅलो’चा दबदबा
कित्येक मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना गावाचा तिटकारा असतो. तर खेडय़ांतून आलेले काही विद्यार्थी खेडय़ांच्या वास्तवापासून दूर जाण्याच्या प्रयत्नात असतात. असे तऱ्हेतऱ्हेचे विद्यार्थी खेडय़ांतील वातावरणाला भिडू लागले. तेथील आहार, पाणी व सार्वजनिक स्वच्छता समजू लागली. अंगावर आजार कसा व का काढला जातो? प्रत्यक्ष भेटीमुळे भावी डॉक्टरांना सामाजिक जाणीव होऊ लागली आणि समाजाला वैद्यकीय भान येऊ लागलं. तरुणांमध्ये ‘आपण उदात्त कृती करतोय, अशी भावना निर्माण झाली की, त्यांच्यामध्ये दहा हत्तींचं बळ येतं.’ ही उक्ती वास्तवात दिसू लागली. रोग होऊ नये यासाठी कोणते प्रतिबंधक उपाय करावेत? ते कसे समजावून सांगावेत? रोगांबाबतच्या अंधश्रद्धा दूर कशा कराव्यात? यावर विद्यार्थ्यांमध्ये वादविवाद झडू लागले. ते खेळ, नाटक, गाणी व वृत्तचित्रं सादर करून सोप्या भाषेत आरोग्याचे शिक्षण घडवू लागले. प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचा पाया भक्कम होऊ लागला. विद्यार्थी आणि प्राध्यापकवर्गात ‘हॅलो’चा दबदबा निर्माण झाला. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ‘हॅलो’च्या मुशीतून बाहेर पडलेल्या सुमारे ५०० डॉक्टरांनी स्वत:चा ठसा उमटवला आहे. अशोक बेलखोडे, क्रांती व माधुरी रायमाने, विजय गायकवाड, संजय गायकवाड, आनंद निकाळजे, शिल्पा दोमकुंडवार, सरिता स्वामी, मिलिंद पोतदार व हणमंत वडगावे आदी ‘हॅलो’च्या शिलेदारांनी वैद्यकीय व्यवसायात नैतिकता जोपासून स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या सर्वानी किल्लारीच्या भूकंपानंतर ‘हॅलो’च्या कक्षा रुंदावण्याकरिता १९९३ साली ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’ची स्थापना केली.
भारतवैद्य, अनोखी संकल्पना
१९९० च्या दशकात शुभांगी व शशिकांत अहंकारी यांनी डेव्हिड वॉर्नर लिखित ‘डॉक्टर नसेल तेथे’ ही संकल्पना घेऊन अणदूर परिसरात ‘भारतवैद्य’ प्रकल्प चालू केला. ‘हॅलो’ने खेडय़ांतील उपेक्षितांमधील अतीव उपेक्षित एकल महिलांना प्राथमिक आरोग्यसेवा देण्यासाठीचं उत्तम प्रशिक्षण दिलं. त्यामुळे गावात कधी वर मान करून पाहून न शकणारी बाई स्टेथोस्कोप लावून हृदयाचे ठोके मोजू लागली. साध्या आजाराचे निदान करून औषध गोळय़ा देऊ लागली. तर गंभीर आजारासाठी मोठय़ा रुग्णालयात पाठवू लागली. गर्भवतीची काळजी कशी घ्यायची हे सांगू लागली. लसीकरण मोहिमेत सहभागी होऊ लागली. परिसर स्वच्छतेची निकड का आहे, हे पटवून त्यात पुढाकार घेऊ लागली. गावातल्या अनेक बदलांची ती दूत झाली. (यातूनच भारत सरकारच्या ‘आशा’- अॅक्रिडेटेड सोशल अॅक्टिव्हिस्ट या योजनेचा जन्म झाला) भारतवैद्य सुशीला हुकीरे (केशेगाव) यांच्या डायरीतील नोंद अशी होती. ‘‘..त्याला मळय़ात जुलाब झालेत समजल्यावर मी तिकडं गेले. चेहरा ओळखू येईना एवढा निरजीव होता. सुस्त, बोलता येत नव्हतं. मी ओ.आर.एस.(ओरल रिहायड्रेशन सॉल्ट) चं पाणी पाजलं. अँटासीड चोखायला दिलं. पेशंटला गाडी करून डॉ. अहंकारीकडे नेले. पेशंटची नाडी लागत नव्हती. त्याला सलाईन लाऊन दोन दिवस उपचार केल्यावर तो बरा झाला. डॉक्टर म्हणाले, माझ्या उपचारामुळे तो वाचला.’’
भारतवैद्यांनी क्षय, एड्सचं, इतकंच नाही कॅन्सरचंसुद्धा वेळीच व योग्य निदान केलं आहे. त्या भारतवैद्य झाल्या नसत्या तर गावकऱ्यांचा किती खर्च झाला असता? किती आजार बळावत जाऊन दुर्धर झाले असते? किती बळी गेले असते? याची अंकगणितातून मोजदाद करणे अशक्य आहे. भारतवैद्य नसणाऱ्या गावाकडे पाहिल्यास आरोग्याची उडालेली दैना पाहून याचा अंदाज बांधता येतो. कोविड काळात भारतवैद्यांनी १०० गावांत करोनाची तपासणी व आरोग्यसेवा पुरवली. गेल्या दहा वर्षांत ७० भारतवैद्यांनी ५० हजार रुग्णांवर उपचार केले. दोन हजार रुग्णांना संदर्भ सेवेसाठी पाठवले. सात हजार बाळंतपणे केली. ५० भ्रूणहत्या वाचवल्या. असं त्यांचं असामान्य कर्तृत्व. ‘अनवाणी डॉक्टर’देखील दाखवू शकतात, हे त्यांनीच सिद्ध केलं.
आरोग्य विम्याची सुविधा
शहरात ‘मेडिक्लेम’साठी विमा कंपन्यांची चढाओढ सुरू आहे. ‘थेट रुग्णालयात दाखल व्हा, उपचार घ्या आणि बिल कंपनी देऊन टाकेल,’ अशा सुविधा मध्यमवर्गीय व नोकरदारांना मिळत आहेत. खरी निकड असूनही असंघटित कष्टकरी मात्र या सोयीपासून वंचित आहेत. याची बोच वाटणाऱ्या अहंकारींना ‘युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी’च्या सहकार्यातून ६०० बचत गटांच्या सभासदांचा आरोग्य विमा उतरवला. कुटुंब आरोग्य विमा योजनेत १९९/- रुपयांत अपघात विमा, घरासाठीचा आग व भूकंपासाठीचा विमा यांचाही समावेश केला. या योजनेत वर्षभरात लाभधारकाला बाळंतपण व इतर कुठल्याही आजाराकरिता रुग्णालयात दाखल केल्यास पाच हजार रुपयांपर्यंतचा खर्च परत मिळू शकतो. वर्षांतून एकदा संपूर्ण शरीराची तपासणी मोफत करून मिळते. ही योजना गोरगरिबांसाठी संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग ठरली आहे. डॉ. अहंकारींनी अनेक व्यासपीठांवरून तिचा पाठपुरावा केल्यामुळे महाराष्ट्र राज्याने उस्मानाबाद, बीड व ठाणे जिह्यात आरोग्य विमा लागू करण्याचा पथदर्शी प्रकल्प हाती घेऊन त्याची सूत्रं ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’कडे सोपवली.
निरामय समाजासाठी..
खेडेगावात संपूर्ण हयात गेल्यामुळे अहंकारींना गावातील खाचाखोचांची बारकाईने जाण होती. अतिशय मृदू स्वभाव व व अंगभूत क्षमाशीलतेमुळे सर्वाना सोबत घेऊन जाणं हे त्यांच्यासाठी सहज शक्य होतं. संवाद तुटू न देता विरोधी व नकारात्मक मत असलेल्यांनासुद्धा आपल्या बाजूला वळवण्याचं विलक्षण कौशल्य त्यांच्याकडे होतं. त्यांच्यातील पारदर्शक प्रामाणिकपणामुळेच ते खेडोपाडय़ांत नकळत अनेक सामाजिक सुधारणा घडवू शकले. समग्र ग्रामीण विकास झाला तरच समाज निरामय होईल, याची त्यांना जाणीव होती. म्हणूनच त्यांनी एकाच वेळी अनेक आघाडय़ांवर कामे सुरू केली. त्यांनी ‘स्वत:च्या वा शेजारच्या घरातील हिंसा सहन करायची नाही. एकत्र येऊन बोलतं झालं की दु:ख हलकं होतं. वेगळे मार्ग सापडतात.’ याची प्रचीती अनेक वेळा आणून दिली. वेगवेगळे कार्यक्रम घेऊन ‘समजदार जोडीदारा’चा सन्मान केला. पुण्यातील ‘विज्ञानवाहिनी’च्या सहकार्यातून ‘विज्ञान केंद्र’ चालू केलं. तुळजापूर व लोहारा तालुक्यातील अनेक शाळा, विज्ञान समजावून घेण्यासाठी अणदूरला येऊ लागल्या. शाळेतील मुला-मुलींसाठीं निबंध स्पर्धा चालू केली. प्रत्येक गावात किशोरी मेळावे सुरू केले. मुलींना सायकली दिल्या. या सर्व बदलांमुळे घराघरांतून ‘मला शिकू द्या, आताच लग्न नको’ असे निर्धार ऐकू येऊ लागले. घरांतील व गावांतील वैयक्तिक व सार्वजनिक जीवनाची गुणवत्ता उंचावत गेली. दुसरीकडे बचत गटातून आर्थिक स्वावलंबन मिळवण्यासाठी महिलांची धडपड सुरू झाली. शेळीपालन, मिरची कांडप, पिठाची गिरणी, शेवयाचे यंत्र घेऊन व्यवसाय सुरू केले. रोपवाटिका, बियाणे-सेंद्रिय खत-कीटकनाशकांची निर्मिती, अळंबी, खाद्य व दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन यांमध्ये बचत गटांचा संचार सुरू झाला. आता ‘हॅलो’मय गावात कोणताही सरकारी अधिकारी, कुठलीही योजना आखताना, तिथल्या भारतवैद्य व बचत गटाच्या कार्यकर्त्यां यांचा सल्ला जरूर घेतात. ग्रामपंचायत निवडणुकीत ३८ पंच, पाच सरपंच आणि दोन पंचायत समितीचे सदस्य होण्याचा मान ‘हॅलो’च्या कार्यकर्त्यांना मिळाला होता. ‘हॅलो’च्या कार्यकर्त्यांना त्यांच्या भागात कमालीची प्रतिष्ठा लाभली आहे. त्या अनेक सार्वजनिक कार्यक्रमांत प्रमुख अतिथी असतात. स्वत:चा ‘स्वर’ गवसलेल्या या महिलांसाठी ‘हॅलो’ हे मुक्त विद्यापीठ आहे. म्हणूनच महिला मेळाव्याला स्वत:चा खर्च करून व सोबत भाजी-भाकरी बांधून चार-पाच हजार महिला सहज जमत. यापैकी प्रत्येकीच्या कहाणीचे साक्षीदार, शशिकांत व शुभांगी अहंकारी यांचा प्रत्येकीशी थेट व जिव्हाळय़ाचा संवाद आहे. शशिकांत विविध कामांसाठी गावोगावी फिरत असत. रुग्णालयाची कायमस्वरूपी जबाबदारी ही शुभांगींवर असे. अणदूर भागातील ५०-६० कि.मी. अंतरापासून रात्री-अपरात्री बाळंतपण, सर्पदंश व अपघाताचे रुग्ण येतात. हसतमुखाने व आस्थेवाईकपणे प्रत्येकावर उपचार करणाऱ्या शुभांगी म्हणजे या परिसराच्या ‘फ्लोरेन्स नाइटेंगल!’
मृत्युशय्येवर असतानाही शशिकांत यांच्या मनात एकल महिला व सार्वजनिक आरोग्याचाच विचार चालू असे. अर्थतत्त्वज्ञ प्रो. अमर्त्य सेन यांच्या शिष्या प्रो. जेनिफर रुगर यांच्या ‘ग्लोबल हेल्थ जस्टिस अँड गव्हर्नन्स’ या संकल्पनेची जगभर विलक्षण चर्चा चालू आहे. प्रो. जेनिफर म्हणतात, ‘‘सध्या अनेक देशांत आरोग्य सुविधा देताना ‘न्याय व समता’ या संकल्पनांचा विचारच केला जात नाही. मानवाची भरभराट करण्यासाठी स्थानिक व जागतिक पातळीवर उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध असणं अतिशय कळीचं आहे.’’ हा विचार पुढे कसा न्यावा? काही संस्थांना सोबत घेऊन १५ ऑगस्टच्या सुमारास महिला मेळावा आयोजित करावा व त्यात अशी मांडणी करावी, असं त्यांच्या मनात चाललं होतं. आता ‘हॅलो’ची पुढची पिढी तो भरवेल. अहंकारींचा वसा अनेक घरांतून व गावांतून चालू राहील.
atul.deulgaonkar@gmail.com